सौरऊर्जेसाठी प्रयत्‍नशील – दोन चक्रम!

लोडशेडींगचा सामना कराव्या लागणा-या गावांना सौर दिव्यांमुळे नवी आशा मिळाली आहे
लोडशेडींगचा सामना कराव्या लागणा-या गावांना सौर दिव्यांमुळे नवी आशा मिळाली आहे

अलिकडच्‍या काळात ऊर्जा हीसुद्धा मानवाची मूलभूत गरज झालेली आहे. ऊर्जेला सर्व स्‍तरांवर अनन्‍यसाधारण महत्त्व प्राप्‍त झालेले असून तिच्‍या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. मागणी आणि उत्‍पादन यांच्‍यामध्‍ये मोठी तफावत निर्माण झालेली असल्‍याने, महाराष्‍ट्र गेली काही वर्षे भारनियमनाचा सामना करत आहे. अशी पार्श्वभूमी असताना पुण्‍याचे दोन तरूण सर्वसामान्‍य जनतेच्‍या आयुष्‍यात ‘प्रखर’ प्रकाश पसरवण्‍याच्‍या ध्‍येयाने वेडे झाले आहेत. आमूलाग्र सुधारणा घडवायच्‍या, पण त्‍या केवळ माफक खर्चात. कारण विकासाचा केंद्रबिंदू हा गोरगरीब जनता असल्‍यामुळे, तिच्‍या खिशाला परवडेल, उपयुक्‍त ठरेल आणि जे दीर्घायुषी असेल असे तंत्रज्ञान विकसित करण्‍याच्‍या उद्देशाने, हे दोन तरुण ‘चक्र’म म्‍हणजे आशीष गावडे आणि अनिरुध्‍द अत्रे झपाटले गेले आहेत. ते दोघे उच्‍चविद्याविभूषित असूनही त्‍यांची नाळ जोडलेली आहे ती गोरगरीब जनतेशी!

आशीष गावडेअनिरुद्ध अत्रेआशीष आणि अनिरुध्‍द इयत्ता पाचवीपासून एकत्र शिकले. दोघेही जिवलग मित्र. आशीष सुरुवातीपासून लोणावळयाच्‍या ‘मनशक्ती प्रयोग केंद्र’ या संस्‍थेत जायचा. दोघांवर बिझनेस मॅनेजमेंट गुरू सी.के. प्रल्‍हाद ह्यांच्‍या विचारांचा प्रभाव आहे. सर्वसामान्‍यांच्‍या समस्‍या दूर करण्‍यासाठी पर्यावरणप्रेमी प्रयत्‍न व्‍हायला हवेत, ही गुरुदीक्षा त्यांच्या मनावर व ज्रलेखाप्रमाणे कोरली गेली आहे. त्‍याचाच परिपाक म्हणून दोघांची ‘बॉटम ऑफ पिरॅमिड एनर्जी अॅण्ड एनव्‍हायरोमेंटल प्रा.लि.’ ही संस्‍था सामाजिक-ग्रामीण क्षेत्रात कार्यरत झाली. ती सर्वसामान्‍य माणसाच्‍या घरात स्‍वस्‍तात ‘प्रखर’ प्रकाश पसरवण्‍याचे काम करत आहे.

आशीष गावडे आणि अनिरुध्‍द अत्रे, ह्या दोघांनीही डी.वाय. पाटील कॉलेजमधून बी.ई. (मेकॅनिकल) केले. आशीष टाटा मोटर्समध्‍ये 1998मध्‍ये रुजू झाला. दोघांनाही १९९९ मध्‍ये अमेरिकेतील फोर्ड मोटर्समध्‍ये नोकरीची संधी मिळाली. दोघांनाही पाश्चात्‍य देशांबाबत आकर्षण नव्‍हते. मात्र, तिथे जाऊन उच्‍च शिक्षण घ्यावे ह्या उद्देशाने ही ‘चक्र’म जोडी अमेरिकेला रवाना झाली.

