Home वारसा वन्‍यवैभव अक्षयवट अर्थात वडाचे झाड

अक्षयवट अर्थात वडाचे झाड

21
carasole

वटपोर्णिमा हा सण सवाष्णीसाठी जरी जिव्हाळ्याचा असला तरी पर्यावरणप्रेमींसाठी मात्र तो मन विषण्ण करणारा अनुभव असतो. पर्यावरणप्रेमींना पोर्णिमेनंतरचे दोन/तीन दिवस तरी रस्त्यावर पडलेल्या, पायदळी तुडवल्या जाणाऱ्या वटवृक्षाच्या पूजनीय फांद्या व त्यांचे मातीमोल झालेले रूप पाहवे लागते.

भारत हा जीवन जगण्याचाच उत्सव करणाऱ्या व गीतेत शिकवल्याप्रमाणे चराचरामध्ये ईश्वरी रूप शोधणाऱ्या भाविकांचा देश. वर्षातील तीनशेपासष्ट दिवस निसर्गानंद साजरा करणाऱ्या सण-उत्सवांचा देश. तेथे सृष्टीतील प्रत्येक सजीव-निर्जीव रूप पूजनीय आहे. भारतीयांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये सजीव सृष्टीतील प्रत्येक भागीदाराचा समतोल जितका राखला जात असे, तितका जगात अन्यत्र कुठेही सांभाळला गेला नसेल.

पर्यावरण सरंक्षण आणि संवर्धन यांचा असा उदात्त वारसा असलेल्या भारत देशात आधुनिक काळात सण-उत्सवांना हिडीस स्वरूप येत गेले आहे. त्यांमागील संस्कारांचा मूळ हेतू हरवला आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे वटपौर्णिमा. पतिव्रता सावित्रीचे देणे असलेले ते व्रत हा मंगल संस्कार न राहता यांत्रिक सोपस्कार झाला आहे.

पुराणकाळातील  बुद्धिमान, विदुषी सावित्री वटवृक्षाचे महात्म्य जाणत होती, म्हणूनच तिने मृर्च्छित सत्यवानाला वडाच्या झाडाखाली झोपवले, कारण ते झाड इतर झाडांच्या तुलनेत सगळ्यात जास्त म्हणजेच जवळ जवळ साठ टक्के प्राणवायू हवेत सोडते. तिला माहीत होते, की तिच्या मृतवत पतीला त्यावेळेस प्राणवायूची सगळ्यात जास्त गरज होती! आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेण्टिलेटरचे काम करतो. आर्यांना हा वृक्ष प्राचीन काळापासून परिचित असल्याचे दिसते. वेदांमध्ये याचा ‘न्यग्रोध’ नावाने उल्लेख आहे. रामायण, महाभारत, चरकसंहिता, बृहत्संहिता, कौटिलीय अर्थशास्त्र, रघुवंश इ. अनेक संस्कृत ग्रंथातून भिन्न भिन्न संदर्भात वडाचा निर्देश आहे. प्लिनी यांनी ‘इंडियन किंग ट्री’ असा याचा उल्लेख केला आहे. सीतीदेवीने प्रयागाच्या प्रसिद्ध वटवृक्षाची प्रार्थना केल्याचा उल्लेख रामायणात आहे. वडाच्या काटक्यांचा उपयोग होमहवनात व यज्ञात समिधा म्हणून करतात. बौद्ध धर्मीयही या वृक्षाला पवित्र मानतात. त्यांच्या सात बोधीवृक्षांपैकी हा एक आहे. वटवृक्षांचा अंतर्भाव मोरेसी कुलातील फायकस या प्रजातीत करतात. फायकस या प्रजातीत सुमारे एक हजार जाती असून त्यांपैकी सत्‍तर जाती भारतात सापडतात.

