एखाद्या गोष्टीची जनतेला जाहीरपणे माहिती देण्यासाठी पूर्वी दवंडीचा वापर केला जाई. लसीकरण मोहीम, गावातील यात्रा, जनजागरण मोहीम यांसारख्या विषयांबाबतीत नागरिकांना माहिती व्हावी या हेतूने गावागावात दवंडी देण्यात येत असे. त्या निमित्ताने लोक एकत्र येत, घडामोडीबाबत चर्चा करत, पण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ही पध्दत कालबाह्य झाली आहे. चावडीवरील गप्पा बंद झाल्या असून त्यांना दूरचित्रवाणीवरील चर्चांचे आणि इंटरनेटवरील सोशल नेटवर्किंगचे स्वरूप आले आहे. माहिती कळवण्यासाठी दवंडी देणे कमीपणाचे मानले जात आहे.
गावागावातील दवंडीचा आवाज केव्हाच बंद झाला असला तरी शिवडी, चुनाभट्टी आणि जीटीबी नगर या, मुंबईतील सहा किलोमीटर परिसरातल्या नागरिकांना दवंडीची गुंज नित्यनेमाने ऐकायला मिळते. दवंडीवाला आपल्या येण्याची वर्दी थाळीरूपी घंटा वाजवत देतो. त्याचे नाव हरिचंद भार्तुराम डिक्का. स्थानिक लोक त्याला ‘हरी घंटीवाला’ या नावाने ओळखतात. अठावन्न वर्षांचा हरी घंटीवाला जन्म, मृत्यू, शोकसभा, संमेलन, धार्मिक घडामोडी यांपासून ते वीज, पाणी, रस्ते, वाहतूक, आरोग्य आदी कोणत्याही विषयाची पण स्थानिकांशी संबंधित प्रत्येक बातमी तो लोकांपर्यंत पोचवतो.
त्याच्या येण्याची चाहूल लागताच स्थानिक एकत्र गोळा होतात. घंटानाद ऐकून बातमीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात आणि हरी घंटीवाला आपल्या पहाडी आवाजात काही वेळातच त्यांना घडामोडीची विस्तृत माहिती करून देतो. स्थानिकांमध्ये त्या संदर्भात चर्चा रंगू लागते, पण तो मात्र आपले काम पूर्ण करण्याकरता अरुंद चाळींतून वाट काढत पुढे निघून जातो.
शिवडी, चुनाभट्टी आणि जीटीबी नगर या सुमारे सहा किलोमीटर परिसरात शंभर चाळी असून प्रत्येक चाळीतील खोल्यांची संख्या सरासरी वीस इतकी आहे. आपल्या विभागात नेमके काय चालले आहे हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाला असते, पण घड्याळाच्या काट्यावर धावणार्या मुंबईकरांना तितका वेळ नसतो. अशा वेळी घरी बसून आपल्या विभागातील अप टू डेट माहिती सविस्तररीत्या पोचवण्याचे काम हरिचंद गेली कित्येक वर्षे न चुकता करत आहे. विभागात एखादे नवे एटीएम सुरू झाले, कोणी नवीन दुकान किंवा हॉटेल सुरू केले, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले, विशिष्ट गल्लीबोळात रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे, नवीन बस स्टॉपचे उद्घाटन, लोडशेडिंग अशा स्थानिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या बातम्या तो पुरवतो.
हरी घंटीवालाची बातमी देण्याची विशिष्ट पद्धत आहे. एखादी आनंदाची बातमी सांगायची असल्यास तो पाच ते सहा वेळा घंटा वाजवतो. गुरुद्वारा संबंधित बातमी असल्यास तो आठ ते नऊ वेळा तर एखादी दुःखद घटना घडली असल्यास तो तीन वेळा घंटा वाजवतो. बातमी देणे हाच आपला व्यवसाय असून आपले वडीलही दवंडी पिटून बातम्या सांगायचे. त्यांचीच परंपरा पुढे चालू ठेवत असल्याचे तो सांगतो. जनहिताच्या बातम्या हरी घंटीवाला स्वतः देतो, पण कोणी मुद्दाम विशिष्ट बातमी द्यायला सांगितल्यास त्यांच्याकडून फी घेऊनच तो बातमी सांगतो.प्रामुख्याने कौटुंबिक आणि व्यावसायिक जाहिरातबाजी करणार्या बातम्यांकरता तो पैसे घेतो.बाकीच्या बातम्या एकही पैसा न घेता लोकांना निष्ठेने सांगतो.हरी घंटीवाला मृत्यूच्या बातमीसाठी साडेतीनशे रूपये घेतो. तरीही महागाईच्या काळात त्याच्याकडून आकारला जाणारा दर बराच कमी आहे. तसेच त्याने दिलेली बातमी स्थानिक लोकांपर्यंत पोचण्याची शाश्वतीही असते.
चोहीकडे वर्तमानपत्रांचे पेव फुटलेले असताना आणि ब्रेकिंग न्यूजचा भडिमार आपल्यावर होत असताना देखील हरी घंटीवाला आपले वेगळेपण जपून आहे. त्यानेही आपल्यात बदलत्या काळासोबत काही बदल घडवून आणले आहेत. पाच वर्षांपूर्वी लोक त्याच्या घरी येऊन त्याला बातम्या देत असत. पण आता त्याने आपले व्हिझिटिंग कार्ड छापले असून तो मोबाईलवरच बातम्या संकलित करतो.
माहिती स्रोत: Mumbai Mirror.
सचिन कुळये- भ्रमणध्वनी :- 9867036368 इमेल:- sachinkulaye@gmail.com