अनंत फंदी हे संगमनेरचे. पूर्वजांचा धंदा सफारीचा, गोंधळीपणाचा, भवानीबाबा नामक साधूने फंदीला धोंडा मारला. तेव्हापासून त्याला कवित्वस्फूर्ती झाली! ‘फंदी अनंत कवनाचा सागर’ असे त्या शाहिराबाबत म्हटले जाते. त्यांचे सात पोवाडे, पंचवीस-तीस लावण्या आणि ‘माधवनिधन’ हे काव्य आहे. त्यांनी कटाव व फटके लिहिले आहेत. अनंत फंदी यांची चंद्रावळ ही लावणी प्रसिद्ध आहे. त्या लावणीत ‘कथा कृष्णाची परंतु रूप मात्र सर्वसामान्य माणसाचे आहे’. त्यांच्या विनोदात ग्राम्यता आणि अश्लीलता जाणवते. त्यांच्या लावण्यांतून प्रतिभेची चमक दिसत नाही. परंतु त्यांची सामाजिक जाणीव जागृत होती. त्यांचा फटका ‘बिकट वाट वहिवाट नसावी’ हा प्रसिद्ध आहे. तो फटका सर्वसामान्य माणसासाठी आचारसंहिताच होय! त्यात दांभिकपणाचा लवलेश नाही. त्यांनी तत्कालीन समाजाला निर्भीडपणे व व्यावहारिक उपदेश केला. त्यांचे फटके सडेतोड उपदेश आणि प्रसादात्मकता यांमुळे खाताना आनंद वाटतो. त्यांनी दुसऱ्या बाजीरावाची कारकीर्द वर्णन करणारी लावणीदेखील लिहिली आहे.
-नितेश शिंदे niteshshinde4u@gmail.com
हा ही लेख वाचा – शाहिरी काव्याचा मराठी बाणा (Shahiri Poets)