अभंगात गझलेचा शोध – एक व्यर्थ खटाटोप!

0
47
तुकाराम महाराज उर्दू-हिंदीतही अभंग रचत
तुकाराम महाराज उर्दू-हिंदीतही अभंग रचत

     अरुण भालेराव यांचा लेख वाचला. अभंग आणि गझल ह्या दोन काव्यप्रकारांचा आकृतिबंध वेगळा, तांत्रिक नियम वेगळे, असे असताना ह्या दोन प्रकारांची तुलना करण्याचे प्रयोजन काय? आशयसाम्यता अनेक प्रकारांत दाखवता येते. अगदी गद्य साहित्यकृतीतही. केवळ आशयावरून तुकारामांच्या अभंगांना ‘गझल’ सिध्द करण्याचा खटाटोप न पटणारा आहे. अभंगापेक्षा हिंदीतला ‘दोहे’ हा प्रकार ‘शेरा’च्या  अधिक जवळ जातो आणि मात्रिक छंदात असतो. तरीही कबिरांच्या किंवा निदा फाजलींसह अनेक सद्यकालीन हिंदी/उर्दू शायरांच्या दोह्याला कोणी ‘शेर’ म्हणत नाही!

     ‘गझलधारा’ ह्या प्रातिनिधिक गझलसंग्रहाच्या प्रस्तावनेत प्रा.डॉ.अविनाश सांगोलेकर ह्यांनी असाच एक ‘शोध’ लावला आहे. कवी अमृतराय (१६९८ – १७५३) व कवी मोरोपंत (१७२९ – १७९४) हे त्यांच्या मते, मराठीतले आद्य गझलकार होत! ह्या दोन कवींच्या काही ओळी किंवा प्रत्येकी एक रचना गझलसदृश आहे, म्हणून! गंमत म्हणजे त्यासाठी प्रा.डॉ. अविनाश दस्तुरखुद्द माधव ज्यूलियनांचा हवाला देतात. ते म्हणतात- “ मुळात अमृतरायांनी व मोरोपंतांनी गझला लिहिलेल्या आहेत, हे सत्यच १९२० पर्यंत कुणाला माहीत नव्हते. मात्र माधव ज्यूलियनांमुळे ते लोकांपुढे येऊ शकले. त्यांनी त्या गझलांमधल्या उणिवाही दाखवून दिल्या आहेत.” खरे तर, त्या रचना गझल तांत्रिक कसोटीवर म्हणून टिकत नाहीत. त्या कवींनी केवळ गझलसाठी मान्यताप्राप्त असलेले फारसी वृत्त वापरले होते, एवढेच माधव ज्यूलियनांना आढळले होते.

      आता, या ‘फारसी’ ‘वृत्तांबद्दल’ (‘बहर’ म्हणतात) अजून एक संशोधन डॉ. अजीज नदाफ (सोलापूर) ह्यांनी केले आहे. त्यांच्या मते, आपल्याकडील वेदांसह संस्कृत वाङमयात ती वृत्ते आढळतात. (किंवा त्यात साम्य आहे) आणि वेद ‘अतिप्राचीन’ असल्याने, ती वृत्ते किंवा छंद संस्कृतमधून ‘फारसी’त गेली असतील, ही शक्यता आहे! प्रत्येक कलाप्रकाराचे/काव्यप्रकाराचे काही नियम असतात. ‘आशय’ एकच असला तरी अभिव्यक्ती वेगवेगळी असते, ती त्या नियमांमुळे. पूर्वी मी कार्यक्रमात एक गंमत करायचो. दोन ओळींचा आशय गद्यात सांगून तोच आशय – मुक्तछंदात, भावगीतात, लोकगीतात, गझलमध्ये कसा लिहिला जाईल ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखवायचो. एक कवी म्हणून कधी प्रसंग आलाच तर, मला सर्व काव्यप्रकारांची माहिती असायला हवी हा माझा मुद्दा असायचा. ते असो.

