अध्यात्म आणि धर्म

1
30
_Purushottam_Karhade_2.jpg

(पुरूषोत्तम क-हाडे यांनी दिनकर गांगल यांच्या ‘अध्यात्म’ लेखावर घेतलेले आक्षेप व गांगल यांनी केलेले त्याचे निराकरण)

दिनकर गांगल यांचा अध्यात्म हा लेख वाचला. मी भगवद्गीता या विषयाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे तो लेख वाचल्यानंतर मनात विचार आले ते असे – 

क-हाडे : सुरुवातीपासूनच्या मानवी जीवनाची व धर्माची सांगड योग्य प्रकारे सांगितली आहे.

गांगल : धन्यवाद.

क-हाडे : माणूस प्रतिसृष्टी निर्माण करण्याच्या गोष्टी बोलू शकतो, हे अनुमान पटत नाही. विज्ञानाने केलेली प्रगती ध्यानात घेतली तरी मनुष्य पृथ्वीच्या -हासासाठी कारण होत आहे. नद्या व हवा यांचे प्रदूषण वाढून निसर्गाचा समतोल ढळत आहे. भारताचा विचार केला तर, असंख्य लोक किडामुंगीचे जीवन जगत आहेत. अन्न निर्माण करणारा शेतकरी स्वत:चा ‘धर्म’ सोडून आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. प्रगत राष्ट्रांचे नेते एकमेकांस अणुबाँबची धमकी देत आहेत. ही तर पृथ्वीच्या विनाशाचीच नांदी दिसत आहे! या परिस्थितीत कोणाची प्रतिसृष्टी दिसत आहे हे समजत नाही.

मानवी जीवनाचे कोणते गूढ उलगडून दाखवले गेले हे स्पष्ट होत नाही. धर्मांनी केलेली मनुष्यजीवनाची व्यवस्था फोल ठरली हे विधान पटत नाही. कारण धर्म पाळला तरच जीवनाची व्यवस्था ठीक राहील. माणसाने धर्म नाही पाळला व जीवन कवडीमोल झाले, तर त्याचा दोष माणसांचा आहे. धर्माचा नाही. मानवी जीवन विवेकहीन होत आहे. वाईट प्रवृत्ती प्रबळ  होत आहेत. देशाचे नेतृत्व करणारे स्वार्थी व भ्रष्ट होऊन, सर्वसामान्य माणूस प्रतिदिनी हताश व निराश होत आहे. धर्म योग्यपणे जाणणा-यास कर्मकांड करणे सक्तीचे नाही हेपण लक्षात घ्यायला पाहिजे. धर्माचा योग्य अर्थ लक्षात घेणे आवश्यक आहे.

गांगल : परिच्छेदातील प्रतिपादन हे रूढ विचारसरणीस धरून योग्य आहे. परंतु विद्यमान जग येत्या (फक्त) पाच वर्षांत पासष्ट टक्के बदलून जाणार आहे असे एक भाकीत आहे. सध्या वय वर्षें दोनच्या बालकापासून नव्वदीच्या अतिवृद्धांपर्यंत असंख्य सजग लोक आढळतात. त्यांचे जीवन सुकर व अर्थपूर्ण करू शकेल अशी समाजव्यवस्था हवी . धर्माने तशी व्यवस्था दीर्घकाळ पुरवली हे सत्य आहे. पण देव/धर्म हेदेखील माणसाने निर्माण केले आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. धर्मव्यवस्थेतून जशा मानवास हितकर गोष्टी घडल्या त्याप्रमाणे त्यातूनच अनेक दूषणे तयार झाली आहेत. धर्माच्या नावाने जेवढी माणसे जगात मृत्यूमुखी पडली आहेत तेवढी अन्य कोणत्याही कारणाने नाहीशी झालेली नाहीत. तो दोष धर्मतत्त्वांचा नाही, ती राबवणा-या माणसांचा आहे. माणसांची ही अपूर्णताच सर्व गुंतागुंत निर्माण करत असते व आदर्श समाजव्यवस्था -हास पावत जातात, त्यात सुधारणा करत राहवे लागते. धर्म व राजे यांची जागा ज्या लोकशाही राज्यव्यवस्थेने घेतली ती तर तीनशे वर्षांतच जगभर कुचकामाची ठरत आहे.

प्रतिसृष्टी हा चमत्कार विज्ञान-तंत्रविज्ञानाचा असणार आहे. मनुष्याची शरीरजीवनाची जी जी अपेक्षा आहे ती तंत्रविज्ञानाने पूर्ण करत आणलेली आहे. ते सुख आमलोकांपर्यंत पोचण्यासाठी किती वर्षें/दशके लागतील हा अंदाज करावा लागेल. तोपर्यंत किडामुंगीचे जीवन अटळ आहे. थोड्या लागटपणे म्हणायचे तर ‘ठेविले अनंते’सारख्या धर्मतत्त्वांच्या भ्रष्टतेने तसे जीवन वाट्याला येत आहे. प्रतिसृष्टीचा अंदाज घेण्यासाठी मोकळ्या मनाने ‘फ्युचरॉलॉजी’ विभागातील पुस्तके पाहायला/वाचायला हवीत.