 त्‍यांनी फोर्डमध्‍ये काम करताना प्रॉडक्‍ट प्‍लॅनिंग, प्रॉडक्‍ट डेव्‍हलपमेंट, प्रोग्रॅम मॅनेजमेंट अशा विभागांमध्ये अभ्‍यास केला. त्‍यांनी अमेरिकेतील वास्‍तव्‍याचा आणखी एक फायदा करून घेतला. तो म्हणजे, युनिव्‍हर्सिटी ऑफ मिशिगन-रॉस स्‍कूल ऑफ बिझनेसमधून त्‍यांनी स्‍ट्रॅटेजी/मार्केटिंग या विषयात एम.बी.ए. ही पदवी संपादन केली. त्‍यांनी भारतात लवकरच परतायचे हे आधीच ठरवलेले असल्‍याने २००६मध्‍ये आशीष मायदेशी आला. तेव्‍हा महाराष्‍ट्रात लोडशेडिंगचे राज्‍य सुरू होते. आशीष ‘कमिन्‍स इंडिया’मध्‍ये जनरल मॅनेजर ह्या पदावर काम करू लागला, मात्र, डोक्‍यात विचारांचे ‘चक्र’ सुरू होते. काहीतरी हटके करायला हवे. फार खर्चात न पाडता सर्वसामान्‍य माणसाचे जगणे सुखकर व्‍हायला पाहिजे, ह्या मुद्दयावर दोघांचे एकमत झाले. ऊर्जा क्षेत्रात काहीतरी अभिनव करण्‍यासाठी अनिरुद्ध अमेरिकेत थांबून अधिक माहिती मिळवत गेला. आशीषने नोकरीचा राजीनामा २००९ मध्‍ये दिला आणि ‘बॉटम ऑफ पिरॅमिड एनर्जी अॅण्‍ड एनव्‍हायरोन्‍मेंटल प्रा.लि.’ ह्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. अनिरुद्ध अमेरिका सोडून २०१० मध्‍ये भारतात आला.

‘चक्र’ या पॅडेल जनरेटरसोबत अत्रे-गावडे यांची जोडीदोघांच्‍या विचारचक्राने अधिक गती घेत जन्‍माला घातला तो पॅडेल जनरेटर! ह्या आगळ्यावेगळ्या जनरेटरला त्‍यांनी मराठी नाव ठेवलं ‘चक्र’. त्‍यांनी बनवलेल्‍या दिव्‍यांनासुद्धा, त्‍यांनी ‘प्रखर50’ आणि ‘प्रखर100’ अशी नावे दिलेली आहेत. दहा ते तेरा मिनिटे पॅडलिंग केल्‍यावर हे दिवे चार्ज होतात. ‘प्रखर50’ हा दिवा रॉकेलच्‍या दिव्‍यापेक्षा सत्तावीस पट प्रकाश देत दहा तास चालतो तर ‘प्रखर100’ रॉकेलच्‍या दिव्‍यापेक्षा पंचेचाळीस पट प्रकाश देत चार तास चालतो. ‘प्रखर50’च्‍या नवीन व्‍हर्जनमध्‍ये काही नवीन फिचर्स तयार करण्‍यात आले आहेत. त्‍या दिव्यांवर मोबाईलसुद्धा चार्ज करता येतो. तर पॅडल जरनेटरच्‍या साह्याने लॅपटॉपही चार्ज करता येतो. सर्वसामान्‍य नागरिकांना सहज परवडेल अशा किंमतीत मिळणा-या ह्या जनरेटरचे अपेक्षीत आयुष्‍य दहा वर्षे आहे. शिवाय, जनरेटरला ऑईल किंवा अन्‍य वंगणसुद्धा लागत नाही. दुर्गम भागात, आदिवासी वस्‍त्‍यांवर, लोडशेडिंगच्‍या काळात सर्वसामान्‍य घरांत, शेतांवर, दोन-चार दिवस जंगल सफारीवर जाताना ह्या ‘चक्रा’ची उत्तम सोबत होऊ शकते.

प्रखर 50अपारंपरिक ऊर्जेतील महत्त्वाचा विभाग म्‍हणजे सौरऊर्जा! भारतात सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात असूनही त्‍याचे शक्तीत रूपांतर करू शकणारी उपकरणे महाग असल्‍याने ती सर्वसामान्‍य माणसाच्‍या खिशाबाहेरची आहेत. त्‍या अडचणीवर मात करण्‍यासाठी ह्या दोन तरुण संशोधकांनी सोलर ‘प्रखर (उपकरणे तयार करण्‍यास प्राधान्‍य दिले आणि ते त्‍यामध्‍ये यशस्‍वी झाले आहेत. ‘सोलर प्रखर100’ आणि ‘सोलर प्रखर50’ ह्या नावाने त्‍यांनी सौरदिवे बनवले. ह्या एलईडी दिव्‍यांचे आयुष्‍यमान 100,000 तास इतके असल्‍याचे ते सांगतात. 2 वॅटचे हे पोर्टेबल लॅम्‍प असून ते दोन्‍हीही चार तास प्रकाश देण्‍यास समर्थ आहेत. सोलर पॅनेलसह ‘सोलर प्रखर100’ दिव्‍यांची किंमत 1550 रुपयांपर्यंत, तर ‘सोलर प्रखर50’ची किंमत आठशे रूपयांपर्यंत आहे.

