होलिकोत्सव

carasole

होळी हा लोकोत्सव होय. तो वर्षाच्‍या मासातील अंतिम उत्‍सव. या उत्‍सवाची होलिकोत्सव, धुलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजेच होळी, धुळवडरंगपंचमी अशी स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी तो एकत्रितरित्या साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत या पाच सहा दिवसांत हा उत्‍सव काही प्रांतात दोन दिवस तर काही ठिकाणी पाच दिवससाजरा केला जातो. होळीच्या दुस-या दिवशी धुलीवंदन (धूळवड) साजरी केली जाते तर पाचव्या दिवशी रंगपंचमी.

‘आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास’ या पुस्तकात ऋग्वेदी या सणाविषयी थोडी वेगळी माहिती देतात – शालिवाहन शकाच्या मासगणनेप्रमाणे शेवटचा जो फाल्गुन महिना, त्यात फाल्गुनोत्सव करावा असे भविष्यादी पुराणांत कथन केले आहे. सामान्यत: शुक्ल नवमीपासून पौर्णिमेपर्यंत हा उत्सव सर्व लहान-थोरांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. स्थानपरत्वे त्यास शिमगा, होलिकादहन किंवा होळी, हुताशनीमहोत्सव, दोलायात्रा, कोकण-महाराष्ट्रात शिमगा व होळी, तर दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. या सणाला उत्तरेत होरी, तर महाराष्ट्रातील कोकण-गोमंतकात शिग्मा किंवा शिग्मो अशी संज्ञा आहे. शिमगा किंवा शिग्मा या शब्दाचा उगम सांगताना रा.चिं. ढेरे लिहितात – ‘देशीनाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ‘सुगिम्हअ’ म्हणजे ‘सुग्रीष्मक’ असे नाव दिले आहे. या नावापासूनच कोकण-गोमंतकातील मराठीत ‘शिग्मा’ हा शब्द सिद्ध झाला आहे आणि महाराष्ट्राच्या अन्य भागांत वर्णविपर्ययाने शिमगा असे त्याचे रूप रूढ झाले आहे. होळीला वसंतोत्सव अथवा वसंतागमनोत्सव म्हणजे वसंतऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नाव देता येईल.

होळी साजरी करण्याची तऱ्हा सर्वत्र बहुतेक सारखीच असते. उत्सवात मुख्य विधान असते ते म्हणजे होलिकादहनाचे किंवा होळी पेटवण्याचे. या सणाच्या उत्पत्तीसंबंधी एकवाक्यता नाही. होळी पेटवण्याच्या परंपरेचा उगम कुणी होलिका किंवा होलाका, ढूंढा, पूतना यांच्यासारख्या पुराणकाळी लहान मुलांना पीडा देणा-या राक्षसींच्या दहनाच्या कथेत शोधतात, तर कोणी त्‍याचे कारण मदन दहनाच्या कथेत असल्‍याचे सांगतात. भविष्‍यपुराणात याबाबत दिलेल्या कथेनुसार, पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा देऊ लागली तेव्हा लोकांनी तिला बीभत्स शिव्या व शाप देऊन आणि सर्वत्र अग्नी पेटवून तिला सर्वांनी पळवून लावले. तेव्हापासून त्या उत्सवात शिव्या, बोंबा मारण्याची प्रथा सुरू झाली असे म्हणतात. परंतु विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपुजनाच्या परंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे सर्वत्र प्रचलित असलेले स्वरूप पाहता असे लक्षात येते, की हा सण मुलत: अगदी लौकिक पातळीवरचा असावा.

या उत्सवाचे धार्मिक विधि-विधान असे – भद्राविरहित फाल्गुनी पौर्णिमेच्या सायंकाळी व्रतकर्त्याने शास्त्रपूत मार्गाने होळी पेटवावी. दिवसा मात्र होळी पेटवू नये. प्रथम कर्त्याने शुचिर्भुत होऊन व देशकालाचा उच्चार करून ‘सकुटुम्बस्य मम ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थ तत्पीडापरिहारार्थ होलिका पूजनमहं करिष्ये !’ असा संकल्प करावा. मग लाकडे, ढलप्या, गवऱ्या यांचा ढीग रचून, त्यांत एरंड किंवा तत्सदृश झाडाची फांदी उभी करावी. नंतर ‘श्रीहोलिकायै नम:’ असा प्रणाम-मंत्र उच्चारून, होळीची षोडशोपचार पूजा करावी. पूजनोत्तर होलिकेची प्रार्थना करावी. प्रार्थनामंत्र असा –

वन्दिता ऽ सि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ् करणे च |
अंतस्त्वं पाहि नो देयि, भूते ! भतिप्रदा भय !!