क-हाडे : यातील पहिल्या चार-पाच ओळीतील वाक्ये पटत नाहीत. अध्यात्माचे नीट आकलन झाले नाही तर धर्माचे पालनही नीट होणार नाही. या ठिकाणी ‘धर्म’ या संकल्पनेचे स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे.

वामनराव पै यांच्या आध्यात्मिक जीवनाचा व कार्याचा लेखात गौरव केला, पण त्यांचे अनुयायी नामाचा जप करतात याविषयी खंत व्यक्त केली आहे. नामाचा जप करणे हा चित्तशुद्धीचा मार्ग आहे. भगवद्गीतेत दहाव्या अध्यायात ‘जप मी सर्व अज्ञात’ असे लिहिले आहे. त्यामुळे त्याविषयी लेखकाचा आक्षेप काय आहे ते स्पष्ट केले जावे. वामनराव पै यांच्या शिकवणुकीप्रमाणे कित्येक लोक व्यसनमुक्त झाले व तसेच अनेक सहकारी शेती करून आनंदाने जीवन जगू लागले हे मान्य असेल तर त्यांच्या ‘नामजपाविषयी’ गैर काय वाटले?

क-हाडे : अध्यात्म म्हणजे काय? असा प्रश्न अर्जुनाने गीतेच्या आठव्या अध्यायात प्रारंभीच विचारला आहे. गीतेनुसार अध्यात्म म्हणजे निजभाव किंवा आत्मज्ञान असा होतो. गांगल यांच्या लेखातील व्याख्या गीतेतील व्याख्येबरोबर जुळत नाही. समजा, एखाद्या माणसाच्या उदाहरणार्थ, चोराच्या अंतर्मनात खूप ठिकाणी जाऊन लूट करावी असा ध्यास असेल व बाहेरील जीवनात त्याने बँका लुटून व दरोडे घालून तो ध्यास पूर्ण केला तर त्याचे जीवन हे आध्यात्मिक होईल का? तो निरामय जीवन जगू शकेल का? निमकर गुरुजींच्या साधकाची गोष्ट अध्यात्म विषयास धरून योग्य वाटत नाही.

गांगल : धर्म आणि अध्यात्म यांचा कशा प्रकारे संबंध आहे हे खरेच कळत नाही. अध्यात्म हा निजभाव असेल तर मी तेच सांगत आहे. व्यक्तीने तिच्या मनीचा भाव (स्वरूप) जाणावा आणि तो उत्कर्षाप्रत न्यावा हे अध्यात्म होय. लुटारूचे उदाहरण हे अतिरेकीपणाने बोलायचे तर आध्यात्मिक आनंद-समाधानाचे समर्पक उदाहरण होय. परंतु माणसाने मनुष्यवर्तनाचे संकेतदेखील निर्माण केले आहेत. त्यात शिक्षण व ज्ञानप्राप्ती अभिप्रेत आहे. तो अर्थपूर्ण जीवनाचा भाग आहे. धर्माने तो अर्थ बराच काळ पुरवला. तो आता कालबाह्य झाला आहे. हिंदू धर्मापुरते बोलायचे तर पुनर्जन्म व मोक्ष या संकल्पनाच उध्वस्त होऊन गेल्या आहेत. त्या उगाळत राहणे हे फसवे समाधान नव्हे का?

वामनराव पै यांना भौतिक उत्कर्ष अभिप्रेत होता. तो नामजपापासून मिळेल का? त्यांच्या कर्जतच्या ‘जीवन विद्यापीठा’चे उद्घाटन झाले तेव्हा आम्हा पाहुण्यांना तेथील अनेक वैशिष्ट्ये दाखवली/सांगितली गेली. त्यात निसर्गसंवर्धन व पाण्याचा पुनर्वापर यांचा उल्लेख होता. मी माझ्या तेथील भाषणात दहा-पंधरा हजार उपस्थित श्रोत्यांना विचारले, की त्यांच्यापैकी कितीजण या गोष्टी जाणतात/त्यांचा पाठपुरावा करतात? एक हातसुद्धा वर आला नाही. वामनरावांनीदेखील नंतर त्यांच्या भाषणात या गोष्टीचा उल्लेख केला. परंतु लोक चुकीच्या धर्मसंकल्पनांनी मूढ होऊन गेले आहेत. वामनरावांसारखे काही शहाणे धर्मगुरू जो रास्त सल्ला देतात तो ते मूढ लोक ऐकत नाहीत, तसे आचरण मुळीच करत नाहीत आणि मग नामजप करून कोणत्या तरी भ्रामक सुखाची आस मनी बाळगतात. नामजपाने मनाची शांतता लाभत असते. परंतु ते मनाचे गोठलेपण होय. मनाचा स्वभाव विस्तारण्याचा आहे. तोच जिज्ञासाधर्म. त्या मनाला नामजपाच्या डबक्यात गुंतवून ठेवायचे?

