साहित्य सम्राट न.चिं. केळकर ग्रंथालय – सोमवार ग्रंथप्रेमाचा!

2
70
carasole

ग्रंथालयांचे, वाचनालयांचे अस्तित्व हे शहरात सांस्कृतिकपणा जिवंत असल्याचे लक्षण असते. त्यात ते ग्रंथालय दुर्मीळ संदर्भग्रंथांनी समृद्ध असेल तर मौल्यवान पाचू, माणके, हिरेच त्या शहराने निगुतीने सांभाळून ठेवले आहेत असे समजावे. मुंबईतील मुलुंड हे उपनगर सांस्कृतिकदृष्ट्या असे सुसंस्कृत आणि श्रीमंत आहे. मुलुंडमध्ये मोठी म्हणावी अशी तीन ग्रंथालये आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्र सेवा संघा’चे ‘साहित्य सम्राट न.चिं. केळकर ग्रंथालय’.

‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’ ही मुंबईच्या पूर्व उपनगरात सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेली एकोणऐंशी वर्षें कार्य करणारी अग्रगण्य संस्था आहे. संस्थेने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे १९७९ रोजी एका प्रशस्त जागेत ‘साहित्य सम्राट न.चिं. केळकर ग्रंथालया’ची स्थापना केली. उत्तमोत्तम ग्रंथ मराठी वाचकांना उपलब्ध करून देत मुलुंडमधील वाचनसंस्कृती समृद्ध करणे हे ग्रंथालयाने आपले उद्दिष्ट मानले.

ग्रंथालयाच्‍या स्‍थापनेच्‍या वेळी एस.एच. केळकर उद्योगाचे भाऊसाहेब केळकर यांनी आर्थिक मदत केली होती. त्‍यांनी त्‍या ग्रंथालयाला साहित्‍य सम्राट न.चि. केळकर यांचे नाव देण्‍याची विनंती केली. ‘महाराष्‍ट्र सेवा संघा’ने ती मान्‍य केली आणि ग्रंथालयाचे नामकरण ‘साहित्य सम्राट न.चिं. केळकर ग्रंथालय’ असे करण्‍यात आले.

ग्रंथालयाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे मुक्तद्वार पद्धत. सभासदांना पुस्तकनिवडीचे पूर्ण स्वातंत्र्य तेथे आहे. पुस्तके हाताळण्याचे, त्यांच्याकडे डोळे भरून पाहण्याचे, नवीन कोऱ्या पुस्तकांचा गंध घ्राणेंद्रियात भरून घेण्याचे सौख्य वाचकांना तेथे लाभते. ग्रंथालये म्हणजे पुस्तकांचे साठवण केंद्र नव्हे हे ‘न.चिं. केळकर ग्रंथालया’चे व्यवस्थापन जाणून आहे. वाचकांच्या स्पर्शासाठी, त्यांच्या दृष्टिक्षेपासाठी पुस्तकेदेखील आसुसलेली असतात. कपाटातील बंदिवानासारखे जिणे त्यांनाही नकोसे वाटते याची जाण व्यवस्थापनाला असल्यामुळेच मुक्तद्वार पद्धत तेथे अस्तित्वात आहे. वाचकांना निवड सोपी जावी म्हणून प्रत्येक कपाटावर, रॅकवर लेखकांची, विषयांची नावे लिहिलेली आहेत. ग्रंथालयाचे संगणकीकरण झालेले असल्यामुळे, एका क्लिकवर ग्रंथसेवक एखादे पुस्तक उपलब्ध आहे का, ते कोठल्या रॅकमध्ये आहे ते वाचकांना सांगू शकतात.

वाचकांना बोलते करावे यासाठी वाचकसंवाद हा अभिनव उपक्रम ग्रंथालयातर्फे सुरू आहे. दर सोमवारी संध्याकाळी तो संवाद घडतो. वाचक त्याच्या मनातील त्याला आवडलेले पुस्तक, प्रसंगी लेख, नाटक, चित्रपट इतर वाचकमित्रांना त्या संवादात उलगडून दाखवतो. ती समीक्षा नसते. वाचकसंवाद कार्यक्रमातून एक उत्कट ग्रंथानुभव इतर वाचकांपर्यंत पोचतो. अनुभवांची, विचारांची, पुस्तकांची देवाण-घेवाण होते. श्रावणातील सोमवार शिवामुठीचे तसेच, मुलुंडचे वाचक वर्षाचे सोमवार ग्रंथप्रेमाचे पाळतात. सतत कोणी ना कोणी हे व्रत घेतच असते. जुने जातात, नवीन येतात. लंडनमधील हाइड पार्कप्रमाणे हे, कोणीही वाचक तेथे येऊन बोलू शकतो. काही काळानंतर ग्रंथालयाचे सभासद नसलेले वाचक चक्क सभासदत्व घेतात. हा त्या उपक्रमाचा दृश्य फायदा.

