‘स्टडी सर्कल’चे नवे रूप

दिलीप करंबेळकरभारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात व स्वातंत्र्यानंतर लगेच राजकीय विचारधारा पक्क्या होत असताना समाजवादी, डाव्या पक्षांमध्ये ‘स्टडी सर्कल’ प्रचलित होती, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ‘बौद्धिके’. नेत्यांना, विद्वानांना बरेच कळते आणि ते प्रतिपादन करतील ते अनुयायांनी, श्रोत्यांनी समजून घ्यायचे अशी कल्पना असे. त्या आधारे, 80-90 सालापर्यंत विचारी समाज विचारशील(बद्ध) राहिला. त्यानंतर  माहिती-तंत्रज्ञानांने माणसाचे भावविचारांचे जग पालटून टाकले आहे. प्रत्येक माणूस माहितीसंपन्न होऊन स्वतंत्र विचार करू लागला आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचे ते विलोभनीय रूप आहे. काळाबरोबर त्याच्या विचारांत प्रगल्भता येईलच!

अलिकडे, न्यू जर्सीचे अशोक विद्वांस व शैला विद्वांस मुंबईत आले होते. त्या निमित्ताने चौदा-पंधरा जणांची एक विचारबैठक जमून आली. त्यासाठी प्रास्ताविक टिपण विवेक साप्ताहिकाचे संपादक, दिलीप करंबेळकर यांनी लिहिले होते. उपस्थितांत डॉ. रविन थत्ते, अशोक नायगावकर यांच्यापासून सारंग दर्शने, निळू दामले यांच्यापर्यंत वेगवेगळ्या विचारछटांचे लोक होते. दीड-दोन तासांच्या चर्चेतून वेगवेगळे पैलू समोर आले. त्यानंतर फोनवर तत्संबंधी बोलताना असे मत व्यक्त झाले, की जुन्या ‘स्टडी सर्कल’चे हे नवे रूप आहे!

येथे ‘स्टडी सर्कल’चे नवे रूप, दिलीप करंबेळकर यांचे टिपण व दिलीप काटदरे यांचे मत प्रसिद्ध करत आहोत. या विचारमंथनात कोणीही सहभागी व्हावे. पुढील बैठकीचा प्रस्ताव पार्ले येथून आला आहे. – संपादक, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम
संस्कृती समन्वयाची प्रक्रिया सुरू होणे आवश्यक

चांगले प्रशासन हा लोकसभा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. एका गृहस्थांनी मला विचारले, की आपल्याला रामराज्य हवे की चार्वाकराज्य? रामराज्य हे आदर्शवादावर भर देणारे राज्य आहे तर चार्वाकराज्य हे सुखवादावर भर देणारे राज्य आहे. ते केवळ दोन दृष्टिकोन नाहीत तर त्या स्वतंत्र जीवन संकल्पना आहेत. त्यांची गृहिते वेगवेगळी आहेत व ती नीट समजावून घेतल्याशिवाय भारतीय समाजासमोरचा सांस्कृतिक पेच सुटणार नाही.

त्यानंतर गृहस्थांबरोबर झालेल्या आमच्या चर्चेत काही मुद्दे आले. मी त्यांना म्हटले, की चार्वाकराज्यात जर वसिष्ठ ऋषींना त्यांचे मत प्रतिपादन करण्याचा अधिकार असेल तर मला चार्वाकराज्यही चालेल. त्यांच्या मते, चार्वाकराज्य हे इंद्रिय सुखवादी असेल, त्या जीवनशैलीत अध्यात्माला महत्त्व नसेल, त्यातून निर्माण होणारी आत्मकेंद्रित जीवनशैली समाजहिताला बाधक असेल.

सुख म्हणजे काय याचा शोध घेताना त्याला दोन फांद्या फुटतात व त्यांचा स्वतंत्रपणे विकास होत जातो. त्यांपैकी एक उपयुक्ततावादी किंवा इंद्रियसुखवादी आहे, म्हणून ती स्वार्थी किंवा समाजविघातक आहे असे नाही किंवा ती नैसर्गिक व स्वाभाविक आहे म्हणून बरोबर आहे असेही नाही; तर दुसरी केवळ आध्यात्मिक म्हणून अंधश्रध्देची पोषक असते असे नाही किंवा केवळ तिच्यामुळे समाज सुखी होईल असेही नाही. त्यामुळे या दोन्ही संकल्पनांचे सामाजिकीकरण कसे होते त्यावर त्याची फलनिष्पत्ती अवलंबून आहे.

