अविनाश बर्वे – उत्स्फूर्त उपक्रमशीलता

1
50
-heading

ठाणे येथील मो.ह. विद्यालयाच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात प्रथम नि.गो. पंडितराव आणि त्यांच्यानंतर अविनाश बर्वे या दोन शिक्षकांनी शाळेचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आणि इतर शिक्षक-विद्यार्थी व व्यवस्थापन यांना शाळेचा, शिक्षणाचा लळा लावला असा स्वच्छ निर्वाळा बर्वे सत्कार समारंभास जमलेले शिक्षक, व्यवस्थापक, विश्वस्त आणि ठाणेकर नागरिक यांनी दिला. यापेक्षा आणखी मोठा गौरव कोणा शिक्षकाला मिळू शकेल? ठाणे येथील ‘मो. ह. विद्यालय’ हे एक संस्कार केंद्र आहे. विद्यालयाची ती ओळख जपण्याची जबाबदारी शिक्षकांच्या सध्याच्या पिढीची आहे. बर्वेसरांच्या पंचाहत्तरीचा कार्यक्रम हे त्यासाठी एक निमित्त होते. नव्या शिक्षकांशी संवाद साधणे हा कार्यक्रमाचा महत्त्वाचा हेतू होता. तो सफल झाला. सारे सभागृह बर्वे सरांच्या चांगुलपणाच्या आठवणींनी भारावून गेले होते. शाळेच्या एकशेपंचवीस वर्षांच्या इतिहासात अनेक नामवंत शिक्षक होऊन गेले. मी त्या एकशेपंचवीस वर्षांपैकी किमान पंच्याहत्तर वर्षांच्या कालखंडाशी जवळून परिचित आहे. त्यांतील उपक्रमशील शिक्षक निवडायचे ठरवल्यास पहिले नाव नि. गो. पंडितराव सरांचे घ्यावे लागेल. त्यांच्या कारकिर्दीत ‘मो. ह. विद्यालया’चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ म्हणजे साहित्यिक पर्वणी असायची. त्यांच्या कारकिर्दीत मराठीतील सर्व नामवंत साहित्यिक व महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या मोठ्या व्यक्ती, केवळ पंडितरावसरांमुळे शाळेत येऊन गेल्या. त्यांची भाषणे ऐकण्याचा योग आम्हाला आला. त्यांनी आमच्यात मराठी भाषेची जाण निर्माण केली. आम्ही त्यांच्या तासाला मंत्रमुग्ध होणे म्हणजे काय असते ते अनुभवले.

पंडितरावसरांनंतर दुसरे शिक्षक निवडायचे असतील तर अविनाश बर्वे यांचेच नाव घ्यावे लागेल. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेकविध उपक्रम शाळेत राबवले. प्रथम म्हणजे प्रमुख पाहुण्यांना शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ देण्याची प्रथा पूर्णपणे बंद करून, त्याऐवजी नामवंत साहित्यिकाची साहित्यकृती देण्याची प्रथा निर्माण केली. प्रत्येक मुलाने व शिक्षकाने त्याच्या वाढदिवसाला एक पुस्तक शाळेस भेट देऊन शाळेचे ग्रंथालय समृद्ध ठेवण्याची परंपरा सुरू केली. एका उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांनी वाचलेले पुस्तक शाळेत आणायचे व विद्यार्थ्यांची तशी सर्व पुस्तके एकत्र करून त्यामधून प्रत्येक विद्यार्थ्याने न वाचलेले पुस्तक घरी न्यायचे अशी अभिनवता होती.

