गाडगेबाबांना नंतरच्या पिढ्यांनी पाहिलेले नाही; परंतु गाडगेबाबांच्या समाजसेवेचा आदर्श घेतलेला, स्वत:च्या ऐषआरामाच्या जीवनावर पाणी सोडून अनाथांसाठी त्यांचे आयुष्य दान देणारा, मातृहृदयी, कृतिशील बाप बघायचा असेल तर तो शंकरबाबांमध्येच बघता येतो ! अचलपूरचे शंकरबाबा पापळकर ! त्यांची वैचारिक जातकुळी बुद्धाच्या तत्त्वज्ञानाशी जमते, म्हणून ते रोज बुद्धाचे स्मरण करतात. ते म्हणतात, “माझा अध्यात्माशी संबंध स्मरण करण्यापुरताच आहे. बाकी दिवसाचे चोवीस तास मी माझ्या मुलांचाच विचार करत असतो. माझ्या काही मुलांचे पुनर्वसन होणार नाही, कारण त्यांच्यात बहुविकलांगता आहे. देशातील प्रत्येक अनाथाचे, मतिमंद-विकलांगाचे पुनर्वसन व्हावे हीच माझी शेवटची इच्छा आहे.”
बाबा म्हणतात, “देशाची प्रशासन व्यवस्था प्रचंड किडलेली आहे. ती सुधारत बसण्यापेक्षा आपण आपले काम मॉडेल म्हणून करत राहवे, हाच त्यावरचा खरा उपाय आहे.” बाबांनी स्वत:साठी बांधलेल्या कबरीसमोरील एका झाडावर समर्पक शेर लिहिला आहे –
नर्म सोफों पे बैठे हैं कुंडली मारकर | आजकल साप पिटारोंमें नहीं रहते || बाबा त्यातून आजचे वास्तव व्यक्त करतात.
शंभर मुलगे आणि एक मुलगी यांचे आईबाप म्हणून महाभारतात गांधारी आणि धृतराष्ट्र यांची नावे घेतली जातात. पण आजच्या घडीला, एकशेपस्तीस मुलांचे बाप म्हणून ओळखले जाणारे संपूर्ण भारतात एक शंकरबाबा पापळकर असतील ! शंकरबाबांनी वाढवलेली ती सर्व एकशेपस्तीस मुलं स्वत:च्या नावानंतर शंकरबाबांचे नाव बाप म्हणून आणि बाबांचे पापळकर हे आडनाव लावतात. नुसते तोंडी लावत नाहीत, तर प्रत्येकाच्या आधारकार्डावर, शाळा-महाविद्यालयामध्ये; तसेच, मतदान कार्डावरही तेच नाव आहे.
ज्यांना कोणी नातेवाईक नाही, रक्ताचे नाते नाही, स्वत:ची जात-धर्म-नाव-गाव माहीत नाही अशा मुलांनी जावे कोठे? अठरा वर्षांवरील अनाथांसाठी देशात एकही योजना नाही. किंबहुना देशातील अनाथालयांमधील मुलेमुली अठरा वर्षांची झाली की त्यांना तेथून बाहेर पडावे लागते. जन्मत:च अनाथ झालेल्या मुलांमधील मुलगे बहुतेक वेळा भरकटत गुन्हेगारी जगात ओढले जातात, तर मुली देहविक्रीच्या व्यवसायात अडकतात. भारतात दरवर्षी एक लाख अनाथ मुली देहविक्रीच्या व्यवसायात विकल्या जातात. दरवर्षी हजारो अनाथालयांतून तीन लाखांच्या घरात अशी बेसहारा मुलं बाहेर पडतात. त्यांच्याकडे मतदानाचं कार्ड नसते, रेशनकार्ड नसते की कायमस्वरूपी निवासाचा पत्ता. त्यांना नोकरी कोण देणार, त्यांची लग्ने कशी होणार, या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेच नाहीत !
अमरावती जिल्ह्यातील शंकरबाबा पापळकर गेल्या चाळीसहून अधिक वर्षे अशा मुलांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम करत आले आहेत. शंकरबाबा मूळचे परतवाड्याचे. ते स्वत: धुनी. ते तरुण वयात गाडगेबाबांच्या संपर्कात आले. ते त्यांच्यासोबत त्यांची भजनं ऐकत गावोगावी फिरू लागले. गाडगेबाबांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर परिणाम झाला. त्यांनी बाबांचे ‘गोपाला’ नावाचे मासिकही काही काळ चालवले. त्यांचे गाडगे मिशनसोबत मतभेद झाले, तेव्हा शंकरबाबांनी स्वत:चे मासिक सुरू केले – देवकीनंदन. गाडगेबाबांनीच त्यांना “शंकर, तू या अनाथांचा नाथ झालं पाहिजेस” असे सांगितले. ते त्यांच्या मनात कायमचे रुजून राहिले.