वटवृक्षाची उंची सुमारे तीस मीटर पर्यंत असते. हा वृक्ष सदापर्णी आहे. वटवृक्षात दुधी रंगाचा चीक असतो. त्यात काऊट चाऊल व रेसिन असते. वृक्षाचे खोड जाड व घट्ट असते. फांद्या जाड व जमिनीत समांतर वाढतात. फांद्यांवर ठराविक अंतरावर पारंब्या फुटतात, त्या जमिनीत गेल्यानंतर फांद्यांना आधार देतात. त्यामुळे वटवृक्षाची वाढ प्रचंड प्रमाणात होऊ शकते. झाडाची पाने जाड असून ती कातडीप्रमाणे चिवट, १०−२० सें.मी. लांब व ५ ते ७.५ सें.मी. रूंद असतात. त्‍यांचा आकार अंडाकृती व दीर्घवर्तुळाकृती असतो. पानांचा पृष्ठभाग केशविरहीत, चकचकीत व गर्द हिरवा आणि खालचा पृष्ठभाग सूक्ष्म लवयुक्त, ठळक शिरा असणारा व फिकट हिरवा असतो. फुलोरे गोलाकार, काहीसे पोकळ, पानांच्या दुबेळक्यात येणारे, लवयुक्त, कोवळ्या व अपक्वावस्थेत हिरवे व टणक, पक्कावस्थेत लालबुंद व नरम अशा लक्षणांनी युक्त असतात. या फुलोऱ्यांनी कुंभालनी पुष्पबंध म्हणतात. फुलोऱ्यांचे संयुक्त फळ बनते. त्याला औदुंबरिक फळ असे म्हणतात. मार्च ते जूनच्या काळात ही फळे झाडावर विपुल प्रमाणात दिसतात. अनेक पक्षी, वटवाघळे, खारी व माकडे इ. प्राणी ती खातात. फळे त्‍यात असणाऱ्या कीटकांमुळे माणसांना खाण्यास योग्य नसतात.

पुराणकथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला! महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हादेखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला! त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून त्याला अनादि-अनंत असा अक्षयवट म्हटले गेले आहे. त्याच्या ह्या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील तो पूजनीय मानतात. त्याच्या अलौकिक गुणधर्मामुळे वडाच्या काड्या होमहवनात किंवा मंगलप्रसंगी अग्नीला अर्पण केल्या जातात. वडाच्या अनेकविध गुणधर्मांमुळे  त्याची लाकडे सरपणासाठी वापरणे निषिद्ध मानले जाते.

आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो. भारतीय वैद्यकशास्त्राने सृष्टीचक्र अखंड गतिशील राहण्यासाठी झाडाचे काय महत्त्व आहे ते ओळखले होते. वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे.

एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला सातशेबारा किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढणे. त्याला आकाराने मोठी व संख्येने भरपूर पाने असल्यामुळे तो जास्तीत जास्त कर्बवायू आणि इतरही अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो. वड उन्हाळ्यात दिवसाला दोन टन इतके पाणी बाष्प स्वरूपात बाहेर फेकतो. त्याचा उपयोग ढग बनण्यासाठी आणि हवेत आर्द्रता व गारवा निर्माण करण्यासाठी देखील होतो. पावसाळ्यात ढगातील पाणी खेचून घेऊन पाऊस पाडण्यास मदत करणे हेदेखील वडाच्या झाडाचे कार्य आहे. वटवृक्ष सदैव हिरवागार असतो व त्याच्या विशाल आकारामुळे तो भरपूर सावली देतो.