क-हाडे : अंतर्मनातील ध्यास कशाचा ते स्पष्ट करावे. माझ्या मते, तो ध्यास केवळ ‘आत्मज्ञान’ प्राप्त करण्याचा असेल तरच ते योग्य होईल.

‘परमेश्वर कृपा’ हे लिहिताना परमेश्वराविषयीची संकल्पना स्पष्ट केली तर बरे होईल. गीतेप्रमाणे परमेश्वर हा अकर्ता, निर्विकार, निराकार व निर्गुण आहे. सोयीसाठी, भक्ती मार्गातील लोकांनी किंवा भक्तांनी त्याला सगुण रूप दिले. त्यामुळे परमेश्वराच्या कृपेची अपेक्षा करण्यापूर्वी साधकाने स्वप्रयत्नांची पराकाष्ठा करणे अपेक्षित आहे. तसे केल्यास, त्याचे जीवन कधीही फसवे होणार नाही. जीवनात यश व शांतता निश्चित मिळेल.

लेखाचा शेवट निराशावादी वाटतो. त्या ठिकाणी आशावाद निर्माण केल्यास वाचकांस उत्साह वाटेल.

गांगल : रूढ आत्मज्ञान ही काय गोष्ट आहे? ज्या काळात मानवाला विश्वाचे भौतिक ज्ञान (विज्ञानाने) माहीत झाले नव्हते, त्या काळात त्याने ‘परमात्मा’ नावाची एक संकल्पना निर्माण केली व त्याभोवती तत्त्वज्ञान रचले. मग त्या परमात्म्याचे ज्ञान व त्याशी स्व-आत्म्याचे मिलन म्हणजे आत्मज्ञान नावाची संकल्पना तयार झाली व तो विचारी जनांना जगण्याचा मोठा आधार झाला. याचाच वेगवेगळ्या त-हेचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या तत्त्वज्ञांनी वेळोवेळी केला आहे. योगी अरविंदांची विश्वजाणिवेच्या उन्नयनाची कल्पना फारच विचारगर्भ आहे. त्यांनी त्या संकल्पनेचा विकासदेखील केला. त्यामुळे ते तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांना व जिज्ञासाजागृत व्यक्तींना आकृष्ट करत असतात.

मला जो ध्यास म्हणायचा आहे, त्याचे उदाहरण नाशिकच्या प्रसाद पवार यांचे देतो. ते चित्रकलाशाखेचे अभ्यासक, कॅमेरामन. ते कॉलेजमध्ये असताना, त्यांनी जुने हाततुटके शिल्प पाहिले व ते तसेच जतन केले जाते असे पाहून त्यांना वाईट वाटले. त्यांनी अजिंठ्याची लेणी मूळ स्वरूप जतन करण्याचा ध्यास घेतला. त्या ध्यासाचा, कोणत्याही चांगल्या विचाराचा व कृत्याचा विकास होत जातो तसा विकास होत गेला. त्यांनी त्यांची सर्व हकिगत मुंबईतील एका मुलाखतीत वर्णन करून सांगितली. त्यावेळी त्यांची समाधीच लागली होती! ते गौतम बुद्ध, बौद्ध धर्म याबद्दल जे बोलले, त्यावरून मी त्यांचे वर्णन, मला माहीत असलेली सगळ्यात मोठी आध्यात्मिक व्यक्ती असे केले. त्यांच्या बाबतीत त्यांचे बहिरंग आणि अंतरंग एक होऊन गेले आहे असाच अनुभव येत होता.

परमेश्वर हे माझ्या लेखी माणसाचे उन्नत रूप आहे. मी भागवत सप्ताहवाल्यांना असे आवाहन नेहमी करत असतो, की विष्णूच्या माहीत नसलेल्या अवतारांच्या लीलांची वर्णने तीच ती पुन:पुन्हा श्रवण करत बसण्यापेक्षा जरा सभोवती पाहा. अनेक मानवी अवताररूपे दिसून येतील. त्यांच्या कहाण्यादेखील नित्यनूतन असतील. सौंदर्याचे तेच सगळ्यात मोठे लक्षण असते ना! त्यांना सभोवती दिसत नसतील तर ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर पाहवी. मला जीवन घडवणारी माणसे सभोवती दिसत असताना मी निराशावादी कसा असेन? माझा मानवी कर्तृत्वावर व मानवी श्रमांवर पक्का विश्वास आहे.

– दिनकर गांगल – पुरुषोत्तम क-हाडे

(दिनकर यांनी लिहिलेला मुळ लेख ‘अध्यात्म‘)

About Post Author

Previous articleअग्निहोत्र – वैज्ञानिक दृष्टिकोन
Next articleविद्यार्थ्याला प्रेमाचे शब्द लाभले, आणि….
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

1 COMMENT

Comments are closed.