प्रखर 100त्‍या दोघांकडेही व्‍यावसायिक वृत्‍ती नाही. आपण जे उपकरण तयार करू ते अनेक वर्षांपर्यंत कार्यरत असावे, त्‍याचा कोणताही मेण्‍टेनन्‍स असू नये असा त्‍यांचा कटाक्ष आहे. त्‍यांनी आपल्‍या सौर उपकरणांच्‍या उपयुक्‍ततेबरोबर त्‍यांची आयुष्‍ये वाढवण्‍यावरही लक्ष केंद्रित केले. मोठ्या कंपन्‍यांच्‍या सौर उपकरणांची बॅटरी दिड वर्षांत बंद पडते, मात्र अत्रे-गावडे जोडीने तयार केलेल्‍या सौरदिव्‍यांच्‍या बॅटरीचे आयुष्‍यमान सरासरी दहा वर्षे आहे. सौर उपकरणे तयार करताना महाराष्‍ट्रातील अथवा देशातील सर्वात चांगली उपकरणे बनवण्‍याऐवजी जगातील सर्वात चांगली उपकरणे बनवण्‍याचे लक्ष्‍य त्‍या दोघांनी डोळ्यांसमोर ठेवले. ते आपण बनवलेली सौर उपकरणे ही जगातील क्रमांक एकची उपकरणे असल्‍याचा दावा करतात. सौरदिवे अधिक स्‍वस्‍त व्‍हावे, तसेच ते आकर्षक दिसावे, याकरीता त्‍यांनी स्‍टायलिंग डिझायनरकडून दिव्‍यांचे रूपडे बदलून घेतले. अधिक आकर्षक असलेले हे सौरदिवे 800 रूपयांपर्यंत लोकांपर्यंत पोचवले जाणार आहेत.

 सावंतवाडी येथे सौरदिव्यांच्या उजेडात काजू निवडत असलेले कामगारगावक-यांना ‘चक्र’ जनरेटरची माहिती देताना अनिरूद्ध अत्रे  एवढे टिकाऊ आणि उपयोगी साहित्‍य बनवण्‍याचा कारखाना साधा आहे. पुण्‍यातील कर्वेनगर रोडजवळ अनिरुद्ध अत्रे यांच्‍या घराच्‍या पार्किंग लॉटमध्‍ये पत्र्याची शेड लावून उभारण्‍यात आलेल्‍या या कारखान्‍यात सौरऊर्जेवर चालणा-या उपकरणांचे उत्‍पादन होते. अनिरुद्ध अत्रे आणि आशीष गावडे यांच्‍यासोबत इतर तीन इंजिनीयर, तीन ऑपरेटर असा स्‍टाफ काम करत आहे. त्‍या जोडगळीने 2011 सालच्‍या मार्च-एप्रिलमध्‍ये ‘पॅडेल जनरेटर’ तयार केला. त्‍यानंतरच्‍या नोव्‍हेंबर महिन्‍यात त्‍यांनी सौर दिव्‍यांची निर्मिती सुरू केली. यापैकी पॅडेल जनरेटरची किंमत नऊ हजार रूपयांपर्यंत आहे.

लोडशेडींगचा सामना कराव्या लागणा-या गावांना सौर दिव्यांमुळे नवी आशा मिळाली आहेआशिष गावडे आणि अनिरुद्ध अत्रे, या दोघांना ऊर्जाक्रांती घडवायची होती आणि त्‍या दिशेने त्‍यांचा यशस्‍वी प्रवास सुरू आहे. त्‍यांच्‍या समर्पण वृत्तीमुळे रघुनाथ माशेलकर आणि रशीद किडवाईंसारखी व्‍यक्तिमत्‍वे त्‍यांच्‍या संस्‍थेला सल्‍लागार म्‍हणून लाभलेली आहेत.

भारताला भेडसावणा-या पाणी आणि शिक्षण ह्या अतिमहत्‍वाच्‍या घटकांकडे त्‍या जोडगोळीने आता आपला मोर्चा वळवलेला असून, ह्या क्षेत्रामध्‍येसुद्धा नवीन पहाट फुलवायचा संकल्‍प त्‍यांनी केलेला आहे.डॉ. रशीद किडवाईडॉ. रघुनाथ माशेलकर

बॉटम ऑफ पिरॅमिड एनर्जी अॅण्‍ड एनव्‍हायरोन्‍मेंटल प्रा.लि.
कार्यालय संपर्क – 91 86007-19636
ईमेल – sales.bopeei@gmail.com
वेबसाईट – www.bopeei.in

विवेक तेंडुलकर
9324901291
vivektendulkar@gmail.com
(ऋतुगंध मासिक मार्च 2012मधून)

About Post Author