शंकरबाबांनी पत्रकार म्हणून काही काळ काम केले. त्यांना अनेक विषयांत रस होता. त्यांना देश-परदेशांतील दार्शनिकांचे तत्त्वज्ञान समजून घेण्यात रस होता, उर्दू शायरीत रस होता. ते रजनीशांच्या संपर्कात आले. त्यांच्यावर प्रभाव साने गुरुजींचाही होता. ते पत्रकार असल्याने त्यांची उठबस राजकारणातील मंडळींमध्येही होती. त्यांच्या ओळखी बाळ ठाकरे, शरद पवार यांच्याशी होत्या. देवकीनंदन या मासिकाच्या निमित्ताने शंकरबाबांची नंतर राष्ट्रपती झालेल्या प्रतिभा पाटील यांच्याशी मैत्री झाली. त्यांचा सहभाग पाटील यांच्या प्रत्येक निवडणुकीत असे. ते अशा मित्रमंडळींमुळे काँग्रेसच्या विचारधारेकडे ओढले गेले; पण त्यांचे मन राजकारणातील सत्ताकारण आणि अर्थकारण बघून विटले. गाडगेबाबांचे शब्द ‘तू अनाथांचा नाथ हो‘, हे त्यांना अस्वस्थ करतं. रजनीशांचा ‘अपने जीने का अर्थ क्या है?’ हा प्रश्न त्यांना छळत असे.
त्या द्वंद्वात असतानाच शंकरबाबांची भेट अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकर वैद्य यांच्याशी झाली. शंकरबाबांनी अनाथ मुलांसाठी कार्य उभे करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. त्यांनी ‘गोपाला शिक्षण संस्थे’च्या माध्यमातून परतवाडा तालुक्यात वझर फाटा येथे स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मुकबधिर बेवारस बालगृह सुरू केले. ते साल 1985 होते. शंकरबाबांनी ठरवले ते त्या मुलांचे हक्काचे घर असेल, ती मुले तेथे अनाथ असणार नाहीत. त्यासाठी त्यांनी सर्व मुलांचे कायदेशीर पालकत्व स्वीकारले.
अनाथ, बेवारस मुले सरकारच्या पोलिस विभाग, समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागाकडून संस्थेत दाखल होऊ लागली. शंकरबाबांनी त्या मुलांना त्यांची मुलं मानले, त्यांना स्वत:चे नाव दिले, कायदेशीररीत्या सर्वांना दत्तक घेतले; त्यांच्या राहण्या-खाण्याची, आरोग्याची, शिक्षणाची व्यवस्था केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांना वडिलांचे प्रेम देऊ केले. त्यांनी सरकारचे पगारदार कर्मचारी नाकारले. मतिमंद, अंध, मूकबधिर सज्ञान मुलांना स्वत:च्या पायावर उभे करून देण्यासाठी स्वत:चाच ‘वझर पॅटर्न’ विकसित केला. त्यांच्या अनाथालयात मुलांची भरती भारंभार केली जात नाही, पण जी मुलं तेथे येतात त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी शंकरबाबांनी घेतलेली असते.
शंकरबाबांनी 1985 पासून आतापर्यंत सतरा मुलींची लग्न लावून दिली आहेत. ते बत्तीस नातवांचे आजोबा आहेत. मुलगा-मुलगी, दोन्ही मुके असताना जेव्हा त्यांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा बोलू लागतो, तेव्हा त्या जोडप्याला होणारा आनंद शंकरबाबांसाठी सर्वाधिक मोलाचा असतो. अंध जोडप्यांना डोळस मुलं, मुक्या आई-बाबांना बोलकी मुलं, विकलांग जोडप्यांना अव्यंग अपत्य जन्माला आल्याचा आनंद बाबांच्या बोलण्यातून डोकावतो. शंकरबाबांच्या अनाथ मुला-मुलींची लग्नं धुमधडाक्यात होतात. ते सोहळे लोकसहभागातून होतात. शंकरबाबांची बारा अनाथ मुले विविध ठिकाणी नोकरी करतात. शंकरबाबांनी एक सूत्र पाळले आहे – एकदा लग्न झाल्यावर ते त्या मुला-मुलींना पुन्हा आश्रमात येऊ देत नाहीत. बाबाही त्यांच्याशी सहसा संपर्क ठेवत नाहीत.
