अभिजात दर्जा मिळाला… आता पुढे काय?

0
119

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरवलेले होते. 2004 मधील निकष 2005 मध्ये सुधारित करण्यात आले. त्यानुसार –       

  1. भाषा प्राचीन असावी आणि त्यात श्रेष्ठ दर्जाचे साहित्य निर्माण झालेले असावे.
  2. त्या भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे.
  3. त्या भाषेला भाषिक आणि वाङमयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे.
  4. प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा.

हे चार निकष जी भाषा पूर्ण करेल, त्या भाषेला हा अभिजाततेचा दर्जा मिळतो. त्यानुसार आतापर्यंत प्रारंभी तमिळ (2004) आणि संस्कृत (2005) भाषेला असा दर्जा मिळाला.

त्यानंतर तेलुगु (2008), कन्नड (2008), मल्याळम (2013) आणि उडिया (2014) याही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हे निकष 2024 मध्ये सुधारित करण्यात आले. त्यानुसार मराठीसोबत पाली, प्राकृत, बांगला आणि आसामी या भाषांनाही हा अभिजात दर्जा देण्यात आला. नवीन (2024) सुधारित निकष पुढीलप्रमाणे –

  1. त्या भाषेचा दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन नोंदीकृत इतिहास असावा आणि त्या काळात साहित्यनिर्मिती झालेली असावी.
  2. प्राचीन साहित्य / ग्रंथांचा एक संग्रह, ज्याला त्या भाषकांच्या पिढ्या स्वतःचा वारसा मानतात.
  3. ज्ञानग्रंथ, विशेषत: गद्यग्रंथ, याव्यतिरिक्त कविता, पुरालेखीय आणि शिलालेखीय पुरावे.
  4. ही अभिजात (शास्त्रीय) भाषा आणि त्यातील साहित्य त्या भाषेच्या सध्याच्या स्वरूपापासून वेगळे असू शकते किंवा त्याच्या शाखांच्या नंतरच्या प्रकारांशी विसंगत असू शकते.

हाल या सातवाहन राजाच्या काळात लिहिला गेलेला ‘गाथासप्तशती’ हा एकमेव ग्रंथ उपलब्ध आहे. या इसवी सन चौथ्या-पाचव्या शतकातील संकलित ग्रंथातील माहाराष्ट्री प्राकृत ही भाषा मराठीचे आद्यरूप आहे, असे महाराष्ट्राने अभिजात भाषेच्या अहवालात नोंदवले आहे. त्या काळातील भाषेच्या स्वरूपाच्या उदाहरणादाखल त्यातील ही एक गाथा पाहू –

अवलंबिअ-माण-परम्मुहीऍ एंतस्स माणिणि ! पिअस्स ।
पुट्‌ठ-पुलउग्गमो तुह कहेइ संमुहटिठ्‌अं हिअअं ।। 1 : 87 ।।

(हे मानिनी! प्रियकर आल्याबरोबर तू क्रोधाने पाठ फिरवलीस परंतु तुझ्या पाठीवर उभे राहिलेले रोमांच तुझे हृदय त्याच्या सन्मुख आहे, असे दाखवतात. vishwakosh.marathi.gov.in/22235/)

या गाथेचा अर्थ लावण्यासाठी संस्कृतचा आधार घ्यावा लागतो. म्हणजेच या माहाराष्ट्री प्राकृताचा आणि मराठीचा सांधा थेट जोडता येत नाही. त्यासाठी संस्कृतचा संदर्भ आवश्यक ठरतो. तसेच, एक समांतर उदाहरण ‘मिसळपाव’ या संकेतस्थळावर मिळते. तेथे कोणा प्रचेतस नामक व्यक्तीने पुण्याजवळ मावळ तालुक्यातील बेडसे लेणीतील इसवी सन सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचा प्राकृत भाषेतील शिलालेख उदाहरणासाठी ठेवला आहे.

    भाषा –प्राकृत                                                 संस्कृत रूप

सिधं धेनुकाकडे वायवस                               सिद्धम् धेनुकाकटे वास्तव्यस्य
हालकियस कुडुबिकस उसभ                                  हालिकीयस्य कुटाम्बकस्य ऋषभ-
णकस कुडुबिणिय सिअगुत                            णकस्य कुटुम्बिन्या: श्रीयगुप्ति –
णिकाय देयधमं लेणं सह पुते                          निकाया देयधर्मो लयनम् सह पुत्रे
ण णंद गहपतिणा सहो                                           ण नंद गृहपतिना सहो||

मराठी अर्थ : सिद्धी असो, धेनुकाकट येथे वास्तव्य करणारी ऋषभणकाची पत्नी श्रीयगुप्ती हिने घरमालक असलेल्या पुत्र नंदासह दान दिलेले हे लेणे.

