सावाना : पावणेदोनशे वर्षें सशक्त!

0
48
_SaaVaaNaa_1.jpg

नाशिकचे ‘सावाना’ हे एकशेअठ्याहत्तर वर्षांचे वाचनालय म्हणजे नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा, आस्थेचा विषय आहे. ते नाशिककरांच्या विसाव्याचे ठिकाणही आहे. ‘सावाना’ची जोपासना करणाऱ्या शेकडो हातांनी काळाबरोबर राहण्याची यशस्वी कसरत केली आहे. त्यामुळे वाचनालयाचे रूप पावणेदोनशे वर्षें उलटून गेली तरी सशक्त राखले गेले आहे. इतक्या वर्षांत वाचनालयाची अनेक नामकरणे झाली, जागाबदल झाले, तरीही साहित्य संस्काराचा मूळ हेतू आबाधित राहिला.

‘सावाना’बद्दलची औपचारिक माहिती ‘आनंदनिधान’ या ‘सावाना’च्या स्मृतिग्रंथात अनौपचारिक पद्धतीने वाचण्यास मिळते. त्या ग्रंथास अनौपचारिक रूप लाभले, कारण ती माहिती वाचनालयाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या लेखणीतून नव्हे तर अंतःकरणातून अवतरलेली आहे. त्यामुळे ‘आनंदनिधान’ या स्मृतिग्रंथाला अनोखे मूल्य लाभले आहे. कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, सेतुमाधवराव पगडी, गोविंद तळवलकर, गंगाधर गाडगीळ, माधव गडकरी, ग.प्र. प्रधान. आदी दिग्गजांचा वाचनस्पर्श लाभलेल्या ‘सावाना’चा प्रवास ‘आनंदनिधान’मधून उलगडत जातो आणि एक ललितकृती वाचल्याचा आनंद वाचकाला मिळतो.

वाचनालयाची स्थापना 1840 मध्ये नाशिकच्या सरकारवाड्यात झाली. सराफपट्टीजवळचा तो पेशवे वाडा पाडण्याची गरज कालांतराने निर्माण झाली. माधव गडकरी यांनी लिहिले आहे – “हा कार्यक्रम आपण लवकर संपवला पाहिजे, कारण ज्या वाड्यात आपण बसलो आहोत तो कधी कोसळून पडेल याचा नेम नाही.” डॉ. अ.वा. वर्टी त्यांच्या नेहमीच्या मिस्किलपणे सरकारवाड्यातील एका समारंभावेळी म्हणाले, “पेशवेवाडा पाडण्यात येणार आहे या वार्तेचे वैषम्य तर वाटलेच, परंतु त्यापेक्षाही या पुराणवास्तूतील ऐतिहासिक वाचनालय कोठे जाणार हा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटला.” तो सोडवला एका पारशी गृहस्थांच्या मृत्युपत्राने. नाशकातील ‘बॉईज टाऊन’ या संस्थेचे शिक्षणप्रेमी संस्थापक एफ.एच. दस्तूर यांनी त्यांच्या मृत्युपत्रात वाचनालयास पत्नीच्या नावे पन्नास हजार रुपये देण्याचे लिहून ठेवले. सोबत, त्यांनी त्यांच्याजवळचा अमोल ग्रंथसंग्रहही वाचनालयाच्या नावे करून टाकला!

नाशिक नगरपालिकेनेही पन्नास हजारांची देणगी जाहीर केली. सरकारने नव्या इमारतीसाठी वाचनालयाला नाशिक हायस्कूलच्या क्रीडांगणावरील जागा विनामूल्य दिली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मे 1962 मध्ये “सरस्वतीच्या हाती भिक्षेची झोळी घेण्याचा प्रसंग येणार नाही” असे जाहीर केले. त्यांनी एक लाखाचे अनुदान दिले. ज्ञानगंगेच्या त्या मंदिराचा खराखुरा पाया असा घातला गेला.

