हेमंत सावंतची ज्येष्ठांसाठी मोफत रिक्षासेवा हेल्पलाईन

4
25
carasole

रिक्षावाल्यांचा अॅटिट्युड, त्यांची लोकांशी बोलण्याची पद्धत याविषयी सामान्यत: नाराजी व्यक्त केली जाते. फार कमी लोक रिक्षावाल्यांविषयी चांगले मत व्यक्त करतात! रिक्षावाले मीटर आडवा टाकून, ढुंकूनही न बघता समोरून जाणार किंवा हात दाखवला, की थांबणार पण अमूक ठिकाणी येणार नाही असे निर्ढावलेपणाने सांगणार, हा सहसा अनुभव. पण रिक्षाचालकांत अपवाद असतोच.

पूर्व विलेपार्ल्याच्या ‘मराठी मित्र मंडळाच्या ‘सिनियर सिटिझन्स डे’ निमित्ताने आयोजित कार्यक्रमात एका रिक्षावाल्याचा सत्कार करण्यात आला! त्यांचे नाव हेमंत सावंत. ते ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत रिक्षासेवेची हेल्पलाईन चालवतात. हेल्पलाईन ज्येष्ठ नागरिकांसाठी रात्री बारा ते सकाळी सहा या वेळात कार्यरत असते. सावंत गेल्या आठ वर्षांपासून सिनियर सिटिझन्सच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. हेमंत व त्यांची ‘मोफत रिक्षासेवा’ त्यांच्या मोबाईल नंबरसह पार्ल्यातील बऱ्याच लोकांना ‘माउथ पब्लिसिटी’मुळे माहीत झाली आहे. त्यामुळे त्यांचा मोबाईल अखंड वाजत असतो. कधी रात्री दोन-अडीचच्या सुमारास एखाद्या आजोबांचा “माझ्या घरातील लाईटस् गेले आहेत.” असे सांगणारा फोन येतो आणि हेमंत दुरुस्तीच्या साहित्यानिशी आजोबांच्या घरी पोचतात. कधी एखाद्या आजी “अहो मी एकटीच असते घरात. मला एक कामवाली हवी आहे. ती मिळेल का?” अशी विचारणा करतात, तर कधी एखादी घरकाम करणारी बाई, तिचा नवरा दारू पिऊन रोज घरात धिंगाणा घालतो अशी तक्रार करते. हेमंत सावंत त्या सर्वांच्या मदतीला धावून जातात. हेमंत यांच्या या कामाविषयी पार्ल्यातील पोलिसांना माहिती आहे. हेमंतना त्यांचीही मदत होते. अनेक ज्येष्ठ मंडळी घरी एकटी असतात, त्यांची विचारपूस करणारे, त्यांच्याशी मायेने बोलणारे त्यांच्याजवळ कोणी नसते. हेमंत तशा व्यक्तींशी आपुलकीने बोलतात.

हेमंत म्हणाले, “२००७ सालच्या पावसाळ्यातील घटना. मी रात्री दोन वाजता रिक्षा घेऊन चाललो होतो. मला रिक्षाच्या हेडलाईटमध्ये रस्त्याच्या कडेला झाडाखाली जख्ख म्हातारे गृहस्थ छत्री घेऊन बसलेले दिसले. त्यांची औषधे संपली होती. हेमंतने आजोबांना रिक्षात बसवले व पार्ल्याच्या (पूर्व) एका दुकानात नेले. तेथे त्यांची काही औषधे मिळाली. हेमंत यांनी इतर औषधे आणण्यासाठी पश्चिम पार्ल्याला जाऊया असे आजोबांना सुचवले. ते टाळाटाळ करू लागले. तेव्हा हेमंत यांनी ताडले, की आजोबांकडे पैसे नसावेत. त्यामुळे हेमंत यांनी आजोबांना ‘पैशाची चिंता करू नका’ असे म्हणत पश्चिम पार्ल्याला दुकानात नेले. तेथेही औषध मिळाले नाही. मग हेमंत यांनी त्यांना ‘नानावटी हॉस्पिटल’मधून औषधे मिळवून दिली.

