ही कहाणी माणसाची, कारवारी मातीची!

0
40
_HiKhaniMansachi_KarvariMatichi_1.jpg

‘कारवारी माती’ ही वसंत नरहर फेणे या ज्येष्ठ लेखकाची ‘शेवटची कादंबरी‘. फेणे हे कथा, कादंबरी, नाटक असे विविध प्रकारचे लेखन अनेक दशकांपासून समर्थपणे करत आहेत, तरी ते प्रसिद्धीपासून कायम दूर राहिले. मात्र त्यांच्या कसदार लेखनाची ओळख खऱ्या वाचकाला आणि चोखंदळ समीक्षकांना पटली होती. फेणे यांचा ‘काना आणि मात्रा’सारखा कथासंग्रह किंवा त्यांची ‘सेंट्रल बसस्टेशन’सारखी कादंबरी ही दोन उदाहरणे घेतली तरी ते मराठी साहित्यविश्वातील प्रथम श्रेणीचे लेखक होते हे मान्य करावे लागेल.

‘कारवारी माती‘ ही पाचशेसत्त्याऐंशी पृष्ठांची आणि पाच दशकांचे समाजचित्र रेखाटणारी  बृहत कादंबरी म्हणजे त्या समर्थ लेखकाने उतारवयात सिद्ध केलेली आणि वयाची नव्वदी पार झाल्यावर प्रकाशित केलेली लक्षणीय साहित्यकृती आहे. ती कादंबरी केवळ पृष्ठ्संख्येने नव्हे तर कालपट आणि आशयसूत्र या दोन्ही दृष्टींनी व्यापक आहे. कादंबरीतील घटना विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात घडतात. तो कालखंडच विलक्षण घडामोडींचा आहे, राजकीय उलथापालथीचा आहे, सामाजिक स्थित्यंतराचा आहे, व्यापक आणि वैविध्यपूर्ण आहे. फेणे यांच्या लेखणीने त्या काळाला कथानकाच्या सूत्रात गुंफून ‘कारवारी माती’ला कादंबरीचा घाट प्राप्त करून दिला आहे.

इंग्लंडच्या राणीचे देहावसान 1901 साली झाले आणि सातव्या एडवर्डने शानदार राज्यारोहण केले. तेथपासून 15 ऑगस्ट 1947 चा भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन… असा हा फार मोठ्या स्थित्यंतराचा कालपट आहे. साम्राज्यवादाची माघार, लोकशाहीचा या देशातील उदय, दुसऱ्या महायुद्धाने ढवळून निघालेले जग, समाजजीवनातील वैचारिक घुसळण, निसटू लागलेली मूल्यव्यवस्था, सामाजिक सुधारणांसाठी उभ्या राहिलेल्या चळवळी, तीव्र होत गेलेले स्वातंत्र्याचे आंदोलन आणि अखेरीस प्राप्त झालेले स्वातंत्र्य यांनी भारून गेलेला तो काळ आहे.

तो काळ ही फेणे यांच्या कादंबरीची केवळ पार्श्वभूमी नाही तर तो त्या कादंबरीचा गाभा आहे. फेणे यांनी त्या काळाला साक्षी ठेवून कारवारच्या मातीतील एक कुटुंबकथा उभी केली आहे. कारवारच्या होन्नेकेरी पंचक्रोशीतील गणपतराय हिचकड या महत्त्वाकांक्षी परंतु अहंकारी माणसाची ती कुटुंबकथा अनेक वळसे आणि वळणे घेत तीन पिढ्यांपर्यंत पुढे जाते; मागील पिढ्यांचे जगण्याचे संदर्भ जागवत आणि त्यातील जातीबद्दलचा, घराण्याबद्दलचा फार मोठा अहंभाव मिरवत पुढे जाते. ही कथा उलगडत जाताना भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, परिसराचे व्यापक आणि प्रत्ययकारी दर्शन घडत असते. होन्नकेरी–कारवार–धारवाड-मुंबई-कलकत्ता–हरिद्वारपासून पार इंग्लंड–जर्मनी–जपान-रशिया येथवर फिरून येते. त्या काळाची विविध रूपे टिपत आणि एकूणच, जागतिक संदर्भापासून कारवारच्या छोट्याशा गावापर्यंत येते. एका छोट्या बिंदूपासून व्यापक परिघापर्यंत आणि तेथून पुन्हा त्या बिंदूकडे येणारी ती कुटुंबकथा विश्वाच्या पसाऱ्यात गुरफटलेल्या माणसाची कहाणी ठरते. माणूस कधीच एकटा नसतो आणि म्हणूनच हिंदुस्थानातील कुटुंबसंस्था, ग्रामव्यवस्था, जाति-व्यवस्था आणि अनुषंगाने स्त्रीशिक्षण, विधवांची स्थिती, धर्मजाणीव. राजकीय विचारसरणी, साम्यवाद, ब्राह्मोसमाज, प्रार्थनासमाज आदी संदर्भांतील विचारसरणी यांचाही त्या कथेशी संबंध येतो. तो या कादंबरीला समाजभानाचे परिमाण देऊन गेला आहे.