नाशिकचे वाचनालय हे वयोमानाने महाराष्ट्रातील दुसरे. नगर वाचनालयाचा मान पहिला. तो वाडा पेशव्यांचे सावकार रायरीकर यांनी बांधला की थोरले माधवराव पेशवे यांनी याबद्दल इतिहासकारांत एकमत नाही. वाचनालयाचे पहिले खरे नाव काय होते व त्यामागे कोणत्या व्यक्तीची प्रेरणा होती हा इतिहासही अंधारातच आहे. नाशकात हायस्कूलची स्थापना 1871च्या सुमारास झाली व वाचनालयाच्या कार्याला चालना मिळाली. नाशिक जिल्हा गॅझेटियरने 1883चा अहवाल देताना वाचनालयात दोन हजार ग्रंथ व मासिक उत्पन्न पन्नास रुपये होय असे म्हटले आहे. वाचनालयाचे वर्गणीदार 1985 मध्ये पासष्ट असल्याचा उल्लेख आढळतो. ‘ज्ञानवर्धिनी’ ही नाशिकच्या वाचनालयाचीच उपशाखा. तिच्यावतीने नाशकात झालेल्या व्याख्यानांसाठी महाराष्ट्रातील नामवंत व्यक्ती व विचारवंत या वाचनालयास भेट देऊन गेले. न्यायमूर्ती रानडे व लोकहितवादी या दोघांच्या नाशकातील वास्तव्याने वाचनालयास जी प्रतिष्ठा लाभली तिचा उपयोग संस्थेला दीर्घकाळ झाला. रियासतकार सरदेसाई यांच्यापासून ज्ञानकोशकार केतकर यांच्यापर्यंत अनेक व्यक्ती वाचनालयाच्या अध्यक्ष म्हणून आल्या. मानवेंद्रनाथ रॉय यांच्यापासून पुरुषोत्तम टंडन यांच्यापर्यंत अनेक राजकीय तत्त्वज्ञ व नेते वक्ते या नात्याने वाचनालयाच्या व्यासपीठावरून बोलले. 1905 पासून नाशिक महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय गाजले ते गोविंद कवी यांच्या काव्यफुलोऱ्याने व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिवादाने. सार्वजनिक वाचनालय हे त्या दोन्हींचे अगत्याचे स्थान बनले होते.

तरुणांमध्ये वृत्तपत्र वाचनाची आवड स्वातंत्र्यपूर्व काळात विशेष होती, ती वाचनालयाने जोपासली. नाशिकला दैनिके नव्हती. मुंबईची दैनिके दुपारी बाराला काशी एक्स्प्रेसने येत. एजंट करंदीकर दही पुलावर बसत. वाचक वाचनालयात येऊन बसत. वाचनालयाचा सेवक धावत जाऊन वृत्तपत्रे घेऊन येई.

वाचनालयाचा ऐतिहासिक मूल्ये जोपासण्याचा प्रयत्न वस्तुसंग्रहालयाच्या रूपाने दिमाखात उभा आहे. वस्तुसंग्रहालय हा वाचनालयाचाच एक भाग बनले आहे. तेथे असलेल्या अनेक पोथ्या आणि अनेक कागदपत्रे तीर्थक्षेत्राचा महिमा वाढवत आहेत. त्यांपैकी काही पोथ्या शतकानुशतके जुन्या आहेत. हस्तलिखित आणि शिळाप्रेसवरील छापलेल्या पोथ्यांच्या एकूण संग्रहाची संख्या काही हजारांवर आहे.

अनेक पोथ्यांचे डिजिटलायझेशन होऊ घातले आहे. राघोबादादा, माधवराव पेशवे, नाना फडणवीस आणि वासुदेव बळवंत वगैरेंची हस्तलिखिते संग्रहात आहेत.

_SaaVaaNaa_4.jpgरणरागिणींची सुंदर चित्रे हे त्या वस्तुसंग्रहालयाचे आणखी एक आकर्षण आहे. शिवाय स्त्रियांचे पुरातन अलंकार, तांब्या-पितळेच्या सुबक मूर्ती, दिवे अशा वस्तू संग्रहालयात आहेत. मस्तानीचे सुंदर चित्र एका कोपऱ्यात भिंतीवर लटकावलेले आहे. प्राचीन वस्तूंचे ते भांडार अलिकडेच नूतन अद्ययावत अशा दालनात हलवण्यात आले. नाशिकच्या गतेतिहासाचे ओझरते दर्शन तेथे सहजपणे होऊ शकते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन 12 फेब्रुवारी 2004 ला झाले तेव्हा ते म्हणाले होते, ‘वस्तुसंग्रहालयातून फिरताना कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळीओळींतून फिरल्याचा भास मला झाला!’

