अंधांना दृष्टी मिळवून देणारे गुरुजी

0
33
_AndhanaDrushti_MilavunDenareGuruji_1.jpg

सांगली जिल्ह्यातील तुंग हे गाव. या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवण्यात तेथील गावकऱ्यांच्या ‘जिव्हाळा ग्रूप’चा सिंहाचा वाटा आहे. जिव्हाळा ग्रूपचे संस्थापक सदस्य आहेत कृष्णात पाटोळे. पाटोळे हे पेशाने शिक्षक आहेत. पण त्यांनी केवळ शाळा एके शाळा असे न करता लोकसेवेचे व्रत घेतले. पाटोळे गुरुजी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम, रोगनिदान शिबिरे, एड्सबाबत जनजागृती शिबिरे, जटानिर्मूलन कार्यक्रम असे अनेक उपक्रम 1999 सालापासून राबवत आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकाच दिवशी तब्बल पाचशे सहासष्ट व्यक्तींनी रक्तदान केले. लहानशा खेड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यासाठी गावकरी सहभागी होणे ही पाटोळे गुरुजींनी केलेल्या लोकजागृतीची पावतीच म्हणावी लागेल!

तुंग गावाला यशवंत ग्राम किताब, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार, निर्मळ ग्राम पुरस्कार असे काही सन्मान मिळाले आहेत. गुरुजींचे ग्राम स्वच्छता अभियानासंदर्भातील कृतिप्रवण विचार स्पष्ट व ठोस आहेत. ते ‘स्वच्छतादूत’ या पुस्तिकेचे संपादक सदस्य होते.

तुंग हे ऊस आणि भाजीपाला पिकवणारे गाव. तेथील भोपळी मिरची प्रसिद्ध आहे. गावामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने ऊस, केळी, भोपळी मिरची यांचे उत्पादन गावामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने घेतले जावे यासाठी ‘जिव्हाळा ग्रूप’तर्फे कृषी व्याख्यानमालेचे आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्यात करण्यात येते. व्याख्यानमालेमध्ये जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार केला जातो. पाटोळे गुरुजींची धडपड विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, अपंगांना साहित्याचे आणि औषधांचे वाटप, गावातील ज्येष्ठ नागरिक संघटना, महिला बचत गटांस मार्गदर्शन अशा लहानमोठ्या उपक्रमांसाठी सुरू असते. त्यांनी ठरवले, की तुंग गावामध्ये नेत्रदान चळवळ उभी करायची. त्याला निमित्त झाले एका दु:खद घटनेचे. सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते सतीश दोडिया यांच्या तरुण मुलाचे अपघातामध्ये निधन झाले. दोडिया यांनी त्यांच्या मुलाचे नेत्रदान केले. पाटोळे गुरुजी त्या घटनेचे साक्षीदार होते. त्यामुळे ते भारावून गेले. चळवळीची सुरुवात झाली, ती नेत्रदानासाठी संकल्पपत्र भरून घेण्यापासून. पाटोळे गुरुजी आणि त्यांचे साथीदार घरोघरी जाऊन नेत्रदानाचे महत्त्व सांगू लागले. त्यांनी दीड हजार संकल्पपत्रे भरून घेतली. त्या दरम्यान, गावातील सोनाबाई पाटील ह्यांचे निधन झाले. कुटुंबातील व्यक्ती सोनाबार्इंचे नेत्रदान करण्यास तयार झाल्या, पण मृत व्यक्तीचे डोळे काढायचे म्हणजे भयंकर घटना अशी त्यांची समजूत. त्यामुळे ती शस्त्रक्रिया घरी करण्यास कुटुंबीयांनी विरोध केला. मग पहिले नेत्रदान नदीच्या काठावर, सरणावर झाले. लोकांनी घाबरून सरणाभोवती चादरी धरल्या. डॉक्टरांनी एका डोळ्याचे नेत्रपटल काढले. डॉक्टरांनी दुसऱ्या डोळ्याचे नेत्रपटल काढण्यापूर्वी, सभोवती धरलेल्या चादरी हटवण्यास सांगितले. नेत्रदानामध्ये मृत व्यक्तीचा पूर्ण डोळा न काढता केवळ नेत्रपटल काढून घेतले जाते, ही गोष्ट जमलेल्या गावकऱ्यांना समजण्यास हवी असा डॉक्टरांचा त्यामागे हेतू होता.

ते प्रात्यक्षिक परिणामकारक ठरले. त्यानंतर गावातील अनेक व्यक्ती नेत्रदानासाठी पुढे आल्या आणि कृष्णात पाटोळे गुरुजींनी त्यांचे सहकारी विनोद पाटोळे, विजय मगदूम, संपत कदम, रशीद या त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अठ्ठावीस व्यक्तींचे नेत्रदान 2002 सालापासून करवून घेतले आहे. त्यांच्या या कार्यामुळे छप्पन व्यक्तींना दृष्टी प्राप्त झाली आहे. ज्या कुटुंबातील मृत व्यक्तीचे नेत्रदान करण्यात आले आहे, त्या कुटुंबाचा ‘जिव्हाळा ग्रूप’तर्फे मानपत्र देऊन गौरव केला जातो. त्या कार्यक्रमात ज्या अंध व्यक्तीला दृष्टी प्राप्त झाली आहे अशा व्यक्तीचे अनुभवकथन आयोजित करण्यात येते.

– नामदेव माळी

About Post Author