कुठल्याही अक्षरगण वृत्तात किंवा मात्रिक छंदात गझल लिहिता येते. मात्र अभंग किंवा ओवी यांसारख्या केवळ अक्षरसंख्येवर आधारित अक्षरछंदात गझल लिहिली जात नाही. ते मान्य नाही     अरुण भालेरावांचा गझल तंत्राचा अभ्यास आहे, हे जाणवते. मग त्यांना सुरेश भटांचे हे वाक्यही ज्ञात असेल, की – ‘कुठल्याही अक्षरगण वृत्तात किंवा मात्रिक छंदात गझल लिहिता येते. मात्र अभंग किंवा ओवी यांसारख्या केवळ अक्षरसंख्येवर आधारित अक्षरछंदात गझल लिहिली जात नाही. ते मान्य नाही.’

     अक्षरछंदात गझल मान्यच नाही, पण समजा, मान्य केली आणि भालेराव म्हणतात, त्याप्रमाणे अभंगाच्या तिसर्‍या व चौथ्या चरणाची अदलाबदल करून यमके एकाखाली एक आणली तरी ती गझल होणार नाही. कारण पहिला व दुसरा चरण मिळून पहिली ओळ बारा अक्षरांची असेल तर चौथा आणि तिसरा चरण मिळून होणारी दुसरी ओळ दहाच अक्षरांची असेल. आणि संतांच्याच काय पण कोणाही कवीच्या अभंगात आपली दोन अक्षरे, अन्य कुणीही घुसडू नयेत. तेव्हा अभंगात गझल शोधण्याचा खटाटोप व्यर्थ आहे.

     अक्षरछंदाचाच विचार करायचा झाला तर अष्टाक्षरी ओवी छंदात गझलची शक्यता अधिक आहे. अष्टाक्षरी ओवीत आठ अक्षरांचे चार चरण असतात. ते दोन ओळींत लिहिले तर – उदा. बहिणाबाईंची ही ओवी –

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटका, तवा मीयते भाकर

     इथे चुल्ह्यावर/भाकर हे निर्दोष काफिये आहेत. दोन्ही ओळींची अक्षरसंख्या समान आहे. रदीफ नसला तरी हरकत नाही – ही गैरमुरद्दफ (म्हणजे रदीफविहिन) गझल होऊ शकते. – अर्थात, पूर्ण गझल नाही, तर फक्त पहिला शेर. – मतला! त्यानंतरच्या ओवींच्या दुसर्‍या ओळीच्या अंती चुल्ह्यावर/भाकर – ला सुसंगत काफिये आले पाहिजेत. मुख्य म्हणजे वरील ओवीत (गझल नसली तरी) – गझलियत भरपूर आहे!

      अष्टाक्षरी ओवी छंदात गझल लिहिणे मान्य केले तर कुसुमाग्रजांची गाजलेली कविता उत्तम गझल ठरते. ती म्हणजे –

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

     त्या कवितेची रचना गझलप्रमाणे आहे. दोन दोन ओळी – (द्विपदी) शेराप्रमाणे स्वतंत्र, संपूर्ण आणि आशयदृष्ट्या स्वयंपूर्ण आहेत. बोलणार/ तोलणार/फुलणार /मिळणार /कळणार / लाभणार /जाळणार असे निर्दोष काफिये आहेत. तर ‘नाही’ हा रदीफ आहे. फक्त त्यांनी गझल तंत्रातील मान्यताप्राप्त वृत्ताऐवजी – अक्षरछंद वापरला आहे म्हणून ती गझल होत नाही. जिज्ञासूंनी कुसुमाग्रजांची ती कविता ‘गझल’ म्हणून पुन्हा वाचावी.

     हे झाले अष्टाक्षरी ओवी छंदाचे. पण कितीही ओढाताण केली तर अभंगाची गझल होण्याची सुतराम शक्यता नाही. ‘आशय’ तसा आहे, किंवा एखादा ‘पंच’ आहे – म्हणून अभंगाला गझल म्हणणे पटत नाही.