गयेचा अक्षयवट व प्रयागचा श्यामवट फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. सिबपूर (कोलकाता) येथील भारतीय वनस्पती उद्यानातील वटवृक्ष पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनला आहे. डी. प्रेन यांनी १९०० मध्ये या वृक्षाचे वर्णन केले. त्या वेळी झाडाच्या खोडाचा घेर सुमारे १५ मीटर, तर पारंब्यांची संख्या ४६४ होती. वृक्षाच्या माथ्याचा परिघ ३७७ मी. होता. दोनशे वर्षाहून अधिक आयुःकाल असलेल्या या वृक्षाचे मूळचे खोड रोगग्रस्त होऊन नष्ट झाले आहे. तसेच, भडोचपासून जवळ असलेल्या नर्मदा नदीतील एका बेटावर कबीरवड हा पुरातन वृक्ष आहे. फॉर्बझ यांनी (१७७६−८३) वर्णन केल्याप्रमाणे त्‍या वृक्षाचा परिघ सुमारे ६०० मी. होता. तो वृक्ष सुमारे ३५० मोठी वायवी मुळे व तीन हजार लहान वायवी मुळांच्या आधारावर उभा आहे. त्या वृक्षाखाली सात हजार सैनिकांचा तळ पडत असल्‍याचा उल्‍लेख आढळतो. १८९९ मध्ये या वृक्षाने व्यापलेले क्षेत्र एक ते दीड हेक्टर इतके होते. हल्ली त्याचे भव्य स्वरूप खूपच कमी झाले आहे. जावळी (जिल्हा सातारा) व जुन्नर (जिल्हा पुणे) येथेही प्राचीन व प्रचंड वटवृक्ष आहेत. मद्रास येथील अड्यार नदीच्या दक्षिण तिरावर पाचशे वर्षे आयुःकाल असलेला वृक्ष असून त्याने सुमारे ४,००० चौ. मी. एवढे क्षेत्र व्यापले आहे. त्याची दक्षिणोत्तर लांबी ६७.५ मीटर व पूर्व−पश्चिम लांबी ६१.५ मीटर आहे. त्या वृक्षाखाली तीन हजार माणसांची परिषद भरली होती, अशी नोंद आहे.

वटवृक्षाच्‍या मुळाचे लाकूड लवचिक व अधिक बळकट असते. तंबूंचे खांब,  बैलगाड्यांचे जू व दांडे इत्यादींच्‍या निर्मितीसाठी ते उपयोगी आहे. खोडाचे लाकूड करडे व साधारण कठीण असते. त्याचा उपयोग अनेक किरकोळ वस्तू तयार करण्यासाठी व सर्वसाधारण सजावटी सामानासाठी होतो. वडाच्या लाकडापासून कागदाचा लगदा तयार करता येतो. सालीच्या धाग्यांपासून दोर तयार करतात. पारंब्यांचाही दोरी म्हणून वापर करता येतो. चिकापासून अतिशय चिकट गोंद बनवतात. त्याचा उपयोग पाखरे पकडण्यासाठी केला जातो. पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार करतात. कोबळ्या फांद्या व पानांचा शेळ्या, मेंढ्या व इतर गुरांना चारा म्हणून उपयोग होतो. हा चारा हत्तींना मोठ्या प्रमाणात लागतो. झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात. वडाच्या सालीत ११% टॅनीन असते. तिचा रस स्तंभक (आकुंचन करणारा) व पौष्टिक असतो. आमांश व अतिसारात तो उपयोगी आहे. वृक्षाच्‍या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे. पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते.

कृष्णवड : या नावाने परिचित असलेला वृक्ष खऱ्या वडांपेक्षा निराळा आहे. त्याचे शास्त्रीय नाव फा. कृष्णी असे आहे. इंग्रजीत त्याला कृष्णाज बटरकप असे संबोधितात. याची पाने पात्याच्या तळाजवळ दुमडलेली असून पेल्यासारखी (द्रोणासारखी) दिसतात. या पानांच्या पेल्यात श्रीकृष्ण लोणी ठेवून खात असे, अशी दंतकथा आहे. हा वृक्ष लहानसर असून शोभेसाठी बागेत लावतात.

भारतीय समाजजीवनात त्याला कुटुंबप्रमुखासारखे मानाचे स्थान आहे. भारतात कुठेही गेलात तरी देवळाजवळ, गावात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला वटवृक्ष जपण्याची परंपरा दिसून येईल. तो देखील कुटुंबप्रमुखासारखा अटळ, अचल उभा राहून संसाराला जीवन, संरक्षण व सुविधा देण्याचे कर्तव्य बजावत असतो. गावातील कित्येक पिढ्या, लहानथोर त्याच्या अंगावर खेळून मोठी होतात. गावोगावी वडाच्या पारावर बसून आयुष्याची संध्याकाळ घालवणारे हजारो लोक आहेत; एरवीही पारावरच्या गप्पा प्रसिद्धच आहेत. टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांवरील चर्चा ऐकल्या, की त्या गप्पाच आठवतात ना! कितीतरी ज्येष्ठांना त्यांची सुखदु:खे वाटण्यासाठी त्याच्या विशाल सावलीचा आधार असतो.