त्या सुसज्ज दालनात लेखनकलेच्या उगमातील काही टप्पे दर्शवणारे ताम्रपट, शिलालेख, लेखनाचे डेस्क, दौत, लेखणीचे प्रकार; तसेच, दोनशे वर्षांपूर्वीची दुर्मीळ तीस काचचित्रे, सोळा ते अठराव्या शतकातील शस्त्रास्त्रे, विविध धातूंतील मूर्ती असा खजिना आहे. सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती म्हणजे सोळाव्या शतकातील नटराजाची मूर्ती होय. ईस्ट इंडिया कंपनीने 1859 साली तयार केलेला अखंड भारताचा नकाशा हे त्या संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे. गुप्त, सातकर्णी, मोगल, मराठा कालखंडातील दुर्मीळ नाणी आहेत. नाशिकला पुरातन काळापासून असलेली यज्ञयागाची परंपरा चित्रित करणारे यज्ञकुंड, आहुतिपात्र व इतर भांडी, यज्ञाभोवती काढली जाणारी मंडले, ज्येष्ठ चित्रकारांची मूळ अप्रतिम चित्रेही तेथे आहेत.

नाशिकचे कलामहर्षी वा.गो. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षांत तेथे छोटेखानी कलादालन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे वाचनालयाच्या आवारात परिपूर्ण असे कलासंकुल उभे राहिले आहे. शेकडो प्रदर्शने त्या कलादालनात भरली. ‘सावाना’ म्हणजे नुसते पुस्तकालय राहिलेले नाही. नाशिक जिल्ह्याच्या सांस्कृतिक जीवनाची ती गंगोत्री ठरली आहे.

श्री.शं. सराफ यांनी ‘सावाना’चा सारा प्रवास अतिशय उत्कटपणे उलगडून दाखवला आहे, “वाचनालयात ठेवलेल्या सूचना-वहीत 8 एप्रिल 1991 रोजी ‘बालबोध’कार विनायक कोंडदेव ओक यांनी लिहिलेली सूचना वाचताना फार मौजेची वाटते; मात्र ती तत्कालीन परिस्थितीवर झगझगीत प्रकाश टाकते, ‘दिवा फार अंधुक जळतो. वाचता येत नाही. गॅस तेलाचा दिवा असल्याने फार त्रास होतो आणि तो मोठा करण्याचे भय वाटते. मेणबत्त्यांचा प्रकाश असेल तर फार बरे होईल.’ प्रसिद्ध साहित्यिक आणि प्रकांड पंडित लक्ष्मणशास्त्री लेले यांनी 1891 च्या मेमध्ये सूचना केली होती, ‘विनंती ऐसी की या आपल्या शहर पुस्तकालयामध्ये अनाथ सुशील विद्यार्थिजनास काही एक नियमित कालपर्यंत प्रत्यही येण्याची परवानगी असावी. येणेकरून त्या अनाथ विद्यार्थ्यांवर उपकार केल्याचे श्रेय सर्व वर्गणीदारांस येऊन, विद्यार्थ्यांस बहुश्रुतत्व, विद्याव्यासंग इत्यादी गुणांचे संपादन करण्याची हौस मनात येऊन एकंदरीत देशहित होईल.’ ही अत्यंत कळकळीची प्रभावी सूचना त्या काळात मान्य होणे कठीण होते. तरीही जुलै 1905 मध्ये दरमहा दोन आणे वर्गणी देणाऱ्यांचा विद्यार्थी सभासद वर्ग निर्माण करण्यात आला, हेही नसे थोडके.”

