सूर्यकुंभ

3
27
carasole1

सूर्यकुंभ उपक्रमात मुलांसाठी ठेवण्‍यात आलेले सोलार कुकरसौर ऊर्जेचा वापर केवळ वीजनिर्मिती करण्यासाठी नसून, इतरही अनेक जीवनावश्यक गरजांसाठी करता येतो, या विचाराने प्रेरित होऊन एक अनोखा प्रयोग, मुंबईनजीकच्या भाईंदरजवळ उत्तन येथील ‘केशवसृष्टी’त ४ जानेवारी २०१४ या दिवशी पार पडला. ‘सूर्यकुंभ’ हे त्या प्रयोगाचे नाव.

सौर ऊर्जेचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना समजावे, सौर ऊर्जेचा वापर करून अन्न कसे शिजते हा प्रयोग त्यांनी स्वत: करावा या उद्देशाने या सूर्यकुंभ प्रयोगाची योजना आखली गेली. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने, केशवसृष्टीत ‘रज्जुभय्या एनर्जी पार्क’ची स्थापना केली गेली आहे. (त्याचे नाव आता ‘प्रो. राजेंद्रसिंग ऊर्जा अभियान’असे ठेवण्यात आले आहे.) ‘केशवसृष्टी’च्या कार्यालयातील उपकरणे त्या योजने अंतर्गत,सौर ऊर्जेवर चालवली जातात.

‘केशवसृष्टी’तील सूर्यकुंभ प्रयोगासाठी मुंबईतील चोपन्न शाळांशी संपर्क साधला गेला. त्या शाळांमधील चौथी ते नववी या इयत्तांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केली गेली. सूर्यकुंभ प्रयोगात तीन हजार चारशेचौऱ्याऐंशी विद्यार्थी व एकशेऐंशी ट्रेनर यांचा सहभाग घेतला गेला. अजून एका गोष्टीचा उल्लेख करणे गरजेचे आहे, की विद्यार्थ्यांमध्ये अनेक मूकबधिर मुलांचाही समावेश होता.

रज्जुभैया एनर्जी पार्क संबंधात काम करणारे ‘केशवसृष्टी’तील पदाधिकारी भारतभर फिरत असतात. त्या भ्रमंतीमध्ये त्यांची जालना येथील विवेक काबरा या तरुण (वय वर्षे एकोणतीस) इंजिनीयरची भेट झाली. विवेक काबरा सौर ऊर्जेसंबंधात गेल्या पाच-सहा वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी ‘सिंप्लिफाइड टेक्नॉलॉजीज फॉर लाइफ’ या कंपनीची स्थापना केली आहे. त्यामार्फत ते सोलर कुकर तयार करतात. त्याचा वापर करून, जालना येथील शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र जमून अन्न शिजवले, ती घटना आहे १९ जानेवारी २०१३ची. विवेक काबरांनी भरवलेला ‘सूर्यकुंभ’चा तो पहिला प्रयोग. सोलर कुकिंगचा जगातील सर्वांत पहिला मोठा क्लास. त्यासाठी जालन्यातील व आजुबाजूच्या एकशेसात शाळांतील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी व दोनशेसहा ट्रेनर एकत्र आले होते.

सूर्यकुंभ प्रयोगासाठी ४ जानेवारी हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे तो ‘केशवसृष्टी’चा रौप्यमहोत्सवी दिवस होता. त्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून भाईंदरकडून उत्तनकडे जाणारे रस्ते विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बसेसनी व्यापून टाकले होते. प्रवेशद्वारातून आत जाताना, प्रत्येक विद्यार्थ्याला पांढरी, हिरवी अथवा केशरी रंगांची टोपी देण्यात आली. टोपी घालून विद्यार्थी जेव्हा राम रत्ना विद्यामंदिराशेजारच्या केजरीवाल मैदानाच्या दिशेने चालत होते, तेव्हा जणू भारताचा तिरंगा ध्वजच लहरत आहे असा भास होत होता. मैदानाच्या बाहेर तीन काऊंटिंग मशिन्स बसवली होती. मैदानावर जसा एकेक विद्यार्थी प्रवेश करत होता, तशी त्याची नोंद त्या मशिनवर होत होती.

आवारात सकाळपासून मधुर गीतांचे स्वर घुमत होते. उदाहरणार्थ, ‘कदम कदम बढाए जा…, सूर्यदेव दिनेश है, बारबार हो प्रणाम…’, सचिन तेंडुलकरची निवृत्ती झाली, त्यावर आधारित गीतही होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, हॉटेल उद्योजक विठ्ठल कामत; तसेच, लोकप्रिय कलाकार दिलीप जोशी उर्फ जेठालाल (तारक मेहता का उल्टा चष्मा सिरियलमधील) उपस्थित होते.

