सुरेश भट, आयुष्यभर लढतच राहिले! (Suresh Bhat)

-heading

सुरेश भट यांनी राजकारणावर जबरदस्त लिहिले आहे. आचार्य अत्रे काय किंवा भट काय अशी माणसे ही खरोखरीच तत्त्वनिष्ठ असतात. जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या मनात खरे कोण, खोटे कोण अशी संभ्रमाची अवस्था तयार होते, तेव्हा अशा साहित्यिकांची उणीव फार जाणवते. आचार्य अत्रे यांचा ‘मराठा’ वाचून लोक नुसता आनंद घेत नसत, तर मते तयार करत. त्यांची टीका ही राजकारणातील वायफळ बडबडीवर व फोल योजनांवर असे. त्यांना समाजाचे भले हवे असायचे. त्यांना त्यांचे भलेपण मांडण्यास राजकारण्यांच्या कोलांट्या उड्या खाद्य पुरवत. अत्रे यांच्या वेळी एखादेच स.का. पाटील होते किंवा भट यांच्या वेळी एखादेच राजनारायण होते, आता तर मतदारसंघनिहाय राजनारायण झाले आहेत. अशा वेळी तशा साहित्यिकांची कमतरता जाणवते. अत्रे यांच्यानंतर भट हे एकमेव असे साहित्यिक होते, की ज्यांचा राग ना काँग्रेसवर होता ना भाजपवर, ना समाजवाद्यांवर. त्यांचा राग होता तो फालतू घोषणा, बेगडी राजकारणी आणि खोट्या पक्ष ध्येयधोरणांवर. त्यांनी शिवसेना असो की भाजप; किंवा काँग्रेस असो की समाजवादी, कोणालाही सोडले नाही. त्यामुळे त्यांची उणीव भासते. ते असते तर?… हे खरेच, की जरतरला काही अर्थ नसतो. 

भट यांनी राजकारणाबाबत 2 डिसेंबर 1994 ला लिहिलेल्या एका लेखातील दोन-तीन ओळी : “मला खरोखरच राजकारणात रस नाही. मी जीवनावर प्रेम करणारा, जीवनरसाचा एकेक थेंब चवीने चाखणारा इसम आहे. पण जेव्हा देशाचे धिंडवडे निघतात, महाराष्ट्राचे अस्तित्वच संपुष्टात, धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा मी उत्तम कवी म्हणून गप्प बसावे काय?” पुढे ते लिहितात, “कवी हा सौंदर्य व प्रेम यांचा पुजारी असतो. पण आमच्या जगण्याच्या ह्या उकिरड्यावर मी नुसती कविता चघळत बसायचे काय?”

भट यांनी समस्त मानवजातीच्या हितासाठी लढण्याचा ठेकाच घेतला होता! त्यांनी अगदी विनोबा भावे यांच्यापासून ते बाबा आमटे यांच्यापर्यंत समाजकारण्यांनाही वेळोवेळी प्रश्नि विचारून अडचणीत आणलेले दिसते. त्यांना कोणीही भोंदूपणे वागलेले आवडत नव्हते; मग तो कोणी का असेना, कितीही मोठा का असेना. म्हणून त्यांनी ज्या भाजपविरुद्ध कायम लेखणी चालवली, त्या भाजपच्या रामदास नायक यांची भरदिवसा हत्या होताच शरद पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती! भट यांनी मुंबई बॉम्बस्फोटानंतर लगेच भाजपचे मुरली मनोहर जोशी यांनी दिल्लीत पाक राजदूत रियाझ हुसेन खोकर यांना दिलेल्या मेजवानीविरुद्ध जेवढ्या धाडसाने लिहिले, तेवढेच ‘बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांची काळजी वाहतात’ हेही ठणकावून सांगितले. बाळासाहेब व शरद पवार यांच्यावर धाडसाने लिहिणारे ते एकमेव साहित्यिक होते. त्याचा अर्थ त्यांचे वैर त्या दोघांशी नव्हते. ते दोघांचेही चांगले मित्र होते. 