पारंपरिकता आणि आधुनिकता, गतानुगतिकता आणि रुढीभंजन, सनातनी आणि पुरोगामी  असे भारतीय समाजमनाचे परस्परविरोधी रंग ‘कारवारी माती’च्या कथानकात उमटत राहतात. देश फार मोठ्या राजकीय स्थित्यंतरातून जात असताना, स्वातंत्र्याची जोरकस मागणी करत असताना किंवा फुले-रानडे-आंबेडकर प्रभृतींच्या विचारधारांना परिचित झालेला असताना फार मोठा समाज परंपरेच्या जोखडात अडकून पडलेला असणे हा अंतर्विरोध फेणे यांनी यशस्वीपणे उभा केला आहे.

बाहेरच्या जगात सत्तांतरे होत असताना कारवारच्या घराघरातून मात्र सत्तेसाठी अहमहमिका चालली आहे. देशात स्वातंत्र्याचे आंदोलन भरात असताना कुटुंबा-कुटुंबांतून मात्र व्यक्तिस्वातंत्र्याला घट्ट वेसण बसली आहे. उच्च शिक्षणाने तरुणांच्या विचारांचे दरवाजे उघडले जात असताना व्यवहारात मात्र त्यांना अटकाव होत आहे. माणसा-माणसांत भावनिक गुंते आणि नातेसंबंधांचे धाक आहेत. म्हणूनच, कादंबरीतील बहुतेक व्यक्तिरेखा परिस्थतीशरण आहेत. कादंबरीत दबून राहणारी, मुकाट सोसणारी किंवा भरकटत गेलेली माणसे जागोजागी भेटतात.

_Vasant_Narhar_Phene_1.jpgशेतीतील ‘दासकोबू’चा महत्त्वाकांक्षी प्रयोग फसल्यावर कर्जबाजारी होऊन गावात हसे झालेला अहंकारी गणपतराय पलायनवादी भूमिका घेऊन देवभक्तीचे नाटक करतो. त्याच्या अपयशाला हसणारी माणसे त्याच्या दांभिकतेपुढे मात्र नतमस्तक होतात. गणपतराय पुढे परागंदा होतो, त्यामुळे गंगाबायच्या आयुष्याची परवड होते. ती सावरण्यासाठी आईच्या वाचनात अडकून गजामामाची ससेहोलपट होते. मथी आणि विद्याधर यांचे बालपण कोमेजून जाते.

