अठराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे होते. ते संमेलन कोल्हापूर येथे 1932 साली भरले होते. मात्र संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सयाजीराव गायकवाड संमेलनाला हजरच राहू शकले नाहीत ! सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रात त्यांचे नातू, चरित्रकार फत्तेसिंगराव गायकवाड यांनी असे लिहिले आहे, की महाराज लंडनहून पॅरिसमार्गे भारतात आले. त्यांनी परदेशात असताना, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होईन म्हणून मान्य केले होते, पण भारतात परतल्यावर त्यांना कळले, की कोल्हापुरात प्लेगची साथ फैलावली आहे. म्हणून ते कोल्हापूरला न जाता तडक बडोद्याला रवाना झाले. सयाजीरावांनी माने नावाच्या त्यांच्या खासगी कारभाऱ्याला कोल्हापूरला पाठवले. त्या खासगी कारभाऱ्याने संमेलनात सयाजीरावांचे भाषण वाचून दाखवले. गंमत म्हणजे सयाजीरावांचे अध्यक्षीय भाषण प्रसिद्ध लेखक चिं.वि. जोशी यांनी लिहिले होते. मात्र त्या श्रेष्ठ विनोदकाराला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कधीच मिळाले नाही ! साहित्य परिषदेचे तेव्हाचे अध्यक्ष माधवराव विनायकराव किबे यांनी कोल्हापूरच्या अठराव्या साहित्य संमेलनातच ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे घेतली. किबे हे मुंबई येथे भरलेल्या बाराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
सयाजीराव दूरदृष्टीचे रसिक संस्थानिक होते. त्यांनी आदर्श राज्यकारभार केला. त्यांना सामाजिक जाणीव होती. ते विचारवंत होते. त्यांना ब्रिटिश राजवटीत उत्तम उच्चशिक्षण मिळाले होते. हे सारे असले तरी त्यांची नेमणूक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून व्हावी हे नवलाचेच वाटले. त्यावेळी एक बोलवा अशी होती, की साहित्य परिषेदेला निधीची मोठी गरज होती आणि सयाजीरावांकडून तो मिळेल अशी अपेक्षा होती.
सयाजीराव यांचे मूळ नाव गोपाळ काशिनाथ गायकवाड. त्यांचा जन्म 11 मार्च 1863 रोजी कवळाणे (खानदेश) येथे झाला. ते बडोद्याच्या संस्थानिकांना दत्तक गेले. त्यामुळे त्यांचे शिक्षण इंग्रज रेसिडेंट आणि बडोदा संस्थानचे दिवाण, सर टी. माधवराव यांनी केले आणि बारा वर्षें निरक्षर असणाऱ्या त्या मुलाला पूर्णपणे विद्यासंपन्न व सुसंस्कृत बनवले.
ते स्वत: नंतर बडोदा संस्थानचे संस्थानिक झाले. पंडित मदनमोहन मालविय यांनी सयाजीरावांना ‘आदर्श राजा’ म्हणून संबोधले आहे. त्यांनी ‘सयाजी ग्रंथमाला’ हे प्रकाशन सुरू केले. गावोगावी वाचनालये काढली. पण स्वत:चे ग्रंथलेखन वा नियतकालिकातील लेखन त्यांच्या नावावर नाही. मात्र सयाजीराव गायकवाड यांच्या नावे एका छोट्या पुस्तकाची नोंद आहे –“Notes on Famine Tour by H H Maharaja Gaekwar.” प्रकाशन वर्ष 1901. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर ‘खासगी रीतीने छापलेले’ असा उल्लेख आहे. ते ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’ या संस्थेच्या डिजिटल लायब्ररीवर उपलब्ध आहे.
त्यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले आहे, की ‘विशिष्ट वर्गाकडून पुस्तके लिहिली गेल्यामुळे सर्व मराठी पुस्तके एकांगी झाली आहेत. वाङ्मयात सर्व धंद्यांच्या, सर्व वर्गांच्या, सर्व स्थळांच्या लोकांनी लिहिलेला ग्रंथसंग्रह असला पाहिजे, तर भिन्न भिन्न वर्गांच्या आकांक्षांचे, भावनांचे, विचारांचे सुख-दु:खांचे चित्र त्यात उमटलेले दिसते व राष्ट्रीय ऐक्यास ते संवर्धक होते आणि भाषेतील शब्दसंग्रह वाढतो’
ते अलाहाबाद येथे भरलेल्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे 1904 साली अध्यक्ष होते आणि ते तेथे हजर होते. त्यांचा मृत्यू 6 फेब्रुवारी 1939 रोजी मुंबई येथे झाला.
– वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 99200 89488
———————————————————————————————————————————————————