सुरंजन खंडाळकर – गाणारा मुलगा

2
62
carasole

सुरंजन खंडाळकर याच्या घरी गाणे हॉलभर जणू भरून राहिलेले आहे. हॉलमध्ये मृदुंग, तबला, वीणा, हार्मोनियम तर शोकेसमध्ये लहानमोठी सन्मानचिन्हे आणि भिंतीवर संगीतातील दिग्गजांसह सुरंजन आणि शुभम् या भावंडांची छायाचित्रे! त्यातूनच त्या मुलांच्या भरीव वाटचालीचे दर्शन होते.

सुरंजनचा जन्म पुण्याजवळ आळेफाटा येथे आजोळी ३० सप्टेंबर १९९३ला झाला. त्याचे बालपण पुण्यात गेले. त्याचे वडील पं. रघुनाथ खंडाळकर हे गायक. त्यांनी मधुसूदन कुलकर्णी आणि जसराज यांच्याकडे शिक्षण घेतले. रघुनाथ खंडाळकर वयाच्या सोळाव्या वर्षांपासून संगीत शिकत आणि शिकवत आहेत. महाराष्ट्रातील जवळजवळ पाच हजार विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे शिक्षण घेतले आहे. रघुनाथ खंडाळकरांनी सुरंजनला वयाच्या तिसऱ्या वर्षी संगीताचे धडे देण्यास सुरुवात केली. ते त्याच्या गळ्यावर शास्त्रीय संगीताचे साज चढवू लागले.

सुरंजनने त्याचे शालेय शिक्षण भारती विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातून पूर्ण केली. त्याने त्याच संस्थेच्या ज्युनियर कॉलेजमधून अकरावी-बारावी पास केले. सुरंजन शाळेत शिक्षकांचा लाडका विद्यार्थी होता, कारण संगीताचा रियाज आणि शाळेचा अभ्यास यांची सांगड तो घालू शके. तो शाळेच्या स्पर्धांमध्येही जिंकत असेच. त्याची शाळेत ओळख गाणारा मुलगा अशी होती. शाळेतील संभाजी कांबळेसर, खैरेसर या शिक्षकांना संगीताची आवड होती.

सुरंजनने त्याची दिशा बारावीनंतर संगीताकडे वळवली. त्याने वाय.एम. कॉलेज, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसमधून प्रथम वर्गात बी.ए. केले. तो एम.ए. (संगीत)च्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. त्याने साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्सही ओंकार केळकर यांच्या शिवरंजनी स्टुडिओतून पूर्ण केला आहे.

सुरंजनच्या घरी त्याचे आईबाबा आणि सातवीतील भाऊ शुभम् असतात. शुभम् २०१०चा ‘सारेगमप’चा ‘लिटिल चॅम्प विनर’ आहे.

सुरंजन वडिलांचे गुरू मधुसूदन कुलकर्णी यांच्याकडून शास्त्रीय संगीत, अभंग, भक्तिगीत यांचे पाठ घेतल्यावर तो पंडित अजय पोहनकर यांच्याकडे शिकत आहे.

सुरंजन सातवीत असताना, त्याने वयाच्या बाराव्या वर्षी ‘प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्याच्या आयुष्यातील पहिल्या महाराष्ट्र स्पर्धेत भाग घेतला आणि त्याने ती दुसऱ्या क्रमांकाने जिंकली. स्पर्धेसाठी मोहनकुमार दरेकर, शोभा अभ्यंकर आणि अशोक पत्की हे परीक्षक म्हणून होते. सुरंजनला त्या स्पर्धेत एक सायकल, एक ट्रॉफी आणि सात हजार रुपये रोख मिळाले. त्याचे ते शाळेबाहेरच्या जगातील पहिले बक्षिस!

नंतर, त्याने अनेक स्पर्धांमधून बक्षिसे मिळवली. त्यात श्रीरंग कला निकेतन, तळेगाव दाभाडे येथील सुगम संगीत, शरद क्रीडा प्रतिष्ठानची भजन संगीत, एड्सविरोधी कँपेनसाठी अशा स्पर्धांचा समावेश होतो. त्यातील एक बक्षीस एक लाख रुपयांचे होते, तर दुसऱ्या एका स्पर्धेनंतर गृहमंत्री कै. आर.आर. पाटील यांनी त्याचा कार्यक्रम येरवडा कारागृहात ठेवला. आर.आर. पाटील फार खूश झाले ते गाणे होते –

“अवघ्या जगाला वेढून।
बसलाय विळखा घालून।
ऐसा महासर्प आहे कोण।
घ्यावे माणसा जाणून।”

हे गाणे रचले होते त्याच्या वडिलांनी.

त्याच्या लहान वयातील कामगिरीचे काही उत्कट क्षण –

राजस्थानमध्ये युथ फेस्टिव्हलमध्ये लाईट म्युझिक स्पर्धेत त्याने गजल गायली – “हमको किसके गमने मारा ये कहानी फिर सही-” गजलेला त्याला राज्यामधून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
‘ग्लोबल स्टार फाऊंडेशन’च्या स्पर्धेत ‘ओंकार अनादि अनंत’ हे गीत व बडे गुलाम अलीखाँची ठुमरी ‘याद पियाकी आये’ गायला. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते त्याला संगीत साधना युवा पुरस्कार मिळाला.

‘गौरव महाराष्ट्राचा’ या रियालिटी शोच्या ‘ग्रँड फिनाले’मध्ये दुबईला तो सुरेश वाडकर यांचे ‘तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा’ हे गाणे गायला. ते गाणे सुरेशजींना इतके आवडले, की त्यांनी स्टेजवर येऊन त्याला पाचशे रुपये बक्षिस दिले. स्पर्धेत सुरंजन फर्स्ट रनर अप म्हणून जिंकला.

