अकलुजचे आद्य विकासक शंकरराव मोहिते-पाटील यांनी 1970-72 मध्ये बंगळूरहून संकरीत गायी आणल्या. त्यांनी त्या शेतकऱ-यांच्या दारात बांधून प्रत्यक्षात संकरीत गायीचे दूध काढून दाखवले. त्यामुळे शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळला. त्यांच्या दारात संकरीत गायी दिसू लागल्या. शेतकरी खाजगी सावकारीतून मुक्त होऊ लागला आणि ‘शिवामृत दूध संघा’ची स्थापना झाली. तो व्यवसाय भरभराटीला आला. दररोज दोन लाख लिटर दूध संकलन होते. त्या माध्यमातून पनीर, दुधपिशवी, आम्रखंड, पेढे, मसाला दूध, खवा, श्रीखंड, तूप यांची निर्मिती केली जाते.
सोलापूर, नांदेड, लातूर, बीड, नगर, तुळजापूर, उस्मानाबाद या भागांत शिवामृत ब्रँडने लोकप्रियता मिळवली आहे. तसेच, पर्यटनाचा दृष्टिकोन ठेवून शिवसृष्टी किल्ला, मल्टिमिडिया लेसर शो, महाशिवरात्री यात्रा, वेगवेगळे पुरस्कार दिले जातात.