‘वझर फाटा‘ अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरापासून जवळच आहे. तेथे एका टेकडीच्या पायथ्याशी पंधरा एकरांत अंबादास पंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृह (अनाथालय) ही संस्था उभी आहे. तेथे गेल्यावर एखाद्या जंगलात प्रवेश करत आहोत असे वाटते. पाच एकरांत अनाथालयासाठी वापरात येणारी छोटी-मोठी बांधकामे आहेत. अनाथ मुलांची व मुलींची निवासव्यवस्था स्वतंत्र आहे. काही मनोविकलांग मुलांची व्यवस्था स्वतंत्रपणे केलेली आहे. अनाथालयांच्या परिसरात आणि बाजूच्या टेकडीसदृश्य डोंगराळ जमिनीच्या दहा एकरांच्या परिसरात शंकरबाबांनी पंधरा हजारांपेक्षा जास्त झाडे लावली आहेत. त्यातील प्रत्येक झाड बालगृहातील मुलांनी दत्तक घेतले आहे. गतिमंद, कर्णबधिर, अंध मुलेच झाडांची काळजी घेतात. त्यांनी प्रेमाने जोपासलेली झाडे आता मुलांच्या मदतीला आली आहेत असे शंकरबाबा सांगतात. म्हणजे काय, तर झाडांपासून मिळणारे उत्पन्न त्या मुलांच्या औषधपाण्यासाठी, शिक्षणासाठी, कपड्यालत्त्यांसाठी वापरले जाते.
शंकरबाबांचे व्यक्तिमत्त्व अवलिया आहे. त्यांना हजारो शेर मुखोद्गत आहेत. शायरी समजणाऱ्यांशी त्यांची चांगली मैफल जमते. बुद्ध, कबीर, गाडगेबाबा, रजनीश यांच्या विचारांचा प्रभाव शंकरबाबांच्या जीवनावर आहे. तो त्यांच्या बोलण्यातूनही जाणवतो. त्यांनी स्वत:ची कबर हयातीत त्या परिसरात उभारली आहे. शंकरबाबा सांगतात, की ते गेल्यानंतरही मुलांना त्यांचा आधार राहवा यासाठी जिवंतपणीच ती तरतूद करून ठेवली आहे.
बाबांना शेरोशायरीची आवड असल्यामुळे त्यांनी तेथील झाडांवर उत्तम शेर लिहिलेल्या पाट्या लावल्या आहेत. मुलं निसर्गात वावरतात तेव्हा त्यांच्यावर त्यांच्या नकळत शाश्वत मूल्यांचा संस्कार होत असतो.
मनोविकलांग, अपंग मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यांना स्वत:च्या शरीराचे-विधींचेही भान नसते. अशा मुलांना सांभाळणे, त्यांची शुश्रूषा करणे हे काम सोपे नाही. ते सर्व काम बाबा स्वत: आणि त्यांनी वाढवलेली मुलं करतात. बाबांच्या आश्रमात बाहेरील कर्मचारी नाहीत. बाबांनी वाढवलेली सज्ञान परंतु अंध, अपंग, कर्णबधिर मुलंच तेथे कर्मचारी आहेत. ते सर्व विकलांग एकमेकांच्या सहकार्याने त्यांची त्यांची दैनंदिन कामे करू शकतात. ती बाबांचीच देणगी आहे.
शंकरबाबा पापळकर 9405990309
नरेंद्र लांजेवार हे तीस वर्षांपासून मुक्त पत्रकार म्हणून लेखन करतात. त्यांनी महाराष्ट्रातील नामवंत दैनिकांमध्ये स्तंभ लेखन केले आहे. त्यांची एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा, वाचू आनंदे, एकाच नाण्याची तिसरी बाजू, सल उकल, प्रश्न आणि प्रश्नचिन्ह?, शिक्षणावर बोलू काही.., शेतकरी आत्महत्या: चिंता आणि चिंतन, वाचन संस्कृती: वास्तव आणि अपेक्षा अशी पुस्तके प्रकाशित आहेत. ते बुलडाणा येथील भारत विद्यालयात ग्रंथपाल असून सध्या ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा‘चे सहसंपादक आहेत. त्यांनी पालक-बालक समुपदेशक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी वाचनसंस्कृती वृद्धींगत करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोगही केले आहेत.
———————————————————————————————————————————————————
दंडवत…