अग्निपुराण

0
33

     अठरा पुराणांपैकी एक पुराण. अग्नीने वसिष्ठाला सांगितलेले विद्यासार अशा अर्थाने ह्या पुराणाला ‘अग्निपुराण’ असे म्हटले आहे.

     वेद व त्यांची षडांगे, मीमांसादि दर्शने इत्यादी सर्व विद्यांना ‘अग्निपुराणा’त ‘अपरा विद्या’ असे  म्हटले असून, जिच्यामुळे ब्रह्मज्ञान होते त्या अध्यात्मविद्येला पराविद्या म्हणून गौरवले आहे. मात्र अध्यात्माविषयी अल्पसे विवेचन असल्यामुळे ह्या पुराणाला तामसकोटीत घातले आहे.

     हे पुराण म्हणजे समस्त भारतीय विद्यांचा विश्वकोश आहे. यात राजनीती, धर्मशास्त्र, ज्योतिष, आयुर्वेद, व्रते, तीर्थ ह्यांचे वर्णन सविस्तर केलेले आहे. तसेच छंदशास्त्र, अलंकारशास्त्र व व्याकरणशास्त्र यांचा योग्य पराशर्ष घेतला आहे. एवढेच नव्हे, तर कल्पविद्या, मंत्रविद्या, मोहिनीविद्या, वृक्षवैद्यक, अश्ववैद्यक, वनौषधी हे विषय ह्या पुराणात विस्ताराने सांगितले आहेत.

     'अग्निपुराणा'त चौदा हजार पाचशे श्लोक असल्याचा उल्लेख वा.शि.आपटे करतात; पण 'आनंदाश्रमा'ने प्रसिद्ध केलेल्या 'अग्निपुराणा'त तीनशेत्र्याऐंशी अध्याय व अकरा हजार चारशेसत्तावन्न श्लोक आहेत. व्यासाने ‘अग्निपुराण’ लिहिले असे म्हटले असले, तरी हे पुराण इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून ते इसवी सन ९०० पर्यंत कधीही लिहिले गेले असावे, असे केतकर, काळे इत्यादी विद्वानांचे मत आहे. पहिल्या सोळा अध्यायांत अवतारमालिका येतात; पण त्यात कूर्मावताराचा उल्लेख नाही.

     रामकथा व महाभारत हे साररूपाने 'अग्निपुराणा'त आहे. बुद्धाला विष्णूचा एक अवतार मानले आहे. दैत्य माजले असता त्यांना मारण्यासाठी विष्णूने इतर अवतारांप्रमाणे बुद्धाचा अवतार घेतला असे 'अग्निपुराणा'त प्रतिपादन केले आहे.

     अवतारवर्णनानंतर सर्ग-प्रतिसर्गादी वर्णनाला आरंभ होतो. (सर्ग म्हणजे जगाची उत्पत्ती तर प्रतिसर्ग म्हणजे ब्रह्मदेव व त्याच्या पुत्रांनी केलेली देव, मनुष्य इत्यादींची निर्मिती) अव्यक्त ब्रह्मापासून सकल सृष्टी कशा क्रमाने निर्माण झाली, हे सांगून देवोपासना, मंत्र व तदनुषंगिक गोष्टींचे विवरण केले आहे. पुढे  २९ ते ४५ ह्या अध्यायांत वास्तुशास्त्राचा विचार केला गेला आहे. देवालय, देवांच्या मूर्ती कशा कराव्यात, हे सांगून देवप्रतिष्ठा करायला फक्त मध्यप्रदेशातील ब्राह्मण पात्र आहेत, असे प्रतिपादले आहे.

     त्यापुढील अध्यायांत सप्तद्वीपे, सागर ह्यांचे वर्णन आहे. राजा कसा असावा ह्याचे प्रतिपादन केले आहे. देश, काल व पात्र ह्यांचा विचार करून केलेले दान सर्वश्रेष्ठ होय असे 'अग्निपुराण' म्हणते.

सुरेश वाघे, संपर्क – (022)28752675

संदर्भ: भारतीय संस्कृति कोश, खंड पहिला, पृष्ठे 60-62
{jcomments on}

About Post Author