हिंदकेसरी गणपत आंदळकर – महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्मपितामह

3
80

महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्म पितामह म्हणून ओळख असलेले हिंदकेसरी गणपत आंधळकर यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील कुस्ती पोरकी झाली आहे. लोक त्यांना आबा म्हणून हाक मारत. तीन बटणांचा चमकदार ढगळ कुर्ता, पांढरे-शुभ्र धोतर, पायात कोल्हापूरी पायताण आणि डोक्याला तुऱ्याचा सुंदर फेटा… अशा वेशात भारदस्त पिळदार मिशांच्या रुबाबाने तरुणांनाही लाजवेल असे तेजस्वी गोरेपान देखणे रूप, तब्बल सहा फूट उंचीचा, बुरुजबंध ताकदीचा आणि पहाडासारखा दिसणारा माणूस!

आबा मैदानात प्रमुख पाहुणे म्हणून दाखल झाले, की कुस्तीशौकिन मंडळींच्या नजरा त्यांच्याकडे वळायच्या. फडात सुरू असणार्‍या पैलवानांच्या लढती सोडून सर्वजण आबांकडे पाहत बसायचे. त्यांना त्यांच्या तेजस्वी बलदंड रूपात जणू प्रती हनुमान दिसायचा! मैदानात हलगी वाजायची, आबांचा हारतुऱ्यांनी सत्कार-सन्मान व्हायचा आणि आबा त्यांचे दोन्ही हात उंचावत कुस्तीशौकिनांना अभिवादन करायचे, की प्रेक्षकांमधून आबांच्या सन्मानार्थ टाळ्याचा कडकडाट व्हायचाच.

आबांच्या साथीला त्यांच्या सारखेच देखणे मल्ल हिंदकेसरी मारुती माने होते. त्या दोघांच्या महान जोडीला बरोबर पाहण्याची संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीशौकिनांना सवय झाली होती. त्या दोघांच्या उपस्थितीने कुस्तीच्या फडाला शोभा येई. युवा पैलवानांना त्या जोडीला पाहून कुस्ती लढण्याचा हुरूप यायचा. मारुती(भाऊ) माने काही वर्षापूर्वी निवर्तले आणि ती जोडी फुटली. त्यानंतर आबा एकटे मैदानात उपस्थित असायचे. त्यांना त्यांच्या सोबत मारुती माने नाहीत याची खंत असायची. आबा सांगली-जवळील पुणवत गावी 1935 ला गरीब शेतकरी कुटुंबात जन्मले, त्यांनी ऐन तारूण्यात मोलमजुरी करून काही दिवस काढले. आबा कुस्तीच्या ओढीने कोल्हापुरात दाखल झाले आणि थेट ऑलिम्पिकपर्यंत पोचले. आंदळकर आबांनी 1960 ला मानाचा हिंदकेसरी किताब पंजाबच्या खडकसिंग या मल्लाला अस्मान दाखवून पटकावला.

त्यांचा थक्क करणारा तो प्रवास जेव्हा-जेव्हा ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकर पुजारी यांच्या तोंडून ऐकायला मिळायचा तेव्हा आबांसाठी असणारा आदर आणखी वाढत असे.

आबांना मातीबरोबर मॅटवरील कुस्तीचे तंत्रही अवगत होते. त्यांनी 1962 च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत फ्रिस्टाईल आणि ग्रिको रोमन या दोन्ही प्रकारांत पदक मिळवून इतिहास रचला होता. त्यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये 1964 ला चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली. त्यांचा सन्मान त्याच वर्षी भारत सरकारने अर्जुनवीर पुरस्काराने केला. मल्लांनी पारंपरिक कुस्तीबरोबर आधुनिक कुस्तीही आत्मसात करावी, तरच ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जातील असा आबांचा आग्रह असायचा. कोल्हापूर या कुस्तीपंढरीचे ते पांडुरंगच जणू. गणपत आंधळकरांनी अनेक मल्लांना घडवले; त्यांच्यावर चांगला संस्कार केला. कुस्ती हा पारंपरिक ईर्षेचा खेळ, हा पैलवान त्या तालीम संघाचा, तो पैलवान त्या वस्तादांचा पठ्ठ्या अशी निकोपी ईर्षा, खुन्नस, प्रसंगी राजकारणही कुस्तीत असते, पण आबा त्या पलीकडे होते. त्यांना अखंड महाराष्ट्राची पैलवान पोरे शिष्य वाटायची. महाराष्ट्राच्याच नव्हे तर अगदी पंजाब-हरियाणाच्या कानाकोपऱ्यातून अनेक मल्लांनी कोल्हापूरच्या आखाड्यात येऊन आबांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले. ते सर्वांशी आस्थेने बोलायचे, मात्र कुस्तीच्या सरावात कोणालाही हयगय करू देत नव्हते, तसा त्यांचा आदरयुक्त दरारा होता.

