अलिबागचा गोटीचा सोडा

1
150

माझे वास्तव्य 1966 सालानंतर अलिबागला झाले. तेथील चंगळ म्हणजे डेव्हीडचा गोटीचा सोडा, आईस्क्रीम सोडा अथवा आईस्क्रीम घेणे ही होती. बेने इस्त्राईल समाजाची काही कुटुंबे अलिबाग परिसरात राहिली होती. डेव्हीड कुटुंब हे त्या बेने इस्त्राईल समाजाचे. ते तिघे भाऊ होते आणि त्यांचे कुटुंब एकत्र राहत. त्यांचा पिठाच्या गिरणीचा व्यवसाय होता. तेथील मोकळ्या जागेत त्यांनी ‘सोडा वॉटर’ फॅक्टरी टाकली होती.

गोटीच्या सोड्याचा इतिहास बहुधा ब्रिटिश काळाला भिडणारा असावा. ड्यूक्सच्या सोड्याने त्याचे बस्तान महाराष्ट्रात बसवण्यापूर्वी खेडोपाडी गोटीचा सोडा प्रसिद्ध होता. त्याचे एक दुकान पोयनाडजवळच्या पळी गावाच्या फाट्यावर आहे. त्या सोड्याची लज्जत ज्यांनी पूर्वी अनुभवली आहे, ती मंडळी तेथे गाडी हमखास थांबवून त्याचा आस्वाद घेताना दिसतात. चोंढीनाक्यावरही जेथून कनकेश्वरला जाणारा फाटा फुटतो तेथेही डेव्हीडची फॅक्टरी होती असे आठवते.

गोटीचा सोडा रेवस धक्क्यावरही मिळत असे. गोटीच्या सोड्याच्या बाटल्यांचा आकार वैशिष्ट्यपूर्ण असे. साधारण सातआठ इंच उंच आणि अडीच इंच घेराची ती बाटली असे. तिचा वरचा एकदीड इंच भाग हा खास वेगळा असा, पण निमुळता असे. तेथे बाटलीच्या आतील बाजूला (लहान मुलांच्या खेळण्यातील गोटी (Marbel) घातलेली असे. गॅस असलेला सोडा यंत्राने बाटलीत भरल्यावर ती गोटी वर बाटलीच्या तोंडावर फिट्ट बसवली जाई. त्याकरता ती हवाबंद व्हावी म्हणून एक लाल रंगाची जाडसर गोलाकार रबरी रिंग बसवलेली असे. त्या बाटल्या अनेकदा हिरव्या रंगांच्या असत. सोडा पिण्याकरता ती गोटी बाटलीत खाली ढकलावी लागे. त्याकरता विशिष्ट पद्धतीचे लाकडी Opener मिळत असत.

प्राय: ‘गोटीचा सोडा’ इतिहासजमा झाला आहे. ‘गोटी सोडा’ भारतात बहुतेक सर्व ठिकाणी- शहरांमध्ये मिळत असे. पूर्वी मुंबईमध्येही तो मिळे. परंतु त्यावेळी मुंबईत वारंवार उसळणाऱ्या दंगलींत त्याचा हिंसक-स्फोटक असा वापर होत असल्यामुळे त्यावर बंदी आली. ‘गोटीचा सोडा’ ठाण्याध्ये; तसेच, नवी मुंबई-पनवेल येथे सोडासरबत गाड्यांवर सध्याही मिळतो.

– अनंत देशमुख 8689978744 dranantdeshmukh@gmail.com

1 COMMENT

  1. असा सोडा सगळीकडे मिळायचा ५०-६० वर्षांपूर्वी. ती खोटी दाबताना एक विशिष्ट आवाज येत असे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here