अरूण काकडे – पडद्यामागचा निष्ठावंत सूत्रधार

0
43
sutradhar5

काही माणसं वेगळ्या रसायनांनी बनलेली असतात. झोकून देणं म्‍हणजे काय हे त्‍यांच्‍याकडून बघून समजून घेता येतं. एखाद्या क्षेत्रात काम करणं वेगळं आणि त्‍या क्षेत्राला आपला सारा अनुभव, निष्‍ठा आणि वेळ देऊन वाहून घेणं वेगळं. मनोरंजन क्षेत्रातील अनेक चेहरे आपल्‍या ओळखीचे असतात, मात्र पडदा किंवा स्‍टेजच्‍या मागे अबोल, पण ठामपणे काम करणारे अनेक अनाम चेहरे आपल्‍या नजरेपलिकडेच राहतात. त्‍यांच्‍या नावावर आणि कामावर प्रसिद्धीचा प्रकाशझोत नसल्‍यानं ते लोकांसमोर येत नाही, पण त्‍यामुळे त्‍यांच्‍या कामाचं महत्‍व कमी होत नाही. प्रत्‍यक्षात त्‍यांनी त्‍यांच्‍या कामाचा डोलारा समर्थपणे सांभाळलेला असतो आणि त्‍याचा परिणाम म्‍हणून इतर व्‍यक्‍ती अधिक मोकळेपणानं कामं करू शकत असतात. अशाच पडद्यामागच्‍या एका महत्‍वाच्‍या सुत्रधाराचे नाव आहे, अरूण काकडे!

पडद्यामागचा निष्ठावंत सूत्रधार – अरूण काकडेअरूण काकडे यांना संपूर्ण नाट्यसृष्‍टी ‘काकडेकाका’ या नावाने ओळखते. काकडेकाका गेली साठ वर्षे नाटकांच्‍या सूत्रधाराची भूमिका वठवत आहेत. कलाकार बदलले, दिग्‍दर्शक बदलले, पण सुत्रधार तोच आहे. पडद्यामागचा हा सूत्रधार अतिशय ठामपणे आणि निष्‍ठेने कार्यरत आहे. म्‍हणून ‘अविष्‍कार’ ही संस्‍था गेली चाळीस वर्षे नाट्यव्‍यवसायात मानाने काम करत आहे. स्‍वतः प्रसिध्‍दीच्‍या प्रकाशझोताबाहेर राहून एखाद्या संस्‍थेसाठी अशा पद्धतीनं वाहून घ्‍यायचं, हे उदाहरण अपवादात्‍मक म्‍हणावं लागेल. नाटकाची निर्मिती करणारा किंवा संस्‍था चालवणारा माणूस व्यावसायिक रंगभूमीच्या संदर्भात प्रसिध्दीचा नसला तरी नाटकातून होणाऱ्या नफ्यातोट्याचा धनी असतो. लाभार्थी असतो. प्रायोगिक रंगभूमीवर मात्र अशा लाभाची अपेक्षा बाळगता येत नाही. असा कोणताही लौकीक लाभ नसताना काकडे यांनी साडेतीन तपाहून अधिक काळ संस्थात्मक कार्याचा डोलारा कौशल्यानं सांभाळला. आधी ‘रंगायन’ आणि नंतर ‘आविष्कार’. या दोन्ही संस्थांचा उल्लेख प्रायोगिक रंगभूमीच्या संदर्भात अग्रक्रमानं करावा लागतो. त्‍या संस्थांचं सुकाणू काकडेकाकांच्या हातात होतं.

सुरवातीचे दिवस

काकडेकाकांचा नाट्यव्‍यवसायाशी संबंध आला, त्‍याला पासष्‍टहून जास्‍त वर्षे लोटली. वडील तबलजी असले तरी घरी नाटकाचे संस्‍कार नव्‍हते. काकांनी शिक्षणासाठी दहाव्‍या वर्षी घर सोडलं. ते पुण्‍याला वाडिया कॉलेजमध्‍ये शिकत असताना भालबा केळकरांच्‍या संपर्कात आले आणि त्‍यांच्‍या ‘पीडीए’त त्‍यांनी चार वर्षे उमेदवारी केली. नाटक म्‍हणजे नुसतं तोंडला रंग लावून काम करणं नव्‍हे, तर त्‍याहूनही अधिक काही आहे – ही जाणीव, हे संस्‍कार द्यायचं काम पीडीएनं केलं. काकडेकाकांना त्‍याचा पुढच्‍या आयुष्‍यात खूप उपयोग झाला.