सुरुवातीला विवेक काबरा यांनी जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सौर ऊर्जेविषयी माहिती दिली. प्रत्येक विद्यार्थ्याला एक सोलर कुकर दिला गेला. त्या कुकरमध्ये अॅल्युमिनियम शीट होते. ते बाहेरून काळ्या रंगाचे व आतून पांढर्याल रंगाचे होते. अॅल्युमिनियम शीट कसे व कुठे दुमडायचे हे काबरा यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सोलर कुकरमध्ये ठेवण्यासाठी (मॅगी शिजवण्यासाठी) बाहेरून काळा रंग असणारा अॅल्युमिनियमचा डबा होता; तो डबा प्रत्येकाने कुठे ठेवायचा हेही काब्रा यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याला मॅगीच्या पाकिटासोबत, मॅगीत घालण्यासाठी चिरलेल्या भाज्याही दिल्या गेल्या होत्या. उदाहरणार्थ, गाजर, मटार. सर्व विद्यार्थी तयार झाले होते.

 विद्यार्थी सूर्यचूलीच्‍या साह्याने मॅगी तयार करतानाविद्यार्थी सूर्यचूलीच्‍या साह्याने मॅगी तयार करतानाघंटा वाजल्याबरोबर, विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रत्येकाच्या सोलर कुकरमधील अॅल्युमिनियम शीट दुमडून त्यावर डबा ठेवून डब्यात मॅगी नूडल्स, भाज्या व पाणी घातले आणि डबा सोलर कुकरवर सांगितलेल्या जागी ठेवला. पंचेचाळीस मिनिटांत मॅगी तयार झाले. नंतर त्याचा आस्वाद सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. प्रमुख पाहुण्यांनाही राहवेना. त्यांनीही विद्यार्थ्यांजवळ जाऊन मॅगीची चव घेतली व आनंद लुटला.

ना गॅस, ना सिलेंडर, ना काडेपेटी, ना खूप भांडी… आणि केवळ काही मिनिटांत स्वादिष्ट मॅगी स्वत: बनवल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवरून ओसंडत होता. एखादी खाण्याची वस्तू स्वत:च्या हाताने, प्रथमच बनवल्याचा तो आनंद होता.

सूर्यकुंभ प्रयोगाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सचे तीन प्रतिनिधी (या प्रतिनिधींना ‘केशवसृष्टी’ने आमंत्रित केले होते) शिरीष केदारे, विष्णुदासजी दरक व शेफ लोबो हे कार्यक्रमाला उपस्थित होते. ते तिघेजण त्या प्रयोगाचा रिपोर्ट, सर्व कागदपत्रे, व्हिडिओज, फोटो, न्यूज रिपोर्ट सादर करतील व त्यानंतर त्या प्रयोगाची नोंद गिनीज बुकमध्ये होणार की नाही ते ठरवले जाईल.

प्रमुख पाहुण्यांची भाषणे व त्यानंतर राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपला. राष्ट्रगीत चालू असताना असंख्य फुगे – पांढऱ्या, हिरव्या, केशरी रंगांचे – आकाशात सोडले गेले.

कार्यक्रमानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला ते सोलर किट भेट म्हणून दिले गेले. त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या मित्रमैत्रिणींना किटचा वापर करून, अन्न कसे शिजवायचे याचे प्रात्यक्षिकही देऊ शकतील. तसेच, स्वत:ही परत त्यात अन्न शिजवून खाऊ शकतील.

वीजेच्या टंचाईला सौर ऊर्जा हा उत्तम पर्याय आहे. त्यात ना प्रदूषण, ना पर्यावरणाची हानी हा संदेश उत्तम रीतीने शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोचवला गेला.

संपर्क –
विवेक काबरा – ९९६०६८६३९३
जगदीश पाटील (केशवसृष्‍टी व्‍यवस्‍थापक) – ९८३३७१८३३५

– पद्मा कऱ्हाडे

About Post Author

3 COMMENTS

  1. VERY GOOD BUT VIDEO SHOOTING
    VERY GOOD BUT VIDEO SHOOTING WAS NOT GOOD> CONG FOR PROG

  2. I am proud of you.We can do
    I am proud of you.We can do fantastik work .Let us hope for bright future by using solar energy.My best wishes to your project.

Comments are closed.