समाजसेवेची भिशी

स्त्रियांचा वावर शिक्षण, नोकरी यांमुळे बाहेर वाढला. त्यांच्या ज्ञानाची, सामाजिक जाणिवेची क्षेत्रे विस्तारली. त्यांच्यात सकारात्मक बदल होत चालला आणि त्याचे प्रतिबिंब भिशीमंडळ, वाचनमंडळ, पुस्तकभिशी यांतून दिसू लागले. त्या सामाजिक जबाबदा-या  उचलू लागल्या. ‘पुणे रोटरी क्लब साऊथ भिशी मंडळ’ हे त्यांपैकी एक. पंचवीस-तीस महिलांनी एकत्रित येऊन मंडळ १९८४ साली डिसेंबर महिन्यात सुरू केले. गरजू संस्थांना आर्थिक साहाय्य पुरवणे हे मंडळाचे उद्दिष्ट.

मंडळाविषयी माहिती देताना अनुराधा सुपणेकर म्हणाल्या, “आम्ही ज्येष्ठ नागरिक महिला यामध्ये आहोत. काही जणींची पंच्याहत्तरी ओलांडलेली आहे. आम्ही सुरुवातीला दरमहा वीस रुपये जमा करत होतो, सध्या पन्नास रुपये जमवतो; वाढदिवस-मुलांची लग्नकार्ये अशा आनंददायी प्रसंगांच्या वेळी थोडी जादा रक्कमही जमा करतो. वर्षाला अंदाजे वीस हजार रुपये जमतात. त्याचा हिशोब मंडळातील मैत्रिणी ठेवतात.”

दुस-या सभासद मीना बापट म्हणाल्या, “माझ्या मैत्रिणी जयश्री बेंद्रे, स्मिता भोळे, संचिता चवताई, स्वाती ओक, पुष्पा भडकमकर, वसुधा गोडबोले, उमा सावंत, सुमन राजहंस, उषा जोशी, चारुशीला पटवर्धन ….. परांजपे या आणि अशा अनेकजणी आहेत, की आम्हाला समाजासाठी काही करायची इच्छा आहे. हे या प्रयत्नामागचे प्रमुख कारण आहे. घरातूनही पाठिंबा आहे. शिवाय, आम्ही आमच्या या कृतीतून आमच्या मुलांच्या समोरही आदर्श ठेवू शकतो. ज्या संस्थांना सरकारी मदत नाही, ज्यांची उद्दिष्टे मोठी आहेत अशा संस्थांना त्यांची गरज लक्षात घेऊन वस्तुरूपात मदत करतो. वैयक्तिक पातळीवर मदत करत नाही. संस्थेला मदत करण्यापूर्वी, आमच्यातील तीन-चार जणी त्या संस्थेला अचानक भेट देतात, त्यांची कार्यपद्धत व विश्वासार्हता यांची खात्री करून घेतात आणि खात्री पटली, की आम्ही जेव्हा प्रत्येक महिन्याच्या दुस-या  बुधवारी भेटतो तेव्हा त्यावर चर्चा होते व मग त्यांना मदत देण्यावर शिक्कामोर्तब केले जाते. काही वेळेला एखाद्या संस्थेला दोनदा मदत केलेली आहे.”

जयश्री बेंद्रे म्हणाल्या, “वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून संस्थांचा परिचय, कार्य वाचण्यात येते. त्यावरून चांगल्या संस्थांची माहिती मिळते. मदत केलेल्या काही संस्था म्हणजे हडपसर कर्णबधिर विद्यालय, रेडक्रॉस, खानापूर अनाथाश्रम, मतिमंद मुलांची शाळा (पावस), सहेली, अनाथ हिंदू महिलाश्रम, सेवाधाम, आश्रमशाळा, डायस झोपडपट्टी याखेरीज चांगल्या स्थितीतील कपडे, भांडी, वस्तू, पुस्तके असे जमवून ती वस्त्यांमधून देणे हेही काम करतो.”

‘स्त्री’ शक्ती मोठी आहे. त्याची जाणीव स्त्रियांना होत आहे. त्यांनी  स्वेच्छेने सामाजिक जबाबदा-या उचलून प्रगतीच्या मार्गावर पुढे पाऊल टाकायला गरजूंना मदत केली पाहिजे. असे चांगले काम करताना त्याच सुंदर होऊन जातात! प्रत्येकाने सांताक्लॉज बनले पाहिजे, कारण देण्यात खरी मौज आहे!

अनुराधा अनिल सुकणेकर
anilsupanekar@hotmail.com
020 24261952/ 020 24262405/ 9371024200
DSK चंद्रदीप, A बिल्डींग, फ्लॅट क्र. 1002/1003,
मुकुंदनगर, पुणे 37

– अनुपमा मुजुमदार

About Post Author