– नरेंद्र काळे
मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई ह्यांची सभा 20 नोव्हेंबर 1955 या दिवशी चौपाटीवर स. का. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. संयुक्त महाराष्ट्राचे मुख्य दोन विरोधक एकाच वेळी व्यासपीठावर आहेत हे पाहिल्यावर संयुक्त महाराष्ट्रवादी मंडळी, उभय नेत्यांचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिली.
पोलिस, बॉडीगार्ड, स्वयंसेवक यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला गेला होता. व्यासपीठाभोवती बांबूंच्या साहाय्याने मोठमोठी कुंपण बांधलेली होती.
मोरारजी, स. का. पाटील आदी मंडळी व्यासपीठावर आली आणि लोकांच्या ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!’ अशा गर्जना जोरदार सुरू झाल्या. त्याचबरोबर ‘सदोबा, मोरारजी चले जाव’ अशाही घोषणा होऊ लागल्या; पोलिस घोषणा देणा-यांना आवरायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना न जुमानता गर्दी व्यासपीठाच्या रोखाने जाऊ लागली. सभेत एकच गोंधळ उडाला. त्या गोंधळात, स. का. पाटील ध्वनिक्षेपक हातात घेऊन गर्दीला उद्देशून म्हणाले, ”तुम्ही सारे संयुक्त महाराष्ट्रवाले गुंड, अडाणी आणि नालायक आहात! राज्य करण्याची अक्कल तुम्हाला आहे? याच वर्षात काय, पण पाच हजार वर्षांत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई तुम्हाला मिळणार नाही. मुंबई गुजरात्यांची आहे, मद्राशांची आहे, उत्तर भारतीयांचीही आहे; एकट्या महाराष्ट्राची नाही. त्यांना वाटते, की मुंबई चांगली आहे, सुंदर आहे. आयतीच आपल्याला मिळत आहे. पण लक्षात ठेवा. ही कॉस्मॉर्पोलिटन मुंबई फक्त तुम्हाला कधीही मिळणार नाही.”
स.कां.च्या या विधानावर श्रोते प्रक्षुब्ध झाले. त्यांनी जोडे आणि टोप्या व्यासपीठाच्या दिशेने भिरकावायला सुरुवात केली. तशातच मोरारजी म्हणाले, ”जोपर्यंत या देशात काँग्रेस आहे. तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही.” यानंतर श्रोत्यांनी जोडे-टोप्यांबरोबर दगडगोट्यांचाही वर्षाव केला. सभा उधळली गेली. स.का. आणि मोरारजी या दोघांच्या या विधानांचा पुरेपूर उपयोग आचार्य अत्र्यांनी, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात वातावरण तापवण्यासाठी केला.
वास्तविक, आचार्य अत्रे हे काँग्रेसचे होते. ते पुणे नगरपालिकेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडूनही आले. स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. पण त्यांच्या मनात मोरारजींच्या विधानाचा इतका प्रचंड संताप भरून राहिला, की एका व्याख्यानात ते म्हणाले, ”देशात काँग्रेस असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं हा मोरारजी म्हणत असेल तर या देशातून काँग्रेस नेस्तनाबूत करणं हे आपलं (संयुक्त महाराष्ट्रवादींचं) पहिलं काम आहे.”
– नरेंद्र काळे
narendra.granthali@gmail.com
भ्रमणध्वनी : 9822819709