नाटककार विजया मेहतापुढे मुंबईत आल्‍यावर त्‍यांचा विजय तेंडुलकर , श्री. पु. भागवत, सुलभा-अरविंद देशपांडे या नाट्यकर्मींशी परिचय झाला. विजया मेहता तेव्‍हा ‘इंडियन अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टस’चं काम पाहायच्‍या. त्‍याही त्‍या ग्रुपमध्‍ये सामिल झाल्‍या. केवळ करमणुकीसाठी नाही तर काही विचाराने, एक चळवळ म्‍हणून गंभीरपणे नाटक करायला हवं, याबद्दल त्‍या सगळ्यांमध्‍ये एकमत होतं. त्‍यातून १९५७ साली ‘रंगायन’ची स्‍थापना झाली. ते नाव पु. शि. रेगे यांनी सुचवलं होतं. ‘रंगायन’चं पहिलं नाटक होतं. – ‘ससा आणि कासव’. ‘रंगायन’चे सगळे सभासद नाट्यवेडे होते. अशा वेळेस प्रयोगांची, त्‍यांच्‍या निर्मितीची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्‍न होता. काकडेकाकांनी ती जबाबदारी घेतली. तेव्‍हापासून सुत्रधाराची भूमिका त्‍यांच्‍याकडे आली ती आजतागायत.

सुलभा देशपांडेअरविंद देशपांडेविजयाबाई काही काळ जमशेदपुर आणि नंतर लंडनला गेल्‍यानं ­­संस्‍थेपासून दूर होत्‍या. त्‍यावेळी सगळी सुत्रं अरविंद देशपांडे यांच्‍याकडे होती. त्‍याच काळात म्‍हणजेच १९६७ ला ‘रंगायन’चं ‘शांतता, कोर्ट चालु आहे’ हे नाटक रंगभूमीवर आलं. मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेलं ते नाटक विजय तेंडुलकरांनी लिहिलं होतं. त्‍याचे दिग्‍दर्शक होते अरविंद देशपांडे. त्‍यात सुलभा देशपांडे यांची प्रमुख भुमिका होती. त्‍या नाटकानं ‘रंगायन’ला वेगळं आणि गंभीर नाटक करायचं आहे हे स्‍पष्‍ट झालं. पण त्‍या वेळी भारतात परतलेल्‍या विजयाबार्इ आणि अरविंद देशपांडे यांच्‍यात मतभेद झाले. त्‍या मतभेदांमुळे पुढे ‘रंगायन’ फुटली. तेव्‍हा काकडेकाका अरविंद देशपांडे यांच्‍यासोबत राहिले. त्‍यानंतर १९७१ साली ‘आविष्‍कार’ची स्‍थापना झाली. अरविंद आणि सुलभा देशपांडे यांच्‍याबरोबर तेंडुलकर, सत्‍यदेव दुबे हेही त्‍या संस्‍थेत होते. काकडेकाकांची भूमिका मात्र बदलली ना‍ही. आता तर त्‍यांना जिद्दीने स्‍थापन केलेली नवी संस्‍था रूजवायची होती. त्‍यामुळे त्‍यांनी अधिक जोमानं पडद्यामागची सुत्र संभाळली.

त्‍या काळात स्‍वतःतल्‍या कलाकारावर आपण अन्‍याय करतोय असं वाटलं नाही का, असं विचारल्‍यावर काकडेकाका म्‍हणतात, ‘‘स्‍वतःतील सृजनात्‍मक वाढ बाजूला ठेवून दुस-याच्‍या सृजनाचं पालनपोषन करणं ही साधी गोष्‍ट नाही. पण मला व्‍यक्‍तीप्रधान नाटक करायचं आहे की संस्‍थाप्रधान? हा प्रश्‍न जेव्‍हा माझ्यासमोर आला – तेव्‍हा मी संस्‍थाप्रधान नाटक निवडलं. कारण तसं काम जास्‍त टिकून राहु शकतं हे मला आत कुठेतरी जाणवलं. त्‍यामुळे माझ्यातला कलाकार मागं राहिला, पण संस्‍था पुढे गेली. आम्‍ही बाहेर पडल्‍यावर ‘रंगायन’ लवकरच बंद पडली. पण ‘आविष्‍कार’ मात्र गेली ऐकेचाळीस वर्षे सुरू आहे. हे या संदर्भात पुरेसं बोलकं आहे.’’