माणूस सुखवादी असला तरी सुखाचा आस्वाद केवळ एक व्यक्ती एकटयाने घेऊ शकत नाही. व्यक्तीला त्यासाठी समाज लागतो व समाज सुखी नसेल तर तो एकटया व्यक्तीला सुख घेऊ देणार नाही. त्या उलट व्यक्ती अध्यात्मवादी असेल तर ती जगाच्या व्यवहाराकडे निरर्थक दृष्टीने, तुच्छतेने पाहू शकेल व तिच्यात अनुकंपेचा अभाव असेल. जातिव्यवस्थेच्या संदर्भात या अभावाचा अनुभव भारतीय समाजाने घेतला आहे. त्यामुळे पहिली जी जीवनदृष्टी जिला साधारणत: पाश्चात्य म्हणून ओळखले जाते व दुसरी जिला हिंदू जीवनदृष्टी म्हणून ओळखले जाते त्या संदर्भात त्या दोन्ही संकल्पनांच्या पलीकडे जाऊन विचार केल्याशिवाय कोणाही चिंतकाला निखळ समाजहितवादी विचार करता येणार नाही.

आध्यात्मिक विचारधारा व्यक्तीचे प्राथमिक नाते हे चैतन्यतत्त्वाशी आहे असे मानते व व्यक्तीने त्या नात्याची अनुभूती घेणे हेच त्या विचारधारेचे अंतिम उद्दिष्ट आहे असेही मानते. त्या अनुभूतीतून मानवाचे निसर्गाशी व अन्य व्यक्तींशी असलेल्या संबंधांचे जे नियम तयार होतात तो धर्म व तोच अंतिमत: समाजनियंत्रकाचे काम करतो असे त्यांचे प्रतिपादन असते. ती विचारधारा त्या नियमांचे संस्कार करणे हे समाजपरिवर्तनाचे प्रमुख माध्यम मानते. त्यामुळे समाजनियमनात अंतिम शब्द हा धार्मिक नेत्याचा असला पाहिजे ही भूमिका तयार होते. अर्थात सेमेटिक धर्म व हिंदू धर्म यांची या बाबतची भूमिका मूलत: निराळी आहे, पण त्याबाबत स्वतंत्रपणे विचार करणे आवश्यक आहे.

इहवादी भूमिकेत व्यक्तीचे समाजाशी व परस्परांशी संबंध हे कराराच्या स्वरूपाचे असतात व ते घटनेनुसार कायद्याद्वारे निश्चित होतात. त्यामुळे घटना व कायदा यांचा सन्मान हाच समाजधारणेचा प्रमुख आधार बनतो. कायदा हा लोकशाही समाजव्यवस्थेत लोकांच्या सामूहिक शहाणपणातून निर्माण झाला पाहिजे हे तत्त्व त्यातूनच उदयाला आले.

भारतातील १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील अपयशानंतर तेथे सरंजामशाही राजवटीची शक्यता संपली व इंग्रजी शिक्षणाने नव्या संस्कृतीचे भान आलेल्या मध्यमवर्गीय तरुणांनी समाजाची सूत्रे हाती घेतली. त्या तरुणांच्या विचारातून भारतातील प्रबोधनपर्वाला सुरुवात झाली. आचार्य जावडेकरांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘युरोपात अठराव्या शतकात जी नवी व्यापारी संस्कृती निर्माण झाली, तिच्याशी टक्कर देण्याचे सामर्थ्य हिंदी संस्कृतीत उरले नव्हते आणि ती आधुनिक, मध्ययुगीन किंवा प्राचीन, कोणत्याच स्वरूपाचे स्वराज्य रक्षण अथवा स्वराज्य संरक्षण करण्यास असमर्थ बनली होती हे मान्य करणे भाग आहे. …आधुनिक राष्ट्रीयत्वाचे धडे आमच्यापासून घेतल्याशिवाय तुम्ही या जगात स्वतंत्रतेने नांदू शकत नाही, अशी भारतीय हिंदू व मुसलमानांची खात्री (त्या व्यापारी संस्कृतीने) करून दिली.’

आधुनिक राष्ट्रीयत्वाच्या या संक्रमणात पाश्चात्य प्रबोधनपर्वातून निर्माण झालेले संस्थात्मक जीवन भारतीयांनी स्वीकृत केले पण अजूनही आंतरिक दृष्टया भारतीयांची पारंपरिक संचितासंबंधीची आस्था व त्यांचा विश्वास  कमी झालेला नाही. या आंतरिक विभाजनामुळे भारतीय लोक परंपरेवर व कायद्यावर त्यांच्या सोयीने विश्वास ठेवतात.

ही द्विधावस्था संपवायची असेल तर त्या दोन्ही संस्कृतींचा समन्वयात्मक विचार करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात असे अनेक प्रयत्न झाले. स्वातंत्र्यानंतर ती प्रक्रिया थांबली. ती पुन्हा कशी सुरू करायची हे भारतीय विचारी वर्गापुढील प्रमुख आव्हान आहे.