(या लेखास मराठी विश्‍वकोश संकेतस्‍थळा’वरील माहिती आधारभूत)

विक्रम यंदे
९८३३९८८१६६
vikram.yende99@gmail.com

About Post Author

21 COMMENTS

  1. धन्यवाद ! उपयुक्त लेख !
    धन्यवाद ! उपयुक्त लेख !

  2. अतिशय छान व मार्गदर्शक लेख.
    अतिशय छान व मार्गदर्शक लेख.

  3. सर्वगुण संपूर्ण
    सर्वगुण संपूर्ण.

  4. अतिशय छान .सर्वगुण संपूर्ण.
    अतिशय छान .सर्वगुण संपूर्ण.

  5. खुप छान उपयुक्त माहिती
    खुप छान उपयुक्त माहिती

  6. अतिशय सुंंदर व सर्वोपयोगी
    अतिशय सुंंदर व सर्वोपयोगी लेखाबद्दल अापले अभिनंंदन.

  7. मस्त व उपयुक्त माहिती दिली…
    मस्त व उपयुक्त माहिती दिली आहे. वटवृक्षाचे संगोपन ही काळाची गरज आहे.

  8. अप्रतीम लेख आणि ऊपयुक्त…
    अप्रतीम लेख आणि ऊपयुक्त माहीती

  9. भारतीय वृक्ष जोपासले पाहिजेत…
    भारतीय वृक्ष जोपासले पाहिजेत .हि झाडे लावली पाहिजेत .

  10. खुप छान माहिती ; वडाचे झाडे…
    खुप छान माहिती ; वडाचे झाडे लावण्याचा संकल्प

  11. आजचं मी भर उन्हात गावातीलऎका…
    आजचं मी भर उन्हात गावातीलऎका वटवृक्षा खाली गेलो… खुप गार सावली देतात वटवृक्ष…
    Shrikant Wankhade
    Fri.01/06/2018

  12. वडाच्या झाडाला जास्तीत जास्त…
    वडाच्या झाडाला जास्तीत जास्त मोकळ्या जागेत लावण्याचे अनमोल सहकार्य केले पाहिजे

  13. अतिशय सुरेख सुंदर
    अतिशय सुरेख सुंदर

  14. वटवृक्षाच्या खऱ्या उपयुक्त…
    वटवृक्षाच्या खऱ्या उपयुक्त तेवर या लेखाने प्रकाश पडला

  15. अत्यंत उपयोगी माहीती…
    अत्यंत उपयोगी माहीती झाडाबद्दल कुतुहल असनार्‍यांना अत्यंत लाभदायक

  16. पर्यावरण आणि पृथ्वीच्या…
    पर्यावरण आणि पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी पुढील पिढीची उत्तम जोपासना व्हावी याकरता वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. त्यासाठी वडाचे झाड अवश्य लावावे. अप्रतिम लेख.

  17. खुप खुप धन्यवाद.. उपयुक्त …
    खुप खुप धन्यवाद.. उपयुक्त माहिती दिलीत वडाचे वृक्ष ही काळाची गरज आहे वृक्ष लावा व जगवा ?? सुषमा र. गायकवाड
    १६ /१०/२०१९

  18. अतिशय उपयुक्त माहिती आहे…
    अतिशय उपयुक्त माहिती आहे. सर्वप्रकारच्या भारतीय वृक्षाबद्दल मिळाल्यास खूपच आनंद वाटेल.
    धन्यवाद, आपला
    सुरेश मुरलीधर पंधे.

  19. सुंदर लेखन
    वडाची झाड जपली…

    सुंदर लेखन
    वडाची झाड जपली पाहिजेत त्याच महत्व अगणित आहे?

Comments are closed.

Exit mobile version