मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले नट विवेक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘अभिनेता विवेक’ या नावाचे एक पुस्तक भारती मोरे यांनी पुढाकार घेऊन संकलित केले आहे. त्या कामी त्यांना प्रभाकर भिडे, रविप्रकाश कुळकर्णी व प्रकाश चांदे या मंडळींचे संपादकीय साहाय्य लाभले. त्यांनी अनेक मंडळींच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या आठवणींतून; तसेच, तत्कालिन वर्तमानपत्रांच्या कात्रणांतून विवेक यांचा आयुष्यक्रम रेखाटला आहे. विवेक यांनी १९४४ पासून १९८१ पर्यंत शहात्तर चित्रपटांत काम केले. त्यांचे १९५३ साली आलेले ‘देवबाप्पा’ (दिग्दर्शक राम गबाले) आणि ‘वहिनींच्या बांगड्या’ (दिग्दर्शक शांताराम आठवले) हे चित्रपट खूपच गाजले. त्यानंतर लगेच, १९५४ साली आलेल्या ‘पोस्टातील मुलगी’ (दिग्दर्शक राम गबाले) या चित्रपटामुळे विवेक यांचे नाव मराठी मध्यमवर्गीय घराघरांत पोचले. विवेक यांचे ‘सुहासिनी’ व ‘देवघर’ (दिग्दर्शक राजा परांजपे), ‘दिसतं तसं नसतं’ (दिग्दर्शक दिनकर द. पाटील), ‘माझं घर माझी माणसं’ (दिग्दर्शक राजा ठाकूर), ‘पतिव्रता व कलंकशोभा’, ‘नसती उठाठेव’, ‘थांब लक्ष्मी, कुंकू लावते’ (दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी), अवघाची संसार (दिग्दर्शक अनंत माने), ‘ओवाळिते भाऊराया’ (दिग्दर्शक दत्ता केशव), ‘नाव मोठं लक्षण खोटं’ (दिग्दर्शक मुरलीधर कापडी) हे काही चित्रपट लोकप्रिय झाले.
विवेक यांचे मूळ नाव गणेश भास्कर अभ्यंकर. त्यांचा जन्म अलिबाग येथे २३ फेब्रुवारी १९१८ ला झाला आणि ते ९ जून १९८८ ला मरण पावले. त्यांना चित्रकला आणि क्रिकेट या दोन गोष्टींची विशेष आवड होती. चित्रकलेचे शिक्षण घेतल्यानंतर ते ‘प्रभात फिल्म कंपनी’मध्ये चित्रकलेचे काम करण्यासाठी म्हणून गेले आणि तेथे त्यांची निवड चित्रपटातील कामासाठी झाली! तेथपासून अभिनय हीच त्यांची करियर ठरून गेली.
संपादक मंडळींनी ‘अभिनेता विवेक’ या पुस्तकामधून त्यांचा व्यक्ती आणि कलाकार म्हणून लेखांमधून वेगवेगळा उत्तम परिचय करून दिला आहे. सुलोचना, रमेश देव यांच्यासारख्या मान्यवरांनी त्यांच्याबद्दल लिहिले आहे. बाळ कुडतरकर तर त्यांचे कॉलेजातील वर्गमित्र. अशा विविध आठवणींमधून विवेक यांचे जे चित्र उभे राहते ते एक सरळसाधे सात्त्विक व्यक्ती म्हणून. चित्रपटासारख्या ग्लॅमरस क्षेत्रात राहूनदेखील ते साधे गृहस्थी जीवन जगले. सर्वसामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीसारखे वागले. त्यांचे देखणेपण सगळ्यांच्याच नजरेत भरे. किंबहुना, त्यासाठी त्यांची तुलना काही वेळा हिंदीतील प्रदीपकुमारशी केली जाई, की चेहरा देखणा पण अभिनयाच्या नावाने शून्य! परंतु या पुस्तकातील लेख वाचत असताना विवेक यांनी मराठी प्रेक्षकांवर कसे गारूड केले होते त्याचा प्रत्यय येतो. पुस्तकातील सगळ्यात हृद्य संदर्भ आहे तो कुसुमाग्रजांनी विवेक यांना दिलेल्या श्रेयाचा. कुसुमाग्रजांनी म्हटले आहे, की मी य.गो. जोशी यांच्या कथेवरील चित्रपट म्हणून ‘वहिनींच्या बांगड्या’ पाहिला. परंतु त्यामुळे मला चित्रपट पाहण्याचे व्यसनच लागले. त्यांनी त्या चित्रपटातील विवेक यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
विवेक यांच्या पत्नी लीला अभ्यंकर यांचे माहेरचे नाव लीला मुळे. त्या ठाण्याच्या. त्यांची आई चिंगुताई स्वातंत्र्यसैनिक होती व त्यांचे नाव स्वातंत्र्यसैनिक म्हणून ठाण्यात फलकावर लागलेले आहे. तसे पुस्तकात नमूद आहे. लीला अभ्यंकर यांच्याबद्दल पुस्तकात हळवा संदर्भ आहे. तो असा, की विवेक यांना सिनेमा-नाटकांतील कामे मिळणे कमी झाल्यावर त्यांना ओढग्रस्त स्थिती आली. तशा परिस्थितीत, लीला अभ्यंकर यांनी पापड-मसाले करून, ते विकून संसाराला हातभार लावला. विवेक यांचे निधन १९८८ मध्ये झाले. लीला अभ्यंकर २२ ऑगस्ट २००९ रोजी मृत्यू पावल्या.
विवेक त्यांच्या सरळमार्गी स्वभावामुळे विस्मरणात गेले होते. भारती मोरे यांनी पुढाकार घेऊन हे पुस्तक निर्माण केले व त्यामुळे विवेक आणि त्यांचे चित्रपट या संबंधातील आठवणींना उजाळा मिळाला.
– प्रतिनिधी