स्वास्थ्यासाठी नाशिककरांची पंढरपूर सायकलवारी

5
39
carasole-copy

‘नाशिक सायक्लिस्ट’ ही हौशीने सायकल चालवणाऱ्या मंडळींची ऑर्गनायझेशन गेल्या तीन-चार वर्षांत नाशिकमध्ये सक्रिय झाली आहे. नाशिक शहरात सायक्लिस्ट मंडळींची संख्या वाढत आहे. त्यातच महेंद्र व हितेंद्र महाजन या डॉक्टर बंधूंनी ‘रॅम रेस अॅक्रॉस अमेरिका’ ही चार हजार आठशे किलोमीटरची स्पर्धा जिंकली आणि नाशिकचे नाव सायक्लिस्टांचे गाव म्हणून भारतभर झाले. पुणे शहराची ओळख सायकल चालवणारे शहर अशी एके काळी होती. स्वयंचलित टू व्हिलर आल्यावर त्यांनी प्रथम पुणे ताब्यात घेतले. आता, नाशिकसह सर्व जिल्ह्यांच्या शहरी स्कुटी, मोटार सायकली यांचेच राज्य दिसते. त्यामुळे सायकलला छांदिष्टांचे, व्यायामप्रेमींचे व पर्यावरणवाद्यांचे वाहन म्हणून प्रतिष्ठा मिळत आहे. नाशिकमध्ये सकाळ, सायंकाळ सायकल चालवणा-यांची संख्या लक्षणीय रीत्या वाढलेली दिसते. त्याचा परिणाम म्हणून यंदाच्या नाशिक-पंढरपूर सायकलवारीला मोठा प्रतिसाद मिळाला. त्या वारीत मुंबई, पुणे, औरंगाबाद, नांदेड, धुळे येथून साडेतीनशे सायक्लिस्ट सहभागी झाले होते!

नाशिक-पंढरपूर सायकलवारीची कल्पना नाशिकचे माजी पोलिस उपायुक्त हरीष बैजल यांची. ते नाशिकला सात वर्षें होते. आता ते मुंबईमध्ये पोलिस उपायुक्त (औषध प्रशासन) या हुद्यावर आहेत. परंतु त्यांनी नाशिकमध्ये ‘नाशिक सायक्लिस्ट्स फाउंडेशन’ या नावाची संस्था निर्माण केली आहे. तिची वेबसाईट व तिचे स्वत:चे अॅप आहे.

बैजल यांची आई स्व. लज्जावती बैजल धार्मिक/श्रद्धावान असल्याने, आईची स्मृती म्हणून ते पहिल्यांदा आठ मित्रांना घेऊन आषाढवारीच्या काळात नाशिकहून सायकलवरून पंढरपूरला गेले. त्यावेळी त्यांच्या बरोबर नरेंद्रभाई कन्सारा, गजानन गायधनी, श्रीकांत शिंदे, शैलेश राजहंस, अजय मिश्रा, दिलीप धोंडगे, स्व. हर्षद पूर्णपात्रे ही मंडळी होती. पुढे, दरवर्षी तो पायंडा पडला व सायकलवारी सुरू झाली.

बैजलसाहेब म्हणाले, की माझी आई धार्मिक होती. तिचा बराच वेळ पुजापाठात जात असे. मी स्वत: त्या प्रवृत्तीचा नव्हतो. परंतु तिच्या मृत्यूनंतर तिला श्रद्धांजली म्हणून वारी करण्याचे मनात आले. पायी वारीला वीस दिवस लागले असते. तेवढी रजा कोठून मिळणार? म्हणून सायकलवारीचे मनात आले. त्यावेळी मी नाशिकला होतो. तेथूनच जुळवाजुळव सुरू केली. त्यांनी सांगितले, की पहिल्या वर्षी (२०१२) फक्त आठजण होते. नंतर दरवर्षी तेरा-चौऱ्याहत्तर-एकशेअठ्ठ्याण्णव असे वाढत गेले. यंदा प्रत्यक्ष सायकलस्वार तीनशे अठ्ठेचाळीस होते. वारीबरोबर विविध सेवा पुरवणारे सोबती बरेच असतात. तशी या वर्षीची पूर्ण मोहीम सव्वाचारशे लोकांची होती. रस्त्यात काही सायकली पंक्चर झाल्या. त्यांचा पंक्चर सरासरी दहा मिनिटांत काढला गेला व सायकलस्वारांचा प्रवास पुढे सुरू झाला. सायकलस्वार एकमेकांना मदत करत.

 

बैजलसाहेब यांनी नाशिकमध्ये सायकलवारीच्या वेगळ्या उपक्रमाची लागण केली आहे. ती झपाट्याने पसरत आहे. नाशिक परिसरात एरव्हीदेखील सायकलस्वार बरेच दिसतात.