नाशिक शहराच्या सांस्कृतिक आणि राजकीय उत्थानाच्या दृष्टीने 1905 या व पुढील काही वर्षांना फार महत्त्व आहे. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावकर, वामन सखाराम ऊर्फ बाबासाहेब खरे व कवी गोविंद दरेकर यांच्या जाज्वल्य देशभक्तीने आणि निस्सीम वाङ्मयप्रेमाने नाशिकचे नाव महाराष्ट्रात पोचले. त्याच काळात शहरात वाङ्मयनिर्मितीही होऊ लागली. त्या जागृतीचा परिणाम वाचनालयावर झाला नसता तरच नवल. सभासद संख्या 1905च्या डिसेंबरमध्ये एकशेसव्वीस होती. इंग्रजी अधिकाऱ्यांनी सभासद होणे बंद केले होते. वाचनालयाचे निमसरकारी स्वरूप कमी झाले होते व ते ‘सार्वजिनक’ होऊ लागले होते. सचिवाचे काम नाशिक हायस्कूलचे मुख्याध्यापक करत, एवढीच ‘सरकारी मुद्रा’ राहिली होती!

वाचनालय मासिक मनोरंजन, चित्रमय जगत, भविष्यविलास, Review of Reviews या नियतकालिकांच्या अधिक प्रती वाचकांच्या सोयीसाठी घेत असे. ‘युद्धाच्या वार्ता रम्य असतात’ हे सुभाषित सर्व काळाला लागू पडते. पहिल्या महायुद्धाच्या काळात महागाईमुळे ग्रंथ, नियतकालिके, नोकरांचे पगार यांत वाढ होऊन वाचनालयावर ताण आला. मात्र वर्गणीदारांची संख्या वाढली.

वाचनालयाच्या नावाचा इतिहासही मनोरंजक आहे. वाचनालयातील खूप जुन्या इंग्रजी आणि मराठी पुस्तकांवर ‘नाशिक लायब्ररी and रीडिंग रूम’, ‘नाशिक जनरल लायब्ररी’, ‘नाशिक सिटी लायब्ररी’, ‘native जनरल लायब्ररी’ अशी वेगवेगळी नावे इंग्रजीतून हाताने लिहिलेली आढळतात. सर्वांत जुन्या शिक्क्यांवर Native Library, Nassick हा इंग्रजी आणि ‘नासिक पुस्तकालय’ हा मराठी मजकूर आढळतो. सन एकोणीसशे चौव्वीस मध्ये वाचनालयाची घटना 1924 मध्ये नव्याने तयार केली तेव्हा ‘सार्वजनिक वाचनालय, नाशिक’ हे नाव दिले गेले आणि ते कायम राहिले आहे.

_SaaVaaNaa_3.jpgवाचनालयाचे ऑक्टोबर 1922 पासूनचे प्रत्येक वर्षाचे अहवाल छापील स्वरूपात उपलब्ध आहेत. पैकी 83व्या वर्षाचा आणि 84व्या वर्षाचा वृत्तांत मुद्रित स्वरूपात प्रसिद्ध झाले आहेत. दोन्ही वर्षांचे वृत्तांत वाचनालयाचे चिटणीस दत्तात्रेय बाळकृष्ण जानोरकर यांनी लिहिलेले आहेत. वाचनालयाच्या इतिहासाच्या दृष्टीने ते बिनचूक, मौलिक आणि महत्त्वाचे आहेत. तशा स्वरूपाचे वृत्तांत पुढे कधी लिहिले गेले नाहीत. जानोरकर यांच्यासारख्या मनःपूर्वक आणि नीटसपणे काम करणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ असतात. त्यांनी तीन वर्षांच्या चिटणीसपदाच्या काळात ग्रंथांची संख्या वाढवणे, वर्गवारी करणे, नवे विविध उपक्रम सुरू करणे, नवीन घटनेचा मसुदा तयार करून मंजूर करून घेणे, वाचनालयाच्या दैनंदिन कामात शिस्त आणणे अशी अनेक कामे निरपेक्षपणे करून ‘नव्या मनू’स प्रारंभ केला. वाचनालयाचे लोकशाही स्वरूप पक्के करून ते बाजूला झाले, हे विशेष!