“मी त्या प्रसंगाने हेलावून गेलो. मला गरजू व्यक्तीला मदत केल्याचे समाधान मिळाले. तेव्हापासून माझे गरजू, ज्येष्ठ लोकांना मदत करण्याचे काम सुरू झाले.”

हेमंत त्यांना अनुभवास आलेला एक प्रसंग कथन करतात ते म्हणतात, “मला एके रात्री पार्ल्यातील एका रेस्टॉरंटमधून फोन आला. मालक म्हणाले, “येथे एक मध्यमवयीन माणूस दारू पिऊन तर्रर्र होऊन पडला आहे. दिंडोशी-दिंडोशी… असे बरळत आहे. त्याला त्याच्या घरी सोडून याल का?” हॉटेल मालकाने माझ्यासोबत एका वेटरला पाठवले. मी त्याच्या मदतीने त्या माणसाला रिक्षातून दिंडोशीपर्यंत घेऊन गेलो. पण तो माणूस त्याचे घर कोठे आहे ते सांगू शकला नाही. मग मी एक शक्कल लढवली. दिंडोशीतील एका दारूच्या दुकानासमोर रिक्षा थांबवली व तेथील माणसाला, रिक्षातील माणूस दाखवला. त्याने त्या माणसाला ओळखले, इतकेच नाही तर त्याचे घर कोठे आहे तेही सांगितले. मी त्याला घरी नेले. तो दारुडा घरात शिरताक्षणीच एकदम व्हायलंट झाला. त्याने वृद्ध आईवडिलांवरच हात उगारला. मी ते पाहून त्याच्या खाड्कन मुस्कटात मारल्या. तसा तो वरमला. मग मी त्याच्या आईवडिलांच्या परवानगीने त्या माणसाला खोपोलीच्या ‘सनराईज फाउंडेशन’ या व्यसनमुक्ती केंद्रात भरती केले. तो माणूस एका वर्षात व्यसनमुक्त झाला. पुढे, तो व्यसनमुक्ती केंद्रासाठी काम करू लागला.”

हेमंत यांनी एके रात्री पार्ले स्टेशनवर थंडीने काकडलेला भिकारी पाहिला. त्यांनी त्याला घेऊन तडक नानावटी हॉस्पिटल गाठले. नानावटीचे एक ट्रस्टी – श्री मोदी हे हेमंत यांच्या ओळखीचे आहेत. ते गरजूंना मदत करतात. हेमंत यांनी त्यांची मदत घेतली. नानावटीतील डॉक्टरांनी त्या भिकाऱ्याला तपासले. त्याला औषधे दिली. जनरल वॉर्डमध्ये ठेवले. डॉक्टर हेमंतला म्हणाले, “याला आणायला तासभर उशीर झाला असता तर तो मेलाच असता.” पुढे, तो भिकारी पूर्ण बरा झाला. हेमंत यांना स्वत:च्या मदतीचा आणि प्रयत्नांचा असा सकारात्मक परिणाम सतत अनुभवास येतो.

हेमंत म्हणतात, “मला आता अखंड फोन येतात, तेही मुंबईच्या इतर उपनगरांमधून. मला त्या प्रभागात अशी सेवा देणे शक्य होत नाही. त्यामुळे माझी सेवा पार्ल्यापूरतीच मर्यादित आहे.”त्या उपनगरांमध्येही तशी सेवा देता यावी याकरता हेमंत लोकांकडे आर्थिक मदतीसाठी आवाहन करतात.

हेमंत यांना पार्ले सोडून अन्य उपनगरातील ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष जाणे शक्य नसले तरी ते गरजूंना दिवसाच्या वेळेत सल्ला देण्याचे काम करतात. उदाहरणार्थ, गरीब व्यक्तींसाठी एखादे ऑपरेशन कोठल्या हॉस्पिटलमध्ये विनामूल्य होते वगैरे. काही व्यक्ती हेमंतना त्यांच्या मुलामुलींसाठी योग्य वधू-वर शोधायलाही सांगतात. हेमंत तीही मदत करतात.