‘सायकल चालवा आणि निरोगी राहा’ हा विचार सायकल वारीमागे आहे. त्यात पंढरपूरचा सायकल प्रवास ही कल्पना अनेकांना भावते. ‘सायकल चालवा आणि तंदुरूस्त राहा’ या विचाराला पंढरीच्या वारीची जोड मिळाली. मी स्वतः आध्यात्मिक परंपरा मानणारा नाही, तरीही सायकलवारी ही कल्पना मला आधुनिक वाटली आणि मी ती अनुभवलीही. सायकलवारीत चौथीत शिकणारी कस्तुरी वालझाडे ही सर्वांत लहान मुलगी होती. ती सायकल मधे मधे चालवत पंढरपूरला पालकासमवेत पोचली. मागच्या वर्षी मल्हार नवले हा बाल सायकलस्वार पंढरपूर सायकलवारीत होता. तो या वर्षीही थेट पंढरपूरला पोचला. रोहित शशी दातार याचे वय अवघे बारा वर्षें. तो पंढरपूरपर्यंत सायकल चालवत आला. अपूर्वा रौंदळ हिनेही वारी पूर्ण केली. ती अकरावीला शिकते. ती शाळेत अव्वल असते. अपूर्वा रौंदळ हिच्या घरातही ‘स्पोर्टी’ वातावरण असल्याने ती पुढे सायक्लिस्ट म्हणून नाव कमावू शकते. अन्वेषा राहुडे ही अवघी अकरा वर्षाची. तिने सुट्टीच्या काळात चार हजार किलोमीटर सायकल चालवली. पंढरपूर सायकलवारीत तिचा टेंभुर्णी येथील ‘रोटरी इनरहिल क्लब’ने भर पावसातही सत्कार केला. ओम महाजन, जतीन जोशी, संकेत लोणारे, ऋतुजा नांगरे ही मुले न थकता, न कंटाळता वारी सायकलवर एन्जॉय करत होती.
स्त्रियाही सायकलवारीत होत्या. सिन्नर घाट चढताना रिमझिम पावसाची आणि सायकलच्या चाकातून उडणा-या पाण्याची, पाठीमागून उडणा-या चिखलाची पर्वा न करता सायकल चालवणा-या स्त्रिया पाहून मला अचंबा वाटला. प्रतिभा भदाणे पुण्याहून येऊन सायकलवारीत सहभागी झाल्या. डॉ. मनीषा भामरे, डॉ. श्वेता भिडे या पंढरपुरात विजयी मुद्रेने वावरत होत्या. सौ. लता चव्हाणके यांचे पतीही वारीत होते. त्यांनी सायकलवारीचा पूर्ण आनंद घेतला. सरला पाटील, विद्या चव्हाण, वैशाली शेलार, रेखा आहेर, अर्चना घुमरे, सिन्नरच्या सरला ताठे या भगिनींना सायकलवारीत पाहून लोकही अचंबित होत होते. स्त्रियांचा सायकलवारीतील सहभाग संख्यात्मक कमी असला तरी गुणात्मक लक्षणीय होता. साडेतीनशे किलोमीटर व सलग तीन दिवस सायकल चालवणे ही नवलाचीच बाब म्हटली पाहिजे. वारकरी भगिनींनी फुगड्या खेळून पंढरपुरात एकच जल्लोश केला तेव्हा ध्येयसिद्धीचा आनंद व्यक्त होत होता. अनेक डॉक्टर मंडळी सायकलवारीत सहभागी झाली होती. डॉ. एस. बी. कासव यांचे वय साठ. पण ते वारीत सायक्लिस्ट म्हणून सहभागी होते. रविकिरण निकम, संजय रकीबे, श्रीपाद उपासनी, जयराम ढिकले, राहुल पाटील, संजय गायकवाड, अजय परदेशी, संदीप लाड, टी आर महाले, ऋषीकेश आफळे, मनोहर शिंदे, नंदकिशोर मोरे हे सर्व डॉक्टर त्यांच्या कृतीतून निरोगी राहण्याचा संदेश देत होते. नांदेडहून डॉ. नंदकिशोर अहिरे नाशकात येऊन सायकलवारीत सहभागी झाले आणि पंढरपूरला पोचलेसुद्धा. देसाईकाका हे मोहिमेतील सर्वांत ज्येष्ठ सायकल वारकरी. त्यांची ही तिसरी सायकलवारी.

