अफलातून चित्रकार शशिकांत धोत्रे

5
44

शशिकांत धोत्रेवर तयार करण्यात आलेली शोर्ट डॉक्युमेंटरी पहा

चित्र म्हटले म्हणजे कॅनव्हास व वॉटर, अॅक्रलिक किंवा तत्सम रंगांचे माध्यम… मात्र शशिकांत धोत्रे याची गट्टी जमली ती पेन्सिलशी. त्याने पेन्सिलच लहानपणापासून हाती धरल्याने त्याच्या चित्रांचे प्रमुख साधन ते बनले. त्याला वॉटर कलरसारख्या 'नव्या' माध्यमाची ओळख होऊ लागली असली तरी त्याची स्वतःची ओळख कायम झाली ती मात्र, कागद आणि पेन्सिल यांच्यामुळेच. चित्रे काढण्याची त्याची ती शैली कलारसिकांत परिचित आहे. शशिकांतला चित्रकलेची पार्श्वभूमी नाही वा त्याने औपचारिक कलाशिक्षणदेखील घेतलेले नाही. ब्लॅक पेपर व कलर पेन्सिल हाच त्याचा कलाप्राण राहिला आहे.

शशिकांतचा जन्म सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील शिरापूर या छोट्याशा गावातील. शशिकांतचे वडील दगड फोडण्या्चे, त्यांना टाके घालण्या-याचे काम करत तर आई रोजंदारी करायची. त्याला तीन भाऊ आणि दोन बहिणी. भावंडांमध्ये  शशिकांत मोठा. शशिकांतमधील सुप्त गुणांना वाव मिळाला तो, बालपणीच. तो म्हणतो, ‘वडिलांच्या हिशोबवहीतून मला चित्रकलेचं बाळकडू मिळालं. त्यांच्या वहीत चार रंगांची बॉलपेनं असायची. वहीच्या पहिल्या पानावर त्यांनी कमळ आणि मोर असं चित्र काढलं होतं. ते चित्र पाहून मलाही चित्रं काढण्याची स्फूर्ती मिळाली.’

शशिकांत त्या वहीतच जेथे जेथे कोरी जागा असेल तेथे तेथे चित्रे काढायचा. त्याचे ते वेड शाळेतही दिसायचे. शशिकांत फळ्यावर, बाकावर, भिंतींवर चित्रे काढण्यात रंगून जायचा. शाळेतील गाबणे गुरुजींनी घरी येऊन अनेकदा शशिकांतची तक्रार केली होती. त्याची चित्रकलेची आवड पुढे वाढतच गेली. शशिकांत सांगतो, "दरवर्षी गावात दत्तजयंतीला होणा-या चित्रकला स्पर्धेत माझं पहिलं बक्षीस ठरलेलंच होतं. त्यातून मला चित्रं काढण्यास प्रोत्साहन मिळत गेलं."

शशिकांत नववीत असताना त्याच्या वडिलांना दारूचे व्यसन जडले. त्यामुळे त्यांना काम मिळायचे बंद झाले. उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. शिक्षण तर दूरची गोष्ट. त्यामुळे शशिकांतवर वडिलांसोबत दगड फोडण्यास जाण्याची वेळ आली. त्यातच वडील घर सोडून गेले. कुटुंबाचा भार शशिकांतवर येऊन पडला.

शशिकांत वाळूच्या ट्रकवर बिगारी कामगार म्हणून कामाला जाऊ लागला. तो वाळू-विटा वाहण्याेचे काम करी. त्यााने ते काम दोन-तीन वर्षे केले. शशिकांत कसाबसा दहावीपर्यंत पोचला. तो दहावीत नापास झाला. अभ्यास करण्यास त्याला वेळच मिळत नसे. त्याच दरम्यान काही मित्रांनी त्याला जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेण्याचा सल्ला दिला, पण त्यासाठी बारावी उत्तीर्ण होणे गरजेचे होते.

