Home लक्षणीय सेंद्रीय शेतीचे आग्रही – अरुण डिके

सेंद्रीय शेतीचे आग्रही – अरुण डिके

carasole

अरुण डिके हे इंदूरमध्ये ‘रंगवासा जैविक ग्राम संस्थान’च्या माध्यमातून सेंद्रीय शेतीचे नवनवे प्रयोग करत असतात. त्यांचा ध्यास नामशेष होत चाललेल्या बहुमोल पिकांचे बहुपीक लागवडीत पुनरुज्जीवन हा आहे. ते म्हणतात, “निसर्ग माणसाला भरभरून देत असतो. ते जर त्याला घेता आले, तर माणसाला कशाची कमतरता भासणार नाही. शेतकऱ्यासही ते लागू आहे. शेतातील टाकाऊ जैविक घटकांचा – शेण, शेतातील जनावरांचे मूत्र, गूळ-बेसन कुजवून जर शेतीसाठी उपयोग केला, तर जमिनीचा पोत सुधारेल. शेतीवरील खर्च कमी होईल व उत्पादकता वाढेल.” अरुण डिके यांच्या गेल्या तीस वर्षांच्या कार्याच्या माध्यमातून त्यांचे म्हणणे जाणून घेता येते.

अरुण डिके यांचा जन्म २२ मार्च १९४० रोजी मध्‍यप्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सनावद येथे, तर माध्यमिक शिक्षण इंदूरला झाले. सनावदला सहकारी बँक सुरू करून भरभराटीला आणल्याबद्दल त्यांच्या वडिलांना महादेव डिके यांना होळकर शासनाचे ‘रायरतन’ (‘पद्मश्री’ सारखे) पद मिळाले होते. अरुण डिके हे भोपाळजवळील ‘रफी अहमद किदवई कृषी महाविद्यालया’तून कृषी वनस्पतीशास्त्रात १९६४ साली द्विपदवीधर झाले. त्यांनी १९६४-६७ दरम्यान कृषी महाविद्यालयाच्या हायब्रीड कापूस संशोधन केंद्रात खांडवा व इंदूर येथे काम केले. त्यांना तेथे काम करत असताना पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्ष शेतीकाम यांतील तफावत जाणवली. त्यांनी त्या संशोधनाचा शेतक-याला काहीही उपयोग होणार नाही हे समजल्यामुळे ती नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी मुंबईला ‘सायनामिड’ या अमेरिकन कीटकनाशक कंपनीत १९६७ साली प्रवेश केला. अरुण डिके मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या तीन राज्यांत कंपनीची औषधे विकण्याच्या कामावर रुजू झाले. खरे तर कंपनी बंद होण्याच्या मार्गावर होती, पण पश्चिमी उत्तर प्रदेशात मेरठ, सहारनपूर, बरेलीसारख्या जिल्ह्यांत १९६९-७० मध्ये ऊसाच्या पिकाला ‘पायरिला’ या साखर खाणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झाला. त्या किडीची साथच पसरली होती. इतकी की ती कीड ऊसावरून गव्हाच्या पिकावर गेली. त्याकरता मध्य प्रदेश सरकारने उपाययोजना म्हणून पिकांवर हवाई फवारणी करण्याचा निर्णय घेतला. ते काम सायनामिड कंपनीला मिळाले. कंपनीच्या ‘मेथालियार अल्ट्रा लो वाल्यूम’ या कीटकनाशकाच्या फवारणीमुळे जवळपास चौतीस लाख हेक्टर जमिनीतील पिकावरील ‘पायरिला’ नष्ट झाला. त्या कामामुळे ‘सायनामिड’ पुन्हा तगली. ते भारतातील हवाई फवारणीचे पहिले उदाहरण होते. मात्र, त्यानंतर कंपनीने ‘थाईमेट’ या दाणेदार कीटकनाशकाद्वारे अवलंबलेले शेतक-यांचे खिसेकापू धोरण डिके यांना आवडले नाही. त्यामुळे त्यांनी १९७२ ला नोकरीचा राजीनामा दिला.

