अजिंठा लेणे

3
79
carasole

मानवी कला आणि सप्तकुंडांचा निसर्गचमत्कार…

महाराष्ट्रातली लेणी हा दृश्य इतिहासातला चमत्कार आहे! भारतात बाराशे लेणी आहेत. त्यांपैकी आठशे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राबाहेर नाव घेण्याजोगी फक्त मध्यप्रदेशातली बाघ येथली लेणी. अजिंठ्यातील लेण्यांना तर वैश्विक ठेव्यात स्थान मिळाले आहे. एका व्यक्तीने कलेचा परमोच्च बिंदू गाठला अशी उदाहरणे आहेत. पंडित भीमसेन जोशी मंद्रसप्तकातून तारसप्तकात जाणारी लखलखती दीर्घ तान घेत तेव्हा अंगावर शहारे येत. तसाच अनुभव उस्ताद अलिअकबरखां सरोदचा टणत्कार करत तेव्हा येर्इ. एक व्यक्ती प्रतिभेने आणि परिश्रमाने लोकांना गुंगवून ठेवण्याचा चमत्कार करू शकते, त्याचेही आश्चर्य वाटते. लेखनात, चित्रकलेत आणि अन्य विषयांतही असे चमत्कार आहेत, पण अजिंठ्याची गोष्ट वेगळी आहे. झपाटलेल्या कुशल कलाकारांचा गट अजिंठ्याच्या घळीत डोंगर पोखरून त्यात चित्र-शिल्पकथा रंगवतो व ते काम पिढ्यानुपिढ्या चालू राहते तेव्हा मती गुंग होऊन जाते. त्यामुळे जो कोणी अजिंठ्याला भेट देतो तो चाट पडतो.
वॉल्टर स्पिंक्समद्रास कॅव्हिलरीच्या कॅप्टन जॉन स्मिथला अजिंठ्याची लेणी १८१९ साली सापडल्यापासून असंख्य लोकांनी ती पाहिली. ती अभ्यासण्यासाठी इतिहासकार जेम्स फर्ग्युसन, जे जे कॉलेजचे प्रिन्सिपाल बॅटली गुलाम यझदानी, बेंजामिन रोलँड हॅवेल, कुमारस्वामी, स्टेला क्रॅमरिश वगैरे अनेक जण येऊन गेले. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठा चे प्राध्यापक वॉल्टर स्पिंक्स गेली चाळीस वर्षे सातत्याने अजिंठ्याला अभ्यासासाठी येत आहेत. दर वर्षी जूनच्या दरम्यान ते विद्यार्थ्यांसाठी या गुंफांमध्ये चर्चासत्र आयोजित करतात. वयाची ऐंशी वर्षे ओलांडलेल्या त्या वृद्ध तपस्व्याला पाहून मन आदराने भरून येते. त्यांनी हरिषेण ट्रस्ट स्थापन केला आहे. हरिषेण ही पाचव्या शतकातील वाकाटकाच्या काळातील प्रतिष्ठित असामी. त्याच्या पाठिंब्यामुळे लेणी खोदली गेली. इंडियन कौन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च चे मत आहे, की मुघल काळच्या कागदपत्रांत अजिंठ्याचा उल्लेख सापडतो.

अजिंठ्यातील डोंगररांगातील पठारात गोलाकार खोलगट घळ तयार झाली आहे. घळीमधील दगडी भिंतींत एकोणतीस लेणी खोदली गेली आहेत. लेण्यांपर्यंत जाण्यासाठी जिथे बस घेऊन जाते तेथून चढून गेले असता एकाच दॄष्टिक्षेपात सगळी लेणी दिसतात.