‘कारवारी माती’त उमेदीच्या मनांच्या वैफल्याच्या कहाण्या स्पष्टपणे उमटलेल्या दिसतात. शोषणाची चित्रेही ठळकपणे दिसून येतात. मात्र त्या मांडणीत इतकी सहजता आहे, की  त्यामागच्या वेदना अधिकच तीव्रतेने जाणवतात. नपुंसक नवऱ्याशी गाठ बांधून दिली गेल्याने मोठ्या मावशीला आणि तिच्या सवतीला घेरून टाकणारी-पावलोपावली उभी असणारी संकटे, सांगून आलेल्या समवयस्क मथुराशी आपल्याच विधुर वयस्क बापाने लग्न केलेले पाहून उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या द्वारकाच्या उभ्या आयुष्याचे कडवट बनून जाणे अशी अनेक उदाहरणे आहेत. धर्मकल्पना आणि जातव्यवस्था निरागस जिवांच्या उभ्या आयुष्यात विष कालवण्यासाठी कशी वापरली जातात त्याची दोन ठळक उदाहरणे म्हणजे श्रीपतबाप्पांचे कोवळ्या मथीशी लग्न व्हावे म्हणून मठपतींच्या पुढाकाराने रचण्यात आलेले कपटकारस्थान आणि कोमारपंत समाजातील मुलाने ब्राह्मणांच्या बरोबरीने येऊ नये म्हणून त्या अत्यंत हुशार मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा शालेय पातळीवरच केलेला पद्धतशीर घात. फेणे यांनी आपला समाज आपल्याच माणसांशी सत्ता व संपत्ती यासाठी किती क्रूर वागू शकतो त्याचे भयावह चित्रच उभे केले आहे. फेणे दैनंदिन व्यवहारापासून जन्ममरणाच्या प्रसंगांपर्यंत स्त्री–पुरुष, उच्च–नीच, स्पृश्य–अस्पृश्य या भेदांचे विदारक सत्य कोणतेही भाष्य न करता प्रसंगचित्रणातून उभे करतात. देवाची वारी, मोठ्या मावशीचा मृत्यू, घरच्या कामकरी मंडळींशी होणारी देवाणघेवाण, सोवळ्या भिमामावशीचे हस्तक्षेप…

‘कारवारी माती’ या कादंबरीचे कथानक तृतीय पुरुषी निवेदन पद्धतीने पुढे सरकते. त्यातही कधी लेखक निवेदकाची स्वतंत्र भूमिका घेऊन जागतिक घडामोडींचा आढावा घेतो. गोपाळकृष्ण गोखले यांच्या भारत सेवक समाजापासून आईनस्टाइनच्या सापेक्षतावादाच्या शेवटच्या प्रबंधाच्या प्रसिद्धीपर्यंत, कार्ल मार्क्सच्या साम्यवादी विचारसरणीपासून गांधींच्या सत्याग्रहापर्यंत, इंग्लंडमधील सार्वत्रिक निवडणुकांपासून भारत-पाकिस्तान फाळणी पर्यंतच्या असंख्य घडामोडी निवेदनातून येतात. क्वचित भाष्य येते, मात्र कथानकाचा ओघ कोठेही खंडित होत नाही; उलट, कथानकाशी संबंधित जवळच्या –दूरच्या खुणा उमटत जातात. फेणे यांच्या शैलीची ती खुबी आहे. कादंबरीत सर्वत्र कारवारी बोलीच्या खुणाही  स्वाभाविकपणे आढळतात. फेणे यांनी त्याचे कंसात अर्थही दिले आहेत. त्या प्रयोगाने कादंबरीच्या प्रवाहीपणाला बाधा मात्र येत नाही.

महत्त्वाकांक्षी व अहंकारी गणपतराय आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा व बापाप्रमाणेच महत्त्वाकांक्षी असणारा विद्याधर हे रूढ अर्थाने त्या कादंबरीचे नायक आहेत. मात्र ते दोघेही त्या काळाच्या फेरानुसार आणि अहंकारी स्वभावामुळे भरकटत गेले आहेत. अर्थात वेगवेगळ्या प्रकारे. खरे तर, ती कहाणी केवळ त्या बापलेकांची ठरत नाही, ती त्या काळच्या अनेक तरुणांची ठरू शकते. ती कहाणी विद्याधरच्या बहिणीचीही असू शकते. अश्राप मथी, सोशिक पार्वतबाय ते सत्याग्रहाच्या चळवळीचा झेंडा उचलून तुरुंगवास भोगणारी माई येथवरील तिचा प्रवास हा व्यक्तिरेखेचा विकास दर्शवणारा आहे. तिची दोन्ही मुले-शांता आणि दिगंबर यांच्या भविष्याच्या काही सूचक खुणाही दिसून येतात. कादंबरीकाराला एका व्यापक समाजजीवनाचे चित्र वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमार्फत उभे करायचे आहे. अखेरीस उपसंहारात ते म्हणतात त्याप्रमाणे ‘ही कहाणी माणसाची…कारवारी मातीची’ आहे हेच खरे!

– सुरेखा सबनीस

Last Updated on 12th April 2018

About Post Author