अफलातून भालचंद्र नेमाडे

प्रा. भालचंद्र नेमाडे हे एक अफलातून तर्‍हेवाईक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे ख्यातकीर्त लेखक व तेवढेच मर्मग्राही समीक्षक म्हणून महाराष्ट्रातला सुजाण वाचक आदराने पाहतो. त्यांनी त्यांच्या 1962 साली प्रसिद्ध झालेल्या ‘कोसला’ कांदबरीपासून वेळोवेळी मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून दिलेली आहे. त्यांनी पाश्चात्य वाड.मयातील अनेक कलाकृतींचे कोडकौतुक केले असले तरी पाश्चात्य वर्चस्ववादी वृत्तीला त्यांचा प्रखर विरोध आहे. ते तौलनिक भाषाशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तीन वर्षे इंग्लंडला होते. त्यांना तेथे वर्णवर्चस्ववादाचे जे अनुभव आले ते त्यांनी परत येताच प्रकटपणे मांडले. किंबहुना त्यामधून त्यांचा देशीवाद जन्माला आला. ते सध्या कादंबरीकार म्हणून जेवढे माहीत आहेत तेवढेच किंवा त्यापेक्षा अधिक देशीवादाचे प्रवर्तक म्हणून लौकिकप्राप्त आहेत. नेमाडे यांच्याइतका प्रभावी साहित्यकार गेल्या अर्धशतकात मराठीमध्ये झाला नसेल. त्याचे एकच लक्षण सांगायचे तर नेमाडे यांच्या नावाने त्यांच्या जिवंतपणीच पंथ (कल्ट) तयार झाला आहे. त्यांच्या विचारपद्धतीचे व लेखनशैलीचे अनुकरण मराठीतील रंगनाथ पठारे यांच्यापासून प्रवीण बांदेकर यांच्यापर्यंतचा लेखकवर्ग करत असतो.

त्यांच्या प्रभावाचे दुसरे लक्षण सांगायचे तर ज्ञानपीठासाठी लायक चौथा मराठी लेखक म्हणून त्यांच्या नावाची चर्चा चालू असते. ‘हिंदू ’ कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर या चर्चेला जोर चढला आहे आणि वजनही प्राप्त झाले आहे.

नेमाडे यांची 1962 सालातली बंडखोरी केव्हाच संपली! ते त्यांच्या लोकप्रिय होऊ शकतील अशा कादंबर्‍या ‘पॉप्युलर प्रकाशना’कडे देतात आणि त्यांच्या मुलाखती, भाषणे असे ‘विचारधन’ पुरोगामी ‘लोकवाड.मय गृहा’कडे पुस्तके निर्माण करण्यासाठी सोपवतात. तेथे ‘साठोत्तरी’, ‘नव्वदोत्तरी’ असे छोटे-मोठे गट तयार होत असतातच. त्यांना भालचंद्र नेमाडे पुरेसे बंडखोर वैचारिक अधिष्ठान पुरवत असतात. हाच त्यांचा पंथ. तेथे ‘भज भालचंद्रम’ सुरू असते.

नेमाडे यांचे स्वत:चे वय आता झाले आहे. (74 वर्षे) ते गतकाळाकडे पोक्तपणे पाहू शकतात आणि सर्व तर्‍हेच्या नव्या साहित्यिक प्रयोगांकडे आणि उपक्रमांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. नेमाडे ‘हिंदू…’ कादंबरीमुळे पुन्हा एकदा जोरदार प्रकाशात आले आहेत. त्यांच्या ठिकठिकाणी चर्चा, मुलाखती होत आहेत. अशीच एक मुलाखत चोखंदळ साहित्यअभ्यासक आणि पुस्तक संग्राहक शशिकांत सावंत याने अलिकडेच घेतली. निमित्त होते, भालचंद्र नेमाडे यांच्या सर्व पुस्तकांच्या इ-आवृत्तीच्या प्रकाशनाचे. ‘बुकगंगा डॉट कॉम’ या अमेरिकास्थित पुस्तक वितरण संस्थेने सध्या मराठीतील पुस्तके इ-स्वरूपात आणण्याचा तडाखा लावला आहे. ‘बुकगंगा’चे चालक मंदार जोगळेकर यांनीच, खरेतर गेल्या वर्षा-दोन वर्षांत मराठीतील साहित्यव्यवहार चैतन्यमय व हलता ठेवला आहे. एरवी मराठी साहित्यात चालले आहे ते संस्थाकारण व अर्थसंपन्न संमेलनांचे कर्मकांड.

