स्वामी रंग अवधूत – नारेश्वरनो नाथ (Swami Rang Avdhoot)

0
59
_Rang_Avadhoot_Maharaj_1.jpg

मोठ्या माणसांची महत्ता ते या पृथ्वीतलावरून नाहीसे झाल्यावर कळते. त्यांचे जीवनचरित्र त्यांच्याबद्दल समजुतदार लोक बोलतात तेव्हा माहीत होते. नंतर त्यांच्या मोठेपणाचा उलगडा होतो आणि चुटपुट लागते. वाटते, मी ते जिवंत असताना त्यांना का नाही भेटलो? नारेश्वर येथील रंग अवधूत यांच्या बाबतीत तेच झाले. त्यांना गुजरातेतील संपूर्ण ‘रेवाकाठा’ ईश्वर मानत होता.

नारेश्वरचे रंग अवधूत स्वामी यांचा जन्म 1898 साली गुजरातेतील गोध्रा या गावी झाला. त्यांचे नाव पांडुरंग विठ्ठलपंत वळामे. त्यांचा जन्म माझे मित्र उपेंद्र सरपोतदार यांच्या घरी झाला. रंग अवधूतांचे वडील सरपोतदारांच्या मंदिराचे पुजारीपण करत असत. तेथेच रंग अवधूतांचा म्हणजे पांडुरंग विठ्ठलपंत वळामे यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1898 रोजी झाला. ते मूळ महाराष्ट्रातील. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात देवळे नावाचे लहान गाव आहे. ते त्यांचे मूळ गाव. त्यांच्या घरात विठ्ठलभक्ती होती.

रंग अवधूत यांच्या आईचे नाव काशीबाई. रंग अवधूत मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर असहकार चळवळीत उतरले. त्यांनी काही काळ शिक्षकी पेशा पत्करला. त्यानंतर सर्व सोडून देऊन 1923 साली संन्यास घेतला. तेथून ते नर्मदेकाठी नारेश्वर या ठिकाणी आले. तेव्हा तेथे जंगल होते. वासुदेवानंद सरस्वती त्यांचे गुरू होते. मी वळामे यांचे घर गोध्रा येथे जाऊन पाहिले. समोर तलाव आहे. तलावाकाठी रस्ता व त्यापलीकडे मंदिर. रंग अवधूत महाराजांनी देह हरिद्वारला 19 नोव्हेंबर 1968 रोजी ठेवला. त्यांना बडोद्याला आणले गेले. पुष्कळ लोक जमले होते. तेथून नारेश्वरला नेण्यात आले.

ते सगळे मला योगायोगाने पाहण्यास मिळाले होते. मला तेव्हा गुजरातेत येऊन जेमतेम दोन वर्षें झाली होती. पण अवधूत परिवारातील मंडळी फार नंतर भेटली. मी नारेश्वरला भेट 1972 साली दिली. तीही कोणाच्या साथसंगतीशिवाय. तेथे गेल्यावर पुस्तके घेतली. नारेश्वरचा परिसर न्याहाळला. पुष्कळ मोर दिसले. समाधी मंदिराजवळची नर्मदा नदी. ते सगळे आवडीचे होते. नर्मदेवर प्रेम बसून एक वर्ष झाले होते. नर्मदेकाठची चांदोद, कर्नाळी, अनुसूया, गंगनाथ, मोटी कोरल वगैरे ठिकाणे परिचयाची होती. भर पावसाळ्यात ओरसंग आणि नर्मदेच्या संगमावरचा अजस्त्र पाणलोट होडीतून अनुभवला होता.