 

 

मी जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये विद्यार्थी असताना प्रथम (१९६१) अजिंठा पाहण्यास गेलो. एकटाच. औरंगाबादहून आम्ही प्रवासी बसने तेथे पोचलो. सगळेच प्रवासी लेणी पाहण्यास आले होते. दिवसभर लेण्यांमधे डोकावता डोकावता सूर्यास्त जवळ आला. प्रवासी परतीला लागले. माझे राहायचे कुठे हे काही नक्की होत नव्हते. तो प्रश्नच होता. सगळे लोक फर्दापूरला राहतात असे कळले. ते ठिकाण लेण्यांपासून सहा-सात किलोमीटर दूर आहे. सूर्यास्तानंतर प्रवासी अजिंठा परिसरात राहात नसत. रात्र पडली तेव्हा चौकीदारसुद्धा आपापल्या घरी निघून गेले. गजबजलेली अजिंठ्याची दरी निर्मनुष्य झाली!
 

 

त्यावेळी लेण्यांजवळ टपरीवजा कँटिनशेजारी इमारत बांधली जात होती. स्लॅब घालून झालेली होती. इमारतीला भिंती नव्हत्या. तीन-चार मजूर एका कोप-यात झोपले होते. मी तेथेच एक रूंद फळी विटांवर ठेवून बाकडे तयार केले आणि पथारी पसरली. माझ्याकडे फारसे सामान नव्हते. एक पिशवी, तिच्यात लँडस्केप पॅड, वही, रंगांची पेटी, पेन, पेन्सिली, ब्रश, टॉवेल व एक चादर होती. मी पिशवी उशाला घेऊन डोळे मिटले. क्षणात झोप लागली, पण लवकर झोपल्याने पहाटेच जाग आली. हवा प्रसन्न होती. दरीत कोणी नव्हते. मी एकटा, पुढे खोल दरी, त्यामध्ये अंधुक पसरलेली लेणी आणि वर अथांग पसरलेले आकाश… सारखे माणसांच्यात असण्याच्या सवयीला ते वेगळे होते. पण भयाण वाटत नव्हते. अवघा निसर्ग माझ्या सोबतीला आहे असा भास होत होता. मी स्तंभित झालो होतो. जवळजवळ अर्धा-पाऊण तास त्याच अवस्थेत गेला. माझे भान हरपले होते. परंतु नंतर शुद्धीवर आलो ते शरीरक्रियांच्या जाणिवेमुळे. कल्याणमध्ये लहानपणापासून खाडीशी मैत्री असल्याने वाघोरा ओढ्यात मस्त विधी उरकले, मजेत आंघोळ केली.
घड्याळ नसल्याने किती वाजले ते कळायला मार्ग नव्हता. दरीत चक्कर मारली. प्रवासी येण्याच्या आतच लेण्यात गेलो. चित्रकलेच्या दोन परीक्षा दिल्या होत्या, तेवढीच माझी चित्रकलेशी ओळख. पण अजिंठा ही जागाच अशी आहे की कोणालाही चित्रकलेची थोडीशी जाण असेल तर त्याला स्फूर्ती यावी! मी त्या दिवसभर व नंतरही सात दिवस लेण्यांमध्ये बसून ती पाहात होतो आणि त्यांची स्केचेस करत होतो.

