हरमेन्यूटिक्सचे शास्त्र

15
70

भाष्यकारांते वाट पुसतू…

     मथितार्थ म्हणजे ‘मंथन’ करून काढलेला अर्थ. कसले मंथन? रवीने ताक घुसळून लोणी काढतात, तशी डोक्यामधल्या विचारांची घुसळण करून आणि ती करताना बुद्धीचा उपयोग करून काढलेला बुद्धिगम्य अर्थ म्हणजे मथितार्थ होय.

     मथितार्थ काढायचे शास्त्र आहे. आधुनिक काळाला या शास्त्राला ‘हरमेन्यूटिक्स’ असे म्हणतात.

     हरमेन्यूटिक्स हा शब्द ग्रीक तत्त्वज्ञानामधून आला आहे. ग्रीक पुराणांमधे हरमिस नावाच्या देवदूताचे वर्णन आहे. हा देवदूत देव आणि मानव यांच्यामधला दुवा आहे. हरमिस ईश्वराबद्दलचे ज्ञान मानवापर्यंत आणून पोचवणे आणि त्याचा अर्थ सांगणे हे काम करतो.

       ग्रीक तत्त्ववेत्ता अरिस्टॉटल याने हा शब्द सर्वप्रथम वापरला. त्याने या विषयावर लहानसे पुस्तकही लिहिले. त्याच्या मते, लिहिलेले शब्द ही बोलीभाषेतल्या शब्दांची सूचके (अ‍ॅब्स्ट्रॅक्शन) असतात आणि बोलीभाषेतले शब्द म्हणजे आपल्या अंतर्मनामधून आलेली सूचके असतात. त्यानुसार या शब्दाकरता विशिष्ट अशी अर्थनमीमांसा बनवली गेली. तिचा मूळ उद्देश बायबलचे अर्थन करणे हा होता. तेव्हापासून हरमेन्यूटिक्स हे बिब्लिकल हरमेन्यूटिक्स या अर्थाने ओळखले जाऊ लागले.

     नंतरच्या काळामधे हरमेन्यूटिक्स शब्दाचा अर्थ व्यापक होत गेला. त्याच्यामधे संस्कृती म्हणजे काय, इथपासून वागावे कसे इथपर्यंत अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा व त्यांतल्या अर्थांचा समावेश केला गेला.

     श्लायरमाखर नावाच्या तत्त्वज्ञाने हे अर्थनशास्त्र सर्व प्रकारच्या ग्रंथांचा अर्थ लावण्याकरता वापरायला सुरुवात केली. त्याने अर्थनमीमांसेचा संबंध मूलभूत ‘आकलन’ या अनुभवाशी जोडला आणि म्हटले, की अर्थनशास्त्र हे १. व्याकरणाच्या संदर्भातले अर्थन आणि २. मन-बुद्धी यांच्या साहाय्याने होणारे आकलन या दोन्हींच्या वर आधारलेले असायला हवे. श्लायरमाखऱच्या मते, कुठल्याही लेखनाचे अर्थन करताना ते कुणी लिहिले, का लिहिले, कोणत्या संदर्भात लिहिले आणि ते वाचल्यावर वाचकाच्या मनावर त्या लेखनाचा काय परिणाम होतो, या सर्वांचा विचार त्याचे अर्थन करताना करायला हवा.

     डिल्थी नावाच्या तत्त्वज्ञाने श्लायरमाखरच्या भूमिकेचा विस्तार केला. त्याने म्हटले, की कुठल्याही लेखनाचे अर्थन करण्यापूर्वी त्या लेखनाचा संदर्भ शोधायला हवा आणि असा संदर्भ शोधताना त्या संदर्भाला इतिहासाची जोडदेखील द्यायला हवी. याचे स्पष्टीकरण डिल्थीने असे सांगितले, की काही गोष्टी विशिष्ट प्रकारे लिहिल्या जातात, कारण त्या काळची ऐतिहासिक परिस्थिती तशा विशिष्ट प्रकारची असते म्हणूनच होय. डिल्थीने अर्थनाचे अधिक व्यापक असे शास्त्रज्ञ बनवले. त्याकरता त्याने अनुभव, अनुभवाचे प्रकटीकरण (आर्टिक्युलेशन) आणि त्यातून उत्पन्न होणारी समज (कॉम्प्रिहेन्शन) अशा तीन गोष्टी एकमेकांत गुंफणारे सूत्र मांडले.