हेमंत हणमंत सावंत हे मूळचे सातारा जिल्ह्याच्या वाई येथील राहणारे. त्यांच्या परिवारात त्यांचे आईवडिल, पाच भावंडे, त्यांची बायको व मुलगा – हर्ष. ते एक-दीड वर्षांचे असताना, त्यांचे आईवडिल वाई सोडून मुंबईत – पार्ले (पूर्व) येथे अँथोनी मिस्किटा चाळीत राहण्यास आले. आता त्या चाळीचे रूपांतर बिल्डिंगमध्ये झाले आहे. हेमंत यांचे शिक्षण पार्ले टिळक शाळेतून, मराठी माध्यमातून एसएससीपर्यंत झाले. त्यांना पुढे शिकण्याची इच्छा होती. हेमंत यांचे वडील प्रभादेवी टेलिफोन डिपार्टमेंटमधून १९९२ साली रिटायर झाले. पुढे हेमंतवर घराची जबाबदारी आली. ते भावंडांमध्ये सर्वांत मोठे. त्यांच्या पाठच्या लग्नाच्या चार बहिणी. त्यांनी स्वत:वर आलेली घराची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी शिक्षण सोडले.

हेमंत यांचे बालपण गरिबीत व कष्टात गेले. त्यांच्या घरी बऱ्याच वेळा जेवण बनवण्यासाठी सामान नसे. मग त्यांची आई पाणी उकळून, त्यात तिखट मीठ घालत असे. हेमंत आणि त्यांची भावंडे बनपाव आणून त्या पाण्यात बुडवून खात असत. हेमंत यांनी लहानपणापासून पेपरची व दुधाची लाईन टाकायला सुरुवात केली. हेमंत ते काम संपवून शाळेत जात असत. त्यांना जरी मध्येच शिक्षण सोडावे लागले तरी त्यांनी त्यांच्या चारही बहिणींना शिकवले. त्या डहाणूकर, साठे कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाल्या.”

हेमंत हे भावंडांत सर्वांत मोठे असल्यामुळे आईवडिलांनी त्यांच्यामागे ‘लग्न कर, लग्न कर’ असा धोषा लावलेला असताना त्यांनी आधी बहिणींची लग्ने केली. त्यानंतर त्यांनी २००० साली लग्न केले.

हेमंत यांच्या पत्नी पार्लर चालवतात. त्या मोठमोठ्या – दहा फुटी, सुंदर रांगोळ्या काढतात. विलेपार्ले येथील पार्लेश्वर मंदिरात दिवाळी पहाट, दसरा इत्यादी दिवशी त्यांचीच रांगोळी असते. ती एकेक रांगोळी काढायला त्यांना चार ते पाच तास लागतात!

हेमंत यांनी १९८३ सालापासून स्वत:ची रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. हेमंत यांच्या मालकीच्या आज तीन रिक्षा आहेत. ते त्यांपैकी दोन रिक्षा दोन शिफ्टमध्ये चालवायला देतात. एक रिक्षा दिवसा चालवण्यासाठी दिलेली आहे. त्यांना त्यांचे नियमित भाडे मिळते. ते त्या पैशांतून बँकलोन वगैरे फेडून घरखर्च भागवतात. हेमंत एक रिक्षा संध्याकाळी साडेसात ते रात्री दहा वाजेपर्यंत स्वत: चालवतात. तसेच, ते गेल्या पाच वर्षांपासून पार्ले (पूर्व) येथील स्वामी समर्थ मठात देव पुसणे, परिसर स्वच्छ करणे अशा प्रकारची सेवा करतात.

हेमंत यांना ट्रेकिंगची आवड आहे. त्यांचा ऐंशी-नव्वद जणांचा ‘ट्रेकिंग’ ग्रूप आहे. हेमंत फूटबॉल व कब्बडी हे खेळ ते शाळेत असल्यापासून खेळतात. त्यावेळी त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये शाळेला ‘प्रबोधन ट्रॉफी’ जिंकून दिली होती.