     माझा खरा आक्षेप अजून वेगळा आहे. उर्दू भाषेत अक्षरछंद – अभंगासारखे प्रकार नाहीत. तसे आणणेही अवघड आहे. कारण उर्दू लिपीत ‘अल्फाज का गिरना’ असा प्रकार असतो. शिवाय, ती उच्चारानुसारी भाषा आहे. ते शब्दांचे ‘वजन’(वज्न) बघतात. त्यांचा एकाक्षरी शब्द (उदाहरणार्थ, है, वो, जो…) कधी एका मात्रेचा तर कधी दोन मात्रांचा असू शकतो. त्यामुळे उर्दूत ‘अभंग’ लिहिता येत नाहीत अशी खंत उर्दू कवींना वाटायला हवी. इथे तर, भालेराव अभंगात गझल शोधताहेत! ‘अभंगापेक्षा गझल श्रेष्ठ’ असा न्यूनगंड तर ह्यात नाही ना? याचाही विचार व्हावा. गालिबने अभंग लिहिला नाही तरी तो श्रेष्ठच आहे आणि तुकारामांनी गझल लिहिली नाही तरी ते जगत्कवीच आहेत आणि राहतील.

     शेवटी, निदा फाजलींचे एक वाक्य देतो – ‘गझल इक तहजीबका (संस्कृती, कल्चर) नाम है l जो अरब के रेगिस्तान में पैदा हुई, पर्सिया के गलियों में पली l दिल्ली के परवान चढी,(यौवनात आली/बहरली) और तवायफों के कोठोंपर बसी l (गणिकांच्या कोठ्यांवर वसली) – तर मराठी आणि उर्दू किंवा अभंग आणि गझल ह्यांच्यातला हा सांस्कृतिक फरक समजून घ्यावा आणि तो तसाच राहू द्यावा.

     सदानंद डबीर यांनी आक्षेप घेतलेल्‍या अरूण भालेराव यांच्‍या तुकाराम महाराजांच्‍या गझला या लेखास वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा

-सदानंद डबीर
बी/२०६ विमान दर्शन,
जीवा महाले मार्ग, अंधेरी(पूर्व),
मुंबई – ४०० ०६९
फोन (०२२) २६८४८३९९
मोबाईल ९८१९१७८४२०

सदानंद डबीर यांचा आक्षेप वाचल्‍यानंतर अरूण भालेराव यांनी दिलेली प्रतिक्रीया –

     सदानंद डबीर यांचा लेख वाचला. गजल श्रेष्ठ असे मानून त्याच्याजवळ अभंग नेऊन ठेवला तर अभंगालाही श्रेष्ठता येईल, असा माझा भाव मुळीच नव्हता व नाही. जसे प्राणीजगतात एकातून दुसरी उत्क्रांती होते, तसे तर काव्यप्रकारातही घडत असेल का, असा प्रश्न पडल्याने मी वरील खटाटोप केला आहे. अर्थात मी कोणी साहित्यिक नसल्याने, वा मान्यताप्राप्त प्राध्यापक नसल्याने हे कसे बरोबर आहे, असा कुठेही मी आव आणलेला नाही. (किंवा कोणा इतर प्राध्यापकाकडे हा प्रबंध म्हणून टाकलेला नाही.) एक अभ्यासक म्हणून हा प्रयत्न केला आहे. अर्थात त्याला मान्यता मिळावी असा माझा प्रयत्न नाही किंवा सदानंद डबीर ह्यांच्या अभ्यासा-निर्णयाविरुद्ध मला हा खटाटोप व्यर्थ वाटत नाही. कदाचित अजून काही विचारांती मला त्यांना पटवता आले तर मी परत एकदा वेगळा (व्यर्थच्‌!) प्रयास करीन.
– अरुण अनंत भालेराव.

सदानंद डबीर परिचय –

सदानंद डबीर     मराठी गजलकारांच्या दुसर्‍या पिढीतील महत्वपूर्ण गजलकार म्हणजे कवी व गजलकार श्री सदानंद डबीर. मूळचे धुळे जिल्ह्यातील पण अस्सल मुंबईकर श्री सदानंद डबीर  यांनी A.M.I. Eng ( Elect. ) ही पदवी प्राप्त केल्यानंतर प.रेल्वेत वरिष्ठ विद्युत अभियंता म्हणून ३५ वर्षे काम केले. महाविद्यालयात असताना त्यांनी कथा-कविता लिहिल्या. त्यांना अनेक बक्षिसेही मिळाली. मॅगझीन सेक्रेटरी म्हणून भित्तिपत्रक ही चालवले. १९७८ पासून गीतलेखन करणारे श्री सदा नंद डबीर गजलकडे वळले ते कवि सुरेश भट यांच्यापासून मिळालेल्या प्रेरणेने. त्यांनी सुरेश भट यांनाच आपली पहिली गजल पाठवली व ती भट यांना खूपच आवडली व ती प्रकाशित झाली. श्री सदानंद डबीर हे आकाशवाणी मुंबईचे मान्यताप्राप्त कवि आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रम आकाशवाणी वर सादर केले आहेत. नवीन संगीत नाटकांसाठी त्यांनी गीत लेखन केले आहे.

