अप्पासाहेब बाबर – डोंगरगावचा विकास

0
25

डोंगरगाव हे सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील पाच हजार लोकवस्तीचे व साधारणपणे सहाशे कुटुंबे असलेले दुष्काळी गाव. त्या गावात पाण्याचा तुटवडा असे. पण त्या गावाला अप्पासाहेब बाबर हे तडफदार नेतृत्व लाभले आणि गावाचा कायापालट झाला! ओसाड पडलेले गाव हिरवे होऊन डोलू लागले. अप्पासाहेब बाबर हे त्या गावचे वतनदार रहिवासी. त्यांच्या घराण्याने त्या गावचे नेतृत्व पूर्वापार केलेले होतेच.

अप्पासाहेबांना डोंगरगावचे सरपंचपद १९८९ पासून २००४ पर्यंत सलग पंधरा वर्षे लाभले. त्यांनी सत्तेचा सदुपयोग केला.

अप्पासाहेब व्यवसायाने सिव्हिल इंजिनीयर. त्यांनी काही काळ महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्यात सेवा केली. त्यामुळे त्यांना शासनयंत्रणेच्या कामकाजाची जाण होती. तिचा उपयोग त्यांनी गावाच्या विकासासाठी केला. अप्पासाहेबांनी गावासाठी जलसंधारण योजनेतून अनेक कामांना अनुदान १९९१-९२ पासून मिळवले. सतरा सिमेंट बंधारे बांधले. कोल्हापूर टाईप दोन बंधारे बांधले. पाच वॉटर शेड क्षेत्रे तयार केली. त्यात नालाबंडिंग, जमिनीचे सपाटीकरण, पाझर तलाव इत्यादी कामे केली. वॉटर शेड मध्ये जिथले पाणी तिथेच जिरवले, त्यामुळे पडणाऱ्या पावसाचा पुरेपूर फायदा झाला व विहिरींना पाणी लागले. त्यामुळे तीन-चार दुष्काळ पडूनही त्याची झळ गावाला लागली नाही. वॉटर शेडमध्ये वनीकरणाची कामे केली. या सर्वांमुळे ऐंशी ते नव्वद टक्के पाणी प्रश्न सुटला. गावाला उन्हाळ्यात पाणी कमी पडत नाही. गावातील बागायत क्षेत्रात तीस टक्के वाढ झाली आहे.

त्यांनी पंचवीस मागासवर्गीय लाभार्थींना विहिरींसाठी शंभर टक्के अनुदान शासनाकडून मिळवून दिले. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील मागास वर्गीयांनासुद्धा बागायती करणे शक्य झाले आहे. गावामध्ये विद्युत पंप बसवले, त्यामुळे शेतीला पाणी देणे सुलभ झाले.

पाण्यामुळे जनावरांना हिरवा चारा उपलब्ध झाला. शासनाकडून दुभती जनावरे खरेदीसाठी मिळणारे अनुदान गावातील गरजूंना मिळवून देऊन दुग्ध व्यवसायाला चालना दिली. गावात पाच दूध उत्पादक संघ आहेत व रोज पंधराशे लीटर दूध विक्रीसाठी बाहेर जाते.

गावातील वाड्या-वस्त्यांवर रस्त्याची खडीकरणाची व डांबरीकरणाची कामे केली आहेत. गावातील पन्नास टक्के रस्ते सिमेंटचे आहेत. त्यामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढल्या. गावात दिवसभरात सात वेळा एस.टी. बस येऊ लागली. गावातील रस्त्यांवरील विद्युतीकरणाचे (पथ दिवे) काम केले.

गावात दर गुरूवारी बाजार भरत असल्याने लोकांच्या मालाला उठाव मिळू लागला व जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धताही वाढली.

शासनाच्या अनुदानातून घरकुल योजना राबवली गेली. पस्तीस जणांना प्रत्येकी सात हजार रुपये खर्चात स्लॅबची पक्की घरे बांधून मिळाली. ते अनुदान अठ्ठावीस हजारापर्यंत गेले आहे. गावातील दारिद्र्य रेषेखालील ऐंशी टक्के लाभधारकांची स्लॅबची पक्की घरे बांधून झाली आहेत.

गावातील तीस टक्के लोकांना शौचालये बांधण्यासाठी शासकीय अनुदान मिळवून दिले. सर्व धर्मीयांसाठी वेगवेगळ्या स्मशानभूमींचे बांधकाम केले आहे. आमदार-खासदार फंडातील निधीचा वापर करून चार अंगणवाड्या व पाच मिनी अंगणवाड्या सुरु केल्या. प्रत्येक वाडीला चौथीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा सुरू झाली आहे.

एकात्मिक ग्रामीण विकास यंत्रणेतून काही योजना गावासाठी राबवल्या गेल्या. महात्मा गांधी योजना, राष्ट्रीय रोजगार हमी योजना, तंटामुक्ती योजना अशा शासनाच्या योजनांतून गावाचा विकास साधला गेला.

गावात राबवल्या जाणाऱ्या विकास योजनांच्या निकषानुसार १९९४-९५ मध्ये गावाला तिसरे पारितोषिक मिळाले. गावाला राज्य पातळीवरील जलसंधारणासंदर्भातील पहिले बक्षीस १९९७ मध्ये मिळाले. पुणे, अहमदनगरसोलापूर जिल्ह्यांमधून निवडलेल्या अकरा सरपंचांत अप्पासाहेबांचा समावेश होता.

अप्पासाहेब बाबर यांनी गावासाठी वाहून घेतल्यामुळे गावाचा विकास शक्य झाला आहे. त्यांनी त्यांच्या दिलदार स्वभावामुळे काही वेळा विरोधी पक्षाची सत्ता असूनदेखील विकासाची कामे पूर्णत्वास नेली आहेत. त्यांची तळमळ सर्वांनाच प्रेरक ठरणारी आहे.

– अनुराधा काळे

About Post Author