फलटणचा वसीमबार्री मणेर हा अवलिया कलावंत आहे ! कला हा त्याच्या जगण्याचा ध्यास आहे. तो चित्रपट दिग्दर्शक -निर्माता, लेखक, चित्रकार, चलचित्रकार, शिक्षक, प्रकाशक, बालसाहित्यिक, स्थापत्य विशारद अशा विविध क्षेत्रांत, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे मुशाफिरी करतो; सिनेनिर्मिती आणि लेखन कार्यशाळा घेतो…
फलटणचा वसीमबार्री मणेर हा अवलिया कलावंत आहे ! कला हा त्याच्या जगण्याचा ध्यास आहे. त्याच्या अंतःकरणात माणुसकीचा ओलावा आहे. त्यामुळे तो कलाकार असूनही एकटा राहत नाही तर सदैव माणसे जोडत असतो, त्यांचे मैत्र जपतो; आणि तरीही तो आयुष्य पणाला लावून स्वत:च्या अटी-शर्तींवर जगतो ! त्याच्या आयुष्याची, स्वच्छंदाची गणिते सर्वसामान्य माणसाला कळत नाहीत. तो चित्रपट दिग्दर्शक-निर्माता, लेखक, चित्रकार, चलचित्रकार, बालसाहित्यिक, प्रकाशक, स्थापत्य विशारद अशा विविध क्षेत्रांत, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे मुशाफिरी करतो; सिनेनिर्मिती आणि लेखन कार्यशाळा घेतो. गाडी चालवतो !
वसीम म्हणतो, “मला घडवले, माझ्या आयुष्याला पैलू पाडले ते फलटणच्या ‘कमला निंबकर बालभवन’ या आनंददायी शिक्षण देणाऱ्या शाळेने.” आनंददायी शिक्षणाची संकल्पनाही तेव्हा इकडे आली नव्हती, अमेरिकेतील शिक्षणतज्ज्ञ मॅक्सिन बर्नसन यांनी फलटणमध्ये चौकटीबाहेरचे शिक्षण देणारी ती शाळा सुरू केली होती. गरीब वस्तीतील मुलांना एकत्र करून त्यांना शाळेची गोडी लावावी हे त्या शाळेचे उद्दिष्ट. तेथे नियमित अभ्यासक्रम होता, पण चार भिंतींपलीकडील जगाचे दर्शनही होते. त्यामुळे वसीम मधील कलावंत घडण्यास तेथेच सुरुवात झाली. त्याला स्वामिनी रुद्रभटे या प्रयोगशील शिक्षिका लाभल्या. वसीम लहान वयातच लिहिता झाला व स्वतःच्या आनंदासाठी लिहू लागला.
मॅक्सिन मावशी अनेक प्रयोग करत. अमेरिकेतील काही मुले मराठी शिकण्यासाठी ‘स्प्रिंग ओरिएंटेशन कोर्स’मध्ये फलटणला येत. ती अमेरिकेतील मुले वसीमच्या वर्गात सहज मिसळून जात. परदेशातील मुले मराठी शिकत आणि फलटणची मुले इंग्रजी ! त्यामुळे वसीम इंग्रजी कधी बोलू लागला हे त्याचे त्यालाही कळले नाही. त्याचा भाऊ ताहेरनक्काश हादेखील त्याच शाळेत शिकला, घडला. दोन्ही भावंडे कलासक्त होती. ताहेर हादेखील वसीम बरोबर काम करतो. तो स्टुडिओत व प्रकाशन व्यवहारात अधिक लक्ष घालतो. ती दोघे फलटणचे भूषण आहेत. वसीमला सातवीत असताना पहिल्यांदा कॅमेरा हाताळण्यास मिळाला. त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन शाळेत वाढीस लागला. त्याला जात्या निसर्गाची आवड होती; त्यात त्याला चित्रकला आणि फोटोग्राफी या छंदांमुळे वन्यजीव शास्त्रज्ञ व्हावेसे वाटू लागले. त्याने शिकत असतानाच पैसे जमवून एक साधा कॅमेरा विकत घेतला. फलटणचा भाग दुष्काळी. उघडेबोडके -ओसाड माळ, माळावरची रानफुले असे अभावग्रस्ततेतील सौंदर्य त्याला आकर्षित करू लागले. त्याच्या कुंचल्यातून साकारलेली चित्र, लेखणीतून उतरलेली पात्रे आणि कॅमेऱ्याने टिपलेल्या प्रतिमा हे सगळेच अफलातून आहे ! माध्यम कोठलेही असो, वसीम कलेला, सौंदर्याला जन्म देऊ पाहत असतो. वसीमने, प्राणिशास्त्रात बी एस्सीपर्यंतचे शिक्षण उत्तम गुणवत्तेसह पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच त्याला पर्यावरणतज्ज्ञ इराच भरूचा यांच्या मार्गदर्शनाखाली गवताळ प्रदेशातील वन्यजीव प्रकल्पासाठी क्षेत्र सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तरीही तो विज्ञानाची वाट सोडून ज्या वैशिष्ट्यपूर्ण शाळेत शिकला त्या ‘कमला निंबकर बालभवन’मध्ये चित्रकला आणि शिल्पकला शिकवण्यासाठी दाखल झाला. त्याने पुण्याच्या रेवाचंद भोजवानी अकादमीच्या सहाय्याने पुण्यात घेण्यात येणाऱ्या कलाशिक्षण कार्यक्रमाचा समन्वयक म्हणूनही काम केले. त्या प्रकल्पासाठी ‘फाउंडेशन फॉर द आर्ट्स ऑफ बंगळुरू’ या संस्थेने निधी दिला होता.
