सुधीर रत्नपारखी – एक रिक्षा ते वीस बसेसचा ताफा!

10
27
carasole

सुधीर रत्‍नपारखी यांनी सोलापूरातील स्‍वतःच्‍या उद्योगाची सुरूवात एका रिक्षापासून केली. आज त्‍यांच्‍या दाराशी वीस बसचा ताफा उभा आहे. सोलापूरमध्‍ये ‘स्‍कूल बस’ ही कल्‍पना सर्वप्रथम राबवण्‍याचा मान त्‍यांच्‍याकडे जातो.

सुधीर रत्नपारखी यांचे मूळ गाव सोलापूर. त्यांचे कुटुंब नऊजणांचे. आई-वडील, दोन भाऊ (मोठा वसंत व लहान मिलिंद), बहीण चारुशीला, काका आणि आजी-आजोबा. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी एकट्या वडिलांवर. वडील नारायण हे ‘लक्ष्मी विष्णू’ मिलमध्ये कामाला होते, तर आई अंबुताई गृहिणी. त्या घरीच शिवणकाम करून मिळकतीत खारीचा वाटा उचलत.

सुधीर बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना सांगतात, “वडिलांच्या जीवावर खाणारी आम्ही आठ जण होतो. मोठा भाऊ दहावी झाल्यानंतर पुढचे शिक्षण घेताना छोटीमोठी नोकरी करायचा. मला शिक्षणात रस नव्हता. माझ्या घराशेजारी मोठे गॅरेज होते. त्या गॅरेजमधील कामकाज पाहण्यात माझा वेळ जायचा. आमच्या वडिलांना ते आवडायचे नाही. कारण आम्ही जातीने ब्राह्मण. माझा हा छंद त्यावेळी त्यांना दरिद्रीपणांची लक्षणे वाटायची. पण माझ्या मनात गाड्यांनी इतके घर केले होते, की मी आठवी-नववीत असतानाच ठरवून टाकले, नोकरी करायचीच नाही – व्यवसाय करायचा, तोही गाडीचा.” त्यामुळे पुढे, अकरावी झाल्यानंतर सुधीर यांनी ऑटोमोबाईलचा डिप्लोमा केला. सुधीर सांगतात, “पूर्वीचे दिवस आजच्या तुलनेत चांगले होते. तेव्हा नोकऱ्यांची ददात नव्हती. पदवी, पदविका पूर्ण झाली की नोकरी दारात हजर असायची. साधारण 1975 ची गोष्ट. मला दोन नोकऱ्या चालून आल्या. त्यांतील एक होती आरटीओ इन्स्पेक्टरची. पण मी तेथे गेलोच नाही. दुसरी होती, सांताक्रूझला एअरपोर्ट अॅथॉरिटीत. तेथे मी कामावर तीन दिवस गेलो नि नोकरी सोडून घरी आलो. साहजिकच, घरात आरडाओरडा झाला. पण माझे मन नोकरीत रमणारे नव्हतेच. घरच्यांना सांगूनही कळत नव्हते. आज ना उद्या वडिलांना माझा निर्णय योग्य होता हे पटेल असा विश्वास मला होता.”

सुधीर यांनी रिक्षा घेतली तेव्हा त्यांच्याकडे केवळ एक हजार रुपये होते. तेही सोलापूरचे तत्कालीन महापौर गणेश बाळी यांनी मदतीखातर दिलेले. रिक्षा दहा हजार रुपयांना मिळत असे. सुधीर यांनी बाकीच्या नऊ हजार रुपयांचे कर्ज बँकेतून घेतले आणि रिक्षा घरी आणली. सुधीर सांगतात, “रिक्षा घेण्यापूर्वी सहा महिने, मी मित्राची रिक्षा सरावासाठी चालवायचो. त्यातून येणारी सारी मिळकत त्यालाच द्यायचो. आतासारखे कोणी रिक्षा चालवायला दुसऱ्या व्यक्तीकडे देत नसायचे. त्यामुळे मला सराव करायला मिळतोय हेच माझ्यासाठी महत्त्वाचे होते. मी स्वत:ची रिक्षा घेतल्यानंतर एका वर्षात रिक्षासाठी घेतलेले कर्ज फेडले. पहाटे लवकरच रिक्षा बाहेर काढायचो नि रात्री उशिरापर्यंत रिक्षा चालवायचो. मी माझी रिक्षा छान सजवायचो. फुलांनी-गजऱ्यांनी. रिक्षात बसणाऱ्याला एकदम फ्रेश वाटायचे.”