दरम्यान, वडील घरी परतले. शशिकांतचे बिगारी काम सुरूच होते. त्याने कशीबशी बारावी पूर्ण केली. मुंबईला यायचे म्हटले तर तिकिटाचे पैसे, अॅडमिशनसाठी पैसे सा-या गोष्टी पैशांच्या होत्या. मोलमजुरी करून शशिकांतने पै न पै साठवली. तो मुंबईत मोठ्या हिमतीने आला. जे.जे.ची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला चार वर्षे मुंबईत काढायची होती. घरची परिस्थिती आणि मुंबईतील खर्च यांचा मेळ बसत नव्हता. घरच्या लोकांचे कसे होणार ही काळजी होतीच. शशिकांत पहिल्या दोनतीन महिन्यांतच कॉलेज सोडून घरी परतला.

तो गावी आल्यानंतर वेळ मिळेल तेव्हा पन्नास-शंभर रुपयांत लोकांची पोट्रेट काढून देऊ लागला. त्या मिळकतीतील काही पैसे आईला देऊन ते पुढील शिक्षणासाठी साठवून ठेवू लागला. त्याने पुण्यात अॅनिमेशन शिकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अॅनिमेशन नव्याने उदयास येत होते. त्यामुळे नोकरीच्या संधी होत्या. शशिकांतकडे दहा हजार रुपये जमा होते. अॅनिमेशन शिकण्याचा खर्च पंचवीस हजार रुपये होता. पंधरा हजार रुपयांची गरज होती. त्यावेळी मोहोळ येथील पुढारी विजयराज डोंगरे यांनी त्याला मदत केली आणि शशिकांतला अॅनिमेशनचे शिक्षण पूर्ण करता आले. तो अॅनिमेशनच्याच एका कंपनीत नोकरीलाही लागला. पण तेथे त्याचे मन काही रमेना.

शशिकांत नोकरी सोडून मुंबईत आला. तो मुंबईत एका कंपनीच्या माध्यमातून घरातील बेडरूम रंगवायची कामे करू लागला. त्याने लहान मुलांच्या खोल्या रंगवण्याचे कामही सुरू केले. त्यातून मिळणा-या उत्पन्नातून काही पैसे घरी पाठवून स्वतःचा खर्च भागवू लागला. त्या दरम्यानही त्याचे चित्रे काढणे काही कमी झाले नाही. शशिकांत वाटेल ती, दिसेल ती चित्रे काढत होता. त्याने टेबलावर बसलेल्या एका छोट्या मुलाचे चित्र 2008 मध्ये काढले होते. ते पाहून त्याच्या मित्राने ते चित्र आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या स्पर्धेसाठी पाठवण्यास सांगितले. त्या स्पर्धेत त्याच्या चित्राला केवळ बक्षीसच मिळाले नाही तर ते चित्र अठरा हजार रुपयांना विकले गेले. शशिकांत म्हणतो, "त्याच्या आयुष्यातील तो टर्निंग पॉईंट ठरला आणि पुढे चित्रच माझे आयुष्य बनले."

शशिकांत म्हणतो, मला शिरापूरने जगायला शिकवले. गावातील प्रत्येक गोष्ट मला जवळची होती. तिच्याबद्दल मला आकर्षण होते, अजूनही आहे. म्हणूनच कदाचित मी शहरापेक्षा गावात अधिक रमतो. मी आपले सणवार, उत्सव, कुटुंबपद्धत, खेळ सारे अनुभवलेले, पाहिलेले आहे आणि तेच माझ्या चित्रातून उमटते.

शशिकांतने तब्बल वीस लाख रुपये खर्चून गावात स्टुडिओ उभारला आहे. त्याच्या घरापेक्षा  स्टुडिओ आकाराने मोठा आहे. तो स्टुडिओ सर्व त-हेने अद्ययावत आहे. ती शशिकांतची कार्यशाळासुद्धा आहे. तिथे तो शिकाऊ मुलांना चित्रकलेचे धडे देत असतो. त्याच्या चित्रकलेमुळे घर व्य्वस्थित चालले आहे. त्याच्या आईला मजुरी करावी लागत नाही. त्या‍च्या वडिलांनीही दारू सोडली आहे. शशिकांतचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन त्यााचा लहान भाऊ शत्रुघ्न धोत्रे हासुद्धा चित्रकलेकडे वळला. त्याच्या चित्रांची प्रदर्शने सोलापूर आणि मुंबईतील जहांगिर आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आली आहेत.

