हरीश सदानी – स्त्रीवादी पुरुष!

6
42

पुरुषार्थाची नवी व्याख्या सांगताना हरीश सदानी मी आकाशवाणीतील  कामाचा भाग म्हणून निराळे काही काम करणारी माणसे शोधायची आणि त्यांच्या कामांना लोकांपर्यंत पोचवायचे असे करत असे. त्या क्रमात हरीश भेटला. हरीश सदानी. ‘मावा’ नावाच्या संस्थेचा सूत्रधार. संस्थेच्या नावातच कामाचे, कामामागच्या विचारांचे वेगळेपण आहे. ‘मावा’ म्हणजे ‘मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अॅण्ड अॅब्युज’- शारीरिक आणि मानसिक हिंसेच्या विरोधात असलेले पुरुष. पुरुषांची चौकटबद्ध प्रतिमा म्हणजे शारीरिक ताकदीच्या आणि परंपरेने मिळालेल्या श्रेष्ठत्वाच्या जोरावर स्त्रियांचे दमन करणारे अशी. त्या प्रतिमेला पूर्णपणे छेद देत चक्क हिंसेच्या विरोधात आघाडी उभारणारे ते ‘मावा’चे पुरुष. आणि त्या कामाचा सूत्रधार हरीश.

हरीश सदानीच्या कामाची एका वाक्यात नोंद करायची तर त्याने स्त्रियांच्या चळवळीला व्यापक विचार करण्यास भाग पाडले, स्त्री-संघटनांनी पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी काम करण्याची, पुरुषांबरोबर संवाद करण्याची गरज आहे हे  ठसवले.
हरीशलाही ते काम सोपे नव्हते. त्याने स्वत:च्या घरातसुद्धा जेव्हा जेव्हा स्त्रियांची बाजू घेण्याचा, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा ‘बायल्या’सारख्या विशेषणांनी त्याची संभावना झाली होती. पुढे व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता झाल्यावर, त्याने आपले मुद्दे पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पुरुषांबरोबर वेगळे काम करण्याची गरज काय, असा प्रश्न त्याला स्त्री-संघटनांकडूनदेखील विचारला गेला.

स्त्रीवादी पुरुषांचा प्रतिनिधी हरीश सदानी महिलांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी त्या समस्येच्या मुळांवरच घाव घातला पाहिजे. म्हणजे पुरुषी मानसिकता बदलली पाहिजे! ते काम करताना आम्हाला पुरुषप्रधान व्यवस्थेशी टक्कर द्यावी लागत आहे. ते आव्हानात्मक काम आहे. अनेकांना त्या कामाचे महत्त्व पटतच नाही. सुरुवातीला आमच्याकडे संदिग्धपणे पाहिले जायचे; आमच्या कामाची अवहेलना, टीका केली जायची.”

स्त्रियांवर होणार्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवावा, असे ज्या पुरुषांना वाटते त्यांनी पुढे यावे, या हरीशच्या वर्तमानपत्रातल्या आवाहनाने त्याला पुढची वाट सापडली. प्रतिसाद देणा-या दोनशेपाच पुरुषांपैकी हरीशसह नव्वद मुंबईतील होते. त्यातील एका गटाने ‘मावा’ला आकार दिला. चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आणि राजीव कालेलकर यांनी ‘मावा’ची वैचारिक बैठक पक्की करण्यास मदत केली.

पुरुषांच्या परंपरागत भूमिकेशी विद्रोह करत स्त्री-पुरुष समानतेची चळवळ सुरू करण्याचे आणि ती रुजवण्याचे काम करणारे काही पुरुष महाराष्ट्रात आणि  बंगालात झाले. महात्मा फुले हे त्यांतील पहिले नाव. ज्योतीरावांनी समानतेच्या मूल्यावर आधारलेली आख्खी संस्कृतीच महाराष्ट्राला व पर्यायाने भारताला देऊ केली. आपल्याकडे १९७५ नंतर जोर धरला तो पाश्चिमात्य स्त्री-वादाच्या प्रभावाने स्त्रियांच्या चळवळींनी. स्त्री- चळवळींमध्ये समानतेचे मूल्य मानणाऱ्या काही सुजाण पुरुषांचा सक्रिय सहभाग राहिला. तरीही स्त्रियांचे प्रश्न मांडले जात होते, मुख्यत: स्त्रियांकडून. त्यामुळे प्रश्नांची आणि उत्तरांचीही मांडणी स्त्रीसापेक्ष होत राहिली. ‘स्त्रीवादा’चा म्हणून एक चष्मा हळुहळू तयार होत गेला. ते स्त्री चळवळीसाठी घातक होते. सर्वसामान्य पुरुषवर्ग स्त्री-चळवळीपासून अंतर राखून होता. हरीशला काम करण्यासाठी तेथे स्वत:ची जागा सापडली. तो काळ १९९० नंतरचा.