सुधीर यांना रिक्षा विकावी लागली. कारण लहान बहिणीचे लग्न करण्यासाठी पैसे अपुरे पडत होते! त्यानंतर त्यांनी मॅटेडोर नंदू कालेकर या त्यांच्या मित्राने केलेल्या मदतीतून विकत घेतली. त्यांनी मॅटेडोरच्या जोरावर मित्राच्या पैशांची परतफेड करून वर्षभराने 1980 साली ट्रक विकत घेतला. मॅटेडोर आणि ट्रक त्यांनी एका खासगी कंपनीकडे मालवाहतुकीसाठी लावले होते. पुढे, वर्षभरातच अजून एक ट्रक त्यांच्या दाराशी उभा राहिला. तोही मालवाहतुकीसाठी लावण्यात आला. पण म्हणावे तसे उत्पन्न ट्रकमधून मिळत नसल्याने, त्यांनी दोन्ही ट्रक 1983 साली विकून बस घेतली. त्यांनी बसमधून शाळेतील मुलांची ने-आण करण्यास सुरुवात केली आणि त्यांना व्यवसायाचा नवा मार्ग गवसला!

सुधीर सांगतात, “सोलापूरमध्ये, पहिल्यांदा मीच स्कूल बस सुरू केली. सोलापूर शहराच्या परिसरात थोड्या दूर अंतरावर महाविद्यालये सुरू होऊ लागली होती. तेथे पोचण्यासाठी महापालिकेची बससेवा पुरेशी ठरत नाही. त्यातही कॉलेजेसच्या वेगळ्या वेगळ्या वेळा! समाजाची वाहतुकीची ती गरज ओळखून मी ते क्षेत्र निवडले. व्यक्तीमधील गुणवत्ता तिच्या कामास प्रतिष्ठा मिळवून देते. तत्परता, नम्रता, सचोटी या गुणांमुळे मी पालकांचा विश्वास तर संपादन केलाच; शिवाय, मुलांचे प्रेमही संपादन केले. शाळांच्या शिक्षक-मुख्याध्यापकांचाही विश्वास संपादन केला.

“माझा बसचा प्रयोग यशस्वी ठरला – शाळांकडून, लोकांकडून त्याचे कौतुक झाले. मी एका कामानिमित्त जुन्नरला गेलो होतो. तेथे स्कूल बस पाहिली. स्कूल बसची कल्पना मला आवडली. त्यावेळी सोलापूरमध्ये एकही स्कूल बस नव्हती. दहा वर्षांत, म्हणजे 1993 पर्यंत मी एकेक करून एकोणीस बस घेतल्या. ‘सपना स्कूल बस सर्विस’ असे माझ्या मुलीच्याच नावाने व्यवसायाचे नामकरण करून त्या सर्व बस मी शाळांना लावल्या.”

सुधीरचे रिक्षावालेकाका विद्यार्थ्यांना प्रिय असत.  प्रेमळ वागणूक, नियमितपणा व टर्मच्या अखेरीस छोटी पार्टी! – ते पालक-विद्यार्थ्यांना अप्रूप वाटे. सर्वजण सुधीर यांना ‘नाना’ या नावाने ओळखतात. उपक्रमशीलता व कल्पकता हा नानांच्या स्वभावाचा भाग आहे. `स्वप्ना` चालवताना नानांनी विविध उपक्रम केले. ते महिन्यातून एक दिवस मुलांसाठी शिबिर घेत. त्यात खेळ, हस्तव्यवसाय याबरोबरच शहराची `सफर’ असे. त्यांना मुलांना वाहतुकीचे नियम समजावून देण्यासाठी ते शहरातील एका चौकात नेऊन प्रत्यक्ष वाहतूक दाखवत. वाहतूक शाखा ते उपक्रम सध्या करत असते, ते उपक्रम रत्नपारखी यांनी दोन दशकांपूर्वीपासून सोलापुरात केले.