-suresh-bhat-asha-bhosleभट लतादीदींना मानत होते, त्यांच्या मित्राची मोठी बहीण म्हणून आदर करत होते, पण लताबार्इंनी आळंदीला साहित्य संमेलनात मराठी भाषेबद्दल काढलेल्या उद्गारांवर टीकात्मक लेखन केले. भट सत्यप्रिय होते, मग भट यांचा कितीही जवळचा माणूस असो, त्याने चुकीचे वर्तन केल्यास त्यांची लेखणी चालत असे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अक्षरशः तुटून पडल्यासारखे लिहिले आहे. पण भट जेव्हा आजारी होते, तेव्हा तेच बाळासाहेब त्यांना भेटण्यास गेले. भट यांनीही, ‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा’ असे उद्गार काढले होते! भट यांनी हिरवी टोपी जाणीवपूर्वक परिधान केली होती. ते करण्याची ताकद फक्त आणि फक्त भट यांच्यामध्ये होती. भट अमरावतीला एकदा शेवाळकर वगैरे मित्रांसोबत मुस्लिम मालक असलेल्या एका हॉटेलात जेवण्यास गेल्यावर मुद्दामहून संघाचा वेष परिधान करून गेले होते – खाकी हाफ चड्डी, काळी टोपी वगैरे; आणि भट अस्खलित उर्दूत बोलू लागल्याने हॉटेलमालक चक्रावून गेला. भट यांचे बाळासाहेबांवर प्रेमही तेवढेच होते. त्याचे उदाहरण म्हणजे त्यांनी  ‘मला बाळासाहेब ठाकरे आवडतात’ हा ‘आज दिनांक’मध्ये लिहिलेला लेख. भट यांनी बाळासाहेबांच्या पत्नी, मीनाताई यांचे निधन झाल्यावर एक गझल लिहूनच बाळासाहेबांना पत्र पाठवले होते. ती गझल अशी होती –

 दे, तुझ्या नव्या त्वेषांची तलवार आज देशाला!
दे, तुझ्या दिव्य क्रोधाचा अंगार आज देशाला!
   हो गडगडाट मेघांचा! हो लखलखाट बिजलीचा!
तुजसमोर गिळतो आहे अंधार आज देशाला!
   तू उचल तुझ्या बाहुंनी शिवधनुष्य स्वातंत्र्याचे
   दे, तुझ्या महाराष्ट्राची ललकार आज देशाला!
       तू विसर तुझ्या दुःखांना! तू विसर तुझ्या अश्रूंना!
  दे, डोळे टिपण्याचाही अधिकार आज देशाला!
कर असेच लढता लढता शेवटी जिवाचे सोने
   पाहिजे तुझ्या स्वप्नांचा आकार आज देशाला!
सांभाळ तूच खचलेला संसार मायभूमीचा…
   दे, अपुल्या शिवशाहीचा आधार आज देशाला!

त्यांनी ती 28 ऑक्टोबर 1995 ला लिहिलेली आहे. भट यांचा वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून सुखदुःखात धावून जाणार्याि स्वभावाचा तो एक पैलू होय. भट यांची एक मैफल ‘एल्गार’ नावाने पुण्यात 1998 मध्ये होणार होती. भट यांची इच्छा त्यास बाळासाहेबांनी यावे अशी होती. पण बाळासाहेब त्यापूर्वी जी मुंबईत मैफल झाली होती, तिला उपस्थित होते. त्यामुळे ते येणार नव्हते. त्यांनी भट यांना तसे पत्र लिहिले. त्यात म्हटले, की ‘मुंबईतील मैफिलीत गीत-संगीताचा पारिजातकच जणू बहरून आला होता. तुम्ही, आशा भोसले ही सर्व पद्यातील माणसे आहात आणि मी गद्यातील. माझे मैदान निराळे आहे. तरीसुद्धा तुम्ही अलिकडे काही वर्षांपासून माझ्यावर प्रेम करू लागला आहात. तेही एक आश्चेर्यच आहे. जणू दोन ठिणग्याच एकत्र आल्या. ‘उषःकाल होता होता…’ यासारखी ज्वलंत काव्ये तुमच्याकडून महाराष्ट्राला हवी आहेत. अखंड महाराष्ट्रासाठी तुमची लेखणी परजत राहू द्या. त्यासाठी शिवरायांच्या चरणी तुम्हाला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो, ही प्रार्थना करतो आणि पुन्हा एकवार ‘एल्गार’ला शुभेच्छा देतो.’ असा त्या पत्रातील मजकूर वाचल्यावर कळते, की बाळासाहेबही त्यांना त्यांच्याएवढा दर्जा देत होते. म्हणून तर ते त्यांना ठिणगीची उपमा देत आहेत.

-suresh-bhatभट यांना राजकारणाचा तिटकारा नव्हता. तसे असते, तर ते निवडणुकीला उभेही राहिले नसते. होय, ते एकदा निवडणुकीला उभे राहिले होते. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे  (आंबेडकर-कवाडे) अधिकृत उमेदवार होते. पण ते निवडणूक हरले. मी त्यांना तेव्हा एक पत्र लिहिले होते. त्यावर त्यांनी, ‘आता तू तुझे निष्कर्ष काढ. माझा कोणताही दावा नाही. मला लढणे ठाऊक आहे. आयुष्यभर तेच केले’ म्हणजे त्यांनाही विजयाची खात्री नव्हती. भट आयुष्यभर लढतच राहिले. त्यांना राजकारणाचा तिटकारा जसा नव्हता, तसा राजकीय व्यक्तींबद्दल द्वेष नव्हता. त्यांची मैत्री विविध पक्षांतील अनेकांशी होती. 