‘इ-पुस्तकांचे प्रकाशन’ खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते झाले. नेमाडे सिमल्याच्या ज्या संस्थेमध्ये सध्या समीक्षाशास्त्राचा अभ्यास करत आहेत त्या संस्थेचे अध्यक्षपद मुणगेकर यांच्याकडे आहे. मुणगेकरांनी आपल्या व्यक्तिमत्त्वावर नेमाडे यांचा झालेला परिणाम वर्णन करून सांगितला. पुढे ते असे म्हणाले, की वाचकांच्या पसंतीनुसार गेल्या शतकातील अग्रक्रमाचे दोन कादंबरीकार म्हणजे वि.स.खांडेकर व भालचंद्र नेमाडे, मला स्वत:ला हा क्रम मान्य नाही. मला नेमाडे हे क्रमांक एकचे कादंबरीकार वाटतात आणि त्यानंतर खांडेकर…

कार्यक्रमानंतर नेमाडे यांची मुलाखत झाली. शशिकांतने त्यांना नेमके प्रश्न विचारले आणि अर्ध्या-पाऊण तासात नेमाडे यांचे प्रगल्भ, मार्मिक दर्शन अनौपचारिक जिव्हाळ्याने घडवले. त्यातून नेमाडे यांची काही वेगळी निरीक्षणेही समोर आली. नेमाडे म्हणाले, की माझी बंडखोरी संपलेली नाही. मी अजूनही नवनवीन लेखकांचे साहित्य, विशेषत: कविता वाचत असतो. त्यावरून माझी खणखणीत मते बनतात. पण मी ती व्यक्त करायचे टाळतो. कशाला उगाच कोणाला दुखावावे असे मला वाटते. मी पूर्वी ज्येष्ठांवर लिहिले, समवयस्कांवर लिहिले. ते कडाडून लिहिले. त्यामुळे खूप असंतोष तयार झाला. पण त्यावेळी संबंधित लेखकांच्या मनात तयार झालेल्या कटुतेची फिकिर मला वाटली नाही. आता या वयात तसे करू नये, नवीन लोकांना दु:ख देऊ नये असे वाटते.

ते म्हणाले, की मी मुख्यत: कादंबर्‍या लिहिल्या, पण कविता हा माझा खरा प्रिय प्रकार; कवितेचा गर्भारकाळ सर्वांत मोठा आणि कठिण असतो. कथा तर दोन दिवसांत निर्माण होत असावी असा माझा समज आहे. पण कवितेचा शब्द न शब्द निर्माण व्हायला महिना-महिना लागतो. तुकारामाला काय यातना झाल्या असतील याची कल्पनादेखील करवत नाही असे म्हणून त्यांनी ‘याचसाठी केला अट्टाहास’ या पंक्तीमधील ‘अट्टाहास’ हा शब्द कसा आला असेल याचे विवरण केले. ते म्हणाले, की तुकाराम त्यासाठी महिना-महिना झगडले असतील. अट्टाहास ही संज्ञा मूळ सैनिकी वातावरणातली आहे. तेथून ती फिरत फिरत ‘प्रयत्नसाध्य’तेपर्यंत येऊन पोचली. तुकारामांच्या पद्यपंक्तीत त्या ठिकाणी अट्टाहास खेरीज दुसरा शब्द येऊच शकत नाही!