मुरलीधर शंकर तथा अण्णा औरंगाबादकर यांनी तर ‘सावाना’चे सतत पंचावन्न वर्षें संगोपन केले. औरंगाबादकरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना आणि विचार ‘आनंदनिधान’मध्ये सामाविष्ट आहेत. यशवंत पाठक यांनी त्यांचे “व्यापार साखरेचा; पूजा कपालेश्वराची आणि देवाणघेवाण सार्वजनिक वाचनालयाच्या व्यासपीठाची ही आयुष्यभर जपलेली त्रिवेणी म्हणजे मुरलीशेठ औरंगाबादकर” असे सार्थ वर्णन केले आहे. मधुकर झेंडे यांची ओळख तर ‘नाशिक शहराचा चालताबोलता इतिहास’ अशीच करून देण्यात येते. ग्रंथपाल राजाभाऊ तथा राजाराम शंकर शहाणे यांची ‘सावाना’च्या विकासातील भूमिका अर्थपूर्ण आहे. त्यांच्या जीवनाचा विकासच मुळी ‘सावाना’च्या आधारे झाला. ते सोळाव्या-सतराव्या वर्षी ‘सावाना’त नोकरीला लागल्यानंतर संधी आणि कर्तृत्व यांच्या जोरावर उच्चपदी पोचले आहेत. अ.वा. वर्टी, तात्यासाहेब शिरवाडकर यांच्यापासून श्री.शं.सराफ, अरविंद पोतनीस, रमेश जुन्नरे, वृंदा भार्गवे, विलास औरंगाबादकर, शंकर बोऱ्हाडे असे मान्यवर ‘सावाना’साठी मनःपूर्वक काम करत आले आहेत.

‘सावाना’चे दमदार आणि ओघवते उपक्रम ही खासीयत मानली जाते. 1924 सालच्या वार्षिक समारंभापासून परगावचे विख्यात आणि तपस्वी साहित्यिक; तसेच, विद्वान अध्यक्ष म्हणून बोलावण्याची परंपरा सुरू झाली. महामहोपाध्याय पां.वा. काणे, साहित्यसम्राट न.चिं. केळकर, वामन मल्हार जोशी, ना.वि. कुलकर्णी, सेतुमाधवराव पगडी, ग.दि. माडगूळकर अशी मंडळी व्याख्यानांसाठी येऊन गेली. अटलबिहारी वाजपेयी, माधव गडकरी यांचीही भाषणे झाली.

वाचनालयाचा शताब्दी समारंभ सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली रुंगठा विद्यालयाच्या भव्य प्रांगणात 10 जानेवारी 1940 रोजी साजरा झाला. त्या निमित्ताने ग्रंथ प्रकाशन झाले आणि प्रदर्शनही मांडण्यात आले होते.

वाचनालयाच्या वस्तुसंग्रहालय शाखेतर्फे ‘महाराष्ट्र इतिहास परिषद’ 1966-67 या वर्षांत भरवण्यात आली होती. द.वा. पोतदार अध्यक्ष आणि प्र.पु. वैशंपायन स्वागताध्यक्ष होते. इतिहास संशोधक मंडळाचे कार्यवाह वा.सी. बेंद्रे यांनी विशेष मार्गदर्शन केले. परिषदेत न.र. फाटक यांनी परखड पण मौलिक विचार मांडले अशी नोंद आहे.

नव्या इमारतीच्या प्रवेश दालनास ‘नगरपालिका दालन’ असे नाव देण्याचा समारंभ मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते 6 ऑगस्ट 1967 रोजी झाला.

बालाजी ट्रस्ट, नाशिक यांनी दिलेल्या देणगीबद्दल एका दालनास ‘स्वाध्याय मंदिर’ असे नाव देण्याचा समारंभ शृंगेरी पीठाधिकारी जगदगुरु श्री. शंकराचार्य यांच्या हस्ते झाला व संशोधकांना निवाऱ्याचे स्थान मिळाले.

महाराष्ट्र ग्रंथालय संघाच्या वतीने भरणाऱ्या राज्य ग्रंथालय परिषदेचे एकोणिसावे अधिवेशन डिसेंबर 1967 मध्ये नाट्यगृहात भरवण्यात आले. वि.स. पागे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना ग्रंथालयाच्या दुखण्याची नस बरोबर पकडून शासनास योग्य सूचना केल्या. उद्घाटक होते हरिभाऊ पाटसकर व स्वागताध्यक्ष होते कुसुमाग्रज.  