आबांच्या कुस्तीप्रेमाला कशाचीही उपमा देता येणार नाही. ते वयाची ऐंशी वर्षे पार केल्यानंतरही पैलवानांचा सराव घेण्यासाठी, कुस्तीचे अस्सल तंत्र शिकवण्यासाठी कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीच्या आखाड्यात स्वतः हातात छडी घेऊन दररोज हजर असायचे. दिसण्यास धिप्पाड, रांगडी देह, पण मनाने मायाळू आणि हळवे. त्यांना पैलवान मुलांबद्दल फार आस्था होती. मुलगा त्यांचा आशीर्वाद घेण्यास कुस्तीच्या फडात आला, की ते मायेने त्याच्या पाठीवर हात फिरवत. प्रत्येक मल्लाच्या खांद्यावर हात टाकत त्याला जवळ करत. आबा मितभाषी होते, परंतु त्यांचा हास्य करणारा तेजस्वी चेहरा मल्लांना नवी ऊर्जा द्यायचा.

आबांची राजर्षी शाहू महाराजांवर अपार निष्ठा होती. त्यांची भावना शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला म्हणूनच कुस्ती टिकली आणि ते मोठ्ठे पैलवान होऊन तांबड्या मातीची सेवा करू शकले अशी होती. त्यांना कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तेव्हा आबांनी तो सन्मान ‘माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान’ असल्याचे उद्गार काढले होते. मी आबांची पैलवानी छबी टिपण्यासाठी छायाचित्रकारांची होणारी धडपड पाहिली आहे. छायाचित्रकार त्यांचा फोटो घेत आहे. ते पाहून आबा त्याच्याकडे पाहत. आणि चेहर्‍यावर हास्य आणत जरा ताठ, ऐटीत बसत. ते त्यांचा फोटो काढून झाल्यावर त्या फोटोग्राफरला हात जोडत व त्याचे आभार व्यक्त करत.

महाराष्ट्रामध्ये मॅटवरील कुस्ती आणण्यात आंदळकरांचा मोठा वाटा आहे. ‘महाराष्ट्रातील कुस्तीची परंपरा जपायची असेल तर गाव तेथे तालीम व मॅट असायला हवी आणि कुस्तीगारांनाही सरकारचा आश्रय मिळायला हवा’ असे ते सांगत. ते ज्या तालमीत कुस्ती शिकले, त्या मोतीबाग तालमीतच वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षापर्यंत ते कुस्ती प्रशिक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यात दादू चौगुले, चंद्रहार पाटील, युवराज पाटील, रामचंद्र सारंग, हिरामण बनकर, संभाजी पाटील, नंदू आबदार, बाला रफिक शेख यांचा समावेश आहे. यावर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब गतविजेत्या अभिजित कटकेवर मात करत बुलढाण्याच्या बाला रफिक शेखने पटकावला. तो सध्या पंचवीस वर्षांचा आहे. तो आंदळकर यांच्याकडे प्रशिक्षण तेरा-चौदा वर्षांपासून घेत होता. बाला रफिक 2017-18 साली महाराष्ट्र केसरी झाला. त्याने तो किताब आंदळकर यांना समर्पित केला आहे!

– मतीन शेख, 9730121246, matinshaikh717@gmail.com

(‘लोकसत्ता’ वरून उद्धृत, संपादित-संस्कारित, विस्तारित)

About Post Author

3 COMMENTS

  1. अखेरपर्यंत लाल मातीशी इमान…
    अखेरपर्यंत लाल मातीशी इमान राखलेला. मातीमय झालेला मल्ल…

Comments are closed.