आविष्‍कारचा आधार

काकडेकाका ‘संस्‍था चालवणे’ हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेली साठ वर्षे कार्यरत आहेत. त्‍या काळात त्‍यांनी निर्मितीबरोबर प्रकाश योजना, सेट लावणं अशीही कामे केली आहेत. ‘कमी तिथं आम्‍ही’ या उक्‍तीप्रमाणे ते प्रसंगी तोंडाला रंग लावून एखाद्या भूमिकेतही उभे राहिले आहेत.

‘कृतार्थ मुलाखतमाले’मध्ये अरूण काकडे यांच्याशी संवादमुंबईतील प्रायोगिक चळवळीचे एक प्रणेते अरुण काकडे यांची प्रकट मुलाखत नाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे घेणार आहेत. हा कार्यक्रम शुक्रवारी, २२ मार्चला सायंकाळी ६.०० वाजता दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’, ‘ग्रंथाली’ आणि ‘वैद्य साने ट्रस्ट’ यांच्या वतीने कृतार्थ मुलाखतमालेमध्ये काकडे – पाथरे संवादगप्पांचे हे पुष्प आयोजित करण्यात आले आहे.

‘आविष्‍कार’ ही संस्‍था ऐकेचाळीस वर्षे सुरू असणे एवढंच तिचं वैशिष्‍ट्य नाही. तर त्‍या संस्‍थेनं नाट्यक्षेत्रासाठी ठोस कामही करून दाखवलं आहे. मराठी रंगभूमी पुढे नेण्‍यात या संस्‍थेचा मोठा वाटा आहे. अधिक महत्‍त्वाचं म्‍हणजे, संस्‍थेनं आपल्‍यासोबत इतर संस्‍था आणि कलाकारांनाही पुढं नेलं आहे. छबिलदास चळवळ हे त्‍याचं उत्‍तम उदाहरण. ‘आविष्‍कार’च्‍या तालमीसाठी छबिलदास शाळेचा हॉल मिळाला होता. त्‍या उपक्रमात ‘आविष्‍कार’नं इतर संस्‍थांनाही सामावून घेतलं. पुढे अनेक वर्षे छबिलदासच्‍या हॉलमध्‍ये अनेक नवीन प्रायोगिक नाटकांचे प्रयोग झाले, तालमी झाल्‍या, त्‍या संस्‍थांना एक व्‍यासपीठ उपलब्‍ध झालं. तो काळ ‘छबिलदास चळवळ’ म्‍हणून ओळखला जातो. त्‍यावेळी या क्षेत्रात मोठ्या संख्‍येने नवीन प्रयोग झाले. त्‍या चळवळीनं नाट्यक्षेत्राला अनेक रंगकर्मी दिले. त्‍यात ‘आविष्‍कार’ आणि काकडेकाकांचा मोठा वाटा आहे.

awishkar-logo‘आविष्‍कार’नं विशिष्‍ट विचारधारणेची नाटकं कधी केली नाहीत. त्‍या संदर्भात काकडेकाका सांगतात, ‘‘आमचा उद्देश या क्षेत्रात काहीतरी नवीन करावे आणि समाजाची अभिरूची वाढवावी असा आहे. तुमची जी काही राजकिय विचारसरणी असेल ती तुमच्‍यापाशी. थिएटर करताना तुमची बांधिलकी ही थिएटरशीच असली पाहिजे. स्‍वतः वैयक्तिक मतं तिथं डोकावली तर तुमच्‍यातलं नैतिक बळ कायम राहत नाही. ते प‍थ्‍य ‘आविष्‍कार’नं कायम पाळलं’’

नाट्यसृष्‍टीतली चाळीस वर्षे-

काकडेकाका गेल्‍या अनेक दशकांपासून निरनिराळ्या लोकांसोबत काम करत आहेत. त्‍यांचा त्याविषयीचा अनुभव कसा आहे, वेगवेगळ्या वयाच्‍या, विचारांच्‍या लोकांशी त्‍यांचं कसं जुळतं, असा प्रश्‍न विचारल्‍यावर काका म्‍हणतात, ‘‘मी कधी नॉस्‍टॅल्जिक होत नाही. ‘आमच्‍या वेळेस असं होतं’- हे वाक्‍य मी नवीन मुलांसमोर चुकुनही उच्‍चारत नाही. प्रत्‍येक पिढिची दृष्‍टी, विचार वेगळे असतात. मला त्‍यांना उपदेश करण्‍यापेक्षा त्‍यांच्‍या उत्‍साहाशी, त्‍यांच्‍या नवीन कल्‍पनांशी जुळवून घ्‍यायला अधिक आवडतं.’’

