साहित्यसृष्टीतील महाभारत : वास्तव आणि अपेक्षा

0
43

मराठी साहित्याला ज्ञानोबा, तुकोबा यांच्यासारख्यांची समत्व आणि ममत्व जोपासणारी थोर परंपरा आहे. संत साहित्याच्या कुशीतूनच मराठी साहित्याला धुमारे फुटले आणि वेळोवेळी अनेक प्रवाह तयार झाले. मराठी साहित्य नव्या वाटा, नवी वळणे ओलांडत विकसित होत गेले. परंतु ज्ञानेश्वर, तुकाराम वगळता कोणते मराठी साहित्य आणि किती मराठी साहित्यिक गेल्या सातशे वर्षांत जागतिक बनले? तुकारामांची गणना जागतिक महाकवी म्हणून केली जाते. मराठी भाषेला तुकोबांची भाषा म्हणून जगात अधिमान्यता मिळते. तसे वैश्विक परिमाण मराठी भाषेला आणि साहित्याला ज्यांनी मिळवून दिले, त्या भाषेतील साहित्य आणि साहित्य संमेलने राजकारणातील संदर्भहीन, संकुचित मुद्यांनी गाजत आहेत. साहित्यक्षेत्रात साहित्यबाह्य गोष्टी वरचढ ठरत आहेत. अखिल भारतीय मानले जाणारे साहित्य संमेलन ना साहित्य रसिकांच्या मनाचा विचार करते, ना सन्माननीय साहित्यिकांचा! मुठभर लोक एकत्र येऊन अखिल साहित्याचा गाडा हाकतात आणि त्यांना राष्ट्रीय लेबल लावून मिरवतात!

लोकशाहीमध्ये लोकांना महत्त्व असते; परंतु येथे स्वार्थाने प्रेरित झालेली आणि साहित्यसंस्कृतीचा ठेका जणू त्यांच्या हाती आहे अशा अभिनिवेशाने वागणारी मंडळी आहेत. मराठी साहित्य हे तशा गटबाजीने, जातीय अभिनिवेशाने, कंपुगिरीने ग्रासलेले आहे. खरे वाचक आणि रसिक मात्र त्यापासून दुरावत आहेत.

मराठी साहित्यात काही सन्माननीय अपवाद वगळले तर सर्वस्तरीय वाचकांचे समाधान करू शकेल, समग्र जीवनाचे दर्शन घडवेल असा, लेखन गाभीर्याने करणारा लेखकवर्ग दुर्मीळ होत आहे. परंतु साहित्याच्या गुणगानाचे ढोल मात्र जोरात वाजताना दिसत आहेत. ‘तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा’ अशी साहित्यक्षेत्रात उदयास आलेली नवी भलावण संस्कृती जोमाने वाढत आहे. गटबाजीने व कंपुगिरीने भारलेले आणि बहकलेले साहित्य आणि त्या साहित्याच्या उत्सवाची पालखी वाहणारे धुरीण अखिल भारतीय म्हणवण्याच्या पात्रतेचे आहेत का? साहित्याला सर्वस्तरीय वाचक लाभत आहे का? नवीन पिढी कोणते साहित्य वाचते? समाजजीवनातील सर्व घटकांना साहित्यक्षेत्राकडे कसे आणता येईल? त्या प्रकारची चर्चा साहित्यक्षेत्राच्या व्यासपीठावर आणि संमेलनात होते का? हे खरे साहित्यक्षेत्रातील कळीचे मुद्दे आहेत. एकीकडे मराठी विद्यापीठीय अभ्यासक आणि प्रकांडपंडित समीक्षक यांनी मराठी साहित्यक्षेत्रातील जुन्या मान्यवर लेखकांना वास्तवतेच्या नावाखाली अडगळीत टाकले आहे. परंतु बहुसंख्य मुरलेले वाचक मात्र त्याच लेखकांच्या साहित्याला पसंती देत आहेत. माझ्या शहरातील सलूनचे दुकान चालवणारा एक वाचक खांडेकर, नेमाडे, रंगनाथ पठारे, आनंद यादव, पु.ल., अरुण साधू यांचे साहित्य वाचतो- त्यावर चर्चा करतो. त्याला साहित्याचे प्रवाह, प्रकार- त्यांची चिकित्सा यांचे घेणेदेणे नाही. तो त्या साहित्याकडे साहित्य म्हणून निखळ, निकोप दृष्टीने पाहतो. म्हणून तो कोणत्याही प्रवाहातील लेखकांचे साहित्य वाचू शकतो, त्याचा आस्वाद घेतो. ही निखळता आणि सुसंस्कृत रसिकता साहित्यक्षेत्रात मिरवणाऱ्या किती लोकांकडे आहे? गदिमांसारख्या महाकवीला गीतकार म्हणून बाजूला केले गेले. अनेकांनी त्यांची शक्ती गीत आणि काव्य यांच्यातील वेगळेपण शोधण्यात वाया घालवली. सर्वसामान्य रसिक मात्र गीत आणि काव्य यांचा आनंद-मौज लुटत राहिले. त्यांना गदिमा माहीत आहेत. समाजमनात लोकप्रिय असणारे असे काही साहित्यिक साहित्यसमीक्षेच्या दरबारात उपेक्षित राहिले.