डिके यांनी हायब्रीड बियाणे, औषधे व खतांचे दुकान १९७२ मध्ये सुरू केले. त्यांनी रासायनिक शेती करत असताना गरजेतून काही यंत्रे तयार केली. शेतकरी दाणेदार विषारी कीटकनाशके हाताने टाकायचे. तेव्हा डिके यांनी त्यांचे इंजिनीयर मित्र अरुण महोदय यांना बरोबर घेऊन ‘ग्रेनुलगन’ हे बंदुकीसारखे यंत्र तयार केले. यंत्राचा चाप दाबला, की दाणेदार औषध बाहेर पडे. तसेच, डिके यांनी बियाण्यांना औषध चोळण्यासाठी ‘किसान सीड ड्रेसर’ यंत्र तयार केले.

त्याच दरम्यान, प्रसिद्ध चित्रकार विष्णू चिंचाळकर यांनी पीटर टॉम्पकिन व ख्रिस्टोफर बर्ड या दोन इंग्रजी पत्रकारांनी लिहिलेले ‘सीक्रेट लाइफ ऑफ प्लांटस्’ हे पुस्तक त्यांना वाचण्यास दिले. अरुण डिके सांगतात, “ते पुस्तक वाचून वनस्पतीशास्त्रात द्विपदवीधर होऊन सुद्धा रोपांचे अंतरंग मला समजलेलेच नाही याची लाज वाटली. त्यानंतर सेंद्रीय शेतीवरील मराठी व इंग्रजी पुस्तकांचा अक्षरश: फडशा पाडला. त्यातून गांडुळाची खरी ओळख झाली. गांडुळाच्या कार्याची माहिती मिळाली. सेंद्रीय शेतीचे महत्त्व पटले. मग रसायन विक्री केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आणि सेंद्रीय शेतीची वाट धरली.”

अरुण डिके यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले. त्यांच्या शेतात त्यांनी जपानचे नैसर्गिक शेतीचे भीष्म पितामह मासानोणु फुकुओका यांचा गोळी पेरणी व कोल्हापूरच्या प्रयोग परिवाराचे श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचा सूर्यशेतीचा प्रयोग एकत्रित केला. फुकुओका यांच्या प्रयोगाप्रमाणे पाच घमेली शेतमाती कुटली. त्यात पाच घमेली कुजलेले शेणखत घातले. त्यात अर्धा किलो गहू, दोनशे ग्रॅम हरभरा, अर्धा किलो मेथी, पन्नास ग्रॅम तीळ, पन्नास ग्रॅम मोहरी ही बियाणी मिसळली. त्याचा गोमूत्र शिंपडत पिठासारखा गोळा केला. त्याच्या लहान गोळ्या केल्या. दाभोळकर यांच्या सूर्यशेतीच्या प्रयोगाप्रमाणे भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तर पीक जोमाने वाढते. त्यामुळे शेतात रोपांमध्ये व रोपांच्या रांगांमध्ये एकेक फूट अंतर सोडले. तेथे मूठभर गांडूळ खत ठेवून त्यावर बियाण्यांच्या गोळ्या ठेवल्या. त्यावर पुन्हा गांडूळ खत ठेवले. झारीने त्या गोळ्यांवर पाणी सोडले. नंतर दर पंधरा दिवसांच्या अंतराने चार वेळा पाणी दिले. रोपे उगवल्यावर गहू व मोहरी ठेवून हरभरा, मेथी, तीळ यांची रोपे उपटून टाकली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करून मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कापणी केली. त्या शेतीतून अर्धा किलो गव्हापासून साडेपाच क्विंटल गहू व पन्नास ग्रॅम मोहरी पेरून पन्नास किलो मोहरी असे उत्पादन झाले! त्यांनी तो प्रयोग अर्धा एकर शेतजमिनीत यशस्वी केला.

त्यांनी शेतात पारंपरिक पद्धतीने एकच पीक न घेता बहुपीक पद्धतीने व गाई, शेळ्या व कुक्कुटपालन अशी मिश्र शेती केली. शेतातील पाणी वाहून जाऊ नये म्हणून शेताच्या बाजूने उतारावर चर मारून शेततळे बांधले. त्यात खाली पाचशे मायक्रॉनची फिल्म बसवली. त्याला वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात. त्यामुळे वर्षभरात त्यांना तीन सिंचने अधिक मिळाली. डिके यांनी तलावात आलेले मासे न विकता शेतक-यांना वाटून टाकले.

