सर्वमंगला सोनामाता

0
28
carasole

सर्वमंगला भगवती सोनामाता या अक्कलकोटवासी श्री गजानन महाराज यांच्या मातोश्री. त्यांच्या कांतीवर जन्मत: व नामकरणाच्या वेळी सोन्यासारखी झळाळी होती. म्हणून वडील रावसाहेब विनायकराव तथा भाऊसाहेब शेगवेकर यांनी तिला ‘सोने, सोने’ असे प्रेमाने म्हणण्यास सुरुवात केली. त्याचे रूपांतर पुढे सोनामाता म्हणून झाले.

खुद्द भाऊसाहेब यांचे जीवन ऋषितुल्य होते. त्यांनी वेदांचे अध्ययन केले होते. श्री स्वामी समर्थांचे उत्तराधिकारी बाळप्पा महाराज (ऊर्फ श्री ब्रम्हानंद सरस्वती) हे देशभर भटकंतीच्या काळात नागपूरला आले असताना त्यांच्याकडून भाऊसाहेबांना अनुग्रह लाभला. ‘समाजाला आलेली धर्मग्लानी दूर व्हावी’ या विचाराने झपाटून टाकलेल्या भाऊसाहेबांनी तपाचरण व गायत्री मंत्राचे पुरश्चरण सुरू केले. मंत्राच्या एक दशांश हवनही केले. सोनामातांचा जन्म 4 जून 1899 (वैशाख वद्य द्वितिया 11 शके 1821) रोजी झाला. तेव्हा त्यांचा सुवर्णवर्ण पाहून ती मुलगी म्हणजे गायत्री पुरश्चरणाचे फळच होय असे भाऊसाहेबांना वाटले. बालिकेचे नामकरण ‘गोदावरी’ असे करण्यात आले. त्यांच्या मातेचे नाव नर्मदाबाई. त्या प्रथमपासून अशक्त होत्या. त्यामुळे त्यांच्या तीन अपत्यांचा सांभाळ भाऊसाहेबांचे कनिष्ठ बंधू गंगाधर महाराज (हे बाळप्पा महाराजांनंतर स्वामी समर्थांच्या पीठाचे अधिकारी बनले) व त्यांच्या पत्नी उमाबाई यांनी केला.

रायपूर-विलासपूर भागात एका अमेरिकन मिशनने शिक्षणसंस्था चालवल्या होत्या. तेथे तिच्याकडून सोनाईस शिक्षण मिळाले व त्यांच्या कनवाळू स्वभावास ख्रिश्चन परिसरात सेवावृत्तीची जोड मिळाली. तेथे काही महिला भजने म्हणण्यासाठी एकत्र येत. सोना व त्यांची बहिण ताबी तेथील शिक्षिकेचे आवडते भजन कधी कधी गुणगुणत असत –

जे का रंजले गांजले|
त्यासी म्हणे जो आपुले|
तोचि साधू ओळखावा|
देव तेथेसी जाणावा|

सोनाईचा विवाह, तिच्या वयाच्या अकराव्या वर्षी रायपूर येथील तात्याजी महाराज राजीमवाले यांचे एकुलते एक चिरंजीव लक्ष्मण (पुढे स्वामी शिवानंद योगिंद्र) यांच्याबरोबर 1910 मध्ये झाला. त्यांनी लग्नानंतर कन्येचे नाव ‘भागीरथी’ ठेवले. ते घरसुद्धा धर्मपरायण होते.

खरगपूरचे प्राचीन काळचे नाव शंबलपूर होते. (कल्की पुराणानुसार भगवान कल्कींचा जन्म शंबलपूर येथे होणार असे दिले आहे.) साकोरीचे उपासनी महाराज 1913-14 च्या सुमारास खरगपूरला गेले व तेथे कामगार वस्तीत राहून सेवा करू लागले. उपासनीमहाराज हे शिर्डीच्या साईबाबांचे प्रधान व सिद्धयोगी असे शिष्य होते. तेथे त्यांची सर्वत्र प्रसिद्धी होऊन अनेकजण त्यांच्या दर्शनास येऊ लागले. बाबा तेथे कधी शेतात जाऊन नांगर ओढण्यास मदत करत, तर कधी कोणाच्या घरचे दळण दळण्यास मदत करत. भाऊसाहेबांसह सोनाईसुद्धा त्या सत्पुरुषांच्या दर्शनासाठी येत.

सोनामाता प्रसूतीसाठी माहेरी खरगपुरास आल्या. तेथे 17 मे 1918 रोजी रात्री त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. तेच श्रीगजानन महाराज होत. सोनामातांना 1921 मध्ये कमलानामक कन्यारत्नही झाले. त्याबरोबरच, सोनामातांची साधना व विरक्ती वाढत गेली.

मधील काळात, पतीला ‘शिवावस्था’ प्राप्त झाल्यानंतर, त्यांचे विविध ‘वृत्तींत’ वावरणे हा सोनामातांसाठी सहनशक्ती व कसोटी यांचा काळ होता. तेव्हाच उपासनी महाराजांनी शिर्डीजवळील साकोरी येथे कन्याकुमारी आश्रम स्थापला. तेथे कुमारी, अविवाहित महिला एकत्र येऊन ध्यानधारणा, साधना, होमहवन करून व्रतस्थ वृत्तीने राहत. सोनामाताही तेथे दाखल झाल्या. त्यांची आसपासच्या गावात झाडलोट करणे, कष्टाच्या कामात मदत करणे, स्वच्छतागृहे साफ करणे अशी कामे नित्याच्या साधनेबरोबर सुरू झाली. त्यांना गोरगरिबांची सेवा करण्यात आनंद वाटे. त्यांनी त्यांची नवीन लुगडीही, उपासनीबाबांच्या सांगण्यावरून मजुरी करणाऱ्या स्त्रियांना देऊन टाकली. केवळ नेसूची वस्त्रे त्यांच्याजवळ राहिली. एका दिवाळीत दारावर भिक्षा मागण्यासाठी आलेल्या एका रोग्याला त्यांनी घरात बोलावले, त्याच्या जखमा धुऊन-पुसून त्याला अंघोळ घातली, नवीन कपडे व फराळाचे पदार्थ दिले. सोनामातांना विश्वात्मक दृष्टी, वैराग्य अवस्था प्राप्त झाली होती.

एकदा, उपासनी महाराजांनी स्वत:ला लाकडी पिंजऱ्यात कोंडून घेतले. त्यांनी ‘बद्ध जीव मुक्त कसा होईल’ असा प्रश्न सर्वांना विचारला. बाबांना दोन-तीन दिवस त्या अवघडलेल्या स्थितीत पाहून सर्वजण कासावीस झाले. सोनामातांनी त्याचे इंगित लक्षात घेऊन, बाबांची अनुमती घेऊन, जवळच्या दत्तमंदिरात ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे| हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे|’ या मंत्राचा टाळजप सुरू केला, तो आजही चालू आहे.

गायत्री मंत्राच्या चोवीस अक्षरांप्रमाणे सोनामातांचे जीवन चोवीस वर्षांचेच ठरले. त्यांना निर्वाणीची चाहूल लागली. त्यांनी बाल गजाननास, ‘तू ध्रुवासारखा होशील’असा आशीर्वाद देऊन, दत्तपादुकांवर दुधाची धार चालू ठेवण्यास सांगितले. सोनामातांची प्रकृती क्षीण झाली होती. त्यांनी अखेरीस, 22 जून 1924 रोजी सायंकाळी बाबांची पाद्यपूजा करून तेथेच देहसमाप्ती केली.

– श्यामसुंदर गंधे

About Post Author