जुन्या साहित्याच्या विक्रीचा व्यवसाय नेकीने करून असामान्य कर्तृत्वाने पैसे जमवणाऱ्या काशिनाथ परशुराम साईखेडकर यांनी वाचनालयास दिलेल्या पाऊण लाखाच्या देणगीचा स्वीकार समारंभ महाराष्ट्राचे पुराणपुरुष द.वा. पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली 9 सप्टेंबर 1969 रोजी झाला. 29 नोव्हेंबर 1969 रोजी वाचनालयास यशवंतराव चव्हाण यांनी भेट दिली. दोन्ही मान्यवरांनी साईखेडकरांचे भावपूर्ण शब्दांत कौतुक केले.

साने गुरुजी कथामालेचे राज्य अधिवेशन नोव्हेंबर 1970 मध्ये उत्साहाने पार पडले. अध्यक्ष मधुकरराव चौधरी व स्वागताध्यक्ष ग.वि. अकोलकर यांच्या भाषणांनी अधिवेशनात रंग भरला. आंध्रचे तत्कालीन शिक्षणमंत्री नरसिंहराव यांनी उद्घाटनाचे भाषण अस्खलितपणे मराठीतून केले. त्यांनी हरिभाऊंच्या ‘पण लक्षात कोण घेतो’चे तेलगूत रूपांतर कसे केले ते सांगून ‘श्यामची आई’चे रूपांतर करण्याचे आश्वासन दिले, तेव्हा सभा भारावली होती.

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाचनालयाच्या मुक्तद्वार विभागाला ‘फ्रेनीबाई दस्तूर मुक्तद्वार विभाग’ नाव देण्यात आले व कै. एफ.एच. दस्तूर यांचे तैलचित्राचा अनावरण समारंभ तत्कालीन राज्यपाल अलियावर जंग यांच्या हस्ते करण्यात आला. नवीन नाट्यगृहाचे उद्घाटन व ‘परशुराम साईखेडकर नाट्यमंदिर’ हे नामकरण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी उत्स्फूर्तपणे लवून काशिनाथ साईखेडकर यांना वंदन केले. त्यामुळे श्रोते भारावून गेले. पु.लं.नी साईखेडकरांच्या कर्णदानी व्रताची स्तुती मुक्तकंठाने केली. त्यांनी उद्योगपतींची देणगी आणि श्रमिकांची देणगी यांतील अंतर विशद केले. त्या,1971-72 मध्ये एका वर्षांत झालेल्या दोन समारंभांनी वाचनालयाच्या लौकिकात भर पडली. वाचनालयाचे माजी अध्यक्ष तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी नाट्य परिषदेच्या कै.राम गणेश गडकरी पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले व त्यांना पुणे विद्यापीठाच्या वतीने माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या उपस्थितीत ‘डी.लिट.’ ही सन्माननीय पदवी दिली गेली. त्या दोन्ही सन्मानांबद्दल वाचनालयाने मराठी नाट्य परिषद व नाशिक महानगरपालिका या संस्थांच्या सहकार्याने तात्यासाहेबांचा नेत्रदीपक सत्कार सोहळा आयोजित केला. ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची स्थापना वाचनालयातच झाली. प्रतिष्ठानचे कार्यालयही त्याच वास्तूत सुरू झाले.

कविसंमेलन हा वाचनालयाच्या कार्यक्रमांचा जणू प्राण आहे. नाशिकच्या इतिहासात अपूर्वाईने रंगलेली कवींची मैफल म्हणजे वाचनालयाने कुसुमाग्रजांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने रुंगठा महाविद्यालयाच्या प्रांगणात 12 मे 1987 रोजी भरवलेले कविसंमेलन होय. वसंत बापट यांनी संमेलनाचे संचालन केले. कृ.ब. निकुंब, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, ना.धों. महानोर, शंकर वैद्य, विठ्ठल वाघ, किशोर पाठक, आनंद जोगळेकर त्यात सहभागी झाले होते. तात्यासाहेबांचे मनोगत हृद्य होते.