नाशिकच्या सायकलवारीत कर्मकांडाला महत्त्व नव्हते. मोहिमेमागे ‘आरोग्यासाठी सायकल चालवा’ हा हेतू असल्याने वारीतील प्रत्येकाने सायकल चालवण्यालाच महत्त्व दिले. स्वयंशिस्त आणि सायक्लिस्टांची सुरक्षितता याला सर्वाधिक महत्त्व होते. किरकोळ अपघात वगळता वारी यशस्वी झाल्याचे दिसून आले. सार्वजनिक स्वच्छता पाळण्याबरोबरच पाणी आणि अन्न यांची नासाडी टाळली गेली. जेवणाची ताटं गोळा करण्यास स्वतः हरीष बैजल बसत त्यामुळे सायक्लिस्टांनी शिस्तीत न्याहरी-जेवणे आटोपली. अविनाश येवलेकर, नाना गायकवाड ‘अभी तो मै नवजवान हूँ’ म्हणत सायकल चालवत पंढरपूरला पोचले. सायकलवारीसोबत अॅब्युलन्स, डॉक्टरांचे पथक होतेच. डॉ. मनीषा रौंदळ प्रत्येक सायक्लिस्टची काळजी घेत होत्या. त्यांनी पायी वारी करत पंढरपूरला निघालेल्या वारक-यांवरही रस्त्यात उपचार केले. नाना गायकवाड यांनी दीर्घ काळ सायकल चालवल्यावर डॉ. मनीषा रौंदळ यांनी त्यांचे ब्लड प्रेशर चेक केले. नानांचा बी.पी. नॉर्मल होता. वारीतील सर्व वारकरी तसेच होते. ‘जय जय रामकृष्ण हरी, आरोग्याचा जागर करी’ हा संदेश घेऊन निघालेली पायी वारी करणा-या वारक-यांचे कुतूहल जागवत होती. सायकलवारीचे व्यवस्थापन मुंबईच्या जगप्रसिद्ध डबेवाल्यांप्रमाणे अचूक होते. पन्नास स्वयंसेवकांचा ताफा वारीला दिशा दाखवत होता.

सायकल चालवून तंदुरुस्त राहता येते याचे प्रात्यक्षिक म्हणजे सायकल वारी. रोजची शुगरची, बीपीची गोळी बंद झाली असे सांगणारे काही भेटले. सायकल चालवून वजन घटवणारेही काहीजण आहेत. सायकल चालवल्याने कार्यक्षमता वाढली असेही काहींनी अनुभवले. सायकल चालवून, शरीरातील चरबी वितळून माणूस फिट्ट होतो असेही काहींना वाटले. ठिकठिकाणी सायक्लिस्टांचे गट स्थापन होत आहेत. नाशिक सायक्लिस्टची चळवळ सगळीकडे पसरत आहे. ‘नाशिक सायक्लिस्ट’चे अध्यक्ष आहेत जसपालसिंग बिरदी. ते स्वतः उद्योजक आहेत. सायकलवारीत उच्चशिक्षित मंडळींचा भरणा अधिक होता.

पंढरीचा पांडुरंग नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध नाही; तरीही लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीला जात असतात. संतांनी आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. ती सायकलवारीतही दिसून आली. सायक्लिस्ट जात, धर्म, भाषा या भेदांच्या पलीकडे एकत्र येऊन ‘निरोगी राहा’चा मंत्र देत पंढरपूरला पोचले. सायकलवारी पंढरीच्या वारीला आधुनिक काळचा नवा मंत्र देईल का? ‘जय जय रामकृष्ण हरी’चा नवा अर्थ!

– डॉ. शंकर बो-हाडे

 

About Post Author

Previous articleदक्षिणकाशी पुणतांबा
Next articleअरण गावचे हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालय
शंकर बो-हाडे हे पिंपळगाव, नाशिक येथील 'कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालया'त मराठीचे प्राध्यापक आहेत. ते सिन्नर गावात 'साहित्य रसास्वाद' हे वाङ्मय मंडळ चालवतात. बो-हाडे हे 'राष्ट्र सेवा दला'चे सैनिक. बो-हाडे नामांतर चळवळीत सत्याग्रह करून शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून जेलमध्ये गेले. ते परिवर्तनवादी, दलित चळवळ व साहित्य याचे अभ्यासक आहेत. त्यांनी पत्रकार 'जागृति'कार पाळेकर यांच्या साहित्याच्या संशोधनानिमित्ताने मराठी पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास केला. ते गेली तीन दशके नाशिकच्या वृत्तपत्रातून लेखन करतात. त्यांनी लिहिलेला, 'ठाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षीय भाषणाची चिकित्सा करणारा लेख विशेष गाजला होता. त्यांची चार स्वतंत्र व दोन संपादित पुस्तके प्रसिध्द आहेत. त्यांची कार्यकर्ता लेखक अशी ओळख आहे. लेखकाचा दूरध्वनी 9226573791

5 COMMENTS

  1. सायकल चालवा – पर्यावरण वाचवा.
    सायकल चालवा – पर्यावरण वाचवा.
    सायकल चालवा – प्रदुषण टाळा .
    सायकल चालवा – आरोग्य जोपासा .
    प्रवक्ता : सिन्नर सायक्लिस्टस्..

  2. सर तुम्ही शाळेतही आम्हाला
    सर तुम्ही शाळेतही आम्हाला चांगले मार्गदर्शनच केले.आणि ह्मा वयात आमच्यासाठी तुम्ही परत आरोग्याचे महत्व पटवुन आमच्यासाठी जणु नवा अभ्यासक्रम आमच्या समोर ठेऊन मोलाचे शिक्षण आम्हाला दिले. सर तुमचे अभिनंदन आणि आभार आपला विद्यार्थी

  3. सरांना नेहमी नविन प्रयोग
    सरांना नेहमी नविन प्रयोग करायला आवडतात.सरांचे कार्य नेहमी प्रेरनादाई आहे.

Comments are closed.