अनुराधा प्रभुदेसाई. मध्यम वयाच्या. चुणचुणीत. स्मार्ट. चेहऱ्यावर व एकंदर देहबोलीत आत्मविश्वास. त्या जे बोलल्या त्यात उत्कटता होती, कारण त्या जे सांगत होत्या, ते त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले होते!
अनुराधा यांच्या आयुष्याला २००४ साली कलाटणी मिळाली. अनुराधा, त्यांचे यजमान गुरुनाथ, त्यांचे मित्र विक्रम व त्यांची पत्नी अपर्णा असे चौघेजण लडाखला सहलीला गेले होते. अनुराधा सांगतात, “आम्ही लडाखला पोचल्यावर जेव्हा आपापले सामान उचलून चालू लागलो, तेव्हा भराभर चालवेना. धाप लागल्यासारखे जाणवू लागले. त्या क्षणीच त्या वातावरणातील वेगळेपणा जाणवला. मला त्या भागाविषयी काहीच माहिती नव्हती. आम्ही तो भाग आजुबाजूला दिसणा-या जवानांशी बोलत, गप्पा मारत असे करत बघत फिरत होतो. कारगिलहून द्रासकडे जात असताना, रस्त्यात पाटी दिसली. ती वाचली आणि मी आतून पूर्णपणे हादरून गेले.”
ती पाटी होती – ‘I only regret that I have but one life to lay down for my country.’
पाटी वाचून, ते चौघेजण तेथे बोलत उभे असताना, त्यांचा आवाज ऐकून सुभेदार मेजर कदम त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, “आज, सात महिन्यांनी मी मराठी ऐकत आहे!”
म्हटले तर किती साधी गोष्ट पण तिचे महत्त्व अनुराधा यांना त्या क्षणी जाणवले.
अनुराधा द्रासला सरकारी गेस्ट हाऊसमध्ये राहिल्या होत्या. तेथील खानसामाशी गप्पा मारत असताना, ९९च्या कारगिल युद्धात तेथे भारतीय जवान धारातीर्थी पडल्याचे कळले. तेव्हा पुन्हा एकदा अनुराधा अस्वस्थ झाल्या. त्यांचे रोजचे व्यवहार, नोकरीधंदा, खाणेपिणे व्यवस्थित चालू होते – त्या विचारामुळे अनुराधा यांच्या मनात त्या घटनेच्या भीषणतेने, हजारो कुटुंबांवर झालेल्या परिणामाने कोलाहल सुरू झाला.
अनुराधा यांनी भारताने जिंकलेले कारगिल युद्ध जेथे झाले, तो टायगर हिलचा भाग लांबून पाहिला. तो सूळका पाहून त्यांना जाणवले, की भारतीय जवान परतीचा मार्ग धूसर असूनही मृत्यूच्या जबड्यात गेले असतील!
अनुराधा त्यानंतर तोलोलिंगच्या विजयस्तंभाजवळ गेल्या. तेथे अनेक पाट्या होत्या. एका पाटीवर कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या नावाची यादी, त्यांची वये लिहिलेली होती. शहीद झालेल्या बावीस-तेवीस-चोवीस वर्षांच्या जवानांची ती नावे वाचून, अनुराधा परत एकदा हादरून गेल्या. पण तो त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉर्इंट ठरला!
अनुराधा व विक्रम यांनी त्याच क्षणी विजयस्तंभाजवळ शपथ घेतली, की “आम्ही सर्वसामान्यांना दरवर्षी लडाख येथे घेऊन येऊ.” भारतीय नागरिकांना तेथे न्यायचे, तो भाग दाखवायचा, कारगिल युद्धाच्या वेळी भारतीय जवान किती कठीण परिस्थितीत तेथे लढले, ते किती खडतर परिस्थितीत देशाच्या सीमांचे सदैव रक्षण करतात, डोळ्यांत तेल घालून, चोवीस तास जागता पहारा ठेवतात. ते त्यांच्या कुटुंबापासून किती दूर गेलेले असतात, हे सर्व त्यांना दाखवायचे. त्या भूमीला वंदन करणे किती गरजेचे आहे, हे पाहणाऱ्यांना जाणवून द्यायचे. तेव्हा खरे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे तीच भूमी आहे हे त्या लोकांना जाणवेल आणि भारतीय जवान त्यांच्या देशाच्या सीमांचे रक्षण करत आहेत म्हणूनच आपण नागरिक आपापल्या घरात सुखाने झोपू शकतो, याची जाणीव लोकांना होईल. तेच अनुराधा प्रभुदेसार्इंचे ‘मिशन लडाख’.
त्या शपथेनुसार, प्रत्येक वर्षी, 26 जुलै या दिवशी अनुराधा एका ग्रूपला घेऊन कारगिलला जातात. ‘२६जुलै’ हा ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
अनुराधा यांनी लोकांना २००४ सालापासून सलग पाच वर्षें कारगिलला नेले. त्यांच्या तेथील जवानांशी ओळखी झाल्या. अनुराधा त्यांच्या मायेच्या ओलाव्यामुळे त्या जवानांची आई, मावशी, ताई बनून गेल्या. त्या सर्वांनी, अनुराधा यांनी त्यांचा तो उपक्रम चालूच ठेवावा असा आग्रह केला.