अजिंठ्यात राहण्याचा, दिवसरात्र वावरण्याचा अनुभव आता घेता येणे शक्य नाही. त्यावेळी मला काय हुक्की आली आणि मी तेथे गेलो! त्यातून माझ्याजवळ आयुष्यभराचे धन साठले. मी होतो तरुण मुलगा. मला कसलीच फिकीर नव्हती. माझे वडील रेल्वेत नोकरी करत. त्यांचा पास मिळे. मी तो घेऊन दर सुट्टीत भारतभर भटके, तसाच अजिंठ्यात येऊन पडलो होतो. योगायोगाने त्याच वेळी कार्तिक पौर्णिमा होती. त्यामुळे कोजागिरीला अजिंठ्यात राहिलेला मी एकटाच शहरवासी असणार! तेथे रात्री चंद्र उगवतो तेव्हा घळीतल्या एका पहाडावर प्रथम चंद्रप्रकाश पडतो. त्यावेळी बाजूचा पहाड अंधारात असतो. चंद्र डोक्यावर आला की सगळी घळ चंद्रप्रकाशाने भरून जाते. रात्री घळीचे वातावरण गूढ भासते.
लेणी तर अव्दितीय आहेतच. पण तिथला निसर्गाचा चमत्कारही पाहण्यासारखा आहे. थोडे वाकड्या वाटेला वळले तर छोटा धबधबा दिसतो. लेण्याच्या समोरची पायवाट पाय-यांजवळ नेते. ती चढून गेल्यावर पठार लागते. वाघोरा नावाची छोटी नदी सात उड्या मारत अजिंठ्याच्या घळीत पडते. मानवनिर्मित अजिंठ्याच्या लेण्यांबरोबर निसर्गनिर्मित घळ आणि सात कुंडांतून उड्या मारत येणा-या पाण्याचा खेळ विलक्षण आहे.
त्यावेळी अजिंठ्यात माझ्याच वयाचा कांबळे नावाचा गाईड होता. तो इतिहास घेऊन एम.ए. झाला होता. रात्री मी तिथेच झोपतो हे त्याला कळल्यावर तो म्हणाला, ‘मी पण येतो झोपायला. माझेही जाणे- येणे वाचेल व गप्पा मारता येतील.’ कांबळेची साथ मिळाल्याने बरे वाटले. आम्ही रात्री दरीत फिरायला गेलो. चंद्र उगवायचा होता, त्यामुळे दरीत अंधार पसरला होता. पायाखालचे दिसत होते. सारे वातावरण गूढ होते. पण भीती वाटत नव्हती. मन काळाच्या पलीकडे गेले होते, निसर्गाची आणि माणसाची अजब कहाणी मनासमोर साकारत होती.
सप्तकुंडरात्री थंडी पडली. चादर एकच असल्याने तीच अर्धी अंगावर व अर्धी खाली घेऊन झोपलो. सकाळी हिंडत हिंडत व्ह्यु पॉर्इंटवर गेलो. तेथून डोळ्यांचे पारणे फिटावे असे दॄश्य दिसते. वाघोरा नदी अजिंठ्यातील दरीत सात वेगवेगळ्या धारांनी उतरत उतरत, धबधबा होऊन खाली पडते. ती पहिली उडी दगडाच्या कुंडात घेते. दगडाच्या तयार झालेल्या तोरणातून ती दुस-या कुंडात पडते. तिसरी उडी सरळ न घेता घरंगळत येते. चौथ्या वेळी कापसासारखी पिंजत पिंजत येत उडी घेते. अशा अनेक उड्या घेत शेवटी ती दरीत झेप घेते. सप्तधारांचे पेन्सिल स्केच केले. व्ह्यु पॉर्इंटवरून सगळीच लेणी दिसतात. आपल्या पूर्वजांनी जगाला अचंबित करेल असे कलावैभव येथे कोरून-रंगवून ठेवले आहे याचा परत परत प्रत्यय येत होता. अजिंठ्याने चित्रकला शिकवली. निसर्ग शिकवला. चंद्रप्रकाश किती सुंदर आणि वेगळे रंग घेतो ते दिसले. नदीचा झुळझुळ आवाज ऐकला.