आता हा शिलालेख मराठीपेक्षा संस्कृत भाषेला खूप जवळचा आहे हे तर दिसतेच आहे.(www.misalpav.com/node/23896) अशी अनेक उदाहरणे देता येतील.

इसवी सन बाराव्या शतकातील महानुभाव वाङ्मयाचे एक उदाहरण – “नरींद्रबासां भेटि: अनुसरणः नरेंद्र कवि: साल कवि: नृसिंह कवि” हे तिघे भाऊ: नृसिंह कविन नलोपाख्यान केले: साल कविन रामायण केले: ते आपुलाले रामदेवरायापुढां म्हणितले: तेथ नरेंद्र कवि बैसले होते: (ते त्यांना म्हणाले) यैसा द्वारकेचा रामहाठु वर्णितेती तरी तुमचे या पापा पुरश्चरण होते: ऐसे रायांदेखतां निभर्षिले:” – या लीळेतील सर्व शब्दांचा अर्थ कळत नाही. पण मराठीच बोलतोय इतपत तरी समजते. कुवलयमालेत मराठी बोलल्याचा उल्लेख “दिण्हले, गहिल्ले” असा आहे, तो समजून घेता येऊ शकतो. पण माहाराष्ट्री प्राकृताला हे इतके लागू पडत नाही. तो लेण्यांतील शिलालेख असो किंवा गाथासप्तशतीतील कविता असो (www.misalpav.com/). त्याचबरोबर इसवी सन 1290 मधील ज्ञानेश्वरीतील कोणतीही एक ओवी निवडा आणि तुमच्या परिसरातील कोणाही मराठी माणसाला ऐकवा. त्याला त्या ओवीचा अर्थ सांगता येतो का ते पाहा. बऱ्याचदा ओवीच्या स्वरूपावर त्या ओवीतील विशिष्ट शब्द अथवा त्यांचे व्याकरण कळले तर अंदाज लावण्याचे काम अशी व्यक्ती करेल. म्हणजेच महानुभाव किंवा ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचा आजच्या मराठी भाषेशी जसा अनुबंध लावता येतो तसा गाथासप्तशती, बेंडसा लेणीतील शिलालेख यांतील मराठी भाषेचा आजच्या भाषेशी अनुबंध लावता येणे अवघड ठरते. मराठी अभिजात भाषा नेमकी कशी आहे, हे सांगण्यासाठी ही उदाहरणे नोंदवली आहेत.

मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यावर नेमकी किती रक्कम मिळू शकते, ते पाहू. (आधार – केंद्र सरकारचे ज्ञापन 4 ऑक्टोबर, 2024)

क्र. भाषा अभिजात दर्जा वर्ष आर्थिक वर्ष आणि त्या वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून मिळालेली रक्कम
14-15 15-16 16-17 17-18 18-19 19-20 20-21 21-22 22-23 23-24
1 तमिळ 2004 8.80 कोटी 11.89 कोटी 5.02 कोटी 10.27 कोटी 5.46 कोटी 9.83 कोटी 12 कोटी 12 कोटी 12 कोटी 15.25 कोटी
2 तेलुगू 2008 1 कोटी 1 कोटी 1 कोटी 1 कोटी 1 कोटी 1.07 कोटी 1.47 कोटी 1.03 कोटी 1.72   कोटी 1.54  कोटी
3 कन्नड 2008 1 कोटी 1 कोटी 1 कोटी 1 कोटी 99 लाख 1.07 कोटी 1.08 कोटी 1.06 कोटी 1.72 कोटी 1.54  कोटी
4 मल्याळम 2013 5.46 लाख 9.83 लाख 8 लाख 63.97 लाख 1.86 कोटी 1.12 कोटी
5 उडिया 2014 8 लाख 58.38 लाख 1.76 कोटी 1.38 कोटी

 

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर दोनशे-तीनशे कोटी रुपये वगैरे मिळणार नाहीत. दूरदृष्टी ठेवून प्रकल्प आखावे लागतील तेव्हाच काही कोटी रूपये मिळू शकतील. त्यासाठी अभ्यासकांनी विचार करण्यास हवा.