अनुराधा यांचा जन्म व शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी शाळेत असल्यापासून ड्रामा, मोनो अॅक्टिंग, वक्तृत्वस्पर्धा यांमध्ये सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून बक्षिसे मिळवलेली आहेत. पुढे, त्यांनी बँकेत नोकरी करत असतानाही इंटरबँक ड्रामा स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे बक्षीस मिळवले. त्यांनी पूर्वी मुंबई दूरदर्शनवरील नाटके, मालिका यांमध्ये कामे केली आहेत. त्यांनी ‘मालगुडी डेज’मध्ये; तसेच, राजदत्त यांच्या दोन टेलिफिल्ममध्येही भूमिका निभावल्या आहेत.
अनुराधा यांनी २०११ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी त्यांचे पुढील आयुष्य केवळ जवानांसाठी – त्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करण्यात खर्च करण्याचे ठरवले. पती गुरुनाथ आणि विक्रम व अपर्णा हे मित्रद्वय त्यांच्या समवेत आहेत. त्यांनी ‘लक्ष्य फाउंडेशन’ची स्थापना २००९ साली केली.
‘वीरभोग्या वसुंधरा’ हे ‘लक्ष्य फाउंडेशन’चे घोषवाक्य आहे. म्हणजे सैनिक ‘किती जगावे यापेक्षा कसे जगावे’ ह्याचा आदर्श घालून देतात हा त्या वाक्याचा अर्थ.
शिस्त, निष्ठा, तीव्र इच्छाशक्ती व समर्पण हे लष्करातील जवानांत आढळणारे गुण आहेत. ते गुण व्यक्ती, समाज व देशाचा उत्कर्ष यांसाठी आवश्यक आहेत. त्या गुणांचा / वृत्तीचा विविध माध्यमांद्वारे प्रसार करून सक्षम, सशक्त आणि संयमी पिढी निर्माण करणे हे अनुराधा यांनी पहिले उद्दिष्ट ठेवले आहे.
शालेय व महाविद्यालयीन मुले, कॉर्पोरेट ऑफिसेसमधील कर्मचारी व अधिकारी यांच्यापुढे, संरक्षणदलातील व्यक्तींच्या उदात्त व प्रखर देशभक्तीच्या कथांचे दृक्श्राव्य कार्यक्रम सादर करणे. त्याद्वारे तरुण-तरुणींच्या मनात स्वाभिमान व देशप्रेम यांची ज्योत जागवणे हे अनुराधा यांचे दुसरे उद्दिष्ट आहे. त्यांनी तसे अडीचशेहून अधिक कार्यक्रम केले आहेत.
अनुराधा लष्करातील सन्मानप्राप्त वीरांच्या कथा छोट्या पुस्तिकांद्वारे जनमानसात पोचवत असतात. त्यांनी जवानांच्या वीरगाथांवरील परमवीरचक्रप्राप्त चार, महावीरचक्रप्राप्त दोन व वीरचक्रप्राप्त दोन अशा पुस्तिका तयार केल्या आहेत. त्या तीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्या आहेत. त्यांचा एकंदर मानस तीस वीरगाथा प्रकाशित करण्याचा आहे.
आर्थिकदृष्ट्या मागास मुलाला/मुलीला लष्करात भरती होण्याची इच्छा असल्यास, त्याला/तिला आर्थिक साहाय्य करून प्रोत्साहन देणे हे ‘लक्ष्य फाउंडेशन’चे तिसरे उद्दिष्ट.
घरापासून कित्येक महिने व कित्येक योजने दूर असणा-या , सैनिकांना रक्षाबंधनाप्रीत्यर्थ सीमेवर जाऊन राखी बांधणे, त्यांच्यासाठी मिष्टान्न घेऊन जाणे; ‘दिवाळी पहाट सैनिक परिवारासोबत’ या संकल्पनेनुसार, सैनिकांच्या घरी दिवाळी साजरी करून, सैनिकांचा आनंद द्विगुणित करणे; तसेच, ‘व्हॅलेंटाईन डे सैनिकांसोबत’ असे काही उपक्रम अनुराधा यांनी सुरू केले आहेत.
अनुराधा दरवर्षी २६ जुलैला, विजय दिवस साजरा करण्यासाठी, ग्रूपला घेऊन जातात, त्यावेळी जवानांसाठी एक कविता करतात व ती कविता सोबत नेतात. आता त्यांना त्या कवितेच्या चार-पाचशे प्रती लागतात, कारण प्रत्येक जवानाला ती कविता त्याच्या संग्रही ठेवायची असते!