रंग अवधूत महाराजांनी त्यांच्या लहानपणीच नरसोबाच्या वाडीला वासुदेवानंद सरस्वती यांच्या पायावर डोके ठेवले, दीक्षा घेतली. त्यांनी कालांतराने, नर्मदेकाठच्या जंगलात वास केला. त्या जागेचे नाव नारेश्वर. ते बडोद्यापासून त्रेसष्ट किलोमीटर अंतरावर आहे. महाराजांशी लोकांचा संपर्क वाढला. प्रत्येक माणसावर काहीना काही संकटे येत असतातच. कोणाच्या मुलीचे लग्न होत नसते, मुलगा वाया गेलेला असतो, मुलीला सासरी छळ असतो. कोणाला दुर्धर रोगाने ग्रासलेले असते. रंग अवधूत स्वामी तशा दु:खी मनावर निर्मळ मनाने फुंकर घालत, मन स्थिर राहण्यास मदत करत. त्यांनी बावनश्लोकी दत्तबाबनी लिहिली. ती रेवाकाठच्या सर्वांना पाठ झाली. मला, माझ्या पत्नीला पाठ आहे. लोकांना महाराजांच्या शब्दांची प्रचीती येऊ लागली. माणसे जमत गेली. अवधूत परिवार जन्माला आला. थेट अमेरिकेपर्यंत पोचला. त्यांनी संन्यास घेतल्यामुळे पुढे पिढी चालू राहू शकली नाही. पण त्यांची आई रूक्मांबा त्याचे सोबत राहात असे. त्याही लोकांना आश्वासक वाटत. त्यांच्यामुळे लोकांना सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळत असे. रंग अवधूतांना सगळे ‘बापजी’ म्हणत. त्यांनी गुरूलीलामॄत हा ग्रंथ लिहिला तसेच अनेक पुस्तके लिहिली.  आजही त्यांचे असंख्य भक्त आहेत. महाराजांची गैरहजेरी नारेश्वरात भासते. मोठी व्यक्ती गेली, की त्या स्थानाचे चांगले दिवस सरतात. त्यांचे प्रश्नोत्तर गीता हे गुजराती भाषेतील पुस्तक आहे. त्यात त्यांनी ‘यक्ष-युधिष्ठिर संवाद’, ‘शंकराचार्याची प्रश्नोत्तर मालिका’ ‘श्रीकृष्णानंदसरस्वती यांची प्रश्नोत्तर मालिका’ तुलसीदास व स्वत: रंग अवधूत यांची प्रश्नोत्तरमाला यांचा समावेश आहे.

रंग अवधूत यांनी बडोद्यात दोन मंदिरांजवळ औदुंबर लावले. अक्कलकोट मंदिराचे विश्वस्त कै. कडुस्कर हे दत्तभक्त. ते माझ्याकडे मंदिराच्या विकासाची परवानगी मागायला आले होते. तेथून ओळख झाली. त्यांना माझ्याबद्दल आत्मियता वाटू लागली असावी. ते वरचेवर गप्पा मारायला येत. भंडारा असला की आमंत्रण देत. काही प्रसंग असला तरी आवर्जून भेटायला येत. त्यांनी रंग अवधूतांना पाचारण करून मंदिरासमोर औदुंबर लावून घेतला. असाच आणखी एक औदुंबर वाडी विस्तारतील प्रतापरूद्र हनुमान मंदिराच्या परिसरात त्यांनी लावला होता. ‘परस्पर देवो भव’, ‘श्वासे श्वासे दत्तनाम स्मरात्मन’, ‘सत्यमेव परम तप:’ ही त्यांची वचने, पण ती आयुष्यात अंगी बाणवणे सोपे नाही, त्यांनी त्यांचा जन्म गुजरातेत झाल्याने गुजराती भाषेत जास्त लिहिले आहे. मराठी माणसाला गुजराती भाषा सफाईने बोलता-वाचता येते.  त्यामुळे मराठी-गुजराती दोन्ही भाषिक लोकांना त्यांचा सारखाच लोभ आहे.

– प्रकाश पेठे, prakashpethe@gmail.com

-०-०-०-०-०-

पुण्याचे मधुकर गोरे यांनी पुढील माहितीची भर घातली आहे.