वाचनालयाने पहिले लक्षणीय प्रदर्शन शतसांवत्सरिक उत्सवाच्या निमित्ताने भरवले. शहरात उपलब्ध असलेली विविध ऐतिहासिक साधने उजेडात आणून रसिकांपुढे मांडावी व संशोधनाला शहरात किती मोठे क्षेत्र आहे याची जाणीव व्हावी हा त्या प्रदर्शनाचा हेतू होता. पेशव्यांच्या घराण्यातील प्रत्येक व्यक्तीच्या हस्ताक्षरातील लेख प्रदर्शनात ठेवले होते. प्राचार्य गो.रा. परांजपे यांनी ‘भौतिक शास्त्रीय वाङ्मयाचा विकास’ हा लेख पाठवला. सदर ग्रंथ वाचनालयाने ‘मनोहर ग्रंथमाले’च्या सहाय्याने ‘प्रदक्षिणा’ या नावाने प्रकाशित केला. त्याच्या सात आवृत्ती प्रसिद्ध झाल्या.

वाचनालयाने कुसुमाग्रजांच्या एकसष्टीचे निमित्त साधून ‘साहित्य समीक्षा’ हा ‘कुसुमाग्रज गौरव ग्रंथ’ प्रसिद्ध केला. त्या ग्रंथाला वर्षातील उत्कृष्ट संपादित ग्रंथ म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे परितोषिक मिळाले. कविवर्यांच्या सत्तरीचे अभीष्टचिंतन म्हणून गौरव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. ‘मराठी वाङ्मय – 1947 ते 1960’ हा व्याख्यानमालेचा विषय होता. सुरेंद्र बारलिंगे यांनी उद्घाटन केले. पुष्पा भावे, म.सु. पाटील यांची व्याख्याने झाली. व्याख्यानांचा ‘प्रदक्षिणा’ – भाग 2 हा संग्रह प्रकाशित झाला आहे.

वाचनालयाच्या वतीने साहित्यविकासाला प्रेरक अशी काही पारितोषिके दिली जातात. साहित्यिक मेळाव्यात दरवर्षी नाशिक जिल्ह्यातील कवींच्या उत्कृष्ट कवितांना तीन पारितोषिके ‘कवी गोविंद’ या नावाने दिली जातात. ती पारितोषिके कुसुमाग्रजांनी ठेवलेली आहेत. जिल्ह्यातील कथालेखकांच्या उत्कृष्ट तीन कथांना अ.वा. वर्टी पारितोषिक देण्यात येते. वाचनालय ही अशी पारितोषिके वितरण करणारी नाशिक जिल्ह्यात एकमेव संस्था आहे. वाचनालयातर्फे कार्यक्षम आमदार पुरस्कारही दिला जातो.

शिरवाडकरांनी ज्या दिवशी वाचनालयाचे अध्यक्षस्थान स्वीकारले त्या दिवसापासून वाचनालयाच्या सुवर्णयुगास प्रारंभ झाला असे म्हणता येईल. नव्या वास्तूसाठी जागा मिळणे, देणग्या व अनुदाने मिळणे, बांधकाम सुरू होणे, विविध सांस्कृतिक उपक्रम सुरू होणे, मान्यवरांनी आवर्जून भेटी देणे हे सारे त्याच काळात घडले.

‘सावाना’ने मॉल संस्कृतीतही वाचन संस्कृतीला समृद्ध करण्याच्या दृष्टीने उद्यान वाचनालय उभे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. महाराष्ट्रातील पहिले उद्यान वाचनालय ‘सावाना’च्या वतीने उभे राहिले आहे.

‘सावाना’ला आजवर काही पुरस्कार मिळाले आहेत. वानगीदाखल…

•    1993 साली राज्य शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार
•    2002-03 चा राजा राम मोहन रॉय  लायब्ररी फाउंडेशनचा पुरस्कार
•    उत्तर महाराष्ट्रातील उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार

‘सावाना’चा पत्ता:

सार्वजनिक वाचनालय टिळकपथ, नाशिक-422 001
दूरध्वनी: (0253) 2573129 / 2580788

– अलका आगरकर रानडे
alakaranade@gmail.com

Last Updated On 17 Sep 2018

About Post Author