‘लक्ष्य फाउंडेशन’ने वीर जवानांच्या भावना, त्यांच्याच शब्दात व्यक्त करणारे विचार, बुकमार्क तयार करून त्यावर छापले आहेत. त्यांचेही वाटप केले आहे.
उदाहरणादाखल, काही बुकमार्कवरील उद्धृते अशी –
1. “The safety, honour and welfare of the country come first always and every time. The honour, welfare and comfort of men you command come next always and every time. Your own ease, comfort and safety come last always and every time.”
2. “We do difficult on routine. Impossible may take little long.”
3. “If I die in battle zone, put me i box, send me home, pin my medals on my chest, tell my mom I did my best.”
4. “If death strikes before I prove my blood, I promise I will kill death.”
अनुराधा यांचे काम पाहून, २०१० व २०११साली ‘विजयदिवस साजरा करायला या’ असे खास आमंत्रण लष्करातर्फे त्यांना देण्यात आले होते. लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने यांच्या हस्ते अनुराधा यांना २०११ साली मेमेन्टोही देण्यात आला. कारगिल मेमोरियल येथे पुष्पचक अर्पण करण्याचा मानही अनुराधा यांना मिळाला.
‘इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस कमांडंट’तर्फेही अनुराधा यांना मेमेन्टो देण्यात आला आहे.
संपर्क –
अनुराधा प्रभुदेसाई ९२२४२९८३८९
गुरूनाथ प्रभुदेसाई ९८१९१२२७३६
– पद्मा क-हाडे
ताई तुमचा उपक्रम फारच चांगला
ताई तुमचा उपक्रम फारच चांगला आहे. तुमच्या उपक्रमात सर्वाना सामावून घ्या.
Aplya karyaasathee,jagateel
Aplya karyaasathee,jagateel kaahee sarwaat junya ani ladhaau paltaneen paiki ek aslelya hyaa paltanichya chahtyanchyaa samuhadware shubhecchhaa.JAY HIND
Sarva bhartiyani kewal
Sarva bhartiyani kewal bhartiya ha dharm samjla tar sainkanchya tyagala layak ahot ase mhanta yeil. Nahitar halli sainikala prshna padawa ashi sthiti ahe ki shatru seemepalikade ahe ki alikade.
अनुताई, आम्हांला तुमचा अभिमान
अनुताई, आम्हांला तुमचा अभिमान आहेे.तुमच्यामुळे सैनिकांचे खडतर जग आम्हाला समजले. त्या वीरांना आमची आदरपूर्वक सलामी.
खूपच छान कार्य करत आहात
खूपच छान कार्य करत आहात
Tai tumcha upkram khpch…
Tai tumcha upkram khpch changla ahe. tumchya pustkadware sainikanche jivan tumhi amchyparyant pohchvalat
29.04.20
१२ vi chyaa pathyapustakआपला…
१२ vi chyaa pathyapustakआपला पाठ अंतर्भूत झाला त्यामुळे बारकाईने माहिती मिळवताना आपण सर्व लोक स्वार्थी , भावनाहीन, निष्ठूर, सामाजिक बांधिलकी विसरलो आहोत याची जाणीव झाली.आपल्या साठी आपला आज देणारे….. आपण त्यांना कसे विसरू शकतो??? आपल्या भावना , उद्देश विद्यार्थ्यां पर्यंत निश्चित पोहोचवण्याचा प्रयत्न करेल.
Tai Tumchya uppkramat amhala…
Tai Tumchya uppkramat amhala he samaun ghya amhala Anand vatel Tumchya barobar hya uppkramat samavisht vhayla
खरंच ताई तुम्ही जर करताय ते…
खरंच ताई तुम्ही जर करताय ते खूप प्रेरणादायी व आदरणीय आहे .आत्ता च्या पिढीला ही सर्व महिती, सैनिकांचे बलिदान ,त्यांच्या बद्दल कृतन्यता त्याचा त्याग अत्यंत भावपणे सांगता मी तुंमचे आभार मानतो ।
भारतीय लष्कर ही तर आपली खरी…
भारतीय लष्कर ही तर आपली खरी शान आहे. मॅडम, वीरांना सलामी या लेखातून आम्हाला कारगिलचा थरार जाणवला. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.
जय जवान! जय किसान!
आदरणीय,सन्माननीय ताई….
…
आदरणीय,सन्माननीय ताई….
प्रथमदर्शी खूपच सोपा आणि सरळ वाटणारा हा अतिशय अवघड उपक्रम आहे. कारगिल आणि द्रास ला एक पिकनिक म्हणून भेट देणारे हजारो पर्यटक असतील. पण भारतीय सैनिकांच्या संवेदना,भावना जाणून घेवून त्या स्वतः पुरत्या मर्यादित न ठेवता सर्व भारतीयांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हा जो काही उपक्रम (खरं तर खटाटोप च म्हणावा लागेल) राबवता आहेत त्यासाठी आपले मनःपुर्वक आभार आणि अभिनंदन….?? हे वाखाण्याजोगे कार्य आहे. Really salute to you n your team….????
Comments are closed.