सांगोल्याच्या साहित्यात परिवर्तनाच्या खुणा

1
40

सांगोला तालुक्यातील कवी, कथाकार, साहित्यिक यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्याकरता मंच उपलब्ध करून देण्यासाठी परिवर्तन साहित्य, सांस्कृतिक परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांना आरंभ झाला. त्यातून नवे साहित्यिक, कवी, अभिनेते व दिग्दर्शक निर्माण झाले. सुनील जवंजाळ, अॅड. महादेव कांबळे, देवदत्त धांडोरे, प्रेमकुमार वाघमारे, संतोष होवाळ, गिरीधर इंगवले, नागेश भोसले, प्रा. डॉ. विधीन कांबळे यांची नावे काव्य संमेलनांत सन्मानाने घेतली जातात. देवदत्त धांडोरे यांच्या ‘पहाटवारा’ व ‘गंध प्रीतीचा’, महादेव कांबळे यांच्या ‘भाकरी की चंद्र’ आणि विधीन कांबळे यांच्या ‘गोधडी’ या काव्यसंग्रहांचे प्रकाशनही झाले आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत जितेश कोळी. त्यांनी त्यांच्या ‘हास्यतुषार’ कार्यक्रमातून सांगोल्याचे नाव महाराष्ट्रभर पोचवले आहे.

परिषदेच्या कलाकारांनी ‘एड्सने ठोठावले स्वर्गाचे दार’ हे प्रबोधनपर नाटक आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर ‘वादळ क्रांतीचे’ हे महानाट्य महाराष्ट्रभर सादर केले. दादा सावंत यांनी ‘शेतक-यांच्या आत्महत्या’, सायली कांबळे या बालकलाकाराने ‘आई मला उमलू दे’, तर जितेश कोळी यांनी ‘पुन्हा एकदा राजे उमाजी’, ‘समतेचे पाणी’, ‘रामजी आंबेडकर- माझ्या भीमरायाचा पिता’, आदी एकपात्री प्रयोगांतून राज्यभर जाणीव जागृतीचे लोण पोचवले. राजकुमार काटे यांनी त्यांचा ठसा कथाकथनाच्या क्षेत्रात उमटवला आहे. साहित्यक्षेत्रात काम करत असतानाच परिषदेने सुनील कांबळे, जितेश कोळी, विधीन कांबळे, दादा सावंत, प्रेमकुमार वाघमारे, दिगंबर नागणे आदी कलाकार चित्रपटसृष्टीला दिले. सागर भजनावळे यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

परिवर्तन साहित्य, सांस्कृतिक परिषदेच्या प्रत्येक सदस्याने साहित्य संमेलन सांगोल्यात घ्यायचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न सत्यात उतरले 9 फेब्रुवारी 2014 रोजी. पंचवीस वर्षांपूर्वी व्यंकटेश माडगुळकर यांच्या अध्यक्षतेखाली सांगोल्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. (अजिंक्य प्लाझा) सांगोला या ठिकाणी परिवर्तन साहित्य, सांस्कृतिक परिषदेने आयोजित केलेल्या पहिल्या साहित्य संमेलनाचा बाज वेगळा होता. ते झाले नामदेव ढसाळ साहित्य-नगरीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक व ग्रामीण कथाकार श्री भास्कर चंदनशिव अध्यक्षस्थानी होते. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष होते आमदार गणपतराव देशमुख आणि स्वागताध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील.

परिसंवादांमध्ये रामनाथ चव्हाण, कृष्णा इंगोले व बाबुरावजी गायकवाड या प्रमुख वक्त्यांनी ‘शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा व आजचे वास्तव’ या विषयावर विचार व्यक्त केले. कथाकथनाचे सत्र विजय जाधव, ज्योतिराम फडतरे व आप्पासाहेब खोत यांच्या ग्रामीण कथांनी गाजवले. काव्य संमेलनामध्ये रमजान मुल्ला, ज्ञानेश्वर कोळी आणि ‘परिवर्तन साहित्य सांस्कृतिक परिषदे’तील नामांकित कवींच्या बहारदार काव्यगायनामुळे रंगत आली.

या साहित्यिक मेजवानीस सोलापूर जिल्ह्यातील शेकडो साहित्यप्रेमींनी हजेरी लावली. परिषदेने द्विवार्षिक साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मनोदय व्यक्त केला आहे.

– नागेश भोसले

 

About Post Author

1 COMMENT

  1. सांगोला तालुक्‍यातील साहित्‍य
    सांगोला तालुक्‍यातील साहित्‍य प्रेमी मंडळींनी एकत्र येवून परिवर्तन साहित्‍य परिषदेची स्‍थापना केली असून या परिषदेने वेगवेगळ्या उपक्रमांतून साहित्यिक चळवळ पुढे नेण्‍याचा प्रामाणिक प्रयत्‍न केला आहे. या साहित्यिक चळवळीला हार्दिक शुभेच्‍छा….!

Comments are closed.