डिके सांगतात, “शेतात बासाच्या काटक्यांपासून शुष्क संडासदेखील बांधला आहे. त्यासाठी चार बाय चारचा खड्डा खणला. त्यात दोन हजार गांडुळे व शंभर किलो कुजलेले शेणखत टाकले. त्या शुष्क संडासामुळे पाण्याची बचत नव्वद टक्के झाली. शिवाय, मानवी मैल्यामुळे वर्षभरात चांगले खत मिळाले. तसेच, गोलाकार न्हाणीघर बांधून त्याच्या पाण्यावर गोलाकार परसबाग फुलवली, त्याला ‘गंगम्मा मंडल’ असे म्हणतात. मिश्र शेतीतून पंधरा ते सोळा पिके एकाच वेळी घेतो. चौदा एकरांच्या जमिनीत भात, मका, कारळे, बाजरी, ज्वारी, अंबाडी, कडधान्ये, डाळी, कापूस, भुईमूग, एरंड, पेरू, पपई, आंबे, चिकू, आवळा, चिंच, जांभूळ अशा जीवनाश्यक सर्व खाद्यपदार्थांची पिके लावली आहेत.”

अरुण डिके यांनी १९८२ साली नाबार्डने दिलेल्या सतरा लाख रुपयांच्या मदतीने ‘बायो लॅब’ सुरू केली. त्यात रासायनिक खते व रासायनिक औषधे यांचे विकल्प म्हणून जैविक खते व कीटकनाशके तयार होतात. त्याची विक्री भारतातील दहा राज्यांत होते. आता बायो लॅबचे काम त्यांचा मुलगा अभिराम व पुतण्या जीवन डिके पाहतात.

रंगवासा गाव इंदूरपासून तेरा किलोमीटरच्या अंतरावर आहे. तेथे डिके यांनी शहरी लोकांना व शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शेतीतून स्वावलंबन शिकवण्यासाठी पाच एकर क्षेत्रात ‘रंगवासा जैविक ग्राम संस्थान’ उभे केले आहे. ते सेंद्रीय खाद्यपदार्थांव्यतिरिक्त शेंगदाण्यापासून शेतातच घाणीचे तेल, पीनट बटर, कडधान्याची बिस्किटे तयार करून घेतात. अंबाडीच्या पानांचे कूट, अंबाडीच्या फुलांपासून शीतपेय आणि मोरंबा बनवून त्याची विक्री केली जाते. अंबाडीच्या फुलांपासून वाइन बनवण्याचा त्यांचा मानस आहे. अंबाडीच्या खोडापासून उत्तम प्रतीचा तागा मिळतो. त्यापासून दोऱ्या बनवल्या जातात. त्यांनी शेताच्या चहुबाजूला एरंड लावले आहेत. एरंडाच्या मुळाजवळ जमिनीला पोषक सूक्ष्म जीवाणू आपोआप येतात. एरंडाच्या फळापासून तेल काढले जाते. रॉकेलच्या जागी एरंडेल तेलाचा उपयोग केला जातो.

त्यांच्या बायो लॅबची पाहणी अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळाने स्थापन केलेल्या ‘सेंद्रीय शेती टास्क फोर्स’च्या भारतातील पंधरा सदस्यांनी २००४ साली केली. अरुण डिके यांनी मध्य प्रदेशमध्ये गांडूळ शेती १९९२ साली सुरू केली. तसेच जैव खते व कीटकनाशके यांचा प्रकल्प उभा केला. अरुण डिके यांनी ‘लोकसत्ता’ वर्तमानपत्रात लिहिलेला ‘देणारे हात घेणारे का झाले’ हा लेख वाचून महाराष्ट्रातील पाच आयटी इंजिनीयर, वकील माने खेड्यात शेती करण्यास जाण्याआधी सल्ला घेऊन गेले. शिवाय, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्थान या राज्यांतील कित्येक शेतकरी प्रशिक्षण घेऊन गेले.