अजूनही वाचक खांडेकर, शिवाजी सावंत यांसारख्या साहित्यिकांचे साहित्य वाचत असतील तर, वाचकांची अभिरुची घडवण्यात मराठी लेखक कमी पडले असे म्हणण्यास वाव आहे. त्या वाचकांना प्रतिगामी किंवा सामान्य दर्जाचे वाचक म्हणून कसे चालेल? कधीतरी सामान्य वाचक, मध्यम वाचक यांच्या ‘बकेटलिस्ट’मधील साहित्य पाहिले पाहिजे. या वाचकांची डायरी तपासून मग जुन्या लेखकांबद्दल, कवींबद्दल नाक मुरडले तर चालेल! आजच्या कोणत्या कवींची कविता समाजमनात घर करून आहे? एखाद्या कवीची कविता अवतरणासारखी, सुभाषितासारखी लोकभाषेत रूढ होणे हा त्या कवीचा सर्वोच्च सन्मान असतो, ते भाग्य मराठी संत, शाहीर, काही अंशी पंडित आणि बहिणाबाई, ना.घ. देशपांडे, बोरकर, खानोलकर, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर, महानोर ते दया पवार, विठ्ठल वाघ, इंद्रजित भालेराव या कवींना लाभले. आता कोणाची व कोणती कविता शालेय मुलांच्या तरुणांच्या ओठावर आहे हेही एकदा तपासून पाहवे लागेल. मुक्तछंदाच्या नावाखाली मराठी काव्यातील नजाकत, तरलता आणि सौंदर्यच संपले आहे! म्हणून कविता हा प्रकार हेटाळणीचा झाला आहे. दर्जेदार कविता वाचली जातेच!

अलिकडेच, राष्ट्रीय पातळीवर वाचकांचा जो सर्व्हे करण्यात आला, त्यात बहुसंख्य तरुण पिढी काय वाचते त्याचे विश्लेषण आहे. वाचनसंस्कृती संपली, आजचे साहित्य कोणी वाचत नाही अशी ओरड करून चालणार नाही. अनेक लोक वाचतात. प्राध्यापकांपेक्षा इतर क्षेत्रांतील वाचकवर्ग मोठा आहे. सुशिक्षित, अक्षरओळख असणारे, ज्यांना वाचता येते असे शेतकरीही साप्ताहिक पुरवण्यांचे आणि काही प्रमाणात साहित्याचे वाचन करतात. लेखक त्यांना काय देतात? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

इतर भाषांतील अनुवादित साहित्य फक्त तरुण पिढी नाही, तर शालेय विद्यार्थीही वाचतात. तशा अनुवादित साहित्याला मोठी मागणी आहे. उलट, तरुण मराठी साहित्य वाचत नाहीत. कारण ते तरुणांच्या मनातील प्रश्नांपासून, त्यांच्या भावनेपासून, त्यांच्या आशाआकांक्षेपासून क्षितीजपार आहे. ते तसे साहित्य कसे वाचतील? मराठीत लिहिणारे भरघोस आहेत, पण मान्यवर ज्येष्ठ लेखकांची नावे सांगा म्हटले तरी ती दहाच्या पुढे जाणार नाहीत. त्यांच्या साहित्याचे पुढे काय होते? मुलांना ‘अल्केमिस्ट’, ‘हॅरी पॉटर’ माहीत आहेत, पण साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी कादंबरी माहीत नाही. असे का होते? या प्रश्नाचा विचार गांभीर्याने व्हायला हवा. वाचणारी तरूण पिढी जागतिक संदर्भ माहीत असलेली आहे. तिला कोते मराठी साहित्य तिच्या भावजीवनाचा, विचारविश्वाचा भाग वाटत नाही. मराठी तरुण मूळ इंग्रजी व मराठीत अनुवादित साहित्याचे वाचन करत आहे, परंतु मराठी साहित्य आणि साहित्यिक मात्र ‘लोकल’ भानगडीतून बाहेर पडण्यास तयार नाहीत. ही बाब साहित्य-संस्कृतीच्या निकोप वाढीसाठी हानिकारक आहे. साहित्य आणि संस्कृती यांचे सर्वस्तरीय नुकसान होण्याचा धोका त्यात आहे.

साहित्याच्या उत्सवात रसिकतेचा सन्मान व्हावा, साहित्य संमेलने रसिकमान्य असावीत, तेथे साहित्याच्या सर्वांगीण विकासासाठीचे प्रश्न उपस्थित व्हावेत, तशा चर्चा घडाव्यात, परंतु यवतमाळ संमेलनातील महाभारत वेगळ्याच कारणाने गाजत आहे. अरुणा ढेरे यांची निवड सन्मान्य आणि आश्वासक वाटत होती; परंतु मंडळाच्या भूमिकेने ते संमेलनही वाजण्याआधीच गाजले. अनेक मान्यवर साहित्यिकांना संमेलनाचे अध्यक्ष व्हावे असे वाटत नाही, असे का? त्याचाही विचार करायला हवा. साहित्यक्षेत्रातील राजकारण, अर्थकारण, स्वार्थकारण असेच चालू राहिले तर येणारी पिढी या साहित्यापासून दुरावण्याची भीती आहे. तशी निकोपता जपायला हवी, म्हणजे साहित्याचा उत्सव सर्वमान्य होईल. नाहीतर वाचणारे तेच, गाजणारे तेच, पुरस्कार देणारे तेच आणि घेणारे तेच हे सवंग प्रायोजित साहित्यचित्र मराठीत तयार होऊ घातले आहे. ते महाराष्ट्राच्या सुसंस्कृततेला अशोभनीय आहे.

– अशोक लिंबेकर

About Post Author