दिलीप करंबेळकर,
संपादक – साप्ताहिक विवेक
kdilip54@gmail.com


माणूस म्हणून आपण स्वत:ला हरवून तर बसलो नाही ना? असा प्रश्न मला पडतो. एक चांगला माणूस किंवा व्यक्ती म्हणून जगण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हे जर आपण पटवून देऊ शकलो, तर जातीधर्मापलीकडे जाऊन बदल घडवून आणता येईल. जगण्याचा दर्जा कसा सुधारता येईल आणि त्यासाठी आवश्यक मानसिकता तयार कशी करता येईल? याचा विचार करून ती बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची जरूरी आहे. ही काळाची गरज आहे. उपलब्ध तंत्रज्ञानाचा त्यासाठी उपयोग करता येईल.

या प्रश्नाचे उत्तर सापडले तर जगण्याचा दर्जा सुधारण्याचा हा एक मार्ग होऊ शकेल. आजच्या काळाला अनुरूप असे काय करता येईल ज्याचा जातिधर्माशी संबंध नसेल? आणि जो समाजातील सर्व थरांपर्यंत पोचवता येईल. हा संवाद साधण्याचे अनेक प्रयत्न झाले. होतही आहेत. समाज सुधारकांनी जगण्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला. मध्यमवर्गातील ज्येष्ठ पिढीला त्याची जाणीव कुटुंबातील संस्कृतीमुळे झाली. संतांनी त्याबाबत केलेली कामगिरी मोलाची होती. व्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून याचे उत्तर शोधायचे कमी प्रयत्न झाले नाहीत. त्यासाठी दोन प्रश्नांची उत्तरे समाधानकारकरीत्या शोधून काढणे जरुरीचे आहे.

पहिला प्रश्न म्हणजे दर्जाची परिभाषा किंवा त्याचे निकष काय? आणि दुसरा प्रश्न ज्याला आपण दर्जा म्हणतो तो कोणी ठरवायचा?

आपल्या आजुबाजूला थोडे लक्ष देऊन बघितले तर आपल्या लक्षात येते, की रोजच्या जीवनात अशी माणसे दिसतात ज्यांच्या जगण्याचा दर्जा सर्वांनाच भावतो. कधी शेवटचा पेशंट तपासण्यासाठी पहाटेचे अडीच वाजेपर्यंत थांबणार्‍या डॉक्टरच्या पेशात, तर कधी गरजेच्या वेळी धावून आलेल्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात. हे करताना त्यांना कशाचीही अपेक्षा नसते, त्याचे कौतुक वाटते. अशा व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा जातिधर्मापलीकडे जाऊन आपण त्यांचा आदर करतो. त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास केलेला नसतो. तो त्यांच्या आयुष्याचाच भाग असतो. अशा लोकांना देशकाळाच्या मर्यादा नसतात.

आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगुलपणा लपलेला असतो. तो शोधून सतत जागा ठेवणे सगळ्यांना जमत नाही. ते न जमण्याचे कारण असे, की धकाधकीच्या, स्पर्धेच्या, वेगवान युगात थोडे थांबून मनात डोकावयाला वेळच नसतो. व्यक्ती स्वत:भोवती एक कोश तयार करून त्यात बंदिवान होते आणि दुसर्‍या व्यक्तीबरोबर तुलना करू लागते. पहिली व्यक्ती जे आहे त्याचा आनंद न घेता जे नाही त्याच्या मागे पळत राहते. ते मिळाले नाही की निराश होते. गावाकडच्या मुलाला वाटते, की  शहरात गेल्यावर त्याचे सगळे छान होईल. ते होत नाही. तोपर्यंत वेळ निघून जाते, व्यक्तीला नेमके काय हवे याचा विचारच तिच्याकडून केला जात नाही. काय मिळवायचे आहे याबाबत गोंधळ होतो. तशा नैराश्यामधून, गोंधळातून आयुष्य भरकटत जाते. त्यात माणुसपण हरवून बसते.

याबाबत माझा अनुभव असा, की दिशा दाखवणारी, प्रश्न विचारून विचार करायला लावणारी विश्वासार्ह व्यक्ती भेटली आणि तिच्याशी मोकळेपणाने बोलता आले तर मार्ग मिळू शकतो. संख्याशास्त्रातील नियमाप्रमाणे ८०% लोक सामान्य असतात. त्यांची मने आणि मते १९% हुशार लोक बदलू शकतात. १ % लोक टोकाचे असतात. हुशार लोक शोधून काढणे हे काम सोपे नाही. त्यांना शोधून बदलता आले तर सामान्य माणसाची मानसिकता बदलण्याची शक्यता वाढू शकेल. त्यासाठी वेळ देणे जरुरीचे आहे. प्रत्येकाने विचार करणे जरुरीचे आहे. एक मंच असा उभारण्याची गरज आहे, की ज्याचा राजकरणाशी किंवा धर्माशी संबध नसेल!

दिलीप काटदरे
९३२११८६४८२
dilip.katdare@gmail.com

About Post Author