तीच नदी रात्री वेगळे रूप घेते. दरीत जणू रूपे ओतले जाते, पौर्णिमेला पडलेले टिपूर चांदणे खळखळत्या उथळ नदीच्या पाण्यात चमचमते. पाणीच चांदी होऊन जाते. मध्येच ढग येतो. चंद्र आड जातो. पण प्रकाश झिरपतोच. नदीत पाणी खोल नसल्याने सगळे पाणीच चमचमायला लागते. चांदण्याचे असंख्य तुकडे पाण्यात खेळत राहतात. हा खेळ पाहता पाहता केव्हा मध्यरात्र होर्इ ते कळत नसे. एकीकडे नीरव शांतता. त्यात दरीत थंडीची लाट शिरते. झाडे गप्प उभी असतात. रातकिडेही झोपी जातात. आवाज येतो तो फक्त नदीच्या खळखळण्याचा. पुन्हा लवकर डोंगराचा एक भाग अंधारात जातो. एकीकडचा डोंगर शांत बसलेल्या गौतम बुध्दासारखा दिसतो आणि त्याच्या मागे डोंगररांगांच्या रूपात बोधिसत्त्वांची प्रभावळ पसरली आहे असा भास होतो.
सकाळी पुन्हा लवकर उठलो. नदीवर आंघोळ केली. झटपट आटोपून लेण्यांकडे गेलो. कांबळे एका बंगाली पार्टीला गार्इड करत होता. मी पण त्यांच्यात सामील झालो. कांबळे प्रत्येक चित्र आणि त्याची गोष्ट रंगवून सांगत होता. त्यामुळे त्या बंगाली लोकांबरोबर पुन्हा एक ते सव्वीस लेणी पाहिली. आपण विचार करायला लागतो तसतसे अजिंठा अधिकच अवघड व समजायला कठीण वाटू लागते. प्रत्येक लेण्याची कथा माहीत झाली. अजिंठ्याचे थोडेसे का होइना पण आकलन झाले असे मनाला वाटले. काही जातककथा इतक्या सुंदर आहेत की तशा कोणाला सुचू शकणार नाहीत!
अजिंठा लेण्‍यातील सर्वोत्‍तम शिल्‍प. बुद्ध, मुलगा राहूल यास भिक्षापात्र देत आहे. आई यशोधरा शोकाकूल होऊन पाहत आहे.अजिंठ्यात सकाळ उजाडते ती एकदम नाही. डोंगराआडून सूर्य डोकावतो. दरीचे एक अंग पिवळ्या उन्हाने न्हाऊन निघते. दिवसभर कॄत्रिम उजेडाची जरूर असलेल्या लेण्यांत प्रकाशझोत शिरतात. चैत्यगॄहे तर त्यांच्या गोलाकार प्रचंड गवाक्षांतून येणा-या प्रकाशाने उजळून निघतात. सूर्य निवांतपणे माणसांनी निर्माण केलेल्या कलाकॄती पाहण्यासाठी गुंफे-गुफेत शिरतो. सूर्याकडे तोंड असलेल्या गुंफा लखलखीत प्रकाशाने भरून जातात. सगळी गुंफा सुर्याने फेकलेल्या पिवळ्या सोन्याने भरून जाते. त्याच बेताला दरीत वारा वाहू लागतो आणि दुपार होते. संध्याकाळी पश्चिममुखी गुंफांमधे सूर्यप्रकाश तसाच शिरतो.
ज्यांनी ही चित्रे रंगवली त्या लोकांना पुरेसा उजेड किती वेळ मिळत असेल? एक गोष्ट लक्षात आली, की मी काढलेली रेखाचित्रे खिडकीतून पुरेसा उजेड येणा-या भिंतींवरची आहेत. त्यामुळे पद्मपाणी, वज्रपाणी, बुध्दाची जी चित्रे अंधारात आहेत ती माझ्याकडून काढली गेली नाहीत. दुपारी जेवणाच्या वेळी अगदी तुरळक प्रवासी असत. तेव्हा मी एकटाच विहारात किंवा चैत्यगॄहात जाई व चित्रे काढत बसलेला राही. अनाकलनीय भावना मनात दाटत. अजिंठ्याच्या वातावरणातच काही तरी जादू आहे. नेमके काय आहे ते सांगता येत नाही.
