सोलापूर महापालिकेची देखणी इमारत

0
38
carasole

जगभरातील सर्वोत्कृष्ट स्थापत्य पद्धतीचा वापर करण्यात आलेली देखणी इमारत ‘इंद्रभुवन’! उद्योजक मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद यांनी सोलापूर शहराच्या सुवर्णवैभवी काळाची साक्ष देणारी ती इमारत 1899 साली बांधण्यास सुरुवात केली. तिचे बांधकाम तेरा वर्षे चालले. त्यांच्या कायमस्वरुपी वास्तव्यासाठी व्हिक्टोरियन स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली ती इमारत (नव्हे महालच) बांधली. त्यांना त्या बांधकामासाठी साडेचार लाख रुपये खर्च आला. त्यांनी जगभर दौरे करून त्या इमारतीसाठी सुबक व आकर्षक वस्तू आणल्या; जगभरातील अत्याधुनिक बांधकाम साहित्यही वापरले. जगातील विविध स्थापत्यकलांच्या मिश्रणातून तो प्रासाद साकारला गेला आहे. ती इमारत इ.स. 1912 साली पूर्णत्वास आली, पण त्याआधी 1911 साली आप्पासाहेब वारद यांना मृत्यू आला व त्या भव्य महालात त्यांना राहता आले नाही. वारद कुटुंबीय त्या ‘इंद्रभुवन’मध्ये राहू लागले. त्यांना नंतरही वारद कुटुंबीयांना आणखी दोन लाख खर्च आला. नंतर ती शासनाने ताब्यात घेतली. 1964 साली सोलापूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्यावर शासनाने पालिका कार्यालय त्या इमारतीत हलवले. आता शासकीय कार्यालये, मामलेदार कचेरी व न्यायालय त्या इंद्रभुवनमध्ये आहे.

त्या इमारतीच्या प्रत्येक खांबावर सिंह व वाघाची प्रतिकृती आहे. अनेक देवता, नृत्यांगणा, प्राणी व फळे यांची शिल्पे जागोजागी कोरली आहेत. सोलापूरची शान असलेल्या ‘इंद्रभुवन’चा गौरव करण्यासाठी टपालखात्याने 2004 साली त्या इमारतीचे चित्र असलेले टपाल तिकिट काढले.

About Post Author