शशिकांतची चित्रे इंग्लंड, कॅलिफोर्निया. दुबई, फ्लोरेन्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यू यॉर्क या देशांत विकली गेली आहेत. त्या चित्रांच्या किंमती कमीत कमी साडेतीन लाखांपासून आठ लाखांपर्यंत आहेत. त्याने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. बक्षीसे मिळवली. त्याला 2010 मध्ये राज्यस्तरीय आशादीप पुरस्कार, 2011 मध्ये इंडिया आर्ट फेस्टिव्हलचा विशेष पुरस्कार, 2012 मध्ये महाराष्ट्र राज्य प्रदर्शनाचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

शशिकांत म्हणतो, मला अजून खूप वेगवेगळ्या विषयांवर काम करायचे आहे. त्याने देशातील प्रमुख सत्तावीस शहरांमध्ये प्रत्येकी एक आठवडा असे चित्रप्रदर्शन भरवले आहे. त्याचा 2019 मध्ये युरोपमध्ये प्रदर्शन आयोजित करण्याचा मानस आहे.

शशिकांत धोत्रे – 9769419969
मु. पो. शिरापूर, ता- मोहोळ, जि. सोलपूर

(माहिती संकलन साह्य – श्रीकांत पेटकर)

– अर्चना राणे

About Post Author

Previous articleमोडी लिपी – अथ: पासून इति पर्यंत
Next articleआजचा टाईम्स, आजचा वाचक
अर्चना राणे यांनी 'दैनिक प्रहार'मध्‍ये प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्‍यांनी 'लोकमत' वृत्तपत्रात शैक्षणिक तसेच साहित्य आणि सांस्कृतिक बीटसंदर्भात काम केले. राणे यांनी पर्यावरण बीटवर काम करत असताना मुंबई, ठाणे, रायगड येथील खाड्यांची स्थिती आणि तेथील जैवविविधतेवर आधारित 'बाराखाडी' ही वृत्तमालिका लिहिली होती. त्‍यांना त्‍याकरता 2013 मध्ये 'चौथा स्तंभ' पुरस्कार देण्‍यात आला. मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या 'नॉलेज एक्सप्लोरर' या शैक्षणिक मासिकाच्‍या कमात त्‍यांचा सहभाग होता. याशिवाय पुण्यातील प्रबोधन माध्यम या न्यूज एजन्सीसाठीही त्‍या कार्यरत होत्या. पर्यावरण बीटवरील उत्कृष्ट कामगिरीकरता 'दिना बामा पाटील प्रतिष्ठान'चा तर शैक्षणिक बीटवरील उत्कृष्ट कामगिरी करता 'सरस्वती चॅरिटेबल ट्रस्ट'मार्फत 2012 मध्ये आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला होता. त्‍यांना बहुजन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संसदतर्फेही शैक्षणिक बीटवरील स्पेशल स्टोरीजसाठी 2010 मध्ये आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्‍यांनी लहान मुलांसाठी लिहिलेले 'झाडे लावूया' हे गोष्टीचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9820847339

5 COMMENTS

  1. Very good Information of
    Very good Information of Shashikant.

    Thinking of Shashikant Dhotre on Art of painting in India
    भारत देश हा चित्रकलेच्या बाबतीत इतर देशाच्या तुलनेत फार पुढे आहे. खाजुराहोचे मंदिर, अजिंठा , वेरुळचे लेणी कितीतरी वर्षापासून जगाला त्याचे साक्ष देत आहे. हजारो वर्षापासून प्रगत चित्रकला असणाऱ्या भारतात हा विषय प्रगत व उच्च पातळीवर जायला हवा. खाजुराहोतील चित्राला वा ह वा म्हणणारे आपण २००० सालात एखाद्या नग्न चित्र आकारणाऱ्या चित्रकाराला देशाबाहेर घालवतो. हि प्रगती आहे कि अधोगती.
    १९२०.३० च्या काळातील मूक चित्रपटापासून सुरुवात झाली आज कितीतरी वेगवेगळया विषयावरील सिनेमाला सर्वसामान्य माणूस बघू शकतो. हि प्रगतीचे लक्षण आहे. तर चित्रकलेबाबत असे का नाही ? हा प्रश्न शशिकांत धोत्रे ला सतत पडतो.
    हा प्रश्न आपण सर्वांनाच का पडू नये ?

  2. चिञकार शशिकांत धोञे वरील
    चिञकार शशिकांत धोत्रेवरील माहिती अप्रतिम आणि प्रेरणादायी आहे.

Comments are closed.