त्याने पुण्यातील ‘विकसी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया स्टडीज’मध्ये मोशन पिक्चर फोटोग्राफीचे अल्पकालीन दोन अभ्यासक्रम 2003 आणि 2006 मध्ये पूर्ण केले. वसीम फोटोग्राफीचे शिक्षण घेऊन बंगळुरूमध्ये सेंटर फॉर एज्युकेशन अँड डॉक्युमेंटेशन (CED) या संस्थेत वन मॅन फिल्म युनिट म्हणून काम करण्यासाठी 2004-05 मध्ये रुजू झाला. त्याने तेथे शाश्वत विकास क्षेत्रातील तीन चित्रपट बनवण्यासाठी काम केले. तेथे आर्किटेक्ट- तत्त्वज्ञ लक्ष्मी रंगराजन कुमार यांचा वसीम यांच्यावर विशेष प्रभाव पडला. त्याच्या जगण्याची, विचार करण्याची दिशा बदलून गेली. तो त्याला जीवन तत्त्वज्ञानाची वैचारिक बैठक कुमार यांच्या सहवासात लाभली असे म्हणतो.
वसीम याच्या कॅमेर्याला हिरवळीपेक्षा पिवळ्या रखरखीत माळरानाचे मोठे कौतुक! त्याच्या अनेक चित्रीकरणातून तो पिवळा माळ प्रेक्षकांना दिसत असतो. ‘होऊ दे जरासा उशीर’ हा वसीम यांनी लेखन-दिग्दर्शन-निर्मिती केलेला पहिला पूर्ण लांबीचा, हटके विषयावरील कथा चित्रपट. त्याच्या पहिल्याच दृश्यात वसीम यांच्या कॅमेऱ्याने टिपलेल्या माळरानाचे दर्शन प्रेक्षकांना भारावून टाकते. चित्रपट 2012 मध्ये चित्रपटगृहात दाखल झाला, मात्र फारशी कमाई करू शकला नाही. परंतु त्याने प्रेक्षक, चित्रपट समीक्षक व जाणकार यांची मने जिंकली. तो मराठी चित्रपट त्या वर्षासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतीय चित्रपटांच्या मुख्य स्पर्धेत चर्चेत होता. वसीम त्या चित्रपटामुळे कर्जाच्या ओझ्याखाली गेला. त्याला एक कोटी तीस लाखांचे कर्ज झाले. ते फेडण्यासाठी आयुष्यातील महत्त्वाची पाच वर्षे घालवावी लागली असे तो सांगतो. त्याच्या आयुष्याची गणिते कळत नाहीत, ती अशी.
वसीम याने त्याच्या चित्रपट निर्मिती संस्थेचे नाव ‘बिरोबा फिल्म्स’ असे ठेवले आहे. त्याला माळावरचा बिरोबा कोठल्याही मॉडर्न नावे पेक्षा अधिक जवळचा वाटतो ! त्याच्या ‘होऊ दे जरासा उशीर’ या चित्रपटात सदाशिव अमरापूरकर, चिन्मय मांडलेकर, आदिती सारंगधर, ऐश्वर्या नारकर, शर्वरी जमेनिस, जयवंत वाडकर असे मराठीतील अव्वल कलाकार होते. त्याने ‘कापूस कोंड्याची गोष्ट, ‘हाक’, ‘आणि ती सहा पत्रं’ वगैरे चित्रपटांचे चित्रीकरण केले आहे. त्याने शिक्षण, वन्यजीवन यांवर आधारित दोनशे ते तीनशे माहितीपटांची निर्मिती केली आहे. तो त्याचे ‘बिरोबा फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड’ हे प्रॉडक्शन हाऊस कमिशण्ड फिल्म्स आणि स्वतंत्र निर्मिती यांसाठी चालवत आहे. त्याने बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी-BNHS (लक्षद्वीप सागरी जीवनाचे चित्रीकरण करण्यासाठी पाण्याखाली डायव्हिंग शिकणे), प्रगत शिक्षण संस्था-PSS, ग्राममंगल, क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट-क्वेस्ट यांच्यासाठी माहितीपट बनवले आहेत.
