स्वीडीश हरित पक्षात मराठी नीला विखे पाटील

0
33
_Sweedish_HaritPakshat_NilaVikhepatil_1.jpg

ग्रीन पार्टी (हरित पक्ष) हा एक छोटासा राजकीय पक्ष स्वीडनमध्ये पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत होता. त्याचे संसदेत हाताच्या बोटावर मोजण्याइतके खासदार होते. भारतीय वंशाची विद्यार्थिनी नीला त्या पक्षात कार्यरत होती. ती ‘गॉथेनबर्ग विद्यापीठा’त शिकत होती. पर्यावरणाचे संवर्धन झाले नाही तर अवघे विश्व धोक्यात येईल, याची जाण तिला होती. माणसांनी पाणी-जमीन-हवा या, निसर्गातील विविध अंगांचे रक्षण केले पाहिजे अशी तळमळ तिला होती. ती तळमळ व्यक्त करण्यासाठी नीला ‘हरित पक्षा’ची सभासद झाली होती. नीलाचे भारतातील कुटुंब म्हणजे प्रवरानगरचे विखे पाटील घराणे. त्यांचा भारतातील राजकारणाशी जवळचा संबंध; परंतु भारतातील राजकारण सत्ताकेंद्रित असते. स्वीडनमधील हरित पक्षाचे राजकारण मूल्यांवर आधारित आहे; त्यामुळे भारतातील राजकारणाशी ओळख असणे हे काही नीलाला फायदेशीर नव्हते. तिने ‘गॉथेनबर्ग विद्यापीठा’त एक सर्वसाधारण कार्यकर्ती या नात्याने ‘हरित पक्षा’त प्रवेश केला.

तिने एका बाजूला अभ्यास सांभाळत दुसऱ्या बाजूला पक्षाचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न केले. नंतर ती पुढील शिक्षणासाठी स्पेनमध्ये गेली; परंतु तिची पर्यावरणाविषयीची तळमळ कमी झाली नाही. तिने स्वीडनमध्ये परतल्यावर ‘हरित पक्षा’चा प्रचार अधिक जोमाने सुरू केला. त्या दरम्यान असंख्य युवक-युवती ‘हरित पक्षा’त कार्यरत झाले होते. स्वीडनच्या खरे तर, कोणत्याही तळ्यातील पाणी बिनदिक्कत पिता यावे एवढे ते शुद्ध असते. सर्वत्र वनराई, फुलबागा व झाडे दिसतात. हवा दूषित वायूंपासून मुक्त असल्याचे मानवी इंद्रियांनांदेखील जाणवते. तरीदेखील तेथील तरुणाई ‘नैसर्गिक संपत्ती सुरक्षित राहिली पाहिजे’ या भावनेने भारली गेली, मोठ्या प्रमाणात ‘हरित पक्षा’कडे आकर्षित झाली. नीला त्या तरुणांमध्ये लोकप्रिय झाली. तिची सदैव मेहनत घेण्याची तयारी इतर मंडळींना अचंबित करणारी वाटे. ती पक्षाच्या विद्यार्थी-शाखेच्या केंद्रीय मंडळावर निवडली गेली.

भारतात राजकीय पक्षांच्या विद्यार्थी-शाखा दुय्यम महत्त्वाच्या असतात; परंतु स्वीडनमधील ‘हरित पक्षा’त विद्यार्थ्यांचे व युवकांचे प्राबल्य असल्यामुळे विद्यार्थी-शाखा ही मुख्य पक्षाएवढीच महत्त्वाची समजली जाते. नीलाला विद्यार्थी-शाखेच्या केंद्रीय मंडळावरून पक्षाच्या केंद्रीय मंडळावर निवडण्यात आले. नीलाची खजिनदार म्हणूनही नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष, महासचिव अशा काही जबाबदाऱ्यांखालोखाल खजिनदार हे पद महत्त्वाचे असते. नीलाला राष्ट्रीय पातळीवरील ती महत्त्वाची जबाबदारी दिली गेली तेव्हा तिचे वय सत्तावीस होते. ती दोन वर्षें त्या जागी होती.

स्वीडनमध्ये निवडणुका 2015 साली झाल्या. ‘हरित पक्ष’ ‘समाजवादी पक्षा’च्या भागीदारीत सत्तेवर आला. मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे ‘हरित पक्षा’कडे सोपवण्यात आली.

_Sweedish_HaritPakshat_NilaVikhepatil_2.jpg‘समाजवादी पक्षा’चे दोन व ‘हरित पक्षा’चे दोन असे अधिकारी पंतप्रधान कार्यालयात नेमण्यात आले. तीस वर्षांची मराठीभाषक नीला विखे पाटील ही युवती स्वीडनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयातील एक महत्त्वाची अधिकारी बनली.

स्वीडन हा देश छोटा आहे. मात्र जगात त्याचे महत्त्व मोठे आहे. स्वीडन तंत्रज्ञान, परदेशी गुंतवणूक व इतर देशांना आर्थिक साहाय्य या बाबतीत अग्रेसर आहे. त्यामुळे त्याचा जगभर प्रभाव आहे. स्वीडनचे पंतप्रधान भारतातील ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. नीलाचे काम स्वीडनपलीकडेही आंतरराष्ट्रीय क्षेत्रात महत्त्वाचे ठरले आहे. ‘हरित पक्षा’कडे परकीय साह्य खातेही आहे. त्या खात्यातून जगातील पन्नास देशांना मदत केली जाते. नीला तिचे पंतप्रधानांच्या कार्यालयातील स्थान व तिचे ‘हरित पक्षा’तील महत्त्व अशा दुहेरी कारणांमुळे जगावर परिणाम करणाऱ्या निर्णयांना हातभार लावू शकते.

