आजच्या आधुनिक युगात अत्यंत प्रगत अशा उपकरणांचे साह्य घेऊन खगोलशास्त्राच्या अंगाने अजिंठ्यात संशोधन केल्यास काय रत्ने हाती लागतील, याबद्दल पुरातत्त्व शास्त्राचे प्राध्यापक असलेले अरविंद जामखेडकर यांच्या मनात उत्सुकता होती. त्यांचा विद्यार्थी आणि खगोल अभ्यासक म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अजिंठा आणि वेरूळच्या गुंफांची रचना खगोलशास्त्रीय दृष्टीने कशी आहे यावर संशोधन होणार होते. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक मयंक वाहिया यांची या कामी साथ होती. मग 21 जूनचा ‘मुहूर्त’ पाहून निघालो. 21 जून म्हणजे विष्टंभ बिंदू. सूर्य त्या दिवशी जास्तीत जास्त उत्तरेकडे सरकलेला असतो. त्यामुळे तो दिवस उत्तर गोलार्धात मोठ्यात मोठा असतो. त्या दिवसाला सर्व प्राचीन वाङ्मयातही खूपच महत्त्व आहे. त्या दिवशी उगवत्या सूर्याचा प्रकाश सरळ आत गुंफेत बुद्ध मूर्तीवर पडतो का, याचा शोध घ्यायचे आम्ही ठरवले.
अजिंठा – खगोलीय दृष्टिकोनातून निरीक्षणे
अजिंठाची निर्मिती करण्यास सुमारे सातशे वर्षे लागली आणि ती ख्रिस्तानंतर सुमारे पाच शतके सुरू होती. वाकाटक राजांच्या काळात तेथे कलेचे सर्वांत उंच शिखर गाठले गेले होते. जर आमची ही निरीक्षणे प्रस्थापित झाली, तर त्या काळच्या विज्ञानावर उत्तम प्रकाश पडू शकेल. तेव्हाची भूमिती, गणित, खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र या शाखांचा किती विकास झाला होता, याचा नवीन अंदाज आपल्याला येऊ शकेल. अजिंठाच्या सर्व गुंफांची खगोलीय दृष्टिकोनातून बारकाईने निरीक्षणे सुरू आहेत. त्यावरून पूर्ण अनुमाने निघायला एखादे वर्ष जाईल.
वेरूळ – संपात बिंदूंचे भान ठेवून निर्मिती
संपात बिंदू आणि विष्टंभ बिंदू म्हणजे काय?
पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरते, त्या वर्तुळाचा अक्ष आणि तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष एकमेकांशी 23.5 अंशांचा कोन करतात. जमिनीवरून पाहता सूर्य पृथ्वीभोवती फिरताना भासतो. तो ज्या मार्गावरून फिरतो, त्याला ‘आयनिक वृत्त’ असे म्हणतात. ते वृत्त आपल्या विषुववृत्ताशी 23.2 अंशांचा कोन करते. ती दोन वृत्ते परस्परांना फक्त दोन बिंदूंत छेदतात. त्या बिंदूंना ‘संपात बिंदू’ असे म्हणतात. त्या बिंदूंवर वर्षातून दोनदा सूर्य येतो, मग त्या दिवशी बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असते. ते दोन 21 मार्च आणि 21 सप्टेंबर, असे दिवस असतात. त्या दिवशी सूर्य अचूक पूर्वेला उगवतो आणि अचूक पश्चिमेला मावळतो. जगातील सर्व धर्मांमध्ये या दोन बिंदूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातील अनेक प्राचीन वास्तू यांच्या अनुषंगाने बांधल्या आहेत. त्याला भारतही अपवाद नाही.
त्याशिवाय आणखी दोन बिंदू आपणास माहीत हवेत. आयनिक वृत्तावर फिरता फिरता सूर्य कधी जास्तीत जास्त उत्तेरकडे जातो, तर कधी जास्तीत जास्त दक्षिणेकडे. पहिला दिवस येतो 21 जून रोजी आणि दुसरा येतो 22 डिसेंबर रोजी. 21 जून रोजी असते ‘उत्तरायण’ आणि दिवस सर्वांत मोठा, तर 22 डिसेंबर रोजी असते ‘दक्षिणायन’, तेव्हा दिवस असतो सर्वांत लहान आणि रात्र मात्र सर्वांत मोठी. ‘विष्टंभ’ आणि ‘अवष्टंभ’ बिंदू म्हणतात ते हेच. ते दोन दिवस सूर्याच्या सीमा दर्शवतात. आपल्या पुराणात आणि प्राचीन वाङ्मयात त्यांना फार महत्त्व आहे. त्यांचाही विचार पूर्वीच्या वास्तुरचनाकारांनी केला होता आणि त्याप्रमाणे आपले तंत्रज्ञान विकसित केले होते.
खगोलशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ, स्थापत्यविशारद आणि अभियंते यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. अनेक विषयांतील तज्ज्ञ एकत्र आल्याशिवाय असे संशोधन शक्य नाही. मग संगणक, जीपीएस उपक्रम आणि आधुनिक लेसर उपकरणांच्या मदतीने सुरू झालेला शोध येत्या दशकात आपल्या ज्ञानात खूपच भर घालेल यात शंका नाही. आधुनिकतेमध्ये ‘प्राचीनता’ आणि प्राचीनतेमध्ये “आधुनिकता’ यांचा जागरूकपणे समन्वय साधणे आवश्यक होऊन बसले आहे. असा समन्वय भविष्यातील आपल्या सर्वांगीण प्रगतीचे मूळ असणार आहे.
– पराग महाजनी
9881201875, 020-24380177
www.paragmahajani.com