त्यांनी ‘ग्रंथाली वाचक चळवळ’ मुलांपर्यंत नेऊन पोचवली. त्यांनी वीस वर्षांहून अधिक काळ निरनिराळे उपक्रम ‘वाचक दिना’ला केले. त्यामध्ये एका वर्षी विद्यार्थ्यांना कविता करण्यास सांगितल्या. दुसऱ्या काही विद्यार्थ्यांनी त्यांनी रचलेल्या कवितांवर आधारित चित्रे काढली. ‘ग्रंथाली’ने त्यांतील निवडक कवितांचे पुस्तक प्रसिद्ध केले! एके वर्षी, विद्यार्थ्यांनी पावसावरील कवितांचा कार्यक्रम सादर केला. शांता शेळके, ग्रेस इत्यादींच्या कवितांवर आधारित कार्यक्रम; तसेच, म्हणी व वाक्प्रचार ह्यांवर आधारित कार्यक्रम केले. एके वर्षी, विवेकानंदांच्या जीवनचरित्रावर आधारित विविध नाट्यप्रवेश विद्यार्थ्यांनी सादर केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम; तसेच, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या जीवनावरील नाट्यप्रवेश सादर केले. गुलजार यांनी लिहिलेल्या ‘बॉस्कीच्या गोष्टी’ या पुस्तकांचे संच मुलांना देऊन मुलांनी त्या गोष्टींवर आधारित नाट्यप्रवेश सादर केले. मराठी माध्यमाच्या पन्नासपर्यंत शाळा त्या उपक्रमात सहभागी होत असत. त्या उपक्रमाची तयारी तीन-चार महिने सुरू असे. संबंधित शाळांना तीन-चार वेळा भेटी देणे- त्यांना उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे – उपक्रम करण्यासाठी जागेची निवड करणे; तसेच, त्या उपक्रमाचा भार ‘ग्रंथाली’वर पडू नये यासाठी प्रायोजक शोधणे…  ते सारे काम त्यांनी दरवर्षी सतत असे वीस वर्षें, श्रीधर गांगल यांच्या मदतीने केले. दुर्दैवाने, तो उपक्रम मागील वर्षीपासून बंद झाला आहे. माझी अशी इच्छा आहे, की ‘मो. ह. विद्यालया’ने त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी तो  उपक्रम परत सुरू करावा.

-avinash-barveअकरावी व बारावी इयत्तांचे कलाशाखेचे विद्यार्थी तसे दुर्लक्षित असतात. पण सरांनी त्यांच्यासाठीही उपक्रम राबवला. मुन्शी प्रेमचंद यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांनी अकरावी व बारावी इयत्तांच्या विद्यार्थ्यांकडून प्रेमचंद यांच्या गाजलेल्या हिंदी कथांचे मराठी रूपांतर करून घेतले. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हणे यांच्या उपस्थितीत रात्री बारा वाजता साजरा झाला तो केवळ बर्वेसरांमुळे! त्यामध्ये अबुबकर हिंदुस्थानात आला येथपासून सुरुवात करून इंग्रजांची राजवट व नंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतचा कालखंड रंगमंचावर नाट्यरूपाने सादर केला गेला. ते सर्व उपक्रम शंभर टक्के यशस्वी झाले, त्याचे कारण म्हणजे एखादा उपक्रम करण्याचे ठरवले म्हणजे बर्वेसर त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतात. उपक्रम जास्तीत जास्त चांगला व्हावा यासाठी तहानभूक विसरून, सर्वस्व पणाला लावतात. तो विषय कार्यक्रम होईपर्यंत सदैव त्यांच्या मनात घोळत असतो. तसेच, ते त्यांच्या सहकाऱ्यांना कधी गोड बोलून तर कधी आपलेपणाने दटावून त्या उपक्रमात सहभागी करून घेतात. आनंद नाडकर्णी यांचा ‘वेध’ हा दरवर्षी सादर होणारा उपक्रम सर्वांना माहीत आहे. बर्वेसरांनी त्याची मुहूर्तमेढ ह्याच शाळेत रोवली.

अविनाश बर्वे यांनी अशा तऱ्हेचे अनेकविध उपक्रम केले. त्या सर्व उपक्रमांचा आढावा घेण्याचे कारण त्यांपासून प्रेरणा घेऊन नव्या शिक्षकांनी विविध उपक्रम करावेत व ‘मो.ह. विद्यालया’ची संस्कार केंद्र ही प्रतिमा जपावी. परिस्थिती बदलत आहे. शिक्षकांच्या कामाचा व्याप वाढत आहे. त्यांना अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. हे सर्व मान्य करूनदेखील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिकवण्याव्यतिरिक्त असे उपक्रम करणे व त्यासाठी वेळ देणे जरूरीचे आहे. बर्वेसरांचा प्रत्येक कार्यक्रम यशस्वी झाला. त्याचे कारण त्यामध्ये त्यांचे शंभर टक्के प्रयत्न व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती हे होते. मला अशी खात्री आहे, की सध्याचे शिक्षक त्यातून प्रेरणा घेऊन नवनवीन उपक्रम शाळेत करतील.

– सुरेश रघुनाथ भिडे
suresh1005@yahoo.co.in 
 

About Post Author

1 COMMENT

  1. जयहिंद. मा. बर्वेसरांचे…
    जयहिंद. मा. बर्वेसरांचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे. जे करतील, ते मनापासूनच ह्या मनोवृत्तीचे नाव म्हणजे श्री. अविनाश बर्वे….

Comments are closed.