काकांचा सुमारे दोनशे नाटकांच्‍या निर्मितीत सहभाग आहे. त्‍या नाटकांचे हजारो प्रयोग झाले आहेत. काका बहुतेक प्रयोगांना स्‍वतः हजर असतात. त्‍या ऐंशी वर्षांच्‍या तरूणाचा प्‍लॅन पाहण्‍यापासून ते सेट लावण्‍यापर्यंत सगळीकडे संचार असतो. नाटकाच्‍या सृजनशीलतेतही त्‍यांचा तेवढाच उत्‍साही सहभाग असतो.

एवढ्या वर्षांत थिएटर कसं आणि किती बदललं याविषयी आपली मतं व्‍यक्‍त करताना ते सांगतात, की ‘‘बदल हा काळाचा स्‍थायीभाव आहे. नाटकाचा आशय, मांडणी काळानुरूप बदलतेय. पूर्वी नाटक रात्री सुरू होऊन पहाटेपर्यंत चालायचं. आता ते तीन अंकावरून दोन अंकावर, दीर्घांकावर आलं आहे. मुंबईत शेवटच्‍या गाड्यांचा विचार करून रात्री अकरानंतर प्रयोग सुरू ठेवता येत नाहीत. आजचं लिखाणही खूप बदललं आहे. तेंडुलकरांनी लेखनात जे वैविध्‍य दाखवलं ते आजच्‍या नाटककारांत दिसत नाही. त्‍यांच्‍या अनुभवानुसार ते लिहितात, पण त्‍यांची ताकद मर्यादित आहे. चेतन दातार हा अलीकडच्‍या काळातला खूप काही करू पाहणारा नाट्यकर्मी होता. मला आज इतक्‍या वर्षानंतर वयाच्‍या ऐंशीव्‍या वर्षीही नवीन प्रयोग करायला आवडतात. करून पाहू, असं माझं नेहमी म्‍हणणं असतं. पण तसं ते या तरूण मुलांचं असतंच असं नाही.’’

‘शांतता कोर्ट चालू आहे’ नाटकातील एक दृश्य ‘तुघलक’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘पाहिजे जातीचे’, ‘चांगुणा’, ‘गौराई’, ‘मिडिआ’, ‘रक्तबीज’, ‘सावल्या’ अशा अनेक उत्तम नाटकांची निमिर्ती ‘आविष्कार’ने केली. छबिलदासच्या प्रवाहात अनेक हौशी-प्रायोगिक नाट्यसंस्था सामिल झाल्या. त्यांना रंगपीठ उपलब्ध करून देण्याचे, दिशा देण्याचे काम काकडेकाकांनी केले. त्‍या काळातच प्रायोगिकवाल्यांनी त्‍यांना काका ही उपाधी दिली.

काकडेकाकांनी मराठी रंगभूमीला दिलेल्‍या योगदानाची दखल घेऊन वयाच्‍या पच्‍याहत्‍तरीत महाराष्‍ट्र सरकारने त्‍यांना सांस्‍कृतीक राज्‍य पुरस्‍कार देऊन सन्‍मानित केलं होतं. त्‍यांना ‘झी मराठी’ वाहिनीकडून 2010 साली जीवनगौरव पुरस्‍कार देण्‍यात आला.