यानंतर होळीला तीन प्रदक्षिणा करून बोंब ठोकावी, अश्लील शब्द उच्चारावे, नाचावे व गावे.

या उत्सवाचे लौकिक विधि-विधान असे –

होळीपौर्णिमेच्या आधी येणाऱ्या पौर्णिमेच्या (म्हणजे माघी पौर्णिमेच्या) दिवशी गावाच्या मध्यभागी अथवा चव्हाट्यावर एक एरंडाची फांदी पुरून होळीची मुहूर्तमेढ रोवतात. या पौर्णिमेला दांडीपौर्णिमा असे म्हणतात. नंतर फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळीसाठी लाकडे, गवऱ्या चोरून आणाव्या असा संकेत आहे. होळी पेटवण्यासाठी लागणारा विस्तव चांडाळ ज्ञातीच्या एकाद्या माणासाकडून लहान मुलांच्या द्वारा आणावा असे सांगितले आहे. होळी पेटवल्यानंतर गावाबाहेर जाऊन अगर गाव मोठा असेल, तर त्यांच्या मोहल्ल्या-मोहल्ल्यात गटागटाने हिंडून, वाद्ये वाजवत अश्लील शिवीगाळी करत किंवा अश्लील गाणी म्हणत, नाच करत दिवसाचा सर्व वेळ काढावा. या प्रसंगी कोठे कोठे दाने करण्याचीही प्रथा आहे. होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध व तूप शिंपून शांत करावी व मग जमलेल्या लोकांना नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावी. त्या दिवशी सारी रात्र नृत्य-गायनात व्यतीत करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी खूप अश्लील बोलून होळीची रक्षा विसर्जित करावी. काही ठिकाणी ही रक्षा व शेण, चिखल यांसारखे पदार्थ अंगाला माखून नृत्य-गायन करण्याची प्रथा आहे.

या दिवशी चांडाळाला स्पर्श करण्याचा प्रमुख विधी शास्त्रात सांगितलेला आहे.

होळीच्या सणाचे सर्वत्र प्रचलित असलेले स्वरूप पाहता असे ध्यानी येते, की हा सण मूलत: अगदी लौकीक पातळीवरचा असावा. कालांतराने त्यात उच्च संस्कृतीच्या लोकांकडून कितीही धार्मिक व सांस्कृतिक विधि-विधानांची भर पडली असली, तरीही या सणाचे लौकीक स्वरूप मुळीच लोप पावले नाही, उलट ते अधिकच गडद व भडकपणे आविष्कृत होत राहिले. आजच्या होलिकोत्सवात अनेक पदर सामावलेले दिसतात. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव हे तीन पदर तर सहज उठून दिसतात. होळी, धुळवड आणि रंगपंचमी ही त्यांची परिचित नावे होत. भारताच्या विविध प्रदेशांत या तिन्ही प्रकारांनी होळी साजरी केली जातेच. त्याशिवाय प्रांतपरत्वे तिचे विभिन्न आविष्कार होतात ते असे –बंगालमध्ये फाल्गुन शुद्ध चतुर्दशीला दोलायात्रा उत्सवाला आरंभ होतो. त्या दिवशी घरचा यजमान उपोषित राहून सकाळी कृष्णाची व सायंकाळी अग्नीची पूजा करतो. पूजा संपल्यावर कृष्णमूर्तीवर फल्गू म्हणजे गुलाल उधळून, जमलेल्या व्यक्तींवरही त्याचा शिडकावा करतात. मग घराबाहेर एक मोठी गवताची मनुष्याकृती जाळतात. हीच तेथील होळी होय. बंगालमधील काही जातींत मात्र महाराष्ट्रातील प्रमाणेच सर्व प्रकारचा धुडगूस चालतो आणि तो फाल्गुन शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत चालतो. पौर्णिमेच्या दिवशी कृष्णमूर्ती झोपाळ्यावर किंवा पाळण्यात ठेवून तिला झोके देतात. बंगालच्या खेड्यापाड्यांतून तर हा दोलोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा होतो.