कोजागिरी पौर्णिमेच्या मागचे पुढचे दोन दोन दिवस अजिंठ्याच्या स्वर्गमय परिसरात काढले. पौर्णिमेला रात्री डोंगराआडून चंद्र डोकावला आणि चंद्रप्रकाशाने दरी उजळत जाऊन काही वेळाने सर्वत्र चांदणेच चांदणे पसरले. सगळे स्पष्ट दिसत होते. बराच वेळ इकडे तिकडे फिरणे झाले. शेकडो वर्षांपूर्वी बौध्द भिक्षू चांदण्या रात्री असेच मजेत फिरले असतील. त्यांनी छोट्या धबधब्याखाली आंघोळ केली असेल. विद्यार्थी विहारातल्या दगडांच्या गादीवर झोपून, पहाटे उठून, स्नान करून ते निसर्गाच्या सान्निध्यात मजेत अभ्यास करत असतील.
काही विहार व चैत्य मोठे आहेत. तेथे उजेड कमी आणि अंधार जास्त अशी स्थिती असते. त्यामुळे तेथेही एकटे असताना गूढ वाटते. त्या काळी तेथे वावरणारे बौध्द भिक्षू डोळ्यांपुढे उभे राहतात. अशा प्रकारची मानसिक अवस्था दोघेतिघे बरोबर असताना होणार नाही. त्यासाठी तेथे एकटेच जायला हवे. नर्मदेच्या खो-यात अश्वत्थामा फिरत असतो असे म्हणतात तसे भगवान बुध्द अजिंठ्याच्या परिसरात विहरत असतील असे वाटले. वॄक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाल्यावर बुध्दाने शिष्यांना, त्यांचे शिक्षण पूर्ण झाले असे सांगितले व त्यांना संदेश दिला, की ‘चला, आता निघा. लोकांना अज्ञानातून मुक्त करा. दु:खी जनांचे अश्रू पुसा. वेगवेगळ्या दिशांना एकेकट्याने जा.’
माझे एकटे फिरणे उत्सुकतेपोटी होते. आपण कसला शोध घेत आहोत ते कळत नव्हते. पण ते कुठेतरी मनाच्या कोप-यात जमा होत राहिले असावे. महाविद्यालयीन शिक्षण होत असताना एकटाच फिरल्याने आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे कळू लागली होती. आज उतारवयात मी ती अशी मांडतो, की एकट्या माणसाला फारसे काही कळत नाही परंतु मानवतेचा वारसा पुढे जात असतो. त्यामधून असे अपूर्व वैभव साकार होते!
त्या काळात तिथे आलेल्यांनी जे निर्माण केले त्याची कल्पना केली तरी स्वत:च्या लहानगेपणाची जाणीव होते. थोडेसे का होर्इना पण स्वत:बद्दल वाटणारे कौतुक कापरासारखे उडून जाते. मागचे सगळे सोडून देऊन नवा विचार करायचा आटापिटा किती कठीण आहे ते उमगते. आपण य:कश्चित आहोत याची जाणीवच विलक्षण असते!
अजिंठाच्या चित्रांमधील केशरचनेची प्रकाश पेठे यांनी काढलेली रेखाटनेअजिंठाच्या चित्रांमधील केशरचनेची प्रकाश पेठे यांनी काढलेली रेखाटनेअजिंठ्यातल्या लेण्यांतल्या चित्रांत स्त्रियांच्या अनेक केशरचना दिसतात. त्या पाहिल्या की आपल्या आजच्या तरूणी काहीच नट्टापट्टा करत नाहीत किंवा अगदी वनातल्या सीतेसारख्या साध्या राहतात. मुली जीन आणि टॉप घालतात तो तर साधेपणाचा कळस होय. तरुणी इतक्या साधेपणाने का राहू लागल्या ते कळत नाही. चित्रांतल्या स्त्रियांचे डोळे आणि शरीरसौष्ठव आजच्या तरुणींपेक्षा उजवे आहे. त्यांतल्या काही स्त्रियांच्या पायांत मोजे दिसतात. दाऊद दळवी यांनी ‘महाराष्ट्रातील लेणी’ या पुस्तकात सप्रमाण नमूद केले आहे. की भारतातील लेणी खोदली गेली त्या काळात इराणचे व भारताचे कलापातळीवर आदानप्रदान होते.