नेमाडे सध्या ‘हिंदू…’ नंतरच्या कादंबर्‍यांच्या जुळवाजुळवीत गुंतले आहेत. ते म्हणाले, की तिन्ही कादंबर्‍यांचे मसुदे लिहून तयार आहेत. तथापि, समाधान होत नाही तोपर्यंत ते बाहेर काढू नये असे वाटते. प्रत्येक कादंबरीवर तीन ते पाच महिने बसावे लागेल. त्या काळात मी अन्य काही, म्हणजे वाचनदेखील करत नाही. ‘हिंदू….’बद्दल त्यांच्या मनात प्रचंड आत्मविश्वास असावा. कादंबरीविषयक चर्चेच्या ओघात तो आपोआप प्रकट झाला. ते म्हणाले, की ‘हिंदू…..’मध्ये अशा जागा आहेत, की ज्यामधून वादाचा धुरळा उडणार हे मला ठाऊक होते. परंतु एक-दोन वर्षांत ही धूळ खाली बसेल आणि कादंबरीचे अस्सल रूप लोकांच्या लक्षात येईल.

नेमाडे यांना १९९० साली ‘टीकास्वयंवर’ या टीकाशास्त्रावरील पुस्तकासाठी ‘साहित्‍य अकादमी पुरस्‍कार’ मिळाला होता. त्‍यानंतर २०१५ साली नेमाडे यांना ‘हिंदू – जगण्‍यातली समृद्ध अडगळ’ या कादंबरीसाठी ‘ज्ञानपीठ’ पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले. साहित्य क्षेत्रात सर्वोच्‍च मानाचा समजला जाणारा तो पुरस्‍कार यापूर्वी मराठी साहित्यामध्ये विष्णू सखाराम खांडेकर (१९७४), विष्णू वामन शिरवाडकर (१९८७) आणि विंदा करंदीकर (२००३) यांना मिळाला होता.

भालचंद्र नेमाडे यांची काही निरीक्षणे

‘हिंदू’मध्‍ये मिथस् तोडण्‍याचा प्रयत्‍न

श्रेष्ठ साहित्यकृती या वाचकांच्या जीवनजाणिवेला आवाहन करत असतात. समाज निद्रिस्त झाला तरी श्रेष्ठ लेखक मात्र जागा असतो. तो जीवनाविषयीचा योग्य तो मूल्यविवेक समाजापुढे ठेवण्याचे काम करत असतो. आधुनिक समाजाची मानवी जीवनश्रेयसाची कल्पना भौतिक व वस्तुरूप विकासाशी फक्त निगडित झालेली असताना जगण्याच्या सच्चेपणाचे खोलवरचे भान प्राप्त करून देणारी ‘कोसला’ ही कादंबरी पन्नास वर्षांनंतरही तिचे मराठी कांदबरी प्रकारातले अनन्यसाधारणत्व कायम आहे.

माझ्या कादंबर्‍यांतून सामाजिक हितोपदेश साधायचा आहे काय असे कितीही ‘सटायरिकली’ म्हटले गेले तरी माझ्या कादंबर्‍यांच्या निमित्ताने हितोपदेशही होऊन गेला, तर खूपच झाले असे मी समजेन. माझ्यानंतर तरी मराठीत चांगला कांदबरीकार निर्माण व्हावा एवढा बंदोबस्त मी माझ्या कादंबर्‍या लिहून करून ठेवणार आहे.

आपल्या निर्बुद्ध वर्तमानपत्रवाल्यांनी आणि मूर्ख लेखकांनी इंग्लंडबद्दल भलभलत्या मिथ्स करून ठेवल्या आहेत. त्यामुळे आपल्या पिढिची मोठी फसवणूक झाली. ‘हिंदू …’मध्ये मला ह्या मिथ्स तोडायच्या आहेत.

आपल्या प्रकाशकांना पुस्तकासंबंधी काही सांस्कृतिक जबाबदारी आहे, याची फारशी तीव्र जाणीवही नसते, असाही अनुभव आहे.