     त्यानंतर मार्टिन हायडेग्गर आणि हान्स गाडामर यांनी हरमेन्यूटिक्सच्या शास्त्राला वेगळे वळण दिले. हायडेग्गरने त्याच्या अस्तित्ववादाच्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर नवे हरमेन्यूटिक्स बनवले आणि गाडामरने त्यात भर घातली. गाडामरचे म्हणणे असे, की प्रत्येक व्यक्तीचे आकलन हे त्या व्यक्तीचे समाजातले स्थान आणि त्या व्यक्तीचा आयुष्यातला अनुभव यांच्यावर अवलंबून असते. म्हणूनच एखादी कविता किंवा एखादे पुस्तक जेव्हा दोन वेगवेगळ्या व्यक्ती वाचतात, तेव्हा त्यांतली प्रत्येक व्यक्ती जे वाटले त्याचा अर्थ आपापल्या परीने आणि आपापल्या अनुभवाच्या आधारावर वेगवेगळा लावत असते.

     हरमेन्यूटिक्समधे अलिकडच्या काळात घातलेली भर म्हणजे पॉल रिकरने मांडलेले तत्त्वज्ञान होय. रिकरने अर्थनशास्त्राला ‘समीक्षा’ या प्रकाराची जोड दिली.

     अर्थनशास्त्रातील विकासाचा आढावा आणि आधार घेऊन हिदू धर्मग्रंथांचे योग्य असे अर्थन करण्याकरता प्रयत्‍न व्हायला हवा. याकरता नवे ‘हिन्दू हरमेन्यूटिक्स’ बनवावे लागेल. अशा नव्या अर्थनशास्त्राचा उपयोग वेदवाङ्‌मय आणि पुराणे यांचे योग्य अर्थन करण्याकरता करू शकतो.

     या बाबतीतला माझा अनुभव असा, की पुराणांचे अर्थन करताना त्यांना इतिहासपूर्व प्रागैतिहासाची जोड द्यावी लागते. डिल्थी याने पाश्चात्य तत्त्वज्ञानात जे केले नेमका तोच प्रकार पुराणांचे अर्थन करण्याच्या बाबतीत लागू पडतो. तसेच, वेदवाङ्‌मयाचे अर्थन करताना त्यामधल्या अनेक शब्दांना असलेले विविध अर्थ ध्यानात घ्यावे लागतात. वेदवाङ्‌मयामधे एकच शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थांनी वापरला गेल्याची उदाहरणे अनेक आहेत. प्रत्येक ठिकाणी गाडामर याने म्हटल्याप्रमाणे संदर्भ काय? हेतू काय? त्यापाठीमागचा अनुभव काय? अशा अनेक बाबींचा विचार करावाच लागतो.

     हरमेन्यूटिक्स या शास्त्राच्या आधारे केलेले हिंदू धर्मग्रंथांबाबतचे संशोधन हे इण्डॉलॉजी या क्षेत्रामधे मोडते. या प्रकारचे संशोधन करताना पाश्चात्य विद्वानांनी पूर्वी या बाबतीत केलेल्या प्रचंड संशोधनाचा आधार घेऊनच पुढे जावे लागणार आहे.

     इण्डॉलॉजी हा अमेरिकेतल्या संस्कृतीविषयक संशोधनाच्या क्षेत्रातला एक विषय आहे. अनेक मोठ्या अमेरिकन विद्यापीठांमध्ये ‘साउथ एशिया स्टडीज्’ नावाचा स्वतंत्र विभाग असतो. त्यातल्या अभ्यासक्रमांमधे संपूर्ण दक्षिण आशियाचा म्हणजे इराणपासून अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, बांगला देश, ते म्यानमारपर्यंत असा सर्व प्रदेशाचा विचार, अभ्यास व त्यावरचे संशोधन असे सर्व केले जाते. भारत हा या सर्व प्रदेशाचा केंद्रबिंदू मानला जातो व म्हणून या अभ्यास व संशोधनामधे भारतीय संस्कृतीला प्राधान्य दिले जाते.

     इण्डॉलॉजीचा अभ्यास म्हणजे भारतीय संस्कृतीचा अभ्यास. प्राचीन संस्कृतीवर भर दिल्याकारणाने त्यात संस्कृत भाषेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. पण निव्वळ भाषेच्या व्यतिरिक्त धर्म आणि धार्मिक उपासनांचे विविध प्रकार, सामाजिक व्यवस्था व तिची जडणघडण, अर्थशास्त्रीय मीमांसा, प्रागैतिहासिक व ऐतिहासिक दृष्टिकोन अशा इतरही अनेक बाबी लक्षात घेतल्या जातात.