भट बनचुके दलित नेते आणि श्रीमंत दलित यांच्याविरुद्ध दंड थोपटून असत. त्यांनी लिहिलेला ‘समुद्र अंतरातला’ हा लेख (11 एप्रिल 1982) पुरावा म्हणून देता येईल. भट यांनी त्यांची लेखणी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी नागपूरचे दलित नेते बाळकृष्ण वासनिक यांच्या पत्नीची नेमणूक विदर्भ रिजनल सिलेक्शन बोर्डावर अध्यक्ष म्हणून केल्यावर परजली. बाबासाहेबांनी ती नेमणूक करताना समर्थन असे केले होते, की वासनिक यांनी आंतरजातीय विवाह केला, हे धाडसाचे कार्य आहे! म्हणून मी त्यांच्या पत्नीला हे पद देत आहे. भट यांनी त्यावर झोड तर उठवलीच, पण त्यांनी ‘वासनिक मागासवर्गीय आहेत. त्यांचा जो काही ठाऊक होऊ शकणारा बँक अकाऊंट आहे तो मागासवर्गीय आहे. त्यांचा नागपूरच्या एल ए डी कॉलेजजवळचा बंगलाही मागासवर्गीय आहे. त्यांची मोटारही मागासवर्गीय आहे आणि त्यांचे बुलडाण्याला होऊ घातलेले सिनेमा थिएटरही मागासवर्गीय आहे.’ अशा शब्दांत खिल्ली उडवली होती. तसे लिहिण्यास धाडस लागते. ज्या भट यांनी भीमवंदना किंवा बौद्धवंदना लिहिली तेच तसे लिहू शकतात! कारण पुन्हा तेच, त्यांचा राग कोणत्याही व्यक्तीवर नव्हता तर प्रवृत्तीवर होता. त्यांनी वेळोवेळी ‘हझला’ (गझलसारखा वृत्तबद्ध पण विनोदी अंगाने जाणारा काव्यप्रकार) लिहिल्या. त्या वाचल्यावर ते खिल्ली कशी उडवत ते कळते. आज जे वातावरण आहे अशा वेळी भट असते तर त्यांची लेखणी शांत बसली नसती. आज, साहित्यिक एकतर उजव्या विचारांच्या बाजूने आहेत, नाही तर विरोधात. काही तर जणू काही एखाद्या पक्षाने नेमलेले प्रवक्ते वाटावेत अशा तर्हेाने लिखाण करत आहेत. खरोखरच, देशाचे हित पाहणारे साहित्यिक किती आहेत? ह्याचा शोधच घ्यावा लागेल. निष्कपट मनाने राजकारणाकडे पाहणारे कविवर्य भट आज न आठवल्यास नवल. खरेच, आज भट हवे होते.

प्रदीप निफाडकर 9922127492
gazalniphadkar@gmail.com

About Post Author

Previous articleमहंत राष्ट्र ते महाराष्ट्र!
Next articleआणि भारताचा नकाशा साकार झाला!
प्रदीप निफाडकर हे उर्दू साहित्य परिषदेचे बिनविरोध निवडून आलेले पहिले मराठी भाषिक अध्यक्ष आहेत. ते व्यवसायाने पत्रकार आहेत. त्यांनी 'सकाळ’, ‘लोकमत’, ‘देशदूत’ अशा विविध वृत्तपत्रांमध्ये उपसंपादकापासून कार्यकारी संपादक पदांवर काम केलेले आहे. त्यांच्या गझलेचा समावेश इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकात आहे. त्यांचे लेखन मराठवाडा विद्यापीठातील बी ए च्या वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात आहे. त्यांचे गीतलेखन प्रसिद्ध आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9922127492

1 COMMENT

  1. भट आणि त्यांचे काल सापेक्ष…
    भट आणि त्यांचे कालसापेक्ष वस्तुनिदर्षण हे तत्कालीन समाजाला आणि राजकीय पक्षांना झेपणारे नव्हते. ज्यांना त्याची कदर होती ते भटांच्या तोलामोलाचे होते. सद्यस्थितीत स्वतःच्या जीवन मूल्यांवर, तत्वांवर विश्वास ठेऊन समाजाचे दीपस्तंभ होऊ शकतील असे साहित्यिक नाहीत. असा विचार हा लेख स्पष्टपणे अधोरेखित करतो. मस्त जमला आहे लेख.
    डॉ मंगेश कश्यप.

    ????

Comments are closed.