मी अहमदपूरला महात्मा गांधी महाविद्यालयात शिकत होतो, त्या वेळी प्रा. निशिकांत देशपांडे यांच्यासोबत अंबाजोगाईला जाऊन अमरला पहिल्यांदा भेटल्याचे मला आठवते. मी १९८५ साली चंद्रकांत झेरीकुंठे यांच्यासोबत ‘दैनिक लोकमन’ची सुरुवात केली. त्यानंतर पत्रकार अमर हबीबची ओळख होऊ लागली. शेतकरी संघटनेच्या चळवळीने ८६-८७ मध्ये चांगला जोर धरलेला होता. मी शेतकरी घरातून आलेलो असल्याने व शेतीतील दु:खांची अनुभूती असल्याने मी ‘लोकमन’मध्ये शेतकरी संघटनेच्या बातम्यांना प्राधान्य देत होतो. त्या विषयावर अग्रलेखही लिहीत होतो. अमर त्या काळात संघटनेत सक्रिय होता. आमची खरी ओळख झाली ती अमर लातूरला आल्यानंतर.
अमर दैनिक ‘मराठवाडात’ लातूर आवृत्तीचा संपादक म्हणून रुजू झाल्याचे मला कळले. मी जाऊन त्याला भेटलो. त्यानंतर आमच्या नियमित भेटी होऊ लागल्या. त्यांची लेखनशैली व प्रश्नांची समज मला प्रभावित करणारी होती. आमची विचारांची दिशा एकच होती. त्यामुळे ‘वेव्ह लेंग्थं’ जुळली. अमरने काही दिवस लातुरात रूम केली होती. पुढे त्याने बसने व मोटारसायकलवर अंबाजोगाईहून ‘ये-जा’ सुरू केली.
अमरचे नाव खरे तर ‘भ्रमर’ ठेवायला हवे. त्याच्या आयुष्यातील सर्वाधिक वेळ फिरण्यात गेलेला आहे. त्याचा हा प्रवास थांबलेला नाही. मला जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा मी त्याच्यासोबत प्रवासाला जायला तयार असतो. पण असे योग क्कचित येतात. आम्ही मिळून ९१ साली हैदराबादमध्ये झालेल्या दंगलीनंतर तिथं गेलो होतो. मी दंगलीचा कारणमीमांसा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या भेटीवर आधारित सहा लेख लिहिले. मी अमरसोबत आंबेठाणला शरद जोशी यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मी, अमर व शरद जोशी भामगिरीवर फिरण्यासाठी भल्या सकाळी गेलो होतो. तेव्हा अमर चक्कर येऊन पडला होता, आम्ही १९९३ किल्लारी भूकंपानंतर भटकंती केली. तो प्रसंगही खास आठवणीतला आहे.
अमरने ‘मराठवाडा’साठी खूप कष्ट घेतले. पेपर वाचनीय केला. पुरवणी काढली. खप वाढवला. परंतु अर्थकारण सांभाळणे ही त्याची जबाबदारी नव्हती. त्याचा तो स्वभावही नाही. अखेर, ‘मराठवाडा’ची लातूर आवृत्ती बंद पडली. अमरचे लातूरला नियमित येणे थांबले. तरीही आमची भेट महिन्यातून एक-दोन वेळा व्हायचीच. तो लातूरला यायचा. मी अंबाजोगाईला जायचो. फोनचा संपर्क तर सतत असायचा. कोणालाही अभिमानाने सांगावा असा हा माझा मित्र आहे. मैत्री जुळते आंतरिक जिव्हाळ्यावर. त्याला समविचाराची जोड असेल तर ती अधिक मजबूत, व्यापक बनते. अमरची आणि माझी मैत्री त्याच पातळीवरची आहे.
मी अशोक पोतदारला सोबत घेऊन माहिती संकलन केले. आम्ही प्रचंड असा मजकूर गोळा केला. त्याचे संपादन करणे गरजेचे होते. अमरने ते काम अतिशय चांगल्या प्रकारे केले. त्या काळात आम्ही सतत संपर्कात होतो. त्या कामाचे सर्वदूर कौतुक झाले. त्यानंतर १९१८ साली मी साप्ताहिक ‘बातमीमागची बातमी’ काढण्याचा निर्णय घेतला. त्या कामात त्याचा सहभाग होता. त्याने ‘बातमी’त कार्यकर्त्याची डायरी या नावाने अनेक दिवस सदर चालवले. साप्ताहिक सुरू केल्यापासून वेळेचे नियोजन माझ्या हातात होते. मी त्या काळात महिन्यातून किमान दोन वेळा तरी अंबाजोगाईला जायचो. डोंगरात फिरायला जाणे हा माझा सर्वात आवडीचा छंद. अमरलाही ते आवडायचे. त्या छंदामुळे माझे अंबाजोगाई गावाशी अतूट नाते निर्माण झाले. आम्ही ‘निसर्गायन’ नावाने ट्रस्ट स्थापन केला. डोंगरात काही जमीन घेतली. तिथे लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा आमचा विचार होता. ते व्यवहारात उतरवणे आम्हाला शक्य झाले नाही. मात्र त्या निमित्ताने आमचे डोंगरात फिरणे सातत्याने चालू राहिले. आमच्या संबंधातील एकत्र डोंगरात फिरणे हा सर्वात आनंददायी भाग राहिला आहे. तो चालू आहे.