हेमंत रात्रीच्या जागरणानंतर सकाळी सहा ते दहा-साडेदहा पर्यंत झोपतात. त्यांचा दिवस सकाळी अकरा-साडेअकरा वाजता सुरू होतो. ते सकाळी पार्ल्यातील बांधकाम व्यावसायिकांची साइटला व्हिजिट वगैरे, अशी कामे करतात. ते लोक देतील तेवढा मोबदला निमूटपणे घेतात. वाढीव पैशांची मागणी करत नाहीत. जेव्हा त्या बिल्डर मंडळींना, हेमंत यांच्या समाजकार्याविषयी कळले, तेव्हापासून ते त्यांना अधिक पैसे देतात. हेमंत ते पैसे बरेच वेळा गरीबांना मदत म्हणून देऊन टाकतात.

‘कमी तेथे आम्ही’ हे ब्रिदवाक्य जपणारे हेमंत ‘लोकांना आनंद देणे हाच माझा आनंद’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय आहे असे सांगतात.

हेमंत यांच्या सामाजिक कामाविषयी ‘आम्ही पार्लेकर’ तसेच ‘अभूतपूर्व’ या पार्ल्यामधून निघणाऱ्या पत्रिकेत लेख प्रसिद्ध झाले आहेत. हेमंत यांचा ‘पार्ले कट्टा’ येथे २०१५ साली सत्कार केला गेला. ‘मराठी मित्र मंडळा’तर्फे होणाऱ्या ‘सिनियर सिटीझन्स डे’निमित्तच्या कार्यक्रमातही हेमंत यांचा गौरव करण्यात आला. त्याप्रमाणे ‘दिलासा’, ‘सोबती’ या सिनियर सिटिझन्सच्या संस्थांच्या कार्यक्रमातून हेमंत सावंत यांचे काम वाखाणण्यात आले आहे.

हेमंत यांचा मुलगा हर्ष ‘पार्ले टिळक’ शाळेच्या मराठी माध्यमात शिकत आहे. चुणचुणीत व हसतमुख हर्ष चार-पाच वर्षांचा असल्यापासून डान्स शिकत आहे. त्याने काही चित्रपट कलावंतांसोबत डान्स शोज केले आहेत. समाजसेवेचा वारसा अनुवंशिकतेने त्याच्यातही उतरला आहे. हर्षची समाजसेवा नव्या तंत्रज्ञानाच्या जमान्याप्रमाणे आहे. अनेक आजी-आजोबांकडे स्मार्ट फोन असतो. पण त्यांना तो कसा वापरायचा ते कळत नाही. असे आजी-आजोबा हर्षला मदतीसाठी बोलावतात. हर्ष सलग दहा/बारा दिवस, त्यांच्या घरी जाऊन त्यांना मोबाईल वापरासंबंधीत सर्व माहिती देतो, कॉम्प्युटर वापरायला शिकवतो, त्यासंदर्भातील त्यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवतो. हे सर्व तो स्वत:ची शाळा, अभ्यास सांभाळून करतो.

हेमंत यांना स्वत:च्या मालकीची अॅम्ब्युलन्स घ्यायची आहे. कारण त्यासाठी खूप लोकांकडून विचारणा होते. अनेक आजी-आजोबांना कधीतरी संध्याकाळी कारमधून फिरावेसे वाटते. त्यांच्याकडे पैसे असतात, पण सोबत नसते. त्यांना विश्वासू माणूस हवा असतो. मग अशा चार जणांना कारमधून जुहू चौपाटी, इस्कॉन टेम्पल किंवा ते म्हणतील त्या ठिकाणी फिरवून आणण्याची सावंत यांची योजना आहे. ट्रिपचे पैसे त्यांच्याकडून घ्यावेत, परंतु पेट्रोलचा खर्च वगळता उरलेले पैसे समाजसेवेसाठी वापरावेत अशी सावंत यांची इच्छा आहे.