नीला ही साधी मुलगी आहे. मी तिला प्रथम मुंबईतील एका सार्वजनिक स्थळी भेटलो होतो. मला वाटले होते, की मी तिला सहज ओळखू शकीन. मी शोधत होतो, तर ती मला एका कोपऱ्यात पुस्तक वाचण्यात मग्न असलेली दिसली. माझे भेटण्याचे प्रयोजन स्वीडनच्या अंतर्गत राजकारणासंबंधी होते. मी तिचे तेथील सरकारी धोरण, राजकीय प्रवाह व सामाजिक बदल याबद्दल खोलवर असलेले ज्ञान पाहून प्रभावित झालो.

नीला ही अशोक विखे पाटील यांची मुलगी व बाळासाहेब विखे पाटील यांची नात आहे. अशोकराव ‘विखे पाटील फाउंडेशन’चे अध्यक्ष आहेत. फाउंडेशनच्या वतीने एकशेदोन शिक्षणसंस्था चालवल्या जातात.

नीला यांचा जन्म स्वीडनमध्येच झाला. त्यांची पहिली काही वर्षें नगरमध्ये गेली. त्यांचे वय सध्या तीस आहे. त्यांनी गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझिनेसमधून एमबीए केले. अर्थशास्त्र आणि कायदा हे त्यांचे विषय होते. माद्रिदच्या कॉम्प्लीटन्स युनिव्हर्सिटी या शिक्षणसंस्थेतूनही त्यांनी एमबीए केले. त्यांचा स्विडिश पंतप्रधानांच्या कार्यालयात सल्लागार म्हणून त्यांच्याकडे करयोजना, लिंगधोरण आणि विकास या तीन बाबींकडे लक्ष द्यावे लागते.

नीलाने या लेखासाठी अपडेट म्हणून एक इमेल पाठवला. त्यातील माहितीनुसार – तिने स्वीडनच्या ग्रीन पार्टीच्या खजिनदार व कार्यकारी मंडळाच्या सभासद या जबाबदार्‍या, तेथे चार वर्षें काम केल्यावर सोडून दिल्या आहेत. कारण तिचा वेळ पंतप्रधानांच्या कार्यालयातील कामात फार जातो. ती पक्षात नव्याने येणार्‍या तरुणांना संघटनात्मक बाबींवर व्याख्यानेदेखील देत असते. ती म्हणते, “माझी’ नेमणूक पंतप्रधानांच्या कार्यालयात सल्लागार म्हणून झाल्याला दोन वर्षें लोटली. तो छान अनुभव होता. माझ्या कामात थोडा खातेबदल झाला आहे. अर्थसंकल्प, करयोजना यासंबंधातील राजकारणाची जुळवाजुळव ही माझी नवी जबाबदारी आहे. त्यापैकी काही जबाबदार्‍या अर्थमंत्र्यांच्या आहेत. त्यामध्ये ग्राहकांचे हक्क आणि बँकांचे नियमन या गोष्टींचा समावेश होतो. मला अवजड उद्योग, व्यवसायक्षेत्र आणि सार्वजनिक मालकीच्या कंपन्या ही कामेदेखील पाहवी लागणार आहेत.”

तिच्या पूर्वीच्या जबाबदार्‍यांत लिंगभावविषयक धोरणाचा समावेश होता. युरोपातील बँक व्यवस्था जशी जास्त विस्तार पावेल तेव्हा त्यांतील काही महत्त्वाच्या गोष्टी तिच्याकडे येणार आहेत. नैसर्गिक शेतीविषयक युरोपीयन प्रस्तावासंबंधातील विचार व कृती यांबाबत पंतप्रधानांच्या कार्यालयातील ग्रीन पार्टीची भूमिका ठरवण्यासंबंधातील गोष्टींचे सूत्र संचालन करण्याची जबाबदारीदेखील तिच्यावर सोपवण्यात आली आहे.

स्टॉकहोम सिटी कौन्सीलच्या निवडणुकांसाठी ग्रीन पार्टीच्या उमेदवारीमध्ये तिचे नाव अकराव्या क्रमांकावर आहे. त्याचा अर्थ ग्रीन पार्टीला अनुकूल असे निकाल जाणवले तर तिला तेथे निवडून येण्याची संधी मिळेल. नॅशनल पार्लमेंटसाठीच्या पक्षीय उमेदवारीत तिचा क्रमांक चौथा आहे. सध्या ग्रीन पार्टीचे नॅशनल पार्लमेंटवर स्टॉकहोममधून चार प्रतिनिधी आहेत. याचा अर्थ निवडणुकांचे निकाल योग्य लागले आणि ग्रीन पार्टी संमिश्र मंत्रिमंडळात सामील झाली तर नीलाला मंत्रिपदाचीही संधी मिळेल. तिला सध्या स्टॉकहोम सिटी कौन्सीलमध्येही काही कामगिरी करावी लागते. एका विभागाची तर ती अध्यक्ष आहे.

– संदीप वासलेकर

[ मूळ लेख – सकाळ, सप्तरंग पुरवणी (13 मार्च 2016) मधून उद्धृत]

About Post Author