मी, माझा मुलगा आनंद, शंकर झुल्पे, अमरचा मुलगा सारंग, मेव्हणे सय्यद गुरुजी व त्यांचा मुलगा अस्लम असे मिळून अंबाजोगाईच्या डोंगरावर एकदा ट्रेकिंगसाठी गेलो होतो. त्यावेळी गुरुजींचा अपघात झाला. सय्यदगुरुजी दीड-दोन हजार फुटांवरून घटंगळत खाली आले. गुरुजी केवळ आपल्यामुळे डोंगरात आले आणि त्यांना अपघात झाला ही बाब मला भयंकर अस्वस्थ करत होती. अमर आमच्यासोबत नव्हता. त्याला ते कळताच तो तात्काळ घटनास्थळी आला. आम्ही गुरुजींना दवाखान्यात पोचवले. आश्चर्य म्हणजे गुरुजींना काहीच झालेले नव्हते. मात्र अमर त्यावेळी माझ्याशी ज्या स्नेहाने, ममतेने वागला ते माझ्या मनावर कोरले गेले आहे. माझ्या मनात डाचत असलेली भावना त्याच्या लक्षात आली असावी. तो हळुवारपणे बोलून गेला… “अपघात हा अपघात असतो. गुरुजींना तुम्ही ट्रेकिंगला बोलावले, यात तुमची चूक काय?”
मध्यंतरी, अमरने ‘बळीराज्य – मराठवाडा’ या नावाने शेतक-यांच्या प्रश्नाविषयी पाक्षिक काढले. त्यात माझाही सहभाग होता. ते आर्थिक अडचणीमुळे स्थिर होऊ शकले नाही. आम्ही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लातूरला ‘अॅग्रोसल’चा आगळावेगळा कार्यक्रम केला. शेतक-यांनी ग्राहकांना थेट माल विकण्याच्या त्या प्रयोगाची त्या वेळी चर्चा झाली. ‘दैनिक लोकमन’मधील मी लिहिलेल्या अग्रलेखांचा सग्रंह काढण्याची कल्पना पुढे आली. तेव्हा त्याचे संपादनही अमरनेच केले. ‘माती आणि नाती’ या अग्रलेखसंग्रहाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्याच काळात आम्ही बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘लातूरचा कानमंत्र’ या नावाने पुस्तक काढले. त्यात आम्हा सर्वांनाच आर्थिक फटका बसला. अमरने अंबाजोगाईत सुरू केलेल्या ‘मंत्रा अॅग्रो’ या कंपनीत मीही सहभागी झालो. मात्र ‘मंत्रा’ हाही एक प्रयोग ठरला.
या बाबी नोंदवण्याचा हेतू एकच आहे. तो म्हणजे आमची प्रयोगशीलता लक्षात यावी. चाकोरी सोडायची कोणाची तयारी नसते. त्यातही आर्थिक अपयश स्वीकारण्याची मानसिकता कोणाचीच नसते. मात्र आम्ही प्रयोगाच्या अपयशांचा बाऊ कधीच केला नाही. नवनवे प्रयोग केले. आणखी करत राहू. ‘मुक्तरंग प्रकाशन’च्या सर्व प्रयोगात त्याचा सहभाग आहे. त्याचे ‘दुष्काळदेशी’ हे पहिले पुस्तक मी प्रकाशित केले याचा मला मनापासून आनंद आहे.
एक काळ असा होता, की अमरचे आणि माझे दिवसातून चार-चार तरी फोन व्हायचे. फोनशिवाय आमचा एकही दिवस जात नसे. त्यावेळी माझी बायको सविता मला म्हणायची, “दोघांपैकी एकजण स्त्री असती तर तुमचं आदर्श प्रेमप्रकरण म्हणून गाजलं असतं.” त्यातील गंमतीचा भाग सोडला तर कोणीही प्रेमात पडावे असेच अमरचे व्यक्तिमत्त्व आहे. माझ्यासारखे त्याचे कितीतरी मित्र देशभर आहेत ! त्याचे अनुभविश्व किती तरी विशाल आहे ! अमर माणसांमध्ये रमतो. कुठल्याही स्तरातील, वयातील स्त्री-पुरुषांशी त्याचा संवाद होऊ शकतो, हे त्याचे सर्वात मोठे बलस्थान आहे. तो माझ्याशी ज्या पद्धतीने बोलतो त्याच पद्धतीने तो माझा मुलगा, आनंदशी बोलू शकतो, बोलतो. त्याच्यातही तो तेवढाच रममाण होतो. त्याच्या या गुणांमुळे तो सर्वांना हवाहवासा वाटतो.