अजिंठ्याच्या त्या पहिल्या भेटीनंतर, बेचाळीस वर्षांनी मी पुन्हा तिथे गेलो. उत्सुकता तर होतीच. जुन्या नोंदी जवळ होत्या, मनात परिसर पाठ होता, त्यावेळचा अनुभव तर चिरस्मरणीय आहे. आता बदल घडला आहे. फर्दापूरच्या पुढे चहापाण्यासाठी संकुल उभे केले गेले आहे. अजिंठामार्गे जाणा-या सगळ्या बसेस तिथे थांबतात. तेथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या लेण्यांकडे जाण्यास सरकारने बसची सोय केली आहे. लेण्यांच्या पायथ्याशी बसगाड्यांसाठी ऐसपैस जागा आहे. वॄक्षांच्या भोवती पार बांधून काढले आहेत. बसची वाट पाहणारे प्रवासी त्यावर बसतात. पायथ्यापासून लेणी उंचावर आहेत. तिथे जाण्यासाठी पाय-या बांधून काढल्या आहेत. वयस्कर लोकांसाठी रॅम्प बनवला आहे.
ज्या इमारतीच्या एकमजली सांगाड्यात मी सात दिवस राहिलो होतो तेथे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे भोजनालय आहे. त्याच्या शेजारी स्वच्छ सुलभ स्नानगॄह आहे. त्याच जागी किसनरावांचे एकुलते एक कँटीन होते. तिथे मी सात दिवस जेवलो होतो. त्यावेळी मैत्री झालेल्या किसनराव व कांबळे यांचा पत्ता लागला नाही. मात्र दशरथ अंभोरे हे त्यावेळचे पहारेकरी निवॄत्त होऊन फर्दापूरमधे आपले उर्वरित आयुष्य घालवत आहेत असे कळले. गुंफांच्या आसपास पिण्याच्या थंड पाण्याची सोय केली आहे. गुंफांमधे चपला-बूट घालून जाऊ देत नाहीत. ज्या लेण्यांत पूर्वी प्रकाशझोत टाकत असत तेथे कॄत्रिम उजेडाची कायमची सोय केली आहे. अजिंठा हा जागतिक वारसा ठरवल्यानंतर सोयी उपलब्ध केलेल्या आहेत.
अजिंठ्यातील आणखी एका चित्राचे प्रकाश पेठे यांनी काढलेले रेखाचित्रजी भित्तिचित्रे मी सहा इंचांवरून पाहिली होती ती सगळी आता आठ-दहा फूट अंतरावरून पाहावी लागतात. माझ्या मनातले चित्र धुक्यात हरवल्यासारखे झाले होते. आनंद हिरावून घेतला गेला होता. सर्व लेणी तेव्हा स्वच्छ होती, आजही आहेत. आठवणीतली बरीच चित्रे पाहायची होती, ती शोधायचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. काही प्रवासी खिळ्याने चित्रे खराब करतात असे दिसते. वाटले, की सरसकट सर्वांना लेणी पाहण्यास परवानगी देऊ नये आणि दिलीच तर अमेरिकन कॉन्शुलेटमधे जशी प्रत्येकाची कडक तपासणी करतात तशी करून आत सोडावे. नाहीतर काही वर्षांत लेणी विद्रूप होतील.
अजिंठा लेण्यांना जपान सरकारने चारशेतीस कोटी रुपयांची मदत दिली आहे. त्यात फायबर ऑप्टिक लाईट, प्रदूषणमुक्त वातानुकुलित वाहनांची सोय, स्वच्छतागॄहे यांचा समावेश आहे. तो उपक्रम पुरा झाला आहे. फर्दापूरपासून थोड्या दूर एक बसस्थानक बनवले गेले आहे. तेथे लोकोपयोगी दुकाने तसेच पिण्याचे थंड पाणी आणि स्वच्छ प्रसाधनगॄहांची सोय केली गेली आहे. मी पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा हे काही नव्हते.