अभिजात भाषा म्हणून घोषित झालेल्या भाषांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून विशिष्ट निधी मिळाला आहे. या निधीतून तेथे केंद्र सरकारने एक संस्था सुरू केली. (उदाहरणार्थ तामिळसाठी www.CICT.in तर कन्नडसाठी shastriyakannada.org ही संकेतस्थळे पहावीत.)

या निधीतून प्राचीन तमिळ/कन्नड भाषेच्या विकासाचे प्रकल्प सुरू केले गेले आहेत. हा निधी नवीन पिढीला ही जुनी भाषा शिकवणे, त्या भाषेतील विविध साहित्यकृती आधुनिक रूपात रूपांतरित करणे इत्यादी कारणांसाठीच खर्च करावा लागतो. संपूर्ण भारतात तमिळ भाषक तुलनेने अधिक सजग असल्याने त्यांच्या केंद्राने सर्वाधिक निधी मिळवलेला आहे. त्या निधीतून काय काय प्रकल्प हाती घेतले आहेत, याचा अंदाज घेतला तर मराठी भाषेसाठी काय काय करणे शक्य आहे, हे लक्षात येईल.

आजवर त्यांनी नऊ प्रकल्प हाती घेतलेले आहेत.

  1. प्राचीन एकेचाळीस तमिळ साहित्यकृतींच्या संपादित संशोधित आवृत्ती प्रकाशित करणे
  2. प्राचीन तमिळ साहित्यकृतींची भाषांतरे करवून घेणे – क. प्राचीन तमिळ साहित्यकृतींचे आधुनिक तमिळमध्ये भाषांतर करणे (एकवीस साहित्यकृती) ख. अन्य भाषांत भाषांतर करणे (अकरा साहित्यकृती) ग. तिरुक्कुरल ग्रंथांचे जगातील सर्व भाषांत भाषांतर करणे (पस्तीस भाषांत)
  3. तमिळ भाषेचे ऐतिहासिक व्याकरण तयार करणे
  4. प्राचीन तमिळ भाषेचे आणि संस्कृतीचे संगोपन करणे – क. शिलालेख प्रतिमांकित करणे, टिकवणे, संगोपन करणे. ख. विवेचनात्मक ग्रंथसूची तयार करणे. ग. अनेक पुरातत्त्वीय स्थानांचा जीर्णोद्धार करणे. घ. प्राचीन नाणी, दागदागिने, मूर्ती, ताम्रपट इत्यादी साधनांचे जतन करणे. ड. जुन्या चित्रांचे, प्रतिमांचे, भांड्यांचे संगणकीकरण करणे.
  5. तमिळ भाषा आणि बोलींचे सर्वेक्षण, संशोधन आणि अभ्यास करणे.
  6. तमिळ आणि इतर भाषा यांच्या संबंधांचा अभ्यास करणे.
  7. प्राचीन तमिळ साहित्यकृतींचे संगणकीकृत ग्रंथालय तयार करणे.
  8. अभिजात तमिळ भाषा शिकवण्यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू करणे
  9. अभिजात तमिळ भाषेच्या साहित्यकृतींचा संगणकीय कोष (Corpus) तयार करणे.

अभिजात म्हणून घोषित झालेल्या भाषांपैकी सर्वाधिक निधी तमिळ भाषेला मिळालेला आहे. त्याचा त्यांनी सदुपयोग केलेला आहे. कन्नड भाषेच्या अशा केंद्राला प्रस्तुत लेखकाने 2018 मध्ये प्रत्यक्ष भेट दिली असता ते म्हैसूर येथील भारतीय भाषा संस्थान या केंद्र सरकारच्या संस्थेच्या जागेतच सुरू होते. त्यांना त्या आर्थिक वर्षात सुमारे एक कोटी निधी प्राप्त झाला होता आणि त्यांचेदेखील जुन्या कन्नड भाषेचे प्रशिक्षण वगैरेंसारखे उपक्रम सुरू होते.

भाषा अभिजात म्हणून समावेश झाल्यास विशेषत: शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतील. या भाषांमधील प्राचीन ग्रंथांचे जतन, दस्तऐवजीकरण आणि संगणकीकरण यामुळे संग्रह, भाषांतर, प्रकाशन आणि डिजिटल मीडिया सारख्या क्षेत्रात रोजगार निर्माण होईल. अशी अपेक्षा हे धोरण ठरवताना केली गेलेली आहे. त्या दृष्टीने मराठी भाषेच्या अभिजात म्हणजे प्राचीन रूपासाठीच नेमके काम करता येऊ शकेल. आता मराठी भाषेच्या वृद्धीचे उपक्रम नीट विचार करून हाती घेण्यास हवेत.