मला सानेगुरुजी हाच एकमेव मोठा कादंबरीकार वाटत होता. अजूनही तसेच वाटते. त्यांच्या श्यामच्या लायकीचा मराठी नायक दुसरा नाही. भटका, निराधार सर्व सृष्टीची परिमाणे लाभलेला असा नायक. साने गुरुजी हाच असा कादंबरीकार आहे, की ज्याने स्वत:चे असे विश्व निर्माण केले. त्यांना स्वत:ची जीवनदृष्टी होती. समाजाच्या सर्व स्तरांना मराठी कादंबरीने खर्‍या अर्थाने स्पर्श केला, तो एकट्या साने गुरूजींमध्येच. ह्या बाबतीत त्यांचा आवाकाही विलक्षण आहे. पण निव्वळ समाजवादी शिष्यांमुळे त्यांची वाईट प्रतिमा रुजली.

‘कोसला’पूर्वी मी फक्त त्या त्या वेळच्या मित्रांनाच आवडायच्या अशा चिक्कार कविता लिहिल्या होत्या. त्या सगळ्या वृत्तबद्ध वगैरे होत्या. बालकवी आणि ‘गोदागौरव’कार चंद्रशेखर त्यावेळी माझे आवडते कवी होते. नंतर कॉलेजमध्ये मर्ढेकर आणि पु.शि.रेगे. शिवाय मी स्वत:साठी म्हणून अनेक वर्षे रोजनिशी लिहायचो. कॉलेज मॅगझीनसाठी मी कथा आणि ललित निबंधही लिहायचो. ‘फर्ग्युसन’मधल्या ‘साहित्यसहकार’मध्ये मराठीतल्या प्रसिद्ध साहित्यिकांवर त्या त्या चर्चेच्या निमित्ताने भयंकर टीकाही करायचो. एकूण लिहायच्या बाबतीत आम्ही फार उत्साही, आत्मविश्वास जादा. पु.शि.रेग्यांच्या ‘छंद’मध्ये पहिल्यांदा माझ्या कविता छापून आल्यानंतर ‘रहस्यरंजन’ आणि ‘आलोचना’मध्ये लेख, टीका, परीक्षणे वगैरे केली. ‘कोसला’पूर्वी हे एवढे.

शाळेत हस्तलिखित वगैरे काढण्याची, त्यांतून टीकास्पद वगैरे लिहिण्याची हौस होती. गावात मित्रांच्या कविता एकण्याचेही नियमित उद्योग आम्ही करायचो. कविता जमवून स्वखर्चाने छापण्याचे ‘मोहर’, ‘उन्मेष’ वगैरे उद्योगही केले. मुंबईला आल्यावर अशोक शहाणे, भाऊ पाध्ये, रघु दंडवते, वृदावन दंडवते, अरुण कोलटकर, मनोहर ओक, राजा ढाले, कृष्णा करवार, बाळ ठाकूर, वसंत दावतर, दुर्गा भागवत इत्यादींबरोबर ‘असो’, ‘अथर्व’ हे लिटल मॅगझीन्सचे भरीव उद्योग केले, ‘रहस्यरंजन’मध्ये वर्षभर नियमित लिहिणे वगैरेही केले. पुण्यात असताना ‘साधने ’तही अधूनमधून वर्षभर काम करत होतो. पण विशेष लिहिले नाही. मुंबईत माधव वाटवे, वृंदावन दंडवते यांच्या नादाने नाटके बसवताना पाहण्याचेही काम करायचो.

‘कोसलाबद्दल’ (1979) संपादक – बाबा भांड या पुस्तकामधून

(नेमाडे यांच्यावरील लेखन ‘थिंक महाराष्ट्र’च्या संपादकीय चमूने संकलित केले आहे.)

लेखक परिचय –

नाव : भालचंद्र वना नेमाडे

जन्म : 27 मे 1938 सांगवी, जि.जळगाव

शिक्षण: मॅट्रिक(1955), (बी.ए.1959, फर्ग्युसन कॉलेज, पुणे), एम.ए. 1961, (भाषाशास्त्र, डेक्कन कॉलेज, पुणे), आणि एम.ए., (इंग्रजी साहित्य, मुंबई विद्यापीठ) मुंबई- 1964.

