साने गुरुजी यांचे साहित्य आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी फार मोलाचे कार्य ‘सानेगुरुजी डॉट नेट’ ही वेबसाइट उभी केल्याने घडून आले आहे असे उदगार कामगार नेते,…
साने गुरुजी यांचे साहित्य आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी फार मोलाचे कार्य ‘सानेगुरुजी डॉट नेट’ ही वेबसाइट उभी केल्याने घडून आले आहे असे उदगार कामगार नेते, माजी खासदार डॉ. शांती पटेल यांनी या ‘साइट’च्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी काढले.
शांती पटेल हे समाजवादी पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते असताना ते साने गुरुजी यांच्या शेजारच्या खोलीमध्ये राहात होते, त्यावेळच्या त्या सहवासाचा उल्लेख करून ते म्हणाले, की साने गुरुजी हे पंचामृताप्रमाणे विविध गुणदर्शी व्यक्त्तिमत्त्व होते.
‘सानेगुरुजी डॉट नेट’ या साइटवर साने गुरुजींची ब्याऐंशी पुस्तके वाचायला, डाऊनलोड करायला मिळू शकतात. ती युनिकोडमध्ये आहेत. साने गुरुजी यांचे साहित्य गतवर्षी कॉपीराइट फ्री झाल्यानंतर ‘थिंक महाराष्ट्र’ने ते सर्व अपलोड करण्याचे ठरवले व वर्षभरात जगभरच्या जनतेला ते खुले केले.
राज्य कर्मचारी संघटनेचे संस्थापक र.ग.कर्णिक म्हणाले, की मी साने गुरुजींना पाहिलेले नाही, परंतु आमच्या पिढीवर त्यांचा विलक्षण प्रभाव आहे. विधानभवनासमोर साने गुरुजींचा पुतळा उभारला जायला हवा असे त्यांनी सांगितले.
साने गुरुजी स्मारक संस्थेचे प्रमुख गजानन खातू म्हणाले, की साने गुरुजींची मोहिनी तरुणाईला होती. त्यांनी वयाच्या चौतिसाव्या वर्षी ‘भारतीय संस्कृती’ हा ग्रंथ लिहिला. त्यांचे सगळे कार्य तरुणांसाठी व मुलांसाठी आहे. या वेब साइटमुळे ते पुन्हा एकदा तरुणांशी जोडले जाण्याची शक्यता तयार झाली आहे.
धारप असोशिएटसने ही वेबसाइट उभी करण्यासाठी अर्थसहाय्य दिले. त्या संस्थेचे संचालक अरुण धारप यांच्या सत्कार्याचा सर्व वक्त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
‘थिंक महाराष्ट्र’च्या वतीने किरण क्षीरसागर यांनी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि ‘सानेगुरुजी डॉट नेट’ या दोन्ही वेबसाइटची झलक सादर केली. त्यावेळेचे त्यांचे भाषण उपस्थित श्रोत्यांना विशेष आवडले. आदिनाथ हरवंदे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. त्यांनी गुरुजींच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे उत्तम रीत्या विशद केले.
– थिंक महाराष्ट्र डॉट कॉम
दिनांक – 31.05.2011
{jcomments on}