हेमंत यांनी एक महत्त्वाकांक्षी योजना मनाशी तयार केली आहे. ती म्हणजे पुण्यात परांजपे यांच्या‘अथश्री’ या योजनेच्या धर्तीवर मुंबईत ‘मढ आयर्लंड’ येथे प्रकल्प उभा करायचा. हेमंत यांच्या परिचयाच्या एका सद्गृहस्थांची तेथे एकशेवीस एकर जागा आहे. ते त्यांपैकी वीस-पंचवीस एकर जागा हेमंत यांच्या प्रकल्पासाठी मोफत देण्यास तयार आहेत. तेथे ‘अथश्री’प्रमाणे ज्येष्ठ नागरिकांच्या निवासासाठी बांधकाम करायचे. पाच एकरमध्ये ओनरशीप फ्लॅट बांधायचे. गरीब ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन एकरांवर मोफत निवास, सोबत त्या संपूर्ण परिसरात रुग्णालय, ओपीडी इत्यादी सर्व सेवा असतील अशी ती कल्पना आहे. तेथे कॅश काउंटर नसेल, पण डोनेशन बॉक्स असेल. पॅगोडा सिस्टिमप्रमाणे ध्यानधारणेतून आजार बरे होऊ शकतात, त्यासाठी तेथे त्यासंबंधीचे मार्गदर्शनही मिळण्याची सोय करावी अशीही त्यांची इच्छा आहे. एक ज्ञानी व्यक्ती त्यासंदर्भात सर्व मदत करायला, शिकवायला तयार आहेत.

हेमंत यांच्या मोफत हेल्पलाईन सेवेमुळे पार्ल्यातील ज्येष्ठ नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. बहुतेक ज्येष्ठ नागरिकांची मुले, कामानिमित्त एकतर परदेशी किंवा भारतातील दुसर्याह शहरांमध्ये असतात. त्यांच्या व्यस्त व तणावपूर्ण जीवनशैलीमुळे, कित्येकांना त्यांच्या पालकांकडे इच्छा असूनही लक्ष देता येत नाही. तशा वृद्धांचा, हेमंत हाच मुलगा झाला आहे असे वाटते. ती ज्येष्ठ मंडळी हेमंतना मदतीसाठी हक्काने बोलावतात. हेमंतही त्यांना तितक्याच तत्परतेने, उत्साहाने, आत्मियतेने मदत करतात. हेमंत स्वत:च्या कृतीतून, सेवाभावातून ज्येष्ठांना, गरजूंना ‘मी तुमच्या पाठीशी आहे’ असा सतत दिलासा देत असतात.

साधारणत: व्यक्ती नागरिक या नात्याने त्यांच्याकडे चालून आलेली त्यांची स्वत:ची कर्तव्ये, जबाबदाऱ्या टाळताना दिसतात. अशा परिस्थितीत हेमंत सावंत यांच्यासारखी स्वत:चे कर्तव्य ओळखून इतरांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढे सरसावणारी व्यक्ती विशेष वाटते. त्यांच्या त्या उपक्रमातून व्यक्त होणारा चांगुलपणा महत्त्वाचा आहे.

हेमंत सावंत ९८६७ ७७११०३
(हेमंत सावंत यांचा मोबाइल क्रमांक हाच त्‍यांच्‍या हेल्‍पलाइनचा क्रमांक आहे.)

– पद्मा क-हाडे

About Post Author

4 COMMENTS

  1. हेमंत सावंत यांच्या कामा
    हेमंत सावंत यांच्या कामा बद्दल मनापासून अभिनंदन !

  2. समाजात अशी निस्वार्थ बुद्धीने
    समाजात अशी निस्वार्थ बुद्धीने काम करणारी माणसे खूप कमी आहेत. फारच छान! असेच काहीसे अनुभव मलाही येत असतात. मी हेमंत सावंत साहेबांएवढा मोठा नाही, पण तरी आपण आपले काम असेच अविरत सुरु ठेवा. तुमच्या कामात मी जर काही मदत करू शकलो तर मला नक्कीच आवडेल. तसा मला आदेश करावा. मी जरूर मदत करेन.

  3. सलाम.अस कार्य केलेल वाचण फारच
    सलाम. असे कार्य केलेले वाचणे फारच सोपे, पण असे काम करणे किती अवघड! सलाम.

Comments are closed.