व्यवसाय: इंग्रजीचे प्राध्यापक (1965) अहमदनगर, धुळे (1966), औरंगाबाद. (1967-71) School of oriental and African studies, London 1971-72, 1974 पासून मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

प्रकाशने: ‘असो’, ‘वाचा’ ही लिटल मॅगेझिन्स,
कांदबऱ्या – ‘कोसला’ (1963), ‘बिढार’ (1957), ‘जरिला’ (1977), ‘झूल’ (1979), हूल, ‘हिंदू’ (2010)
कवितासंग्रह – ‘मेलडी’ (1970) आणि देखणी, प्रकाशित कवितांची हिंदी व इंग्रजी भाषांतरे.
‘वाचा प्रकाशन’ या संस्थेशी संबंधित. मराठीत व इंग्रजीत लेख,

समीक्षालेखन: टीकास्वयंवर, साहित्याची भाषा, तुकाराम, The Influence of English on Marathi : A Sociolinguistic and Stylistic Study, Indo-Anglian Writing, उदाहरणार्थ कोसला (विविधांगी समीक्षा) संपादन – वासुदेव सावंत

साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. १९९० – टीकास्वयंवर या टीकाशास्त्रावरील पुस्तकासाठी

ज्ञानपीठ पुरस्‍कार, इ. स. २०१५ – ‘हिंदू – जगण्‍यातली समृद्ध अडगळ’ कादंबरीसाठी

टिम ‘थिंक महाराष्‍ट्र‘ 9892611767

About Post Author

11 COMMENTS

  1. नेमाडे काही दिवस गोव्यात होते
    नेमाडे काही दिवस गोव्यात होते त्याचा उल्लेख केलेला दिसत नाही .

  2. kosala hi kandabari va book
    kosala hi kandabari va book va kahihi vatatach nahi. vargatil shevatachya bakavar basanarya vidyarthyane lihave ase te likhan vatale. kosala ka eavadhi prasiddha zali navalach aahe //////

  3. भाजप सरकार आलै म्हणून
    भाजप सरकार आले म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हिंदू कांदबरी लिहीली म्हणून पुरस्कार. तसेच पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण देण्‍यात काय बाबा याची कर्तबगारी! इतिहासीकाल म्हणून कधीही यांचे नाव नसते. फक्त गोष्टीवेल्हाळपणा चालत नाही. अभ्यास हवा असतो खराखरा.

  4. फालतू लेखक.

    फालतू लेखक.
    कोणत्या अॅगलमधून नेमाडे लेखीक वाटतात.
    त्यापेक्षा मंगेश पाडगावकर वैगैरे याना का नाही हो मिळत पुरस्कार.

  5. खरच एक फालतू लेखक.

    खरच एक फालतू लेखक.
    इतके चागले चागले लेखक असताना एक हेच का मिळाले.

  6. नेमाडे लेखक म्हणून मोठे आहेत
    नेमाडे लेखक म्हणून मोठे आहेत पण ते जातीव्यवस्थेचे समर्थक आहेत.

  7. नेमाडे व विजय तेंडूलकर हे
    नेमाडे व विजय तेंडूलकर हे माझे आवडते लेखक. त्यांनी बिन्दास्त व रोखटोखं लेखन केले .

  8. नेमाडे समजण्यासाठी खूप मोठी
    नेमाडे समजण्यासाठी खूप मोठी साहित्यीक समज लागते.उदाहरणार्थ हे येड्यागबाळ्याचे काम नाही इथे पाहिजे जातीचे….

  9. ते तौलनिक भाषाशास्त्राचा…
    ते तौलनिक भाषाशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तीन वर्षे इंग्लंडला होते. त्यांना तेथे वर्णवर्चस्ववादाचे जे अनुभव आले ते त्यांनी परत येताच प्रकटपणे मांडले…
    हे कुठे (शक्यतो ऑनलाईन) वाचायला मिळू शकेल?
    तसेच लेखात उल्लेख केलेली शशिकांत सावंतांनी घेतलेली नेमाड्यांची मुलाखतही कुठे वाचायला मिळेल का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here