भिख्खूंचा बोधिसत्त्वावर विश्वास होता. त्यांचा समूहशिक्षणावर भर होता. एकट्याच्या मोक्ष- कल्पनेवर नव्हता. त्यामुळे विहारांची निर्मिती केली गेली. लोकांना मदत करणे हे महत्त्वाचे कार्य समजले जार्इ. त्यांची शिकवण होती की सर्व ज्ञान एकाकडून दुस-याला देणे श्रेयस्कर असते.
अजिंठा लेण्‍यातील बुद्धाचे चित्र.बुध्दभद्र नावाच्या एका श्रीमंताने ऐश्वर्याचा त्याग केला आणि सर्व संपत्ती लेणी खोदण्यास दिली. तो म्हणाला “जर भक्ताने वाहिलेले एक फूल र्इश्वराला प्रसन्न करू शकते तर भगवान बुध्दाचे तत्त्वज्ञान चित्रित केलेला प्रार्थना कक्ष निर्माण केला तर त्याच्यावर नक्कीच कॄपा होईल. आपली प्रार्थना त्याच्या चरणांशी वाहिली तर ती अतीव आनंदाच्या जवळ घेऊन जाईल.”
महावीर आणि बुध्द यांनी चातुर्वर्ण्याचा त्याग केला. दोघांचे कार्य ब-याच बाबतींत भावा भावांसारखे आहे. पण जैन धर्मात शरीराला कष्ट देऊन मोक्ष मिळवायची कल्पना आहे. बौध्द धर्म मध्यममार्ग स्वीकारतो. बौध्द धर्माची जादूच वेगळी आहे. समाजाचा तो हजार वर्षांचा काळ आनंदात आणि समाधानात गेला असेल. त्यामुळे लेणे क्रमांक सव्वीसमधे वाक्य लिहिलेले आहे, की “ज्यांच्याकडे समॄध्दी आहे आणि ज्यांना आध्यात्मिक आनंद आणि मुक्ततेची इच्छा आहे त्यांनी भव्य गोष्टींची निर्मिती का करू नये?”
लेणे क्रमांक सोळामधील वाक्य – “जोपर्यंत सूर्य दिमाखात तळपत राहील तोपर्यंत ह्या सभामंडपाचा आनंद घेत राहवे”
सव्वीसाव्या लेण्यात भगवान बुध्दाची कुशीवर आडवी झालेली खूप मोठी मूर्ती आहे. बुध्दाला मोक्षप्राप्ती झाली आहे ही तेथे कल्पना आहे. बुध्दाच्या चेह-यावर जे निरागस आणि समाधानाचे भाव दिसतात तसे आजवर कुठे पाहायला मिळाले नाहीत. ती मूर्ती कितीही वेळ निरखली तरी समाधान होत नाही.
कॅप्टन गिल यांना खराब होण्याच्या मार्गावर असलेल्या अजिंठ्याच्या भित्तिचित्रांच्या प्रतिकॄती बनवण्याचे काम ब्रिटिशांनी 1845 साली सोपवले होते. ते काम पुरे झाल्यावर त्यांनी लंडनला क्रिस्टल पॅलेसमधे त्याचे चित्रप्रदर्शन मांडले होते. पण 1860 साली क्रिस्टल पॅलेसला आग लागली आणि ती सर्व चित्रे अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडली.
मुंबर्इ कलाविद्यालयाचे प्राचार्य ग्रिफिथ यांनी तेरा वर्षे अजिंठ्याच्या अभ्यासात घालवली. अजिंठा लेण्यांमधे अशी काही शक्ती आहे की ती संवेदनशील माणसाला ओढून घेते. अभ्यास आणि विचार करायला लावते. अजिंठ्याच्या प्रत्येक भेटीत नवे शिकवण्याची क्षमता आहे. अजिंठा हा संदर्भ ग्रंथ आहे. त्यात भूस्तरशास्त्र, निसर्गशास्त्र, स्थापत्यशास्त्र, शिल्पशास्त्र, तत्त्वज्ञान, वास्तुकला, चित्रकला, भित्तिचित्रकला, रसायनशास्त्र, रंगशास्त्र, विज्ञान, ध्वनी-प्रकाश यांचा अभ्यास, सामान्यज्ञान, अध्यात्म, चिंतन, मनन, स्वशोध असे अनेक विषय आहेत. या एकाच ठिकाणी इतिहास-भूगोलाचे आणि भारताचे इतर जगाशी असलेले संबंध अशा अनेक गोष्टींचे ज्ञान होते.