पालकांचे शिबिर हा सुधीर रत्नपारखी यांचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम. `मी पालक, मी संवर्धक` हे त्या उपक्रमाचे नाव. नुसते लाड, नुसता धाक म्हणजे पालकत्व नव्हे तर मुलांच्या गरजा, त्यांची मानसिकता जाणून त्यानुसार त्यांच्याशी संवाद करणे म्हणजे जबाबदार पालकत्व. त्या उपक्रमासाठी सुधीर त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना शिबिरात निमंत्रित करत. वर्षातून एकदा पन्नास किलोमीटर अंतरावरील एखाद्या रम्य ठिकाणी मुलांना सहलीस नेले जाते. शिक्षणशास्त्रात पदवी मिळवणाऱ्यांनी जे करणे अपेक्षित आहे ते हा ‘साधा रिक्षाचालक’ करत होता!

सुधीर यांनी स्कूल बस सर्विस सुरू केली तेव्हा त्यांच्या पत्नी शैलजा यांचे त्यांना मोलाचे सहकार्य मिळाले. शैलजा स्कूलबसमधून मुलांबरोबर शाळेमध्ये जायच्या. मुलांना बसमध्ये बसवण्याचे, उतरवण्याचे, त्यांच्या पालकांना सूचना देण्याचे, मुलांकडे लक्ष ठेवण्याचे; तसेच, अकाउंटचे काम त्या पार पाडायच्या. त्यांच्यामुळे पालक-विद्यार्थी आणि स्कूल बसचा कर्मचारी वर्ग यांच्यामध्ये विश्वासाचे दृढ नाते तयार झाले. त्यांनी घर सांभाळून केलेल्या सहकार्यामुळे सुधीर यांच्या व्यवसायाची भरभराट झाल्याचे ते आवर्जून नमूद करतात.

शैला व सुधीर, दोघांनाही वाचनाची आवड, त्यांनी फिरत्या ग्रंथालयाचा उपक्रमही करून पाहिला. शैला यांनी बालवाडी चालवली. `स्वप्न रंजन`ने लौकिक चांगला मिळवला. दोघांना झाडाझुडुपांची, फुलाफळांची आवड. त्यामुळे त्यांनी ‘स्वप्नरंजन’भोवती नंदनवनच उभे केले.

सुधीर एकसष्ट वर्षांचे आहेत. त्यांनी त्यांच्या व्यवसायातून निवृत्ती पत्करली आहे. त्यांनी त्यांच्या पदरच्या एकोणीस बसपैकी पंधरा बस विकून इतर चार बस त्यांच्या मुलाच्या- निरंजनच्या नावावर केल्या आहेत. ते म्हणतात, ‘वयाच्या पंधराव्या वर्षांपासून मी कमावत आलो. मी स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण केली. आयुष्यातील मोठा टप्पा मी समाधानाने पार केला. माझी इनिंग संपली. आता मुलाची सुरू. त्याला दिलेल्या चार गाड्यांच्या तो आठ गाड्या करेल ते त्याच्या कष्टांवर, नशिबावर अवलंबून.’

निरंजनला त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात रस आहे. सुधीर यांनी व्यवसायाची, घरची आर्थिक सूत्रेही त्याच्याकडे सूपूर्द केल्याने त्याच्यावरील जबाबदारी वाढली आहे. सुधीर म्हणतात, “व्यवसाय करणे सोपे नाही. व्यवसाय करण्याची स्वप्ने पाहू शकतो. पण ती स्वप्ने जिवंत करण्यासाठी काम, मेहनत, कष्ट प्रामाणिकपणे, सचोटीने करायला हवेत. व्यवसायात नुकसान एकदा होईल, दुसऱ्यांदा होईल, पण त्यातील त्रूटी समजल्या की त्यावर मात कशी करायची हे अनुभवच सांगतो. त्यामुळे स्वप्न बघा आणि ते जगवा, इतकेच मी आताच्या पिढीला सांगू इच्छितो.”

सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेल्या सुधीर यांना माणसांचे व वेगवेगळ्या उपक्रमांचे मात्र व्यसन आहे. स्वच्छ उच्चार, स्वच्छ आचार असलेले नाना शहरातील सर्व क्षेत्रांतील लोकांचे मित्र आहेत!

सुधीर रत्नपारखी (0217)2303993
शैलजा रत्नपारखी 9423590354

– अर्चना राणे

(माहितीसंकलन सहाय्य अविनाश बर्वे)

About Post Author

Previous articleगाविलगड – वैभवशाली बांधकामाचा बलदंड किल्‍ला
Next articleमैत्रेयी नामजोशी – तिचा कॅनव्हासच वेगळा!
अर्चना राणे यांनी 'दैनिक प्रहार'मध्‍ये प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्‍यांनी 'लोकमत' वृत्तपत्रात शैक्षणिक तसेच साहित्य आणि सांस्कृतिक बीटसंदर्भात काम केले. राणे यांनी पर्यावरण बीटवर काम करत असताना मुंबई, ठाणे, रायगड येथील खाड्यांची स्थिती आणि तेथील जैवविविधतेवर आधारित 'बाराखाडी' ही वृत्तमालिका लिहिली होती. त्‍यांना त्‍याकरता 2013 मध्ये 'चौथा स्तंभ' पुरस्कार देण्‍यात आला. मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या 'नॉलेज एक्सप्लोरर' या शैक्षणिक मासिकाच्‍या कमात त्‍यांचा सहभाग होता. याशिवाय पुण्यातील प्रबोधन माध्यम या न्यूज एजन्सीसाठीही त्‍या कार्यरत होत्या. पर्यावरण बीटवरील उत्कृष्ट कामगिरीकरता 'दिना बामा पाटील प्रतिष्ठान'चा तर शैक्षणिक बीटवरील उत्कृष्ट कामगिरी करता 'सरस्वती चॅरिटेबल ट्रस्ट'मार्फत 2012 मध्ये आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला होता. त्‍यांना बहुजन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संसदतर्फेही शैक्षणिक बीटवरील स्पेशल स्टोरीजसाठी 2010 मध्ये आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्‍यांनी लहान मुलांसाठी लिहिलेले 'झाडे लावूया' हे गोष्टीचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9820847339

10 COMMENTS

  1. Ata Bharat Dershan jamlyas
    Ata Bharat Dershan jamlyas pardeshi Pravas sarvani karava Tourist Company Laonch karra Age Badhoo Acche Din sea with Family

  2. नाना जिद्द आणि सचोटीचे उत्तम
    नाना जिद्द आणि सचोटीचे उत्तम उदाहरण . मृदू भाषी व आदर्श व्यक्तिमत्व.यापुढेही उत्तम आरोग्य व समाधान लाभो ही प्रार्थना.All the best Nana

  3. Nana tumchya ya karkirdila
    Nana tumchya ya karkirdila manacha mujara..me hi tumchyach bus madhun 6 year college la ye ja karaychi….Nana your are really grt.. Ani thank you nana tumhi students la jababdari ne neta ani titakyach kalji ne ghari aanun sodata pan.

  4. खुपच छान सुधीर यांचा आयुष्य
    खुपच छान सुधीर यांचा आयुष्य पट केवळ मेहनतीने पुढे आले आहेत … त्यांच्या निवृत्त जीवनाला शुभेच्छा ..

  5. Nana tumhchya bus madhun mi 1
    Nana tumhchya bus madhun mi 1 Li te 10 vi surkshit ani anand lutat shalela jat yet hote, mala teva tumhala thank you mhanaych rahunch gel, pan aata mi tumhala mana pasun thanks mhante. Thank you Nana kaka!!

  6. Its really inspirational.
    Its really inspirational..story..
    Always observed.. the dedication towards work..a nice human being…
    Hats off

  7. Preranadayi personality, khup
    Preranadayi personality, khup chan sudhirji iam impress, thank u so much.ya kamasathi tumche khup khup abhinandan.

Comments are closed.