अभिजात साहित्य आणि अभिजात वाचक या वेगवेगळ्या गोष्टी आहेत; तरीदेखील ज्याच्या वाचनात अधिकाधिक ग्रंथ येतात तो अभिजात वाचक असे म्हणता येईल अशी सुटसुटीत व्याख्या प्रसिध्द लेखक-आस्वादक संजय भास्कर जोशी यांनी ‘अभिजात वाचकाच्या शोधात’ या विषयावरील दिवसभराच्या चर्चासत्रात केली. त्या ओघात अभिजाततेचा अनेकांगांनी विचार घडून आला. त्यामध्ये अरुण साधू, सतीश काळसेकर, अशोक नायगावकर, दिनकर गांगल, रविप्रकाश कुलकर्णी असे ग्रंथव्यवहारामधील अनुभवी लोक सहभागी झाले. चर्चासंचालन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. दीपक पवार यांनी केले. के. ज. पुरोहित व सुनील कर्णिक चर्चासत्रास पोचू शकले नाहीत. त्यांनी पाठवलेली टिपणे वाचून दाखवण्यात व प्रसृत करण्यात आली.
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल आणि ‘सानेकेअर’ यांच्या वतीने खोपोलीजवळच्या ‘माधवबागे’त हे चर्चासत्र घडून आले. या दोन संस्थांनी दर महिन्याच्या चौथ्या रविवारी ‘माधवबागे’मध्ये वेगवेगळ्या विषयांवर दिवसभराचे सखोल ‘विचारमंथन’ करण्याचे योजले आहे.
साधू-काळसेकरांनी त्यांच्या वाचनानंदाचे अनेक अनुभव सांगितले. काळसेकर म्हणाले, की मी ‘ब्रदर्स कारामॉझॉव्ह’ कित्येक काळ दोनशे पानांपुढं वाचू शकलो नव्हतो. शेवटी रजा काढून ती पूर्ण केली आणि त्यानंतर जो आनंद झाला, तो कित्येक दशके झाली तरी संपत नाही! साधू यांनी टॉलस्टॉय , गॉर्की यांच्या कादंबर्यांचे तसेच उल्लेख केले आणि पुढे ते म्हणाले, की अमेरिकन फिक्शन ही आपल्याला तेथील जीवनाचे सूक्ष्म तपशील पुरवते व त्यामुळे नवी दृष्टी लाभते. पण म्हणून त्यांना अभिजात ग्रंथ म्हटले जात नाही, त्यामुळे अभिजात शब्द फसवा व गोंधळ निर्माण करणारा ठरू शकतो.
तथापी खिळवणा-या पुस्तकापासून वाचकाच्या कल्पनाशक्तीला खाद्य पुरवणा-या ग्रंथापर्यंत सर्व तर्हेचे वाङ्मय वाचत जावे, त्यामधून वाचकाची अभिरूची घडत जाते व तो अभिजाततेच्या पातळीपर्यंत पोचू शकतो असे सर्व सहभागीदारांच्या चर्चेमधून निष्पन्न झाले.
‘ग्रंथसखा’ श्याम जोशी यांनी वाचकाने त्याची वाचनाची इयत्ता कोणती ते प्रथम ठरवावे असे बजावले. त्यांनी वाचनसाक्षरतेची गरज प्रतिपादन केली. त्यांनी ग्रंथालयांमधील अनास्थेचे अनेक अनुभव सांगितले व ते म्हणाले, की वाचनालयात काऊन्सेलरची गरज आहे. तो वाचकाला चांगल्या वाचकापर्यंत घेऊन जाऊ शकेल. त्यावर काळसेकर उद्गारले, की तेच तर ग्रंथपालाचे काम आहे. याच संदर्भात राजा पटवर्धन यांनी माणसांची जिज्ञासा जागृत करणे व त्यांना वाचकास प्रवृत्त करणे कसे शक्य आहे ते सांगितले.
संजय भास्कर जोशी यांनी अभिजात ग्रंथाची लक्षणे सांगितली. ते म्हणाले, की ग्रंथास अभिजातता सामाजिक व वैयक्तिक चिरंतनतेमधून येते. अभिजात ग्रंथ अनिर्णायक व सूचक असतो, तो जगण्याची जाण समृध्द करतो आणि अशा ग्रंथाच्या वाचनात वाचकाचा प्रातिभ सहभाग घडत जातो. ते म्हणाले, की वाचकाची ज्या ग्रंथाच्या वाचनातून आपण लेखकापेक्षा दोन पावले खालच्या पायरीवर आहोत अशी भावना होते तो ग्रंथ उत्तम वाटला तरी तात्कालिक स्वरूपाचा मानावा. उलट, अभिजात ग्रंथाची निर्मिती घडत असताना लेखकाला त्याच्यापेक्षा वाचक दोन पावले उंचावर असल्याची भावना होते. वाचनानंदाची प्रत व त्यानुसार वाचकांचे जाळे असे सूत्र ठेवून, जगभरच्या मराठी वाचकांचे, रसिकांचे, छांदिष्टांचे ‘नेटवर्क’ करण्याची योजना ‘झिंग’ सायबर क्लब या नावाने आखली गेली असल्याचे दिनकर गांगल यांनी जाहीर केले. त्यामध्ये ‘माधवबाग’ व ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ हे एकत्र काम करतील असेही त्यांनी घोषित केले.
दीपक पवार यांनी आधुनिक तंत्रसाधने व माध्यमे वापरून, इतर माध्यमांबरोबर वाचनाचे माध्यमदेखील बळकट करता येईल असे सुचवले तर सुधीर बडे यांनी ग्रंथालय मित्रमंडळे निर्माण करून सांस्कृतिक वातावरण समृध्द करता येईल असे सांगितले व त्यांची योजना मांडली. ‘माधवबागे’चे अतुल भिडे, किरण भिडे व डॉ. यश वेलणकर यावेळी उपस्थित होते. अशोक नायगावकर कोमसाप संमेलनाचे अध्यक्ष निवडले गेले याबद्दल त्यांचा अतुल भिडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नायगावकर म्हणाले, की हा मला घरचाच सत्कार वाटत आहे!
नोव्हेंबरच्या चौथ्या रविवारी, २५ तारखेला ‘चित्रकलेचे बाजारीकरण’ या विषयावर ‘विचारमंथन’ होणार असून, त्यामध्ये सुहास बहुलकर, ज्योत्स्ना कदम, सतीश नाईक, माधवी मेहेंदळे हे कलाकार सहभागी होणार आहेत.
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.