पुढारी मंडळींना नेहमी प्रकाशात राहवे लागते. अन्यथा लोक त्यांना विसरून तर जाणार नाहीत ना, अशी चिंता त्यांना सतत लागून राहिलेली असते. त्यामुळे अनेक जण त्यांचे नाव लोकांच्या लक्षात नेहमी येत राहील यासाठी प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग करून घेत असतात. वाढदिवस ही पुढाऱ्यांना प्रसिद्धीची मोठीच संधी असते. त्यांच्या वतीने त्यांच्या अनुयायांनादेखील त्यावेळी मोठा वाव असतो. मग त्यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणाऱ्या जाहिराती अनेक ठिकाणी झळकतात. अभीष्टचिंतन हा शब्द, आभीष्टचिंतन असा लिहून चालणार नाही. अभीष्ट हा या शब्दातील घटक अभि+इष्ट या दोन भागांचा मिळून बनतो. भि मधील ‘इ’ आणि इष्ट मधील ‘इ’ एकत्र येऊन त्यांचा ‘ई’ बनतो व म्हणून अभीष्ट असे रूप प्राप्त होते. ‘इष्ट’ दिशेने जाणारे असा त्या ‘अभी-इष्ट’चा (म्हणजे अभीष्टचा) अर्थ आहे. आपले चिंतन (म्हणजे मनातील विचार) असे इष्ट दिशेने जाणारे हवे!
ऋत आणि सत्य
ऋत म्हणजे सत्य. त्यामुळे अनृत (अन्-ऋत) म्हणजे असत्य, सत्यासत्य (सत्य व असत्य) आणि ऋतानृत (ऋत व अनृत) असे शब्द आहेत. परंतु ऋत आणि सत्य यांच्यात थोडा फरक आहे. ऋत म्हणजे वैश्विक रचनेतील घटित; जे खरोखर आहेच, ज्याच्या अस्तित्वाबद्दल शंका नाही असे. सत्य म्हणजे जे घडले आहे! जे अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. ऋत हे ईश्वरीय, तर सत्य हे मानवीय असते.
– म.बा.कुलकर्णी gjcrtn@gmail.com
(‘शब्दचर्चा’ वरून उद्धृत संपादित -संस्करीत)