अभिजात दर्जामुळे मराठीची भाषिक प्रतिष्ठा वाढेल, मराठी शाळा बळकट होतील, त्यांना भरपूर अनुदान मिळेल, मराठी माध्यमातून शिकलेल्यांसाठी रोजगार निर्मिती होईल, वाचन संस्कृतीचा विकास होईल, बृहन्महाराष्ट्रातील साहित्य संस्था, तज्ज्ञ, विद्यार्थी यांना पाठबळ मिळेल, मराठीच्या बावन्न बोलींचे संशोधन मार्गी लागेल, श्रेष्ठ मराठी ग्रंथ रास्त किंमतींत उपलब्ध करून देता येतील आणि यांसारखे इतर अनेक उपक्रम यांना अभिजातमुळे बळकटी येईल, असे बरेचसे मुद्दे मराठीप्रेमी मंडळी मांडताना दिसतात. मात्र अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही असे करता येत नाही, हे तमिळ, कन्नड या दोन प्रमुख भाषांना अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतरच्या परिस्थितीवरून कळून येईल.

लक्षात घ्यावे, की भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे

  1. भाषेचे विद्यमान रूप व अवस्था बदलणार नाही.
  2. दोनशे-पाचशे कोटी रूपये निधी मिळणार नाही.
  3. विद्यमान भाषेसाठी, भाषकांसाठी कोणतेही उपक्रम राबवता येत नाहीत.
  4. मराठी शाळा सक्षम करण्यासाठी अनुदान मिळणार नाही.

मराठी भाषा सुदृढ होण्यासाठी काय काय करावे लागेल याबाबत काही सूचना –

  1. प्राचीन मराठी भाषेचा अभ्यास करण्याचे उपक्रम सुरू होतील.
  2. मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण करण्याचा एक वस्तूपाठ डेक्कन कॉलेज (पुणे) यांच्या भाषाविज्ञान विभागाने करून दिला आहे. त्याप्रमाणे मराठीच्या सर्व रूपांचे उत्तम सर्वेक्षण करण्यासाठी निधी मागावा. डेक्कन कॉलेजच्या मार्गदर्शनाखाली असे सर्वेक्षण महाराष्ट्रात सर्वत्र व्हावे. त्याचा उपयोग करून विविध साधने निर्माण व्हावी.
  3. मराठीचे शिलालेख, ताम्रपट यांचे उत्तम संकलन आणि संवर्धन व्हावे. त्यांच्या प्रतिमा निर्माण करून प्रत्यक्ष आणि आभासी संग्रहालय तयार करावे.
  4. मराठीत झालेले ऐतिहासिक बदल स्वतंत्रपणे सोदाहरण नोंदवून त्या आधारे साहित्यकृती निर्माण व्हाव्या यासाठी उपक्रम हाती घ्यावे.
  5. प्राचीन मराठीतील विविध ग्रंथांचे भारतीय आणि परदेशी भाषांत भाषांतर करावे.
  6. सर्व अभिजात भाषांमधील, भाषिक आणि साहित्यिक कृतींची चर्चा करणे, समजून घेणे, भाषांतर करणे असे उपक्रम वाढीस लावावे.
  7. महाविद्यालये आणि विद्यापीठे यांतून मराठीचे उत्तम अभ्यासक तयार होतील, यासाठी अध्यापनात आणि अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल घडवावे.
  8. मराठीच्या प्राचीन रुपाचे व्याकरण आणि आजची मराठी यांचा तौलनिक अभ्यास करावा.   

केंद्र सरकारने काही निकष बदलल्यामुळे मराठी भाषा अभिजात पदवीस पोचली आहे. आता ती प्रगत आणि आधुनिक बनवणे हे उद्दिष्ट गाठतानाच त्या भाषेच्या अभिजात रूपाकडे दुर्लक्ष न करता, तिच्या इतिहासातून आपल्या वर्तमानाचे निरीक्षण करून दमदार भविष्याकडे पावले टाकण्यासाठी सीमोल्लंघन करण्याची वेळ समीप आलेली आहे.  

-आनन्द काटीकर 9421610704 anand.katikar.marathi@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here