ओडिसा प्रदेशात होळी होत नाही, फक्त दोलोत्सव होतो. तेथील चैतन्यपंथी लोक कृष्णमूर्तीची पालखीतून घरोघर मिरवणूक नेतात. त्या त्या घऱी कृष्णमूर्तीला अत्तर लावून, तीवर गुलाल उधळतात. मिरवणूकवाल्यांवरही गुलाल उधळला जातो व त्यांना वस्त्रप्रावरणे व दक्षिणा दिली जाते. काही ठिकाणी गोप लोक त्यांच्यापैकी एकाला कृष्णवेष देऊन त्याच्या भोवती टिपऱ्यांचा नाच करतात.

उत्तर प्रदेशात फाल्गुन शुद्ध पंचमीपासून पौर्णिमेपर्यंत लाल-पिवळी वस्त्रे परिधान करून, गुलाल उधळीत व गाणी गात लोक कालक्रमणा करतात. पौर्णिमेच्या दिवशी चव्हाट्यावर होळी पूजनाचा व दहनाचा सोहळा होतो.

महाराष्ट्रात काही ठिकाणी हा उत्सव फाल्गुन शुद्ध नवमीपासून पौर्णिमेपर्यंत, तर काही ठिकाणी पौर्णिमा ते अमावास्या या कालखंडात होतो. होळीत आंबा, माड, पोफळ, एरंड यांसारख्या वृक्षांचे किंवा वृक्षशाखेचे दहन करण्याची प्रथा आहे. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो. पूर्वी होळीच्या निमित्ताने परस्परांच्या अंगावर अश्लीलतासूचक शब्दांचे किंवा चित्रांचे ठसे उमटवण्याची, तमाशाचे फड गाजवण्याची, कॉफी, भांग, मद्य, अफू यांसारखी उत्तेजक पेये व द्रव्ये सेवून अश्लील व अर्वाच्य गाणी गाण्याची किंवा शिवीगाळ करण्याची, तसेच होळीशेजारी बसून गंजीफा, पत्ते किंवा सोंगट्या खेळण्याची चाल सर्वत्र होती. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीवर तापवलेल्या पाण्याने स्नान करत. मग होळीची पूजा करून, गोडाधोडाचे भोजन करत व देवदर्शनास जात.

गोमंतकातील होलिकोत्सवाची रंगत वर्णन करताना पं. महादेवशास्त्री जोशी यांनी म्हटले आहे – शिमगा म्हणजे पालथा हात तोंडाला लावणे, शिमगा म्हणजे बीभत्स, अर्वाच्य बोलणे हे समीकरण आम्हा गोमंतकीयांना मान्य नाही. आमचा शिमगा गातो, नाचतो, वाजतो आणि खेळतो. आमची होळी जळत नाही, तर उभी राहते. गावोगावच्या ग्रामदेवतेच्या देवळांसमोर ती उभी केली जाते. त्यासाठी काही दिवस आधीच एखादा सडेतोड पण बेताचा वृक्ष हेरून ठेवला जातो. होळीच्या रात्री गावकरी ढोलकी वाजवत त्या वृक्षाकडे जातात, त्याची पूजा करून तो तोडतात, त्याच्या फांद्या छाटतात आणि तो पंधरा-वीस हात उंचीचा उभाच्या उभा सोट गावकरी लोक खांद्यावर घेऊन नाचवत देवळाकडे येतात. तेथे खोल दर तयार असतो. त्यात तो वृक्षाचा सोट उभा करतात. त्याच्या टोकावर एक असोला नारळ ठेवतात आणि त्याच्या शेजारी एक कागदी झेंडा अडकवतात. मग होळीला हळदकुंकू वाहतात, नारळ फोडतात आणि जी काय बोंबाबोंब करायची ती त्यावेळी करतात. अर्वाच्य उच्चार त्या वेळी होतात.

हे बीभत्स, अर्वाच्य उच्चारण का करायचे याचा उलगडा पुढीलप्रमाणे करता येतो –

फाल्गुन शुद्ध १५ ला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. त्या नक्षत्राची देवता भग ही आहे. भगीचा रूढ अर्थ आहे जननेंद्रिय, अर्थात स्त्रीचे इंद्रिय. तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची. ही एक प्रकारची पूजाच होय. तो त्या देवतेचा सन्मानच समजावा. गोमंतकात होळीच्या निमित्ताने विविध प्रकारची सोंगे निघतात, ‘खेळ्ये’ येतात व राधा नाच होतो.

मद्रास भागात होळी शिवालयासमोर पेटवतात. तो मदनदहनाचा प्रकार असावा असे वाटते.

– भारतीय संस्कृतिकोश, खंड दहावा

About Post Author

Exit mobile version