प्रतिवर्षी ‘मराठी भाषा दिना’चे औचित्य साधून, साहित्याच्या मुख्य प्रवाहापेक्षा, वेगळ्या लेखनप्रकारात, क्षेत्रात, विषयात साहित्यनिर्मिती करणाऱ्या साहित्यिकाच्या साहित्यकृतीला ‘साहित्यसाधना’ पुरस्कार दिला जातो. त्या साहित्यकृतीची निवड ग्रंथालयाचे वाचक करतात. त्या पुरस्काराचे काही मानकरी आहेत गिरीश कुबेर, संजय ओक, विज्ञानकथा लेखक संजय ढोके, गिरीश प्रभुणे, इसादास भडके. या उपक्रमाचे फलित म्हणजे वाचकांमध्ये कथा, कादंबरी या प्रकारांव्यतिरिक्त इतर साहित्य प्रकारांविषयी आवड निर्माण होते.

बालवाचकांपर्यंत पुस्तके पोचावीत यासाठी ‘बालझुंबड’चे आयोजन केले जाते. दिवाळी अंकातील लिखाणासंदर्भात महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातात. त्यासाठी काही निवडक वाचकांना नोंदवह्या दिलेल्या असतात. उत्तम नोंदवही ठेवणाऱ्या वाचकांचा एका सोहळ्यात सत्कार केला जातो. तसाच आणखी एक आगळा उपक्रम म्हणजे पॉप्युलर प्रकाशनाच्या सहकार्याने साजरा केला जाणारा ‘प्रिय रसिक’ हा तीन दिवसांचा साहित्यिक कार्यक्रम. रसिक वाचकांसाठी तो कार्यक्रम म्हणजे पर्वणीच. गेल्या सहा वर्षांत अनेक दिग्गज साहित्यिकांनी ‘प्रिय रसिक’च्या व्यासपीठावरून त्यांचे विचार व्यक्त केले आहेत. ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे, कवी आणि गीतकार गुलजार, प्रज्ञा पवार, कवी सौमित्र, श्याम मनोहर, देवदत्त पट्टनायक, किरण नगरकर ही त्यातील काही ठळक नावे. मान्यवर इतिहास संशोधक सेतुमाधवराव पगडी हे मुलुंडकर. ग्रंथालय त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रतिवर्षी इतिहास विषयासंदर्भात एक व्याख्यान आयोजित करते. वाचकांच्या आवडीनिवडी त्यांच्या नकळत समृद्ध करणे, अनेकविध साहित्यप्रकारांविषयी त्यांच्या मनी प्रिती निर्माण करणे हे तशा उपक्रमांचे उद्दिष्ट.

ग्रंथालय अनेक संदर्भग्रंथ, दुर्मीळ ग्रंथकोश यांनी समृद्ध आहे. ग्रंथालयाची सभासदसंख्या जवळ जवळ तेराशे आहे. ग्रंथालयाला ‘बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ मिळाला आहे. मात्र ग्रंथालयाचे व्यवस्थापन आत्मसंतुष्ट बनलेले नाही. मुलुंडमधील दूरवरच्या निवासी संकुलातील वाचकांना ग्रंथालयापर्यंत येणे जमत नाही हे जाणून ग्रंथालयाने ‘सिटी ऑफ जॉय’ या संकुलात तेथील वाचकांसाठी आठवड्यातील एक दिवस ग्रंथालयच त्यांच्या दारी नेले आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेपेक्षा ही योजना वेगळी आहे. दर आठवड्याला शंभर नवीन पुस्तके तेथील वाचकांना उपलब्ध करून दिली जातात. ती सेवा सशुल्क आहे. नव्या ‘ग्रंथालय तुमच्या दारी’ या उपक्रमातून नवनवे वाचक ‘न.चिं. केळकर ग्रंथालय कुटुंबा’त सामील होत असतात.

ग्रंथालयाच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ असल्यामुळे, व्यवस्थापनाने मुलुंडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या नववी व दहावी इयत्तांतील विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर पुस्तकपेढीच्या माध्यमातून क्रमिक पुस्तके देण्याचा उपक्रम गेली अनेक वर्षें चालवला आहे. तसेच, मुंबई ‘नॅब’ संस्थेच्या सहकार्याने दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसू इच्छिणाऱ्या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी दृष्टिसेवा केंद्रातर्फे अभ्यासवर्ग चालवले जातात.

ई-बुक्स, टी.व्ही., इंग्लिश माध्यमाचा वाढता प्रभाव या सर्वांना तोंड देत ग्रंथालय गेली सदतीस वर्षें तीस हजार ग्रंथांच्या मदतीने वाचकांना सकस दर्जेदार साहित्य देत आहे. भविष्यातही अनेकविध नवीन उपक्रम आयोजित करून वाचनसंस्कृती जिवंत ठेवण्यासाठी ते कटिबद्ध आहे, सेवेसी तत्पर आहे.

संपर्क –
022 2568 1631
mss_mulund@rediffmail.com

– अरुण भंडारे

About Post Author

2 COMMENTS

 1. खुप महत्वाची माहिती व लेखन.

  खुप महत्वाची माहिती व लेखन.
  धन्यवाद

 2. अरुण भंडारे साहेब मला जरा
  अरुण भंडारे साहेब मला जरा सभासदत्व मिळेल का ? कारण सभासदत्व नाकारण्याची देखील ग्रंथालयाची परंपरा आहे तरी कृपया मला सभासदत्व द्यावे हि कळकळी ची विनंती
  रामचंद्र जाधव
  9869672870

Comments are closed.