अरुण डिके यांनी कोल्हापूरच्या प्रयोग परिवाराची शाखा इंदूरला स्थापन केली आहे. त्या परिवाराचे पंधरा शेतकरी, ‘सायन्स इकोटेक’ संस्थेचे अंबरीश केला, ‘जिमी मॅकगिलिगन सस्टेनेबल, अॅग्रीकल्चर व सस्टेनेबल फूड नेटवर्क’च्या पद्मश्री जनक पलटा यांनी मिळून शेतकरी व ग्राहक यांना जोडणारा ‘जैविक सेतू’ हा उपक्रम सुरू केला आहे. श्री. केला यांनी स्वत:ची इंदूरला लागून असलेल्या भिचोली मर्दाना गावी जागा जैविक सेतूसाठी उपलब्ध करून दिली. जैविक सेतूवर बुधवारी व रविवारी पंधरा शेतकरी सेंद्रीय भाज्या, फळे व इतर खाद्यान्न विकण्यासाठी येतात. शेतकरी शेतमाल ‘जैविक सेतू’द्वारा थेट ग्राहकाला विकतो. त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या खर्चाच्या तुलनेत पन्नास टक्के जास्त मोबदला मिळतो. दोनशेच्या वर ग्राहक त्या बाजाराचा फायदा घेतात. रोज दहा ते पाच या वेळात तेथे सर्व तऱ्हेचा जैविक किराणा माल विकला जातो. शेतकऱ्याला शेतात कष्ट करूनसुद्धा उत्पादनाच्या एकोणीस टक्के फायदा फक्त मिळतो. त्यातून ‘जैविक सेतू’ ही कल्पना पुढे आली. शेतक-याला शेतमाल विक्रीच्या पाच टक्के पैसे जैविक सेतूच्या मेंटेनन्ससाठी भरावे लागतात. जैविक सेतूच्या माध्यमातून शेतक-याच्या शेताची पाहणी केली जाते. प्रयोगशाळेत त्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करून, त्यात रासायनिक घटक नसल्याची खातरजमा केली जाते. शेतक-याकडून ‘फक्त सेंद्रीय शेतमालच विकणार’ असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. त्यात फसवणूक झाल्यास संपूर्ण जबाबदारी त्या शेतक-याची असल्याची हमी घेतली जाते. त्यानंतरच त्याची शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी केली जाते.

अरुण डिके सेंद्रीय शेतीमध्ये कार्वर, अल्बर्ट हॉवर्ड, जपानचे फुकुओका व श्रीपाद अच्युत दाभोळकर या शेतीतज्ज्ञांना गुरू मानतात. अरुण डिके यांनी सेंद्रीय शेती व शेतमालाच्या प्रचार-प्रसारासाठी ‘एज्युकेशनल एकड क्राफ्ट’ नावाची संस्था १९९२ साली सुरू केली. त्यात कृषिप्रदर्शनासाठी सीडीज व पथनाट्य, बॅनर्स, क्लिपचार्ट, प्लेकार्ड, बोर्ड तयार केले जातात. डिके यांनी अल्बर्ट हॉवर्ड यांच्या ‘अॅन अॅग्रीकल्चर टेस्टामेंट’ या पुस्तकावर ‘भारतीय शेतीचे वारसापत्र’ नावाचे अनुवादित पुस्तक लिहिले आहे. त्यांनी पुण्याहून प्रसिद्ध होणा-या ‘बळीराजा’ मासिकातून क्रमाक्रमाने त्या पुस्तकातील भाग प्रसिद्ध केले. डिके यांनी ‘हमारी खेती – कल, आज और कल’ हे पुस्तक लिहिले. त्यांनी त्याचे मराठी भाषांतर ‘आमची शेती आमची माती’ प्रकाशित केले आहे. त्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतरही डिके यांचे अमेरिकास्थित मित्र प्रभाकर पंडित यांनी केले. पराशर, वराहमिहिर, कश्यप, सुरपाल, सारंगधर ऋृषींनी पारंपरिक शेतीवर भरीव काम केले आहे. त्याची माहिती कोठल्याही कृषी विद्यापीठात नाही याची डिके यांना खंत वाटते. त्यांनी कार्वर यांची शेतीविषयक पुस्तके हिंदीत भाषांतरित केली आहेत. त्यांचे ‘ग्रामीण अर्थव्यवस्था – आज की आवश्यकता’ या पुस्तकाच्या लिखाणाचे काम सुरू आहे. डिके शहरी ग्राहक व शेतक-यांना जोडण्यासाठी ‘दानापानी’ हे मासिक चालवतात.