स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे तरुण-तरुणी हरीश सांगतो, की प्रत्येक स्त्री संघटना ही एखादे बेट असल्यासारखे मला वाटायचे. त्या संघटनांचे प्रयत्न स्त्रियांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी होते. पण पुरुषांवर त्या संदर्भात जाणीवपूर्वक काहीच काम केले जात नसे. स्त्री-अत्याचाराच्या काही प्रकरणांमध्ये वा एकूण स्त्री- समस्यांवर उपाय म्हणून संघर्षाचा आधार घेतला जाई, उदाहरणार्थ निषेध, धरणे, काळे फासणे, बहिष्कृत करणे, अद्दल घडवण्याची भाषा करणे वगैरे. अत्याचारित, अगतिक स्त्रीला अशी भूमिका घ्यावीशी वाटणे समजू शकते, पण पुरुष शोषक आणि स्त्रिया गरीब-बिच्चा-या अशी सरसकट मांडणी करणे, तेही पुरुषांची मनोभूमिका, त्यांची जीवन व कार्यपद्धत समजून न घेता, हे बरोबर नव्हते. अशा भूमिकेमुळे स्त्री-चळवळीविषयी आस्था असणारे वा समानतेचे मूल्य मानणारे पुरुषदेखील स्त्रियांच्या कामापासून दुरावत चालले होते. ‘मावा’ने अशा पुरुषांशी संवाद करून त्यांना कार्यप्रवृत्त केले. त्यांचा आवाज स्त्री चळवळीपर्यंत पोचवला. कारण सर्व समाजाची साथ मिळाल्याशिवाय स्त्री-पुरुष समानतेची चळवळ पुढे जाणार कशी होती?

समानतेसाठीच्या चळवळीत नवे पुरुष, विशेषत: तरुण मुलगे जोडले जावेत यासाठी पुरुषांची फौज वाढवण्याकरता पुरुषांना निराळा अवकाश (स्पेस) मिळावा यासाठी प्रयत्न करणे. ‘मावा’ने समानतेच्या चळवळीची ‘मालकी’ ही पुरुषांनी घ्यावी आणि सुजाण माणूस होण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू करावे यासाठी अनेक उपक्रम केले आहेत.
युवा मैत्री हा अलिकडचा वैशिष्टयपूर्ण उपक्रम. महाराष्ट्रातील शंभर तरुण मुलांना माणुसकीची वाट दाखवणारा!

'युवा मैत्री'तील संवादक किशोरवयीन मुलांशी संवाद साधताना ‘युवा मैत्री’ उपक्रमाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील सहा महाविद्यालयांमध्ये तरुणांशी सशक्त संवाद साधण्याचा प्रयोग २००६ साली पहिल्यांदा करण्यात आला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत तेहतीस तरुण ‘संवादक’ म्हणून त्या उपक्रमात सहभागी झाले. त्यानंतर उपक्रमाची व्याप्ती मुंबई, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये वाढली. तो मुंबईमध्ये ‘युवा संवाद’ या नावाने तर कोल्हापूरमध्ये ‘मानुष’ नावाने चालवला जात असे. विशी-पंचविशीतील तरुण ‘संवादक’ त्यांना समवयीन मुलांशी सशक्त संवाद साधतात. त्याशिवाय गटचर्चा, गाणी, पथनाट्ये, भित्तिपत्रके यांच्या माध्यमातून किशोरवयीन, तरुण विद्यार्थ्यांमध्ये ‘जेंडर’ या विषयाबाबत संवेदनशीलता जागवली जाते. मुलीसुद्धा त्या संवादात सहभागी होऊ लागल्या. व्याप्ती वाढल्यामुळे इतर स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये विद्यापीठे त्यात सहभागी झाली. चारशेहून अधिक पुरुष संवादक तयार झाले असून गेल्या सात वर्षांत साठ हजार किशोरवयीन मुले आणि तरुणांपर्यंत ते पोचले आहेत. संवादक तरुणांमध्ये या उपक्रमातून रुजलेली मूल्ये म्हणजे त्यांच्या आयुष्याचा स्त्री-पुरुष समानता हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ते त्यांच्या घरांतील महिलांच्या बाजूने ठामपणे उभे राहतात. जेजुरीतील एका मुलाने स्वत:च्या गावतील महिलांच्या आरोग्यासाठी काम सुरू केले आहे.