       अखिल भारतीय नाट्य परिषदेचा उत्कृष्ट गीतकार हा मानाचा पुरस्कार  श्री सदानंद डबीर. यांना सलग चार वेळा मिळाला आहे. प. रेल्वे कला विभाग , नेहरू सेंटर अशा ठिकाणी त्यांनी लेखन केलेल्या संगीतीका व संगीत नाटके सादर झाली आहेत. त्यांच्या गजलांना संगीतकार यशवंत देव , अशोक पत्की, आनंद मोडक आदि मान्यवर संगीतकारांनी संगीत दिले आहे .त्यांचे गजलांचे सोलो अल्बम माधव भागवत , सुलोचना देवलकर, विजय गटलेवार यांच्या सुरेल स्वरात प्रसिद्ध झाले असून खूप गाजले आहेत. सामना, महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता आदि दैनिकात त्यांचे गजलेवरचे उत्तम लेख प्रसिध्द झाले आहेत,

सदानंद डबीर यांची साहित्य संपदा

लेहरा : कविता / गीत/ गजल संग्रह १९९४ ग्रंथाली प्रकाशन
तिने दिलेले फूल : कविता / गीत/ गजल संग्रह २००२ ग्रंथाली प्रकाशन
सावलीतील उन्हे : दुष्यंतकुमार यांच्या साये मे धूप या गजल संग्रहाचा अनुवाद २००५ ग्रंथाली प्रकाशन.
मराठी गजल : संपादन डॉ. राम पंडित २००७ अभिव्यक्ती प्रकाशन
खयाल : गजल संग्रह २००८ ग्रंथाली प्रकाशन
गारुड गजलचे : मराठी व उर्दू गजलांचा सौंदर्यवेध घेणारा ग्रंथ
आनंद भैरवी : कविता / गजल संग्रह २००१ सोमनाथ प्रकाशन

About Post Author

Previous articleतुकाराम महाराजांच्या गझला
Next articleदिंडी
मराठी गजलकारांच्या दुसर्‍या पिढीतील महत्वपूर्ण गजलकार म्हणजे कवी व गजलकार सदानंद डबीर. ते मूळचे धुळे जिल्ह्यातील पण अस्सल मुंबईकर. सदानंद डबीर यांनी ए एम आय इंजिनीअरींग ही पदवी प्राप्त केल्यानंतर पश्चिम रेल्वेत वरिष्ठ विद्युत अभियंता म्हणून पस्तीस वर्षे काम केले. त्यांनी महाविद्यालयात असताना कथा-कविता लिहिल्या. गीतलेखन करणारे सदानंद डबीर गजलकडे वळले ते कवि सुरेश भट यांच्यापासून मिळालेल्या प्रेरणेने. त्यांनी सुरेश भट यांनाच त्यांची पहिली गजल पाठवली व ती भट यांना खूपच आवडली व ती प्रकाशित झाली. सदानंद डबीर हे आकाशवाणी मुंबईचे मान्यताप्राप्त कवि आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रम आकाशवाणीवर सादर केले आहेत. त्यांनी नवीन संगीत नाटकांसाठी गीत लेखन केले आहे. त्यांचे गजलेवरचे उत्तम लेख सामना, महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता या दैनिकांत प्रसिध्द झाले आहेत. त्यांचे ‘लेहरा’, ‘तिने दिलेले फूल’, ‘सावलीतील उन्हे’, ‘खयाल’, ‘गारुड गजलचे’, ‘आनंद भैरवी’, ‘साकिया’, ‘छांदस’ आणि ‘अलूफ’ हे गजल, गीत आणि कवितासंग्रह प्रकाशित आहेत.