अरुण डिके व त्यांचे मित्र डॉ. अरविंद दाभोळकर यांनी डॉ. क्लॉड अल्वारिस यांच्या ‘ऑर्गॅनिक फार्मिंग सोर्स बुक’वरून भाषांतरित केलेले ‘संपूर्ण सेंद्रीय शेती’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. डिके यांनी सेंद्रीय शेतीत एवढी भरघोस कामगिरी करूनही ते पुरस्कारांपासून लांब राहिले आहेत!

अरुण डिके यांना दोन मुली व एक मुलगा. मुलगा डिके यांचे काम इंदूरला राहून पुढे पाहतो. एक मुलगी बंगलोरला असते. दुसरी पुण्याला त्रिवेणीत असते. ती सेंद्रीय शेतीसंबंधातच काम करते. त्यांचे मोठे भाऊ कै. बाबा डिके हे मोठे नाटककार होते.

अरुण डिके – 9425064315
website –
www.indobioagri.in

– वृंदा राकेश परब

About Post Author

10 COMMENTS

  1. शेतकऱ्यांसाठी अत्यंत
    शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण लेख आहे
    आशा सुंदर लेखनाबद्दल आभारी आहोत

  2. Brief but timely introduction
    Brief but timely introduction to the pioneering work being done by Arun Dike, far from the limelight and publicity.

    His work needs wider recognition in India, especially in Maharashtra.

    *

  3. Extremely nice write up. Your
    Extremely nice write up. Your Experience and knowledge should reach to maximum number Farmers of India. The Book being published will partly cater to the requirement.
    My best wishes will be always with you. I know, I will not be of any help in your Project, still if you find that I can do something for you , please tell me without hesitation. I shall be glad to do it.
    Please correct one sentence of last para. (दुसरी पुण्याला त्रिवेणीत असते)
    Your efforts to promote Organic Farming will change the very Chemistry of Farming.
    ALL THE BEST,

  4. Arun maze mitra aahet.Tyanchi
    Arun maze mitra aahet.Tyanchi sendriya sheti baddal vichar dhara stutya aahe.Tyanchya baddal mahiti chhan vatali.Lekhikeche kautuk.

  5. Congratulations, Well
    Congratulations, Well deserving . Your efforts to promote Organic Farming will definitely bring Positive Results,
    In last para one sentence need correction— “दुसरी पुण्याला त्रिवेणीत असते” Well now not in your hands.
    The Article is fantastic anyway.

  6. मला संपूर्ण सेंद्रीय शेती हे…
    मला संपूर्ण सेंद्रीय शेती हे पुस्तक विकत पाहिजे

  7. sir really inspiring work,…
    sir really inspiring work, and a great personality. your positive approach towards women farmers and your efforts to promote organic farming is need of this era. for this article very very thanks sir.

    14-9-2018

  8. डिके काकांना नमस्कार,…
    डिके काकांना नमस्कार,

    सेंद्रिय शेती संबंधी माहिती गोळा करत असताना त्याच्या साध्या आणि सोपी पद्धतीची माहिती सहज मिळाली. मी आशा करतो कि येणाऱ्या काही वेळात मी स्वतः आपल्या संस्थेला भेट देऊन पूर्ण माहिती समजावून घेण्याच्या आणि शेत जमिनीत त्याचा अवलंब करण्याचा प्रयन्त करेल.

    वृंदा ताईंनी त्याची संग्रहित माहिती सगळ्यांना मोफत उपलब्ध करून दिली याबाबत तुमचे सुद्धा धन्यवाद.

    Abhijeet D (9552557848)

Comments are closed.

Exit mobile version