पांडुरंग वळामे, अर्थात रंग अवधूत यांना एक लहान बंधूही होता. त्याचे नाव नारायण होते. त्यांचे पितृछत्र बालपणीच हरपले. माता रुक्मांबा दोन्ही मुलांच्या उपनयन संस्कारासाठी गोध्र्याहून त्यांच्या मूळ देवळे गावी आल्या होत्या. सर्वजण उपनयनाचा कार्यक्रम आटोपून परत गोध्रा येथे जात असताना श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडीस दत्तदर्शनासाठी गेले. त्या वेळी वासुदेवानंद सरस्वती यांचा वाडी येथे मुक्काम होता. तेव्हा स्वामींची व पांडुरंगाची दोन-चार मिनिटेच भेट झाली. स्वामी म्हणाले, “बाळ, तू कोणाचा?” पांडुरंग म्हणाला, ‘तुमचाच’. पुढे ‘तुमचा व आमचा’ हाच पांडुरंगासाठी महान मंत्र ठरला. स्वामींनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली व त्यांना पूर्ण वैराग्य प्राप्त झाले. त्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले होते. त्यांचे प्रभुत्व मराठी, हिंदी, गुजराती व संस्कृत भाषांवर होते.

थोरल्या महाराजांनी त्यांना दत्त पुराणाची एकशेआठ पारायणे करण्याचा आदेश दिला. त्यासाठी त्यांना ‘नारेश्वर’ची भूमी सुचवण्यात आली. नारेश्वर गावाजवळ दहा गावांची स्मशानभूमी होती. तेथे नारेश्वर महादेवाचे मंदिर होते. ते गाव नर्मदेच्या काठावर असून तेथे पूर्वी श्री गणेशाने तपश्चर्या केली होती अशी श्रद्धा आहे. त्याच ठिकाणी पांडुरंगाने उग्र तपश्चर्या केली. नंतर त्याने श्री गुरूंच्या आदेशाप्रमाणे नर्मदा परिक्रमा केली. तपश्चर्येनंतर त्यांना दिव्य शक्ती प्राप्त झाली अाणि सिद्धी त्यांच्या पायाशी लोळण घेऊ लागल्या अशी लोकधारणा अाहे. भक्त त्यांच्याकडे येऊ लागले. त्यांनी लोकांच्या इच्छा पूर्ण करण्याचे व्रत घेतले.

त्यांचा धाकटा बंधू मरण पावल्यानंतर त्यांच्या मातोश्री रुक्मांबा माता यांचे वास्तव्य नारेश्वरी होते. अवधुतांनी आईची उत्तम प्रकारे सेवा केली. नारेश्वराचे महत्त्व वाढवण्याच्या कार्यात त्यांच्या आईचा सिंहाचा वाटा आहे.

नारेश्वर हे गाव नर्मदा काठावर आहे. एका भक्ताने त्याच्या पदात म्हटले आहे, की नारेश्वरची माती म्हणजे चंदन तर रेवाजल हे अमृत आहे. बडोदा ते नारेश्वर अंतर साधारण चाळीस किलोमीटर आहे.

– मधुकर गोरे, पुणे, फोन (०२०) २५३८१२६४

Last updated on 26th Sep 2018

About Post Author

Previous articleमहाराष्ट्राचा महावृक्ष
Next articleगरिबांचा जीवनदाता : देवेंद्र गणवीर
प्रकाश पेठे यांचा जन्म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्थायिक आहेत. त्यांनी ‘सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ (मुंबई) येथून शिक्षण पूर्ण केले. त्यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्यांनी संगीत विशारद ही पदवी 1989 मध्ये मिळवली. ते नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त 1998 मध्ये झाले. त्यांनी ‘महाराज सयाजीराव विद्यापीठ’ बडोदे येथे 1977 पासून अतिथी प्राध्यापक, 2001 पासून ‘सरदार वल्लभभाई पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलाजी’ येथे अतिथी प्राध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. पेठे यांना प्रवास, छायाचित्रण, साहित्य, संगीत आणि कला अशा विविध विषयांची आवड आहे. त्यांची ‘स्वप्नगृह’, ‘धमधोकार’, ‘आनंदाकार’, ‘वडोदरा’ व ‘नगरमंथन’ अशी पुस्तके ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाली आहेत.