‘युवा मैत्री’मधील शंभरातील एक गणेश फुले. महात्मा फुले यांच्या खानवली गावचाच, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तो सांगतो, ‘आम्हाला दोन्ही बाजूंनी प्रश्न पडतात. आम्हा मुलांना पुरुषांसाठीच्या नियमांचाही त्रास होतो. आम्हीच केस बारीक का ठेवायचे? वाढवायचे का नाहीत? आणि घरात माझ्या बहिणींसाठी संध्याकाळच्या आत घरी परतण्याचा दंडक का? मुलींनी शर्ट-पँट घालणे आणि मुलग्यांनी कानांतील घालणे हे वरवरचे झाले. स्त्रिया आणि पुरुष, दोघांनीही घरात बाहेर जोडीने विश्वास आणि आदर ठेवून काम करणे व्हायला हवे. सर्व क्षेत्रांत मुली मोठ्या संख्येने चमकत आहेत, मेरिटमध्ये येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर मुलांना अस्वस्थ, असुरक्षित वाटते. याचा अर्थ स्त्रियांनी मागे राहावे असे मुलांना वाटते का? तर तसेही नाही. पण स्त्रियांच्या पुढे येण्याने त्यांच्यात न्यूनगंडही तयार होऊ नये. स्त्री आणि पुरुष हे एकमेकांचे स्पर्धक नसून ते जोडीदार आहेत याचे नीट भान त्या दोघांनाही येणे गरजेचे आहे. ‘मावा’ हे काम करू शकते, असा विश्वास गणेशसारख्या तरुणांना वाटणे हेच हरीश सदानी यांच्या कामाचे यश आहे.

संस्थेने चौदा वर्षावरील तरुणांसाठी युवा मैत्री हेल्पलाईन सुरू केली आहे. त्या वयात भेडसावणा-या लैंगिक समस्यांबाबत, प्रश्नांबाबत ‘बिनधास्त बोला आणि मोकळे व्हा’ अशी या हेल्पलाईनमागची कल्पना आहे. संस्थेचे प्रशिक्षित कार्यकर्ते तरुण आणि तरुणी यांचे विवाहपूर्व समुपदेशन करतात. संस्थेतर्फे मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे देणा-या शिबिरांचे आयोजनही केले जाते. ‘मावा’ आणि ‘पुरुष उवाच’ या संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून ‘पुरुषस्पंदनं – माणूसपणाच्या वाटेवरची’ हे नियतकालिक प्रकाशित केले जाते.

महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार स्वीकारताना हरीश सदानी आणि ‘मावा’ यांच्या या कार्याची दखल देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली. अमेरिकेतील ‘अशोका चेंजमेकर’ संस्थेने महिलांवरील हिंसाचाराविरुद्ध काम करणा-या संस्थांच्या प्रवेशिका मागवल्या होत्या. त्यासाठी आलेल्या एकशेपंचावन्न प्रवेशिकांमधून ‘युवा मैत्री’ उपक्रमाची विजेता म्हणून निवड करण्यात आली. त्या उपक्रमाला विजेता म्हणून पाच हजार अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार मिळाला. तसेच, महाराष्ट्र फाउंडेशनने हरीशला २०१० मध्ये  सन्मानित केले. हरीशला २०१०-११चा राष्ट्रीय स्तरावरील कर्मवीर पुरस्कारही देण्यात आला होता, तर २०१४ साली ‘आयबीएन लोकमत’ वृत्‍तवाहिनीकडून ‘मुक्‍ता सन्‍मान’ (विशेष विभाग) पुरस्‍काराने त्‍याला गौरवण्‍यात आले. भारत सरकारच्या संकेतस्थळावर युवा मैत्री उपक्रम आदर्श उपक्रम (बेस्ट प्रॅक्टिस) म्हणून नोंदवण्यात आला आहे. त्याचा केस स्टडी देशभरातील नोकरशहा पाहत असतात. परंतु ते मॉडेल देशाच्या अन्य भागात राबवण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत अशी खंत हरीश व्यक्त करतो.

अर्धे आकाश स्त्रियांचे असले तरी जगाचे नागरिक होऊ पाहणा-या स्त्री-पुरुष, दोघांनाही जोडीने भरा-या घेण्यासाठी पूर्ण आकाश मोकळे आहे. त्यांना त्या भरा-या घेण्यासाठी भान आणि बळ देण्याचा हरीश सदानी यांचा प्रयत्न आहे. पुरोगामी महाराष्ट्रात ‘सावित्रींच्या लेकीं’प्रमाणेच ‘ज्योतिबांची लेकरे’ही निर्माण व्हावीत या भावनेतून त्याचे कार्य सुरू आहे.

मेधा कुळकर्णी
इमेल kulmedha@gmail.com

MAVA’s Counseling, Guidance and Resource Centre
रुम क्रं. ४, तळमजला, नित्यानंद म्युन्सिपलस्कूल,
गरवारे कंपनीसमोर, सहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०६९
(युवा मैत्री हेल्पलाईन – ०२२- २६८२६०६२)

हरीश सदानी
मोबाईल ९८७०३०७७४८
इमेल harsh267@rediffmail.com
www.mavaindia.org

(दै. सकाळ ९ जून २०१० अंकातील लेख संपादीत आणि सुधारीत स्वरूपात )

Last Updated On – 3rd May 2016

About Post Author

6 COMMENTS

  1. हरिशसर
    खूपच छान उपक्रम

    हरिशसर
    खूपच छान उपक्रम

Comments are closed.