काकडेकाकांनी आयुष्‍यभर अनेक नाटकं केली, त्‍यातली काही नेहमीसाठी त्‍यांच्‍या स्‍मरणात राहिली आहेत. ‘शांतता, कोर्ट चालू आहे’ ला त्‍यांच्‍या मनात खास जागा आहे. ‘तुघलक’चा उल्‍लेखही ते आवर्जुन करतात. चाळीस वर्षांपूर्वी एवढ्या मोठ्या संख्‍येनं कलाकार असलेल्‍या त्‍या नाटकाचे ‘आविष्‍कार’ने पंच्‍याहत्‍तर प्रयोग केले होते. त्‍यानंतर त्‍या नाटकाला पुन्‍हा कुणी हात लावू शकलेलं नाही. ‘अरूण सरनार्इक यांच्‍यासारख्‍या-तेव्‍हा चित्रपटांत व्‍यस्‍त असलेल्‍या कलाकारानं तीन-चार चित्रपटांचे करार रद्द करून त्‍या नाटकासाठी वेळ दिला होता.’ अशी आठवण ते सांगतात. असंच एक मनाच्‍या जवळचं नाटक आहे – महेश एलकुंचवारांची त्रिनाट्यधारा. ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्‍न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’ या सलग सुमारे साडेआठ तास चालणा-या तीन नाटकाचं दिग्‍दर्शन चंद्रकांत कुलकर्णींनी केलं होतं. कोण देणार एवढा वेळ नाटक बघायला? असं म्‍हणत लोकांनी तेव्‍हा मला वेड्यात काढलं होतं. ’’ काकडेकाका सांगत असतात, ‘‘पण एलकुंचवारांना ते नाटक सलगच करायचं होतं. दुसरं कुणीही ते तसं करू धजलं नाही. तेव्‍हा मी म्‍हटलं, लेखकाला ते नाटक जसं करायचंय तसंच आपण करू. त्‍यातून संस्‍थेला फायदा झाला नसेल. पण ते नाटक मराठी रंगभूमीवरचं पारदर्शी नाटक म्‍हणून ओळखलं जातं. याचं महत्‍व कसं नाकारणार?’’

कामावरची निष्‍ठा-

इतक्‍या वर्षांनी मनात काही खंत राहून गेली आहे का? असं विचारल्‍यावर काकडेकाका म्‍हणाले, ‘सरकारने वेगळ्या प्रयोगांसाठी मदत केली पाहिजे आणि ती कर्तव्‍य म्‍हणून केली पाहिजे. आज प्रायोगिक नाटकांना तालमीसाठी जागा नाहीत, प्रयोग करायला थिएटर्स नाहीत याकडे लक्ष पुरवलं गेलं पाहिजे,’ असं ते आग्रहाने सांगतात.

आज फक्‍त नाटक हे उपजिवीकेचं साधन होत नाही. अनेक प्रलोभनं आहेत. त्‍यामुळे कलाकार टिकत नाहीत याची काकडेकाकांना खंत आहे. पण त्‍यांना त्‍याहीपेक्षा मोठी खंत वाटते, ती कामावरची ध्‍येयनिष्‍ठा हा टिंगल टवाळीचा विषय झाला आहे याची. ते म्‍हणतात, ‘इतक्‍या वर्षांत इतके रंगकर्मी उभे राहिले पण माझ्यासारखं काम दुस-या कुणी केलं नाही याचा विषाद वाटतो. एक नाटक केलं, की आजच्‍या मुलांचा बायोडाटा तयार होतो. मी इतकी वर्षे या व्‍यवसायात आहे, मात्र माझा बायोडाटा अजूनही तयार नाही.’

काकडेकाकांकडे एवढी वर्षे ज्‍या नाटकांचे हजारो प्रयोग केले त्‍या सगळ्यांच्‍या नोंदी आहेत. त्‍यांनी त्‍या अनुभवांवर लिहावं म्‍हणून श्री.पु.भागवत, तेंडुलकर यांनी खूप आग्रह केला. पण काकडेकाकांना ते जमलं नाही. कारण त्‍यांना त्‍यासाठी वेळच नाही. ते आजही दिवसातले पंधरा-सोळा तास काम करतात. काकडेकाका म्‍हणतात, ‘मी चर्चा करत नाही. मी दुस-यांच्‍या चर्चा एकतो आणि त्‍यातलं आवश्‍यक ते घेतो. आज थिएटर करणं खूप कठीण झालय. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्‍ट्याही. कारण काही झालं तरी पैशाचं सोंग तुम्‍ही कसं आणणार? या क्षेत्रात टोकाचे अहंभाव असतात. त्‍याला तोंड द्यायला, पचवायला मानसिक ताकद लागते. मी ती ताकद शांत राहून मिळवतो. नाटक ही सतत करत राहण्‍याची गोष्‍ट आहे. मी हे गेल्‍या साठ वर्षांच्‍या अनुभवांतून शिकलोय. तेच करत राहावं एवढीच इच्‍छा आहे.’’

– सीमा भानू

About Post Author