वसीम त्याच्या अनेकविध धडपडींतून सातत्याने करत असलेला एकमेव उद्योग म्हणजे तो पुण्यातील ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर म्हणून सिनेमॅट्रोग्राफीचे धडे विद्यार्थ्यांना देत असतो. जब्बार पटेल त्या विभागाचे प्रमुख आहेत.
वसीम याला स्त्रीपुरुष भेद, लैंगिक असमानता आणि सामाजिक अन्याय हे विषय कळकळीचे व चिंतेचे वाटतात. ते त्याच्या लिखाणातून, भाषणातून व सामाजिक उपक्रमांतून नेहमी जगासमोर येत राहिले. त्याचा पुणे येथे झालेल्या दुसऱ्या प्रादेशिक ‘मेन एंगेज’ परिषदेतील संवादात प्रमुख वक्ता म्हणून सहभाग होता. त्याने ‘महिला आणि त्यांचे चित्रपटातील प्रतिनिधीत्व’ या विषयावर परिसंवादात भाष्य केले. त्याचा दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या जागतिक ‘मेन एंगेज’ परिषदेतील परिसंवादात प्रमुख वक्ता म्हणून सहभाग होता. त्या परिषदेला जगभरातील चौऱ्याण्णव देशांतील पंधराशे प्रतिनिधी आले होते. वसीम ‘कन्सल्टेशन ऑन वुमन इन इंडिया-आर्टिक्युलेटिंग अ व्हिजन 2030’ या परिषदेमध्येदेखील 2013 मध्ये वक्ता होता.
‘झुम्कुळा’ हा वसीम याचा गाजलेला कथासंग्रह. बालसाहित्य हा त्याचा आवडता प्रांत आहे. मुलांसाठी जागतिक दर्ज्याचे बालसाहित्य निर्माण व्हावे यासाठी त्याने ‘दवात-ए-दक्कन’ ही प्रकाशन संस्था फलटण येथे सुरू केली. त्या संस्थेने आजवर बालसाहित्याची अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. वसीम मणेर याच्या ‘मौजे पुस्तक संच 1’ या पुस्तकास राज्य शासनाचा राजा मंगळवेढेकर उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी 2020 चा बालसाहित्य पुरस्कार मिळाला आहे. वसीम याची बालसाहित्यातील ‘म्हाताऱ्या नागिणीचा पत्ता’, ‘सुतकीवाले अण्णा’, ‘हेलिकॉप्टरला जेव्हा…’, ‘मौजे पुस्तक’, ‘पाहिला एकदा चहा बनवून’, ‘तुसतुशा’ आदी पुस्तके बालगोपाळांच्या विशेष पसंतीस उतरली असून त्यांतील चित्रे, छोटी छोटी वाक्ये अशी काही वैशिष्ट्यपूर्ण तंत्र यांच्यामुळे बालमनावर विशेष परिणाम साधला जातो. वसीम याच्याकडे अजूनही मुलांसाठी दहा पुस्तकांचे नियोजन तयार आहे. त्याला अजून खूप चित्रे काढायची आहेत. शिक्षण क्षेत्रात मोठे काम उभे करायचे आहे, चित्रपट निर्मितीत स्वतःची वेगळी पाऊलखूण निर्माण करायची आहे… अनेक मोठमोठी स्वप्न वसीम याच्या डोळ्यांत आहेत ! तो त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव धडपडत आहे, अस्वस्थ आहे…कलावंताला अस्वस्थतेचा शाप असतो असे उगीच म्हणत नाहीत !
वसीमचा विवाह झाला असून त्याची पत्नी हिना व मुलगा सादत असा त्याचा संसार आहे. त्याने मुलाचे नाव मंटो यांची आठवण म्हणून ठेवले आहे.
वसीमबारी मणेर 8888826275 mwaseem1@gmail.com
– किरण भावसार 7757031933 kiranvbhavsar1972@gmail.com
————————————————————————————————————————————–