अजिंठा पाहून काही शंका आणि प्रश्न माझ्या मनात येतात…

  • अजिंठ्यातील कलावंत आपापली छिन्नी आणि इतर साधने बरोबरच बाळगत असतील. पण त्या दगड खोदू शकणा-या भक्कम छिन्न्यांपैकी एकही आजवर मिळू नये याचे नवल वाटते. छिन्नी, हातोड्या, फावडी, घमेली, पहारी, ओळंबे वगैरे साहित्य ठेवायचे दालन कुठे असावे?
  • अजिंठा हे मोठे विद्यापीठ असणार. एकोणतीस गुंफांतील अनेक विहार आणि प्रत्येक विहारातील प्राध्यापकांच्या खोल्या जमेस धरल्या तर निदान तीनशे-साडेतीनशे माणसे तेथे राहत असतील. म्हणजे आजच्या आयआयएमसारखे संकुल झाले. त्या सर्वांच्या अनेक गरजा पुरवणारी यंत्रणा असल्याचे पुरावे मिळायला हवेत.
  • आठशे वर्षे मुक्काम केलेल्या कलावंतांची वस्ती कोठे असेल?
  • रंगकाम करणारे लोक, त्यांचे रंग बनवणे वगैरेची रंगरसायन प्रयोगशाळा कुठे असेल?
  • इतक्या मोठ्या कामाची संशोधन शाळा, चर्चाखंड व कार्यशाळा कुठे असतील?
  • साडेतीनशे विद्वानांची जेवणाची सोय असणा-या दालनांची काहीतरी खूण सापडायला हवी.
  • सर्व शिल्प-चित्रकाम अनुभवी शिक्षितांनी केलेले दिसते. त्यांचे शिक्षण कुठल्या चित्रशाळेत झाले असावे? ते विद्यालय कुठे असावे?

अजिंठ्यात माणूस गुंतत जातो तो असा. जातककथा सांगण्यासाठी केलेला चित्रकलेचा प्रयोग अद्भुत आहे. ती चित्रे आहेत त्या स्थितीत कशी ठेवायची हा मोठा प्रश्न आपल्या देशापुढे आहे. एकदा का अजिंठ्यात जीव गुंतला की त्याचा मनगमता गुंता होतो आणि त्यातून बाहेर पडावेसे वाटत नाही.
प्रकाश पेठे
०९४२७७८६८२३, दूरध्वनी: (०२६५) २६४ १५७३

About Post Author

Previous articleअजिंठा-वेरूळ – वेध खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून
Next articleअजिंठा – एक अनमोल ठेवा
प्रकाश पेठे यांचा जन्म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्थायिक आहेत. त्यांनी ‘सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ (मुंबई) येथून शिक्षण पूर्ण केले. त्यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्यांनी संगीत विशारद ही पदवी 1989 मध्ये मिळवली. ते नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त 1998 मध्ये झाले. त्यांनी ‘महाराज सयाजीराव विद्यापीठ’ बडोदे येथे 1977 पासून अतिथी प्राध्यापक, 2001 पासून ‘सरदार वल्लभभाई पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलाजी’ येथे अतिथी प्राध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. पेठे यांना प्रवास, छायाचित्रण, साहित्य, संगीत आणि कला अशा विविध विषयांची आवड आहे. त्यांची ‘स्वप्नगृह’, ‘धमधोकार’, ‘आनंदाकार’, ‘वडोदरा’ व ‘नगरमंथन’ अशी पुस्तके ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाली आहेत.

3 COMMENTS

  1. महाराष्ट्राचं

    महाराष्ट्राचं खरंखुरं वैभव जपुन ठेवायला हवं. प्रकाश पेठे यांनी खूपच छान वर्णन केले आहे. कारण ते चित्रकार आहेत. त्यापेक्षाही ते स्वत: तिथे राहीले आहेत. “अनुभुती” खुप सुंदर.

    माम

Comments are closed.