अमरचा पिंड कार्यकर्त्यांचा आहे. तो कुठल्याही कामात उतरला की तो स्वत:ला पूर्णपणे झोकून देतो. जीव ओतून काम करतो. यश-अपयश, फायदा-तोटा हे शब्द काम करताना त्याच्या खिजगणतीतही नसतात. त्याची विचार करण्याची पद्धत तर्कशुद्ध आहे. तो कुठलीही गोष्ट बुद्धीच्या, तर्काच्या कसोटीवर घासून स्वीकारतो. त्याचे विचार ठाम, स्पष्ट असले तरी चर्चेतून पुढे आलेले निष्कर्ष तो स्वीकारतो, मान्य करतो. त्यामुळे त्याच्याशी छान संवाद होतो, रंगतो.
अमर नेहमी सकारात्मक विचार करतो. तो कधीच जाणीवपूर्वक कोणाला दुखावत नाही. कोणाचा द्वेष करणे, वाईट चिंतणे त्याच्या स्वभावात नाही. तो चिकित्सा मात्र परखडपणे करतो. कोणी त्याचा ‘स्व’ दुखावण्याचा प्रयत्न केला तर मात्र तो त्याला सोडत नाही. लेखन आणि वक्तृत्व या बाबी अवगत असणारे अपवादानेच असतात. अमरची दोन्ही बाबतींत मास्टरकी आहे.
अमर आणि त्याची पत्नी आशा हे आतंरधर्मीय प्रेमविवाहाचे आदर्श उदाहरण आहे. एकमेकांबद्दलचा विश्वास व परस्परांबद्दलची समज अशी क्वचितच पाहायला मिळते. आशा अंबेजोगाईतील मेडिकल कॉलेजमध्ये प्रमुख परिचारिका म्हणून काम पाहतात. अमरची मुलगी तरंग इंजिनिअर असून त्यांचा मुलगा सारंग वोडाफोन कंपनीमध्ये अधिकारी आहे. सारंगचे लग्न झालेले असून त्यास ‘साद’ हा मुलगाही आहे.
अमर जयप्रकाश नारायण यांच्यासोबत राहिलेला आहे. संघर्षवाहिनीची प्रेरणा जे.पी. हेच होते. ‘अपनी पसंद की जिंदगी, हॉं यह अधिकार हमारा है!’ ही त्याची युवकांसाठीची घोषणा होती. मला वाटते, अमरने ही घोषणा त्याच्या जगण्यात उतरवली आहे. त्याने त्याची तेवढी किंमतही मोजली आहे.
अमर माझा मानसिक आधार आहे. जेव्हा-जेव्हा माझ्यावर आघात होतो, अंधारून येते, समोर रस्ता दिसत नाही. आपण कोलमडून पडतो की काय असे वाटू लागते. तेव्हा मी कुठेही न जाता अमरकडे जातो. त्याच्याजवळ मन मोकळे करतो. त्याच्याकडे माझ्या दुखण्यावर इलाज असतोच असे नाही. परंतु त्याला भेटल्यानंतर, त्याच्याशी चर्चा केल्यानंतर माझ्यातील नैराश्य निघून जाते. पुन्हा आत्मविश्वास जागा होतो. आपण आणखी चालू शकतो, नवा रस्ता शोधू शकतो असा विश्वास मनात निर्माण होतो. यापेक्षा मित्रापासून अधिक काय हवे?
– महारुद्र मंगनाळे, 9422469339,
नाव – अमर हबीब,
जन्म – सप्टेंबर 10, 1954
पत्ता – अंबर, यादव हॉस्पीटलच्या शेजारी, हौसिंग सोसायटींग, अंबाजोगाई – 431517
शिक्षण – प्रथम वर्ष बी. ए.ला शिकत असताना जे. पी. मूव्हेन्टमध्ये सहभागी झाल्याने शिक्षण सोडले.
व्यवसाय – पत्रकार, स्तंभलेखक. प्रकाशक. ‘परिसर प्रकाशना’चे मालक, लेखक आणि संपादक.
कार्यरत – फेब्रुवारी 2010 मध्ये आद्यकवि मुकुंदराज कविता ग्रंथालयाची स्थापना.
दैनिक मराठवाड्याच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक
सद्यस्थिती अन् सद्यघटनांवर लेख, शेतक-यांच्या समस्यांवर लेखन, पुस्तके, विशेषांक आणि स्मरणींकाचे
संपादन,
लिबरल मूव्हमेन्टचे कार्यकर्ते.
गेल्या काही वर्षांत पंधरापेक्षा जास्त पुस्तकांचे प्रकाशन.
दुष्काळ देशी, नाते, संवाद, खरी कमाई, खुल्या व्यवस्थेत मुसलमानांचे भवितव्य, भाषणाची गोष्ट, कलमा
आणि आकलन ही त्यांनी लिहीलेली पुस्तके.
संपर्क – 9422931986, इमेल – habib.amar@gmail.com