सुरंजनला पुण्याच्या ‘गानवर्धन’ संगीत संस्थेने श्रीरंग संगोरामांच्या नावाने घेतलेल्या शास्त्रीय संगीत स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे अकरा हजार रुपयांचे बक्षिस आणि सन्मानपत्र मिळाले. पुरस्कार देताना प्रभा अत्रे म्हणाल्या, “तू जे शास्त्रीय संगीत गातोस त्यात तुझ्या वयापेक्षा कितीतरी अधिक प्रगल्भता आहे. एखाद्या बुजूर्गासारखी समज तुला मिळाली आहे.”

दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर ‘नादभेद’ स्पर्धेसाठी भारतातून अठराशे स्पर्धक होते. सुरंजनने प्रथम क्रमांकाचा दहा लाख रुपयांचा पुरस्कार पटकावला. स्पर्धा सहा एपिसोडमध्ये झाली. कोलकाता येथे अँकर होत्या शबाना आझमी. सुरंजनचे बाबा म्हणाले, “त्या दिवशी सुरंजनने ‘याद पियाकी आये’ ही ठुमरी गायली. रात्री शबाना आझमींचा मला फोन आला. म्हणाल्या, “काय गातो तुमचा मुलगा… इथून पुढच्या काळात जे महत्त्वाचे आठ-दहा गायक असतील त्यात तुमच्या मुलाचे नाव नक्की असेल!”

शाहीद परवेज यांनीही सुरंजनचे कौतुक केले आणि त्याला सल्ला दिला, की, “कलाकार चांगले गातो, त्याला प्रसिद्धी मिळते, सगळे होते; पण जे टेंपरामेंट गायकाकडे हवे असते ते नसेल, तर गाणे खुलत नाही. इन्शाल्ला जो टेंपरमेंट आपको मिला है, वो कायम रखना.”

परवीन सुलतानानी त्याला ‘ठुमरीच गा’ अशी फर्माइश केली. मग सुरंजनने जंगला भैरवी रागातील ठुमरी सादर केली – ‘नैना मोरे तरस गये आजा बलम…’ ती ऐकून परवीन सुलताना यांनी ‘रिझल्ट जाहीर होण्यापूर्वीच मी तुला फुल्ल मार्क्स दिलेत’ असे सांगून टाकले. तर प्रभा अत्रे म्हणाल्या, “तू क्लासिकलही गातोस, ठुमरी पण, तराना पण – पण प्रत्येकाची जी वेगवेगळी विशेषता आहे, ती तू बरोबर दाखवतोस!”

‘स्पर्धेत इन्स्ट्रुमेंटल, अकंपनीमेंट, व्होकल या सगळ्या प्रकारांमधून सुरंजनला व्होकलला पहिले बक्षिस दिले गेले.’ त्यानंतर विजेत्यांना भारतभरात दहा कार्यक्रमांमधून गाण्याची संधी मिळाली.
त्याने जावेद अख्तर यांच्या एका प्रोजेक्टमध्ये संत कबिराचे दोहे गायले आहेत.

याचबरोबर लखनौला Voice of India पुरस्कार, विश्वनाथ कराडांच्या विश्वशांती केंद्रात गायची संधी, ‘स्वरायन’ या रघुनंदन पणशीकरांच्या संस्थेत गाण्याची संधी, आळंदीला संत ज्ञानेश्वरमहाराज ट्रस्टच्या कार्यक्रमात दरवर्षी त्रयोदशीला, समाधी सोहळ्या दिवशी गाभाऱ्यात भजन सेवा करण्याचा मान त्याला लाभला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने त्याला दोन वर्षांची शिष्यवृत्तीही बहाल केली आहे. उस्ताद झाकिर हुसेन यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचे गुरू अजय पोहनकर गायले होते तेव्हा तानपुऱ्यावर त्यांना साथ करून त्यांचे आशीर्वाद त्याने घेतले.

सुरंजनला पं. गंगाधारबुवा पिंपळखरे उदयोन्मुख कलाकार हा पुरस्कार, ज्येष्ठ व्हायोलिनवादक उस्ताद फैय्याज हुसेन खाँ यांच्या हस्ते मिळाला आहे. सुरंजनला ‘जयपूर जेम्‍स चॅरिटेबल ट्रस्‍ट्र’कडून यंग वोकलिस्‍टकरताची फेलोशीप ५ ऑक्‍टोबर २०१६ रोजी मिळाली.

सुरंजनने वयाच्या मानाने खूप काही मिळवले आहे. मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद, आईवडिलांचा पाठिंबा, उत्तम गुरुंकडून शिक्षण, स्पर्धात्मक यश… पण सुरंजनला मोठा पल्ला गाठायचा आहे. त्याला स्पर्धांच्या पलीकडे जाऊन स्वतःचे असे काही शोधायचे आहे.

त्याला संगीताशिवाय क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम अशा खेळांमध्येही रुची आहे. सुरंजन म्हणतो, “संगीत हेच माझे जीवन आहे. संगीत आहे म्हणून मी आहे!”

सुरंजन खंडाळकर – ९७६२१ २४५१५

– अंजली कुलकर्णी

Last Updated On – 23rd Jan 2017

About Post Author

2 COMMENTS

  1. Best wishes to Suranjan.I
    Best wishes to Suranjan.I feel good to read all positive and good information. Html

  2. Suranjan pudhil watchalis
    Suranjan pudhil watchalis tumhala khup khup shubhecha
    Rajapur Gramasthanche ashirwad

Comments are closed.