     इण्डॉलॉजी या विषयाचे मूळ सुमारे दीडशे वर्षांपूर्वी युरोपीयन विद्वानांनी केलेल्या संशोधनकार्यामधे सापडते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीपासून इण्डॉलॉजी हा स्वतंत्र विषय मानला जाऊ लागला. पण त्याचा पाया अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात विल्यम जोन्स, कोलब्रूक, श्लेगेल या पाश्चात्य विद्वानांनी घातलेला होता. त्यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धामधे मॅक्सम्यूल्लर आणि ओल्डेनबुर्ग यांनी वेदवाङ्‌मयावर संशोधन करून वेदवाङ्‌मयाचे अर्थन केले. त्यामुळे इण्डॉलॉजी या विषयाला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांच्या बरोबरीनेच विल्सन, कनिंगहॅम, वेबर, ग्रिफिथ, ब्युहलर, व्हिन्सेन्ट स्मिथ, हर्मान जॅकोबी, मॅक्डॉनेल, ब्लूमफिल्ड, विण्टरनिट्झ, कीथ या आणि आणखी इतर अनेक विद्वानांनी इण्डॉलॉजी या विषयामधे बहुमोल लेखन करून त्यात भर घातली. या पाश्चात्य विद्वानांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या व त्यामधे अग्रेसर असलेल्या भारतीय विद्वानांची देखील, विसावे शतक उजाडताना साथ लाभली. त्यामधली लोकमान्य टिळक, नीलकंठ शास्त्री, भाण्डारकर, तेलंग ही काही प्रमुख नावे. काळाची वाटचाल विसाव्या शतकाच्या मध्याकडे चालू असताना, तीच परंपरा त्यानंतर पां. वा. काणे यांच्यासारख्या इतर भारतीय विद्वानांनी पुढे चालवली.

     इण्डॉलॉजी या विषयाच्या जडणघडणीमधे महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल सर्व पाश्चात्य विद्वानांचे ऋण आपण अगत्याने मानायला हवे. कारण हिंदू धर्मग्रंथांचा आधुनिक प्रकारे अभ्यास, अर्थन व त्यांच्या वरचे संशोधन, या सर्वांची परंपरा पाश्चात्य विद्वानांनी सुरू केली.

     ज्ञानेश्वरीमधे ज्ञानेश्वर म्हणतात, ‘भाष्यकारांते वाट पुसतू’. इण्डॉलॉजीच्या बाबतीत पाश्चात्य विद्वान हेच भाष्यकार आहेत. त्यांना वाट विचारून, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने पुढे जाऊन आणि त्यांनी घालून दिलेल्या पायावरच आपल्याला भविष्यकाळातल्या इण्डॉलॉजीची इमारत उभारायची आहे.

अनिलकुमार भाटे

निवृत्त प्राध्यापक
विद्युत अभियांत्रिकी,

संगणक विज्ञान, माहिती तंत्रविज्ञान आणि मॅनेजमेन्ट
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका
ईमेल : anilbhatel@hotmail.com

About Post Author

15 COMMENTS

  1. हरमेन्यूटिक्सचे शास्त्र
    लेखकाने ह्या विषयाची चांगली ओळख करून दिली आहे. मला दोन मुद्दे मांडायचे आहेत. मी स्वतः संगणक तंत्रज्ञ आहे आणि भारतविद्या( इण्डॉलॉजी) मध्ये पदव्युत्तर आहे. पहिला मुद्दा असा कि हरमेन्यूटिक्सचे शास्त्र हे भारतात मीमांसा दर्शन ह्या रूपात प्रसिद्ध आहे, त्याचाही विचार करावा लागेल. दुसरा मुद्दा असा कि भारतविद्या हा विषय जरी युरोपियनांनी जरी सुरु केला असला तरी, त्यातील बरेच विषय आपल्याकडे आधीपासून शिकवले आणि शिकले जात होते, त्यामुळे त्यांनीच घातलेल्या मार्गावरूनच या पुढेही गेले पाहिजे असेही काही नाही. याउलट, भारतविद्या शाखेतील कित्येक विषयात अभ्यास करणारे हे अगदी स्वतंत्ररित्या संशोधन करत आहेत. मी स्वतः न्यायदर्शन आणि संगणक याची सांगड घालण्याचा खटाटोप करत आहे. मूळ मुद्दा असा आहे, कि भारतीय परंपरेतील ह्या विद्याशाखांचा उपयोग तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवण्यास मदत होते आहे.

Comments are closed.